जाता जाता एक नजर इथेही........
Sunday, January 31, 2010
देशोदेशी पुणेरी चुली..........
Saturday, January 30, 2010
१० वाजून १० मिनिटेच का.....
जाहीरात करताना किंवा विक्रीसाठी मांडताना घड्याळात १० वाजून १० मिनिटे ही वेळ दर्शविण्यामागे घड्याळाचे सौंदर्य खुलवणे हाच हेतू प्रामुख्याने असला पाहिजे.
दोन्ही काटे एकावर एक नसल्याने व्यवस्थित व संपूर्ण दिसतात. काट्यांची अशी समअंग रचना ( सिमेट्रिकल -मध्यबिंदू पासून तंतोतंत सारखी परंतु उलट -मिरर इमेज ) बहुतांशी लोकांना अपील होते-आवडते.
घड्याळ कंपनीचा लोगो बहुतेक वेळा १२ आकड्याच्या खाली व घड्याळ्याच्या मध्यभागी असतो. काट्यांच्या या रचनेमुळे तो आकर्षक रित्या मांडला जाऊन लोकांच्या नजरेत भरतो.
टाईमेक्स कंपनीच्या म्हणण्यानुसार पूर्वी ८ वाजून २० मिनिटे ही वेळ दर्शविली जात असे. परंतु घड्याळ हे चेहऱ्याचे प्रतीक मानले तर ८ वाजून २० मिनिटे मधील काट्यांच्या रचनेमुळे चेहरा दुःखी भासतो. याउलट १० वाजून १० मिनिटे मध्ये हसरा चेहरा दिसून येतो. अजूनही ज्या घड्याळांमध्ये कंपनीचा लोगो ६ च्या वर असतो त्या घड्याळांत ८ वाजून २० मिनिटे वेळच दर्शवण्याचा प्रघात आहे.
(माहिती जालावरून संकलित )
Wednesday, January 27, 2010
लोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती
जसे कधीकधी टिसी मुद्दामहून सतावतात तसेच टिसींनाही सतावणारे, पळून जाणारे व त्यांना स्वत:मागे पळायला लावणारेही काही कमी नाहीत. मस्त मजेदार किस्से आपल्या अवतीभोवती रोजचे घडत राहतात. आपल्याला प्रत्येकवेळी ती गंमत अनुभवायला वेळ नसतो पण काही मात्र जणू खास आपली व डब्यातल्या सगळ्यांची करमणूक करायलाच घडतात. रोजच्या गाड्या ठरलेल्या त्यामुळे मैत्रिणी-ग्रुप्सही ठरलेलेच. म्हणजे अगदी नेहमीची गाडी चुकली तरीही पुढच्या दोन-तीन गाड्यांचे समीकरण तयार असतेच. त्या मैत्रिणीही अगदी तितक्याच आपुलकीने आपल्याला सामावून घेतात. सकाळ व संध्याकाळचे हे टॉनिक चुकवणे म्हणजे सगळा दिवस खूप काहीतरी चुकल्यासारखे वाटत राही. सेलफोन्स बोकाळलेले नव्हतेच. फार क्वचितच एखादीकडे दिसत असे. जिच्याकडे तो असे तिला सारखे कोणाचे तरी फोन्स येत, मग कधी मोठ्याने-सगळ्यांना ऐकू जावेच म्हणूनच मुद्दाम, तर कधी इतकी कुजबूज की ज्याच्याशी बोलतेय त्या व्यक्तीला तरी ऐकू येतेय का नाही हाच प्रश्न सगळ्या पाहणाऱ्यांना सतावत राही.
एकदा अशीच माझी रोजची गाडी अगदी चार पायऱ्यांसाठी चुकली. दोन नंबर पासून जीव काढत धावलेली मी वैतागून गेले. पुन्हा जिने चढून पुलावर जाऊन उभे राहावे तोच अनॉन्स्मेंट झाली. आधीची एक लेट झालेली फास्ट तिनावर येते आहे. चला, हे बरे झाले बाई. नाहीतर आज थोडक्यासाठी उशीर होत होता. गाडी आलीही. चढून जरा दम टाकत होते तोच समोर टिसी. मी पर्समध्ये हात घातला तर म्हणाली नको. मी मनोमन खूश. आजूबाजूच्या दोघीतिघींनाही तिने राहू दे म्हणून सांगितले. आम्ही सगळ्या जरा नवलच करत होतो. टिसी एकदम डब्याच्या आत घुसली. आधीच फर्स्टक्लासचा लेडीज डब्बा एवढासा त्यात सकाळी आठ ते अकरा म्हणजे गर्दीचा कहर. आणि त्यावर टिसी आला/आली की ज्याच्या त्याच्या नजरेत चिडचिडेपणा येत असे. जणू ही सारी गैरसोय तिनेच केली आहे या थाटात सगळ्या तो जाहीर उघडही करीत. टिसींची कातडी या साऱ्याला सरावलेली. काय करतील रोजचेच झालेय म्हटल्यावर.
तर ही टिसी खिडकीशी एक जण अगदी हळूहळू सेलवर कुजबुजत होती तिच्याकडे गेली आणि तिकीट म्हणून विचारू लागली. त्या मुलीने अगदी आश्चर्यचकित झाल्याचे भाव डोळ्यात आणत हातानेच तिला आहे ना... असा इशारा केला. सेलवरचे बोलणे सुरूच होते. टिसी म्हणाली, तिकीट दाखव. तसे पलीकडच्या व्यक्तीला एक मिनिट थांब असे सांगत टिसीला म्हणाली, " मी बोलतेय ना, दिसत नाही का? आहे ना पास. रोज रोज काय दाखवायचा? इथे इतक्या जणी आहेत त्यांना विचार ना, मी काय पळून जातेय का? बोलणे संपले की दाखवतेच. " आता हे सगळे बोलण्यापेक्षा पटकन पास दाखवून टाकायचा तर...... टिसी बरं म्हणाली आणि इतरांकडे वळली. इतरजणी त्या सेलवालीवर जाम वैतागल्या. नसता उच्छाद, हिला कोणी सांगितलेय नको ते सल्ले द्यायला, वगैरे बडबडत पर्स मधून पास काढू लागल्या.
क्षणभर टिसीही चकीतच झाली पण अश्या बायकांची तिला सवय असणारच. विजयी मुद्रेने तिने, " काय... चकटफू प्रवास करायला हवा ना? तोही फर्स्टक्लास मधून? "त्यावर टिसीलाच झापत, " अहो, उगाच फालतू बडबड नकोय. मी कळव्याला चढलेय, आता भांडूप येतेय. तेव्हा जो काय मिनिमम होइल तो दंड घ्या. चला पटापट. जितकी स्टेशन्स पुढे जातील तितक्याला तुम्ही जबाबदार, मी त्याचे पैसे भरणार नाही. " हिचाच आवाज चढलेला. टिसीने पावती फाडली तिला दिली आणि वळली. " उरलेले पैसे काय उद्या देणार का? " टिसीपण... वेंधळेपणा की मुद्दाम... पण उरलेले पैसे दिलेच नव्हते ना.... मग चडफडत दिले, ही उतरली. माझी खात्री आहे, मागून येणारी गाडी तिने पकडली असणार. हा रोजचाच प्रकार असेल. एकतर डब्यात टिसी काही रोज येतच नाहीत. चुकून आलाच तर तो तुमच्यापर्यंत पोचेलच असेही नाही. तीन-चार महिन्यातून एकदा असे पैसे द्यावे लागले तरी किती फायद्याचा सौदा होता की हा. पन्हा ना खेद ना खंत.
एकदा अश्याच एक वयस्कर बाई धावतपळत आल्या. " अगो, परेलला थांबेल ना ही गाडी?" मी हो म्हटले. तश्या चढू लागल्या. त्यांना थांबवत मी हा फर्स्टक्लास असल्याचे सांगितले आणि अगदी दहा पावलांवरच असलेल्या सेकंडच्या डब्याकडे बोट दाखवत तिथे जा असेही सांगितले. तसे, " मला माहीत आहे हा पेशल डब्बा आहे ते. माझ्या लेकीने इथेच चढायचे असे बजावून सांगितलेय. तिकीट आहे ना माझ्याकडे." मी चूप. तिकीट असू शकतेच ना....... त्या चढल्या. मुलुंडाला टिसी आली. आमचे पास पाहून पुढे पुढे सरकत या बाईंकडे पोचली. तिकीट दाखवा मावशी, आहे ना? असे विचारताच यांनी सेकंड्चे तिकीट काढून टिसीला दिले. अहो हा फर्स्टक्लास आहे. तुम्ही इथे कशाला चढलात? अगो बया, मला काय माहीत या डब्यात चढायचे नाही. सगळे चढले मग मीही चढले." " हो का? बरं, आता उतरा भांडुपाला आणि जा सेकंडमध्ये. पुन्हा सापडलात तर दंड वसूल केल्याशिवाय सोडणार नाही मी " असे सांगून ती पुढे गेली. या डामरट बाईला मी एवढे सांगूनही - खरे तर तिलाही ते माहीतच होते, तरीही ही आरामात चढली होती. उभा जन्म लोकलने प्रवास केला असेल तिने वर हा अडाणीपणाचा आव...... धन्य. पुन्हा पुढच्यावेळी ती हमखास फर्स्टक्लासच गाठणार होतीच.
माझी जवळची मैत्रीण, दिवस अगदी भरत आलेले तिचे. वसई ते बॉम्बे सेंट्रल, रोजचाच प्रवास. तिकडून शेअर टॅक्सीने ऑफिस. शेअर टॅक्सी मिळवायची असेल तर तुम्हाला झटकन स्टेशनबाहेर पडायला हवे. एकदा का मेंबर पटापट टॅक्सी पकडून गेले की पंचाईत. एकच टिसी रोजच हिला अडवून पास विचारी. आधीच हिचा जीव मेटाकुटीला आलेला तश्यांत हा उच्छाद. एके दिवशी त्याने पास विचारताच ही थांबलीच नाही. सरळ चालू पडली. "ओ मॅडम, कहाँ जा रही हो? तिकीट किधर है?" तुला रोजच माझे तिकीट पाहायचेय ना? मला थांबायला वेळ नाही आत्ता. तू ये माझ्या मागोमाग. ऑफिसमध्ये पोचले ना की दाखवते हं का तुला माझा पास." असे म्हणत ही पुढे आणि टिसी मागे. शेवटी अगदी गेटपर्यंत पोचल्यावर टिसीने नाद सोडला. ही पठ्ठी काही थांबलीच नाही.
काहीवेळा खरोखरच पास संपत आलाय/संपलाय हे लक्षातच नसते. मग अशावेळी अगदी दयनीय अवस्था होऊन जाते. तर कधी काही लोक अतिशय बेमुर्वत आणि निर्लज्ज असतात. तर काहींचा एकदम कॅलक्युलेटेड हिशोब असतो. जोवर लोकल आहे तोवर किस्से तर घडतच राहणार. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार त्यांचे रंगही वेगवेगळे असणार... कधी रडवेले, कधी टाईमपास करणारे तर कधी हळहळ वाटावी असे.
Monday, January 25, 2010
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
चवळी - उसळ
जिन्नस
- भिजलेल्या दोन वाटी चवळ्या.
- एक चमचा जिरे, चार चमचे सुके खोबरे व दोन-तीन सुक्या लाल मिरच्या
- चार-पाच अमसुले, दीड चमचा घाटी मसाला, चवीनुसार मीठ
- चार चमचे तेल, फोडणी-नेहमीचीच ( मोहरी+हिंग+हळद व लाल तिखट-आवडीनुसार )
- मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
मार्गदर्शन
टीपा
Friday, January 22, 2010
नटरंग....
गेले काही महिने या चित्रपटाची गाणी-विशेषतः अमृता खानविलकरचे ' वाजले की बारा ’ व सोनालीचे ' अप्सरा आलीs...’ व ’ नटरंग उभा - टायटल सॊंग ’, बरेच वेळा ऐकली होतीच. नटरंगच्या सगळ्याच गाण्यांचे बोल जास्ती परिणामकारक आहेत. खालोखाल संगीत. शिवाय झी ने प्रचंड गाजावाजा केल्याचेही ऐकत होते. मी ही कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे मूळ कादंबरी व लिहिलेली पटकथा यात किती फेरफार केले आहेत हे मला कळलेले नाही. तरीही श्री. यादवकाका व अतुल ही दोन अस्सल खणखणीत नाणी असल्यामुळे व झी ची प्रचंड प्रसिद्धी पन्नास टक्के डिस्कॉउंट करूनही माझ्या या चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा फारच जास्त असल्या पाहिजेत. लागोपाठ दोन वेळा एका दिवसाचे अंतर ठेवून ' नटरंग ’ पाहिला. गेले चार दिवस मनात तोच घोळत आहे. प्रथम पाहताना, दुसऱ्यांदा पाहताना व दोन दिवस उलटून गेल्यावरही काही विचार तेच राहिलेत. तेव्हा तो पाहून मला काय वाटले ते लिहीत आहे.
गेली बरीच वर्षे म्हणजे - ' आशिकी ’ ( १९९० साली आलेली, महेश भट दिग्दर्शित ) पासून चित्रपट येण्याआधीच सहा महिने आधी गाणी जिकडेतिकडे वाजवायची आणि एक जबरदस्त हवा निर्माण करायची हा पायंडा पाडला व रुजलाही गेला. अर्थात त्यासाठी गाण्यांमध्ये थोडा तरी दम हवाच. पण तो नसला तरीही सतत ऐकून गाणी लोकांच्या कानावर तरी रुळतातच. मराठीतही गेली काही वर्षे असे करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. प्रसिद्धी हवीच त्याशिवाय निभाव लागणार नाहीच. परंतु मराठी सिनेमात यापेक्षाही अतिशय चांगली गाणी आलेली आहेत. तरीही 'वाजले की बारा ’ व ' अप्सरा आली ’ ही संगीत व अप्सरा-सोनालीमुळे जास्त प्रभावी झालीत असे वाटत राहते.
मुळात ’ गुणा ’ हा पैलवान गडी आहे. शेतमजुरी हा त्याचा पेशा. कमावलेलं शरीर असलं तरी मनात कुठेतरी तमाशा-त्यातला वग-लावण्या यावर त्याचा जीव - ओढा आहे. परंतु तो बाईलवेडा नाहीये. त्यामुळेच जेव्हां तमाशा काढायचा हे ठरते तेव्हा त्यात बाईही हवीच हे समीकरण त्याच्या डोक्यात नसतेच. कलेवरील प्रेमाने भारलेला कलावंत गडी. कलेवरच्या प्रेमापायी आणि घरातील दारिद्र्याने, ओढग्रस्तीने त्रासलेल्या गुणाचा हा एक प्रयत्न.
तमाशा नाच्याबिगर होऊच शकत नाही आणि दुसरे कोणी तयार होत नाही हे पाहून एका असहाय क्षणी नाच्याची भूमिका स्वतःच करायचा उरफाटा निर्णय गुणा घेतो. " अरे पर म्या तर राजा हाय नवं........मग......." हा प्रश्न खरे तर तो स्वतःलाच विचारत असतो. गुणाची ती अगतिकता अतुलने चांगली व्यक्त केली आहे. केवळ सदैव पाहिलेले-खरे झालेच पाहिजे असे स्वप्न पूर्ण व्हावे, आपले-घरादाराचे भविष्य घडावे या आशेने नाचा होण्याची तडजोड स्वतःहून स्वीकारतो. पण मुळातला तो पैलवान गडी. केवळ मंचावर फालका माणूस आहे हे समाज पाहत नाही त्यामुळे पुढे जे जे घडते अन गुणाला ही औटघटकेची भूमिकाच खाऊन टाकते याचे चित्रण परिणामकारक झाले आहे.
अजून एक अतिशय खटकलेली घटना म्हणजे गुणाला पुढे करून काम साधणे. हे गळी उतरणे कठीणच आहे. क्षेत्र कुठलेही असेल पण काम साधण्यासाठी नाचाला पुढे करणे हे अशक्यच आहे. तमाशात नयना सारखी नखरेल, नाजूक तरुण नार असताना नाचाला शिंदेशी अशी जवळीक करायला लावून सुपारी मिळवणे म्हणजे अजब गणित आहे. बरे हा शिंदे काही ' त्यातला-समलिंगी संबंधातला ’ दाखवलेला नाही की साधा बोलण्यातूनही तसा उल्लेख नाही. आणि गुणाचे हे असे लाडेलाडे बोलणे-घोळात घेणे एकवेळ नयनाबाई तिथेच बसलेली असताना झाले असते तरीही खपले असते. तिचे मादक कटाक्ष-देहबोली व गुणाचे शब्द. पण तसेही घडत नाही. केवळ पुढचे नाट्य घडवता यावे यासाठी हा प्रसंग रचला गेलाय असेच वाटत राहते.
पुढचा सारा प्रवास-प्रसिद्धी भरभर होते. मग लगोलग पुरस्कारही मिळतो. मग येणाऱ्या सुपाऱ्या, राजकारणी लोकांची कारस्थाने- हेवेदावे आणि त्यातून नाचावर - गुणावर झालेला बलात्कार. नयनाबाईला सोडून गुणाला पळवणे- म्हणजे दोघांनाही पळवले गेलेले दाखवले असते तर जास्त खरे वाटले असते. गुणाचे घरी परत येणे. बाप मेलाय हे तेव्हा तरी कळले असेलच ना..... पण दोन मिनिटांचाही प्रसंग - विवशता - बोच काहीच नाही. अतुलने त्या दोन मिनिटांचेही सोने केले असते. मुळात गुणाची व्यक्तिरेखा व्यवस्थित खुलवायला हवी होती. त्याच्यातला कलाकार, लेखन सामर्थ्य फारसे काही भरीव दाखवले गेलेच नाही. चार टाळकी जमून जेव्हां एखादी सुरवात करतात तेव्हा एकदम काही बेष्ट असत नाहीत पण हळूहळू बदल होतोच ना? इथे तसे काही जाणवतच नाही. तसेच एकदा उध्वस्त झाल्यावर पुन्हा उभारी धरून झालेल्या गुणाच्या आयुष्याची कहाणी अक्षरश: गुंडाळली--नाही उरकूनच टाकली आहे. ' जीवन गौरव ' इतका मोठा मानाचा पुरस्कार प्राप्त व्हावा असे गुणाने काय केले हे उलगडतच नाही. म्हणजे प्रेक्षकांनी सगळे समजून घ्यायचे का? गुणातला ' तो-स्पार्क ' ना आधी नीट व्यक्त होत ना नंतर. मूळ कथानकात हे दाखवले असल्यास पटकथेचा जीव दुबळा झाला असे म्हणावे लागेल आणि मूळ पुस्तकातही ते नसेल तर मात्र तसे मुद्दाम असायला हवे होते असे वाटत राहते.
काही चित्रपट, दिग्दर्शक स्वतःच्या कसबावर जिंकून नेतात तर काही टीम वर्कने तरून जातात. इथे कलाकारांनी अभिनय सामर्थ्यावर व अजय-अतुलच्या संगीतावर सिनेमा तडीस लावला आहे. ’ गुणा-अतुल कुलकर्णी ’. नव्याने काहीही सांगायची गरज नाही. किती ताकदीचा व कसदार अभिनेता आहे हे सगळ्यांनाच ज्ञात आहे. या सिनेमातही प्रचंड मेहनत घेऊन अतुलने गुणाची दोन्ही रुपं अप्रतिम सादर केलीत. बायकापोरांची-बापाची जबाबदारी असूनही फारसे त्यात न गुंतता स्वतः:च्या स्वप्नांसाठी आयुष्य झोकून टाकणाऱ्या - भारलेल्या वेड्याची भूमिका अतुलने समरसून केली आहे. मुळात अतुलची शरीरयष्टी पैलवान प्रकारातील नाहीच. त्यामुळे मेहनत घेऊन तितके मजबूत-पीळदार शरीर कमावले आणि लगोलग इतके उतरवले की नाचाच्या चेहऱ्याला गरजेचा तो उभेपणा, गालफडे आत, मान काटकुळी...... मानले पाहिजे. नुसतेच अभिनय कसब या चित्रपटासाठी पुरेसे नसून भूमिकेसाठी देहबोलीची तितकीच नितांत गरज आहे हे जाणून ती गरज समर्थपणे पुरी केली आहे. मात्र कधीकधी जास्त शुद्ध बोलतो -शिक्षणामुळे आपसूक होणारे उच्चार डोकावतात. शिवाय नाच्याचे काही संवाद तोंडातल्या तोंडात वाटतात. लेकरू तोंडावर थुकते अन पाठ फिरवते त्यावेळी गुणाचा चेहरा जास्ती विदीर्ण व्हायला हवा होता - फाटलेले काळीज दिसायला हवे होते.
सोनाली कुलकर्णी( नंबर-२...) ने मात्र झकास काम केले आहे. मला तिची एंट्रीच एकदम आवडून गेली. जत्रेत तिचे स्वतःच्याच मस्तीत बेभान होऊन नाचणे सहीच झालेय. तिचे लटके-झटके, मुरडणे मस्तच. तमाशाप्रधान नृत्यात तेच तेच असते तरी सोनालीने त्यात जान ओतली आहे. गुणाची बायको- विभावरी देशपांडे यांनी मन लावून भूमिका केली आहे. घर चालायला हवे म्हणून नवऱ्याने कामाला जावे, शेती करावी याकरिता तिचे गुणाला मनवणे, सासऱ्याची तगमग, नवऱ्याचे स्वप्न- त्याची ओढ, त्याची अगतिकता समजून घेण्याचा प्रयत्न, नाचा झाल्यावर ते काम सोडून दुसरे काहीबाही करावे चा वडिलाबरोबर केलेला प्रयत्न व सरतेशेवटी घडलेल्या घटनेने, समाजातील छीः थूने पोळलेली, आयुष्याचे वाटोळे झाले या भावनेने खचलेल्या गुणाच्या बायकोचे काम नीटस केले आहे. किशोर कदम यांचे काम नेहमीप्रमाणेच आहे. खास वेगळेपणा काहीच जाणवत नाही.ते आता टाईप कास्ट होऊ लागलेत. उदय सबनीस यांनी छोटेसेच काम नेटके केलेय. गुणाच्या बरोबरीला सगळ्याच कलाकारांनी योग्य ती साथ दिली आहे.
अजय-अतुल चे संगीत एकंदरीत चांगले झाले आहेच. गाणी मनात रेंगाळतात - काही काळाने आपण गुणगुणू लागतो. ’ खेळ मांडला ’ काळजाचा ठाव घेणारे बोल आणि अजय-अतुलचे संगीत, लाजवाब.
Wednesday, January 20, 2010
अपघात....का घातपात+मिलीभगत......?
Tuesday, January 19, 2010
नॅनो आली रे......
Monday, January 18, 2010
बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२
जिन्नस
- चार वाट्या भिजवून मोड आणून सोललेल्या डाळिंब्या-कडवे वाल
- चार चमचे तेल भाजीसाठी व वरून घालावयाच्या फोडणीसाठी दोन चमचे तेल
- चवीपुरते मीठ, गुळाचे चार-पाच मध्यम खडे ( किसलेला गुळ पाच चमचे )
- दोन चमचे ओले खोबरे व मूठभर कोथिंबीर
- तीन चार सुक्या लाल मिरच्या व फोडणीचे साहित्य
मार्गदर्शन
टीपा
Saturday, January 16, 2010
शेवटी एकदाचे घोडे गंगेत न्हाले........
समोर दिसेल त्या दुकानात घुसून थोडेसे विंडो शॉपिंग करू लागले पण पंधरा मिनिटातच पायांनी कुरकूर करायला सुरवात केली. बिचारे खूप दमले होते शिवाय असाही खूप वेळ आपल्याला विमानतळावर काढायचाच आहे तेव्हा प्रथम थोडा आराम करावा असे ठरवून आम्ही दोघांनी भोज्जाला टच केले. गेट नंबर ७८ हे शेवटचे गेट. सी शेपमध्ये - एका भिंतीला ७२-७४, ७६ दुसऱ्या भिंतीला ७३-७५-७८ व मध्यभागी ७७ अशी गेट्स असून या सगळ्यांच्या सेंटरला मोठ्ठा कॅफेटेरिआ आहे. हुश्श्श..... मी एक मोठा निःश्वास टाकला. हो ना... नाहीतर काही खावे म्हटले की पुन्हा किमान दहाबारा गेट्स तुडवावी लागतील या कल्पनेनेच माझ्या पोटात गोळा आलेला. ७७ च्या समोरच भले मोठे टांगलेले टीवी पाहून एकदाचे स्थानापन्न झालो. जरा श्वास नियमित झाल्या झाल्या मन आजूबाजूला फिरू लागले.
आमच्या समोरच एक वयस्कर व्हाईट अमेरिकन जोडपे बसलेले. त्यांच्या थोडेसे पुढेच एक कपल " तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा " स्टाइलवर स्वतःत मशगुल होते. त्यांच्या शेजारीच.... अरे, ही तर तीच मेक्सिकन मुलगी ना? आपल्यामागेच होती की रांगेत उभी. माझे कुतूहल चाळवले. नेमके तिनेही त्याचवेळी माझ्याकडे पाहिले. मी हात हालवून तिला हाय करताच एखादे कोणी ओळखीचे माणूस दिसावे असे हसू तिच्या चेहऱ्यावर पसरले. तिनेही हात हालवून प्रत्युत्तर केले. आणि बाडबिस्तरा उचलून समोरच बसलेल्या वयस्कर जोडप्याच्या शेजारच्या खुर्चीवर स्थिरावली.
बॅग हा शब्द ऐकताच तिही मैदानात उतरली. ते दोघे मुलीकडे लॉस अँजेलिसलाच निघाले होते. त्यांचीही फ्लाईट चुकली होती. १.५० च्या फ्लाईटची तिकिटे आणि आधीच्या दोनवर ते स्टँड बाय होते. " अग आमच्या दोन्ही बॅग्ज गेल्यात पुढे. सगळी गिफ्ट्सही त्यातच आहेत. आता मला बाई भारी अस्वस्थ वाटतेय. नातवंडांना आजच्या दिवसात भेटणार की नाही काही समजत नाही. ते म्हणतील आजीने आम्हाला चीट केले. येते म्हणाली आणि आलीच नाही." ती अगदी रडवेली झालेली. तिचा नवरा हातावर थोपटून तिचे सांत्वन करत होता. तोच ७४ नंबरवर एकदम गडबड सुरू झाली. एलएचीच फ्लाईट निघणार होती. बोर्डिंग सुरू झालेले. काही लोकांच्या नावाची अनाँन्समेंट सुरू होती. जर ते लोक आलेच नाहीत तर कदाचित या जोडप्याचा व मेक्सिकन मुलीचा नंबर लागू शकला असता. कोणाचीही फ्लाईट, गाडी, बस काहीही चुकणे हे वाईटच त्यात तसे दुसऱ्या कोणाचे व्हावे म्हणजे आपण जाऊ शकू अशी वाट पाहणे म्हणजे...... मनाला एकीकडे अपराधी भावना सतावत असते तर दुसरीकडे आपल्याला जायला मिळेल याचा आनंद. फारच चमत्कारिक अवस्था....
हे तिघेही उठले आणि कॉउंटरपाशी जाऊन उभे राहिले. पण यांच्या आधीपासून नंबर लावून उभे असलेले दोन जण होते. त्यांना फ्लाईट मिळाली. म्हणजे आणखी दोन जणांची चुकली होती. अजून दोन लेडीज नावांची सारखी पुकारणी सुरू होती. अगदी गेट बंद करणार तोच एक जण धापा टाकत आली ... नशीब जोरावर होते तिचे. दुसरीचे नाव पुन्हा एकवार घेऊन तिच्या जागी एका माणसाला त्यांनी पाठवून गेट बंद केले.
अक्षरशः दोन मिनिटेच मध्ये गेली आणि एक अठरा-वीस वर्षांची मुलगी पळत पळत गेटवर येऊन थडकली. अतिशय बारीक शरीरयष्टी, केसांच कसातरी बांधलेला बुचडा. जीन्स, टीशर्ट, खांद्यावर भली मोठी बॅग, पाठीवर दप्तर आणि हातात जाडा कोट. धावताना चष्मा नाकावर घसरलेला. तो सावरायला हात मोकळे नव्हतेच. कॉउंटरवर टेकली तोच कर्मचाऱ्याने आत्ताच गेट बंद केले तेव्हा आता तुला जाता येणार नाही हे सांगताच ती स्तब्ध झाली आणि पाहता पाहता स्फुंदून स्फुंदून रडायलाच लागली. आम्ही सगळे पाहत होतो. कॉउंटरवरील दोघेही जरा बावचळलेच. ही आपली रडतेय रडतेय. एकाने तिचे दुसऱ्या कुठल्याश्या फ्लाईटचे तिकीट करून दिले, पाणीही दिले.
असाच अर्धा तास गेला. ही मुलगी शांत झाली. सेल काढून कोणालातरी काय काय झाले त्याचे रंगून वर्णन करत हसू लागली. चला.... निदान हसतेय तरी. वातावरण सैलावले. तोवर ११.४५ झालेले. भुकेची जाणीव चांगलीच सतावू लागली. आम्ही दोघे कॅफेटेरियाकडे निघालो. ती मक्कू मुलगीही आमच्याबरोबर आली व सोबतच खायलाही बसली. " अग मी पहाटेपासून इथे आहे. भाऊ म्हणत होता तसे कनेक्शन घेऊन किंवा $५० देऊन गेले असते तर बरेच झाले असते गं. नाहीतरी बघ ना आता फ्लाईट मिळेतो माझा खाण्यावर तेवढाच खर्च होणार आहे. शिवाय इतका त्रासही. " अग बाई हे तुला कळतेय ना मग कशाला हा हेकटपणा करायचा....... मनातच मी बडबडत होते. तोच बाजूला ओळखीचा आवाज कानावर पडला.
अरे हा तर चिंकीचा आवाज. म्हणजे हे लोक अजूनही इथेच आहेत. आश्चर्याने मी वळून पाहिले.... चिंकू फॅमिली टाको बेलचे विविधप्रकार घेऊन पलीकडेच बसली होती. आजी-आजोबा खूप थकल्यासारखे दिसत होते. तान्हुले झोपले होते. जरा मोठा नातू आजीला मोठे मोठे डोळे करत रंगून काहीतरी सांगत होता आणि चिंकी अजूनही तडतडच होती. तोच अचानक चिंकू पळत सुटला तो कॉउंटरवर जाऊन थडकला. त्याच्या मागोमाग चिंकीही पळाली. तिथे काय झाले कोण जाणे पण परत आले तेव्हा चिंकीचा चेहरा आनंदाने फुलला होता. टेबलपाशी पोचताच एका फ्लाईटची तिकिटे देत नाहीत म्हणजे काय मी बरी गप्प बसेन. ही बघा आणलीच मी मिळवून या आवेशात ती लगालगा आजी-आजोबांना काहीतरी सांगू लागली. त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रथम अचंबा मग अविश्वास आणि सरतेशेवटी आनंद व सून-लेक जी कोण असेल तिचे कौतुक ओसंडून व्हावू लागले. भरभर खाणे तोंडात कोंबत त्या सगळ्यांनी संपवून गेटकडे धूम ठोकली. चला एका कुटुंबाची तरी नैय्या पार झाली होती.
खाणे संपवून आम्ही तिघे पुन्हा येऊन बसतच होतो तोच अमेरिकन जोडप्याचा स्टँडबाय मध्ये नंबर लागला. ते हॅपी हॉलिडेज-मेरी ख्रिसमस म्हणत बाय करून पळाले. ती फ्लाईट निघताच आम्हाला स्टँडबाय वर टाकलेली फ्लाईट लागली. ते पाहताच नवरा विचारायला गेला. लेकही तोवर अटलांटाला पोचून पुढच्या फ्लाईटची वाट पाहत बसला होता. त्याच्याशी बोलताना एक डोळा नवऱ्याकडे होताच. बोलता बोलता नवऱ्याने खिशात हात घालून पाकीट काढलेले पाहिले आणि मी उमजले. आधीच गगनाला भिडलेले रेटस कमी पडले की काय म्हणून नॉर्थवेस्टने आमची काहीही चूक नसताना आम्हाला अजून $१०० ची फोडणी दिली होती. पण एकदाचे ३.५० च्या डायरेक्ट फ्लाईटचे कन्फर्म तिकीट मिळाले होते. चला आता तरी कुठेही नवीन माशी न शिंकता सकाळी ११.३० वाजता पोचणारे आम्ही दैवाने साथ दिली तर संध्याकाळी ६ वाजता ( म्हणजे डेट्रॉईटच्या वेळेनुसार रात्री ९ वाजता ) पोचणार होतो.
सुतारपक्षी अटलांटावरून वेळेवर उडाला. आम्ही तरीही गेट नंबर ७८ वरच धरणे धरून होतो. अखेरीस ३.१५ ला आमचे विमान आले. ३.३५ ला आम्ही विमानात शिरलो व ४ वाजता चक्क आम्हाला घेऊन विमान उडालेही. टेल विंड असल्याने विमान ५० मिनीटे आधीच पोचले. लेक कधीचाच पोचलेला होता. मित्रही येऊन आम्हा सगळ्यांची वाट पाहत होता. मग सकाळीच रवाना झालेली बॅग पावती दाखवून ताब्यात घेतली आणि मित्राच्या गाडीने घरच्या रस्त्याला लागलो तेव्हा घड्याळात साडेसहा वाजून गेले होते .