रूबीच्या अँजोप्लॅस्टी व ग्राफी जिथे होते त्या विभागातच आम्ही पहाटेपासून बसलो होतो. आजूबाजूला आमच्यासारखीच धास्तावलेली, विमनस्क मने होती. सात तास एकाच कॉरीडॉरमध्ये वावरणारे अनेक जीव व त्यांच्या मनातील विचारांची आवर्तने राहून राहून दिसत होती. कोणीही फारसे कोणाशी बोलत नव्हते. तरीही मनातला कोलाहल, येणारे आठवणींचे उमाळे, मनातल्या मनात मागितली जाणारी माफी, चुकांची कबुली, स्वतःला दिलेली दूषणे. हा विचारही नको असे मन म्हणत असले तरी अपरिहार्यपणे सारखा समोर उभा ठाकलेला प्रश्न, जर काही भयंकर घडलेच तर पुढे काय? नाही नाही असे काही होणार नाही असे म्हणत पुन्हा पुन्हा झटकलेली मान, गालावर मारलेल्या चापट्या.
सूर्य उगवला, कोवळी उन्हे अवतरली, हळूहळू उन्हाचा ताप वाढू लागला. पाहता पाहता आग ओकू लागला. निसर्ग दिवसाच्या वर येण्याबरोबर स्वतःची रूपे बदलत होता. पण त्याची दखल इथले एकही मन घेत नव्हते. काहींची बरीच माणसे अवतीभोवती असल्याने ती लगबग करीत कॉफी/चहा आणत होती. बळजोरीने एकमेकांना पाजत होती. तर काहींचे नातलग आता आपल्याला किती भार पडतोय याचा अंदाज घेत होती. पाय फार अवघडले म्हणून मी उठून फेऱ्या मारू लागले. या कॉरीडॉरला लागूनच एक बऱ्यापैकी मोठी गच्ची आहे. बाथरूम्स, प्यायच्या पाण्याचे तीन-चार नळ. टेबले-खुर्च्या, सिमेंटचे चौकोनात बांधलेले कट्टे, गरम चहा-कॉफी व बिस्किटे आणि डाव्या हाताला एक उघडीच -अर्ध्या भिंती वर छप्पर व आत तीन बाजूंनी बांधून काढलेले सिमेंटचे कट्टे असलेली एक खोलीसदृष्य जागा आहे. गच्चीत बरीच गर्दी होती. काळजीचे स्वर हळूहळू कुजबुजत होते. चर्चा सुरू होत्या.
चालता चालता मी या डाव्या कोपऱ्यातल्या कट्ट्यावर टेकले. डोळे मिटले. गदिमांचे, " सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातून, कोण आवडे अधिक तुला? " हेच गाणे सकाळपासून ऐकू येते होते. बाबांच्या अनेक छोट्याछोट्या गोष्टी आठवत होत्या.... मन गाण्यातील शब्दांबरोबर हिंदोळे घेत होते तोच एक घुसमटलेला- उरी फुटलेला हुंदका आला. क्षणभर वाटले भास झाला. सगळेच जण एकाच बोटीत असल्याने पटकन आवाजाचा माग लागेना. तोच पुन्हा आवाज आला. कोपऱ्यात एक म्हातारे बाबा गुडघ्याला कवळ घालून डोके खुपसून बसले होते. उमाळ्यावर उमाळे येऊन गदगदून रडत होते. आवाज बाहेर फुटू नये म्हणून टॉवेलचा बोळा तोंडाशी धरला होता.
गावाकडून आले असावेत. शेतकरी कदाचित. अगदी फाटकी शरीरयष्टी होती. कधीकाळी पांढरा असलेला सदरा व धोतर आता कळकट झाले होते. पायाला मोठ्याला भेगा होत्या. रापलेला रंग अन राठ खरखरीत हात त्यांचे काबाडकष्ट दाखवत होते. आजूबाजूला कोणीच दिसेना. एकटेच असावेत. कोण बरे असेल यांचे इथे ऍडमिट? त्यांचे घुसमटून घुसमटून रडणे थांबतच नव्हते. त्यांना तसेच सोडूनही जाववेना पण पुढे होऊन बोलावे का न बोलावे? त्यांना अजून त्रास तर होणार नाही.... काही समजेना. शेवटी उठले आणि चहावाल्याकडून चहाचा एक ग्लास घेतला. बाबाच्या समोर जाऊन मांडी घालून बसले. तसे त्याने पटकन वर पाहिले. ओतून आलेले डोळे, फाटलेले मन अन सुकलेले ओठ जरासे थरथरले. नुसताच कण्हल्यासारखा कुठल्याश्या यातनांच्या डोहातून आल्यासारखा एक आवाज तोंडातून निघाला.
माझ्या मनात बाबांच्या आठवणींचा पूर, बाबांचे ऒपरेशन सुखरूप पार पडू देत चा जप त्यात यांचा हा स्वर सगळे बांध तोडून गेला. अश्रू वाहू लागले. आईसमोर एकदाही मी आसवे तरळूही दिली नव्हती. डोळे न पुसताच मी विचारले, " बाबा चहा घ्याल का? तुमच्या आजारी माणसासाठी तुम्हाला निदान काही दिवस तरी जगायलाच हवे ना? घ्या नं.... " असे म्हणत मी त्यांच्या हातावरून हात फिरवत राहिले. डोळे पुसून त्यांनी चहा घेतला. मला हातानेच सुखी राहा गं बाय असे म्हणून पुन्हा नजर खाली लावून बसले. ते पाहून मी हलकेच निघाले. आईशेजारी येऊन बसले. त्या सत्तरीच्या आसपास असलेल्या बाबांचे कोण असेल बरे इथे हा प्रश्न रेंगाळतच राहिला. नंतर बराच वेळ मी पुन्हा बाहेर गेले नाही आणि ते बाबा मला आसपास दिसले नाहीत.
डॉक्टरांनी बळजोरीने आम्हा दोघींना तिथून बाहेर काढल्यावर आम्ही खाली आलो. रूबीच्या गेटमधून आत शिरल्या शिरल्या कँटिन आहे. चहा-कॉफी व वडा, इडली-सांबार, समोसे, पुरी-भाजी सारखे पदार्थ तिथे मिळतात. सारखा माणसांचा राबता असतोच. आईला एका कट्ट्यावर बसवून मी कॉफी घेऊन आले. बाबांचे ऑपरेशन व्यवस्थित झाले होते. मी आणि आई आनंदात होतो. कॉफी घेत एकीकडे मी भरभर तीनचार फोन केले. आम्ही दोघी पुन्हा वर जायला निघालो. येताना एका झाडाखाली पाय पोटाशी घेऊन बसलेली तीन मुले-साधारण पंधरा-बारा-आठ असे वय असेल. बावरलेले- हरवलेले खिन्न चेहरे, वाट पाहणारे-आपले माणूस शोधणारे डोळे. मला एकदम बाबाची आठवण आली.... ही पोरे त्याचीच कोणी असतील का? अजूनही त्या बाबाचे कोण आजारी आहे तेही कळले नव्हते.
वर जाताना पुन्हा लक्ष गेले त्या मुलांकडे आणि समोरून बाबा येताना दिसला. ती त्याचीच नातवंडे होती. मी व आई आणि बाबा एकाचवेळी त्या मुलांपाशी पोचलो. बाबाला आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते. त्याला पाहून पोरे तटकन उठून उभी राहिली. सगळ्यांकडे एकवार पाहून तिघांना त्याने त्याच्या मिठीत कवटाळले. दोन्ही लहान पोरे बावरून गेली पण मोठ्याला कळले होते," आज्या आरं बोल की, आमचा बाबा........ आमचा बाबा बरा आहे ना?" आज्याने त्यांना तसेच घट्ट जवळ घेत खाली बसवले. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत डोक्याला डोकी लावत चौघे धुळीत अनवाणी पायांनी, बोडक्या डोक्याने उकिडवे बसले. आज्याने डोळ्यातले पाणी मुठीने पुसले अन म्हणाला, " पोरांनो बापूस ग्येला तुमचा. ग्येला माझा पोर ग्येला रं पर तुम्ही डरू नका. मी तुमचा आज्या अजून जिता हाय. आता माय बी म्याच अन बापूस बी म्याच. एकडाव किती रडायचं ते प्वाटभर रडून घ्या. नंतर अजाबात कोणी बी डोळ्यातून पाणी काढायचं न्हाय. तुमच्या बापसाचे तेवढेच श्वास लिवलेले होते. पर तुमचा पुरा जलम जायचा आहे. रडत बसून त्यो निभनार न्हायी तवा सारखं डोळं गाळून जमायचं न्हायं. त्यो त्याच्यावाटचे भोग काढून गेलाय आपले अजून बाकी हायेत. मी येतोच त्याला घेऊन मग जाऊ सांगाती घरला. घाबरू नगा तुमच्या आज्यांच्या काळजात अजून ताकद हाय. समदं होतंय. " असे म्हणत तोही पोरांसोबत असहाय आक्रोश करू लागला.
मी, आई व अजून काही जण हे ऐकत होतो. सारेच हेलावलेले, रडत होते. पोरांच्या पाठीवरून हात फिरवून बाबाला नमस्कार करून मी व आई वर आलो. जिने चढताना जाणवत राहिले एक जीव जगला होता तर एक जीव अनेक जीवांना पोरके करून अनंतात विलीन झाला होता.
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?........ गदिमांचे शब्द अन बाबूजींचा आवाज माझे काळीज चिरत राहिला.
काय लिहु?? तू डोळ्यात पाणी आणलंस गं..सध्या तसंही डोळे कारणाशिवायही भरून येतात त्यात हे असे पोस्ट वाचुन खूप गलबलायला झाले....
ReplyDeletesame feelings like as aparna .. Ashwini
ReplyDeleteअपर्णा त्यांची अगतिकता आजही काळजात कळ आणते.गेलेला जीव सुटला म्हणायचे की उरलेल्यांचे भोग अजून वाढले...... असह्य होते सारे. आणि दुस~याच दिवशी त्या आजींची व सुनेची भेट झाली.एकाच वेळी दोन वेगवेगळे प्रसंग तेही आमच्या स्वत:च्या कठिण काळात....
ReplyDeleteहो गं....मला कळतेय....
अश्विनी :)आभार.
ReplyDeleteडोळ्यात पाणी आले गं!!!!यावेळेस सुट्टीत नासिकला गेले तेव्हा आमची आजीही अशीच ICU मधे होती गं....तिचा तो नेहेमीचा कामात रहाण्याचा स्वभाव पहाता तिला ते असे बेडवर पहाणे फार कठीण जात होते.....एकच समाधान होते की तिथेच असणारे ईतर नातवंड काही कारणाने येत नाहीत असे असताना मी मात्र दिवसातून दोनदा तिला भेटत होते.....तिला खाउ घालत होते...तुझ्या या दोन्ही पोस्ट वाचताना सतत डोळ्यासमोर आजीच येत होती बघ!!!!
ReplyDeleteखरच शेवटचा पॅरा वाचे पर्यंत डोळे पाण्याने डबडबून गेले...:(
ReplyDeleteभाग्यश्री ,वाचुन एकदम कसंनुसच झालं. खुप अगतिक वाटल मला वाचुन.
ReplyDelete-अजय
ताई ,
ReplyDeleteहेलावलोग मी....जेव्हा अजोबा बोलयाला लागले तेव्हा तर अंगवार काटाच आला...पन प्रासांगानुरूप त्यांचे धैर्य पाहुन प्रेरणा पन मिलाली....खरच शिकन्या सारखे आहे त्यांचाक्डून....
शब्द्च नाही उरले ग श्री...काय लिहु...खरच पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...
ReplyDeleteतन्वी आपले कोणी, जे नेहमी हसतमुख-कामात असणारे आजारी पडले की मन सैरभैर होऊन जाते.जे घडणार आहे ते टाळता येईलच असे नसले तरी निदान जे आपल्या हाती आहे तेवढे मनापासून करावे.
ReplyDeleteसुहास स्वागत व आभार.
ReplyDeleteअजय हो रे. साध्या साध्या गोष्टीत पण आपण किती कुरकुर करतो नाही....इथे मात्र कोणाचे काही चालत नाही. मागे राहिलेल्यांचे हाल आणिकच वेगळे....:(
ReplyDeleteगणेश खरेच. ती तीन कच्चीबच्ची आई-बाबाच्या माघारी वाढवायची म्हणजे...परिस्थिती कुठल्याही वयाला बळ देते.बाबा पोरांसाठी मनावर दगड ठेवून उभा राहीला.
ReplyDeleteरोहिणी, माऊ.....तेच म्हणते...पराधिन आहे जगती .....
ReplyDeleteतुझं म्हणणं खरं आहे. परिस्थिती कुठल्याही वयाला बळ देते. आत हलल्यासारखं वाटलं हे वाचून.
ReplyDeleteकांचन प्रतिक्रियेबद्दल आभार.
ReplyDeleteफारच छान!
ReplyDeleteThis is a very touchy subject, which i want to forget...for what so ever reasons....
ReplyDeleteमहेंद्र,भापो.
ReplyDeleteमधुमती प्रतिक्रियेबद्दल आभार.
ReplyDeleteमी तर बाबांची तारीख पण विसरले, आई करता, ते गेलेच नाहीत असे समजून वागते. पोस्ट वाच. पुन्हा गलबलून आले......''विसरलेली तारीख'' म्हणून लिहिले आहे. भारतातून मध्य रात्री फोन आला की अजूनही धस्स होते.हात कापरे होतात.
ReplyDeleteअनुक्षरे आपल्या सारख्या हजारो मैल लांब राहणा~यांची सशासारखी गत.रात्री अपरात्री फोन वाजला की काळजात धस्स होतेच.पोस्ट वाचते तुझी.आभार.
ReplyDeleteखरच वाचता वाचता डोळे कधी ओले झाले ते कळलच नाही ...
ReplyDeleteदेवेंद्र प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.
ReplyDeletekaay bolayach g! nukateech ashyaa prasangaatun gele. sagal sagal dolyapudhe ubha kelasa....paaNi aala Dolyatun.
ReplyDeleteश्यामली स्वागत व आभार. ओह्ह्ह...आशा आहे त्यांची प्रकृती सुधारत असेल.लवकर बरे वाटू देत.
ReplyDelete