जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, February 28, 2013

पिंपळ...

माणसाचं मन रोजच्यारोज उत्साहानं नवनवीन गोष्टी शोषत राहते. जोमाने आजूबाजूला घडणार्‍या घटनांवर विचार करत राहते. तितक्याच तगमगीने मागे होऊन गेलेल्या घटनांवर पुन्हा पुन्हा स्वतः:ची शक्ती असे का घडले ची कारण मीमांसा शोधत कष्टी होण्यात घालवते. असह्य जखमांचे क्षण कुपीत भरून खोल खोल डोहात भिरकावून दिल्यावरही पुन्हा एकदा नवीन कुपी आकार घेऊ लागते तेव्हां अगदी अजिबात गरज नसताना ओढवून घेऊन त्या जुन्या निद्रिस्त क्षणांचे पापुद्रे उलगडून तितक्याच असहाय्य वेदना जगण्याचा प्रयास हट्टाने करत राहते.  गिरणीचा पट्टा कसा अव्याहत दळण दळत राहतो. बहुतांशी गव्हाचाच भुगा... कधी जास्ती कोंडा तर कधी कमी कोंडा. का कोण जाणे आपल्या जेवणातला पोळी हा महत्त्वाचा पदार्थ असूनही भाकरीचा मायाळू बाज तिला नाही. म्हणूनही असेल पण कुठल्याही धान्याची भाकरी मनाशी जास्त जवळीक साधून असते खरी. गिरणीच्या पट्ट्याला ही मधूनमधून वेगळेपण लागतेच. कधी ज्वारीबाजरीचे मायाळू कण, तांदुळाचे शुभ्र एक प्रकारचा तलम भास देणारे राजस कण, सणासुदीला भाजणीचे खमंगपण, कधी चुकार साबुदाणा वगैरे उपासाचे चोचले. पट्टा सुरूच. मनाचेही दळण असेच. दिवस रात्र सुरूच. अगदी झोपेतही ते विसावत नाही. प्रयत्न करूनही थांबत नाही. थांबवता येत नाहीच.

ठाण्याच्या घरी हातात चहाचा मग घेऊन मागल्या गॅलरीत मनाची पाटी कोरी ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत मी बसते. आजकाल जागोजागी उंच उंच बिल्डिंग उभारल्यामुळे आकाशाचा मुठीत मावेल इतकाच तुकडा दिसतो अशी एकीकडे तक्रार करणारे मन त्या वाहत्या तुकड्यातून इतक्या अनंत गोष्टी टिपू पाहते की गिरणीच्या पट्ट्याची गती धापा टाकू लागते. मुठीत मावणार्‍या आकाशात भरारी घेणारे मन, डाव्या व समोर दिसणार्‍या रस्त्यावर चोहोबाजू न्याहाळणारे मन, आसपासच्या खिडक्यांमधील वेगवेगळ्या मनांच्या आंदोलनांचा अदमास घेणारे मन, एक नं दोन... हे सारे टिपून घेत असतानाच समांतर धावणारी माझ्याही मनाची अजब खेळी. शक्य तितके मन कोरे ठेवण्याचा चुकार प्रयत्न आजही हाणून पडलेला दिसल्यावर तो खुळा प्रयास सोडून मी स्वत:ला स्वाधीनच करून टाकलेले. खाली डोकावून पाहत होते तर दुसर्‍या मजल्यावरील दातेकाकूंच्या गॅलरीशेजारील पाइपाला धरून एक छोटेसे पिंपळाचे रोप जीव धरू लागलेले. जेमतेम फूटभर उंचीचे रोपटे. त्यावर चार कोवळी पाने नुकतीच जन्मलेली दिसत होती. लाल तांबूस तपकिरी रंगांची ती नाजूक पानं दिसेल तितके जग किलकिल्या डोळ्यांनी असोशीने पाहत हसत होती. मन तिथेच घुटमळू लागले.... मनाला लगाम घालत नजर हटवली तरी हे हट्टी ते बेटे ऐकतेय थोडेच... पुन्हा त्या कोवळ्या जीवाभोवती रुंजी घालू लागले... अन हे काय...

अरे हो हो... इतक्या घाईने कुठे पळत सुटलेय आता. जरा अंधुक अंदाज येऊ लागलेला. गेल्या मायदेशीच्या फेरीत बसलेली एक जीवघेणी ठेच पुन्हा एकवार वर आलीये. आजचा फेरा ’ राधाक्काच्या ’ परसातल्या पिंपळाच्या पारावर... नक्कीच. तोच दिसतोय, माझा आवडता ’ अश्वत्थ ’. पिंपळाची कोवळी लुसलुशीत फिकट चॉकलेटी रंगाची तकतकणारी पालवी किती वेळ मी निरखत राहायची. नाजूकपणे अल्लाद बोटे फिरवून त्या कोवळिकीला स्वत:त उतरवत राहायची. पारावर बसून लोंबकळते पाय वाहणार्‍या वार्‍यासंगे व डोलणार्‍या पिंपळाच्या पानांसंगे तालात हालवतं जराश्या जून पानांची पिंकाणी करून वाजवण्यात किती किती आनंद होता. हे सगळं कुठेसं हरवून गेलय आजकाल. छोटी छोटी सुखं, संवाद विरत चाललेत.

वाड्याच्या उंचीच्यापेक्षा आणि त्यातल्या माणसांपेक्षाही सर्वार्थाने मोठा प्रेमळ पिंपळ. अपार उत्साहाने सळसळणारा. वार्‍यासंगे डोलणारा, टाळ्या वाजवणारा माझा लाडका पिंपळ. सूर्याची उगवती कोवळी किरणे अंगाखांद्यावर लेऊन पाराशेजारी असलेल्या देवळातल्या भूपाळीसंगे हलकेच झुलणारा. सकाळ चढू लागली की किरणांची मृदुता आग ओकू लागे. मग पिंपळाच्या सळसळीलाही जोर येई. जणू वाड्याला कामाला लावण्याची जबाबदारी स्वखुशीने घेतलेली होती त्याने. दुपार कलली की पोरंटोरं शाळेतून परतू लागत. पहिली धाव पाराकडे. दप्तर फेकून दमलेली लेकरं टेकत. पिंपळाला कोण आनंद होई. शक्य तितके स्वत:ला झुकवत पोरांशी प्रेमळ लगट करी. कधीमधी पोरं उगाच पानं ओरबाडत, खोडाची साल काढत. पोरांचा खोडसाळपणाही आजोबांच्या मायेने कानामागे टाकून देई. पोरं पळाली घरी की वाड्यातल्या आज्या वाती वळत सुखदु:खाचे गूज एकमेकींना सांगत. अगदी मन लावून तो ऐकत राही. ऐकताना निर्विकार, स्थितप्रज्ञाचा आव आणून वाड्यातल्या एकेका घराचा खरा आरसा पाहत राही. कधी गूज आनंदाचे तर कधी अश्रूंची बरसात घेऊन येणारे. या सगळ्या सुना म्हणून वाड्यात आल्या तेव्हांपासून आपल्या अंगाखांद्यावर विसावल्या. यांची सगळी स्थित्यंतर आपण पाहिलीत. पोरींनो, अगं मी आहे बरं भक्कम उभा तुमच्यासाठी. जे आपले नव्हते नं त्यासाठी टिपं गाळूच नका. सुखं दु:खं असं काही नसतंच मुळी. हे भोग आहेत असंही म्हणू नका. जीव कष्टी झाला की इतरांकडे पाहायला शिका. आता हेच पाहा नं, शब्दांना भावना आहेत का? नाहीतच. नुसती अक्षरांची जुळणी केलेली. पण जेव्हां त्यात तुम्ही स्वत:ची सुखदु:ख भरता तेव्हां ते तुमच्या आनंदाने हसतात / तुमच्या दु:खाची ओझी वाहतात. जीव गुंतवूनही निर्विकार राहायला शिका गं माझ्या लेकींनो. माझा योगी पिंपळ लेकींची समजूत काढत असलेला.

दिवेलागण होई. अंगणात धुडगूस घालणारी लेकरं, आज्या, क्वचित सुना, लेकी घरी जात. तिन्हीसांजेची किंचितशी आलेली मलूलता, उदासीनता समईच्या प्रकाशाने उजळून निघे. घाईघाईने कोणीतरी येऊन देवळातली पणती लावून जाई. लेकरांच्या शुभंकरोती, परवाच्यांच्या तालावर वाड्याचा आत्मा डोलू लागे. कामावर गेलेले बाबाही नुकतेच परतू लागलेले असत. घराघरातून चुली धूर ओकू लागत. सुग्रास ऊन ऊन अन्नाचा दरवळ आसमंत भरू लागे. पणतीच्या मंद सोबतीने पिंपळही काहीसा शांत होई. दिवसभराच्या सळसळीने किंचित दमलेला पिंपळ त्याच्या लेकरांच्या घराघरातील सौख्याचा हलकेच अदमास घेऊ लागे. चुलीशेजारी दिसणारा लालबुंद रसरसलेला मायाळू भाव साठवून घेई. मायेच्या प्रेमाची उतरलेली चव चाखून तृप्त होणारी पोटं, ढेकरांचे पावती देणारे आवाज कानावर येत. चुलीवर पाणी पडे, पोतेरे चढे. निरवानिरव झाली की अंथरुणे पडत. हळूहळू रात्र गडद होऊ लागे. आपापल्या वाट्याच्या श्रमाने दमलेली पोरं, आया, बाबा, आज्या, आजोबा आजच्या दिवसाची सांगता करू लागलेली. त्यांच्यासंगे वाडाही डोळ्यात नीज भरू लागे. निरव शांतता. गाढ झोपेत डोळ्यांत स्वप्न भरू पाहणार्‍या मनांचे एका लयीतले श्वास खोल्यांखोल्यांतून ऐकू येऊ लागत. त्यांना स्वप्नांच्या आंदोलनावर अलवार झुलवत ठेवून पारावर विसावलेल्या कुत्र्यांना कुशीत घेऊन पिंपळही वरकरणी स्तब्ध होई. मन मात्र टक्क जागे... आठवणींची जपमाळ ओढू लागे.

आजही पुन्हा एकदा पिंकाणी करून आईसंगे ’ राधाक्काच्या ’ आठवणींची पोतडी उघडावी म्हणून धाव घेतली होती पण हे काय... पार तर जाऊदे पण पिंपळही दिसेना. डोळे बंद करून पाहतेय की काय मी. काहीतरीच गं. बंद नाही... डोळे फाडून फाडून पाहतेय पण एकही ओळखीची खूण दिसेना. जणू आख्खा वाडाच हरवलाय. ओह्ह्ह... ही टोलेजंग इमारत वाड्याच्याच जागी उभी आहे. अरे बापरे! हे कधी घडले? तरीच आई सारखी म्हणत होती, " तू नको बरं हट्ट करूस क्षेमकल्याणी वाड्यात जाऊ " चा. फार जीव कष्टी होईल तुझा. तू ओढीने मारे निघालीस बालपणीचे लोभस, निखळ आनंदाचे क्षण पुन्हा एकदा जगायला. पण तिथे आता संपूर्ण अनोळखी जग उभे आहे.  मी कुठली ऐकायला. आईला ओढत घेऊनच गेलेले. माझ्या बालपणाच्या खुणा मिरवणारा माझा प्रेमळ पिंपळ जमीनदोस्त झालेला. जणू तो कधीही तिथे नव्हताच. प्रगतीच्या सगळ्या भौतिक सुखसोयी पुरेपूर लेऊन उभी असलेली इमारत माझ्या पिंपळाचा अन वाड्याचा आत्माच गिळून निर्विकार तटस्थ उभी होती.

हे इतकं अनपेक्षित होतं माझ्यासाठी. सहनच होईना. माझ्याबरोबर अनेक मने आजूबाजूला कष्टी होऊन बसलेली दिसू लागली. जीव गुदमरला. राधाक्काच्या आठवणींच्या पोतडीत अजून एक भर... मन माघारी पळू लागलेले. काहीही उरलेले नाही तुझे आता इथे. राधाक्का गेली, वाडा पाडला, पिंपळही उखडला. आता पुन्हा असा हट्ट धरु नको बरं... असं म्हणत पाऊल उचलले तोच अजूनही जेमतेम तग धरुन असलेल्या, जागांच्या गगनाला भिडलेल्या भावानुसार स्वत:ला आक्रसून घेतलेल्या देवळाच्या मागल्या भिंतीतून त्या सिमेंटच्या आत्माहीन जंगलात एक नाजुकसे पिंपळाचे इवलेसे रोपटे जिद्द धरुन डोकावत होते. जणू माझ्या पिंपळाचा आत्मा घेऊन आलेले भासले. वाटले माझी तगमग त्याला कळलेलीच. म्हणूनच मला आश्वस्त करायलाच जणू इवलाली पाच सहा कोवळी पाने हसत होती. बयो, मी आहेच बरं. इथेच आहे. नको उगा राग धरूस. शेवटी ही ही आपलीच माणसे गं! इतके शिकवले तुला, विसरलीस का? भावनांचे, प्रेमाचे, गुंतल्या जीवाचे ओझे वाहू नकोस. माझ्यासारखी सगळ्यात असूनही नसल्यासारखी राहा बयो! असून नसल्यासारखी राहा! रुजत राहा अन रुजवत राहा!

20 comments:

  1. खूप छान लिहिले आहेस ! आपले मन खरच कुठे कुठे धाव घेत असते ना !

    ReplyDelete
  2. मनाला भिडणारं लिहलं आहेस. मस्त.

    ReplyDelete
  3. दळवींची एक कथा आठवली. नाव नाही आठवत पण त्याचा भाव हा असाच काहीसा होता.
    छानच लिहिलं आहेस. सर्व झाडांत मलाही पिंपळाचं झाड फार आवडतं. वाऱ्याची एक झुळूक आणि त्याचं प्रत्येक पान थरथरतं नृत्य सुरू करतं.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी अगदी! अश्वत्थाची सगळी रुपे मोहकच! :) कथा आठवली तर मला सांगशील गं!

      आभार्स अनघा! :)

      Delete
  4. बयो फार फार सुरेख.... किती दिवसानी एक सुंदर लेख वाचायला मिळालाय.... _/\_

    पिंपळ, वड मलाही अतिशय आवडतात.... आमच्या रोह्याच्या बिल्डींग्सशेजारी आमराई होती आणि त्याबाजूला एक वडाचे झाड... दिवसभर असेच कोणीतरी त्या वडाच्या सावलीला धरून ठेवलेले असे... मुलांची लपायची हक्काची जागा....
    आपल्या लहानपणी मोठमोठी झाडं आजूबाजूला असण्याची ’चैन’ होती हे आताच्या मुलांकडे , त्यांच्या आजूबाजूच्या रूक्षतेला पहाताना जाणवते गं :(

    पोस्ट आवडली बयो !!

    ReplyDelete
    Replies
    1. हो गं! आपल्या लहानपणी निसर्गाची भारीच उधळण होती.’चैन’ केली आपण. आजकाल मुलांना पार्किंगच्या जागेत कसेबसे खेळावे लागते. :(

      धन्यू गं ! :)

      Delete
  5. आपण माणसं विलक्षण आहोत .. आपण उदासही होतो गमावलेलं आठवून आणि आधारही शोधतो जे आहे त्यातून ...

    ReplyDelete
    Replies
    1. मनाचे सारे खेळ आहेत गं! :) जे थांबवणे अशक्य आहे.

      धन्यवाद सविता! :)

      Delete
  6. Ekhadya bhavuk karnarya lelhavar , kharatar, kay pratikriya dyavi ha motha prashna asto... mi kharach nishabd zaloy...

    ReplyDelete
    Replies
    1. :) :) धन्सं रे श्रीराज!

      Delete
  7. खूप छान झालाय लेख.
    माझी त्यात इतक्यात मायदेश भेट झाल्यामुळे "अगदी अगदी" होतंय....फ़क्त संदर्भ वेगळे.

    ReplyDelete
  8. "भावनांचे, प्रेमाचे, गुंतल्या जीवाचे ओझे वाहू नकोस. माझ्यासारखी सगळ्यात असूनही नसल्यासारखी राहा बयो! असून नसल्यासारखी राहा! रुजत राहा अन रुजवत राहा!"

    Agadi patesh. Post chanach tai.

    ReplyDelete
  9. kay lihu samjhat nahi... sandhyakalach chitra dolyasamor ubh rahil ........ apratim

    ReplyDelete
  10. अप्रतीम लेख ! हे असे काहीसे गावी गेल्यावर जाणवते.नेहमीचे रस्ते पण बदललेले चित्र. आणि मग वाटू लागते आपण काय शोधत असतो? आणि का? बदल अपरिहार्य आहे हे सत्य इतके कटू आणि तरीही अमान्य!

    ReplyDelete
  11. अप्रतिम गं...किती सुंदर मांडले आहेस.
    जास्त लिहीत नाही..बस्स...असेच सुंदर सुंदर लिहीत रहा .

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !