भुवनेश्वराला 'मंदिरांचे शहर ' असेच म्हटले जाते. ओरिसाची राजधानी भुवनेश्वर येथे एकेकाळी जवळ जवळ ७००० पेक्षा जास्त मंदिरे होती. आता त्याचे प्रमाण पाचशेवर आले असले तरीही खरोखरच पाहावे तिकडे मंदिर असेच दृश्य आजही दिसून येते. ट्रेन प्रवासाने सगळे जण दमले असले तरी दिवस फुकट घालवणे शक्य नव्हते. आता फक्त सहा/सात दिवसच उरले होते व अजून भुवनेश्वर, जग्गनाथपूरी, हैदराबाद व सिकंदराबाद व आजूबाजूचा परिसर पाहून दादर गाठायचे होते. प्रवासात बराच वेळ जाणार होता. त्यामुळे मामांनी सगळ्यांना झोप व फ्रेश होण्याकरिता पाच तास दिले. नाश्ता करून साडेदहाला आपण प्रथम उदयगिरी व खंडगिरी पाहण्यास निघायचे आहे असे सांगून तयार राहा बिलकूल उशीर करू नका असा आदेश दिला. माना हालवून सगळ्यांनी जोरदार होकार भरला खरा. पण पोरे व मोठेही इतके दमले होते की गाढ झोपले. शेवटी नाश्ता नाही पण जेवण करूनच सगळे बाराला निघाले.
डालमा 
संतुला

बिकलकर रोशगुल्लेओरिया जेवणाची एक वेगळीच खासियत आहे. नेहमीचे साधे जेवण म्हणजे लूच्छी/लच्छी आणि डालमा म्हणजे पुऱ्या व भाजी. या लूच्छ्या अगदी आपल्या पुऱ्यांसारख्याच असतात पण खूपच पांढऱ्या. थोडे यीस्ट घालून कणीक जरा आंबवून किंवा फुगवून मग केलेल्या असतात. गव्हाच्या पिठापासूनच बनवतात. आणि डालमा म्हणजे हरबरा डाळ आणि त्यात हाताला ज्या लागतील त्या साऱ्या खूप प्रमाणात घातलेल्या भाज्या घालून ही भाजी बनवतात. संतुला म्हणजे शेवग्याच्या शेंगा व बटाटे, फ्लॊवर वगैरंची केलेली भाजी. बदामीसर रंगावर असलेले मोठे मोठे रोशगुल्ले होतेच. निघताना पटकन हे असेच साधे पण चवदार जेवण जेवून मोर्चा उदयगिरी व खंडगिरीकडे वळवला.


उदयगिरीतील गुंफेच्या 
आतील कोरीव काम

आतील कोरीव कामगणेश गुंफा
राणी गुंफा 
हत्ती गुंफा
साधारण आठदहा किमी लांबवर असलेल्या उदयगिरी व खंडगिरी गुहा या दगड खोदून बनविल्या असून उदयगिरी येथे एकंदर १८ गुंफा असून अतिशय प्राचीन आहेत. सुंदर कोरीवकाम केलेल्या अनेक मूर्ती असून ' राणी गुंफा, गणेश गुंफा, वाघ गुंफा व हत्ती गुंफा ' थोड्या थोड्या आठवतात. ' राणी गुंफा ' सगळ्यात मोठी असून इथे अनेक जैन चिन्हे तसेच देवी देवतां व धार्मिक दृश्ये कोरलेली आहेत. ' गणेश गुंफा ' ही राणी गुंफेच्या वर असून बरीचशी बौद्ध चैत्य प्रासादाशी मिळतीजुळती आहे. याच्या भिंतीवरील कोरीवकाम व मूर्त्यांवरून कळून येतेय की कधीतरी येथे नक्कीच बौद्ध साधूंचे वास्तव्य होते. ' वाघ गुंफेच्या ' तोंडाशीच डरकाळ्या फोडणारी दोन वाघांची तोंडे कोरलेली असून एकदम पहिल्यास थोडी भीतीच वाटते. ' हत्ती गुंफा ' ठाकठीक वाटते. खास काही आकर्षण पाहिल्याचे आठवत नाही.



’ लिंगराज मंदिर -भगवान शंकराचे ' अतिशय प्राचीन-अकराव्या शतकातील, मंदिर असून ओरिसामधील खूपच प्रसिद्ध मंदिरांपैकी एक. संपूर्ण मंदिरभर कोरीवकाम व अनेकविध शिल्पे आहेत. या मंदिराचा काही भाग तर म्हणे सहाव्या शतकातला असून ' सोमवंशी राजा-जयती केशरी' यांनी बांधलेला आहे. पण कुठेही दस्तऐवजांमध्ये हा उल्लेख सापडत नाही. लाल दगडांच्या प्रचंड मोठ्या भिंती असल्याने मंदिर एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखे भासते. मंदिराच्या पूर्वेस प्रवेशद्वार असून त्याचे नांव ' सिंहद्वार ' आहे. चार भागात विभागलेल्या या मंदिरात ' मुख्य मंदिर, यज्ञ शाळा, भोग मंडप व नाट्य शाळा ' आहेत. श्रीविष्णूंचे शाळिग्राम व चक्र व भगवान शंकरांचे त्रिशूळ मुख्य द्वारासमोर दोन भागात पाहावयास मिळतात. लिंगराज मंदिर जवळ जवळ ५५ मीटर उंच असून भगवान शंकराची ग्रॅनाइट मध्ये बांधलेली आठ फूट व्यासाची मूर्ती जमिनीपासून ८ इंच उंचीवर बांधलेली आहे. दररोज दूध, पाणी व भांगेचा अभिषेक केला जातो. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर आहे.
दिवसभर प्रचंड चालल्यामुळे सगळेजण थकून गेले. लहान मुले तर फारच किरकीरत होती. शिवाय हे प्रचंड मंदिर थोडेफार बघेतो अंधार झाला होताच. तेव्हा आता जेवून कधी एकदा झोपतो अशीच सगळ्यांची अवस्था होती. मोर्चा सरळ धर्मशाळेकडे वळवला. महाराजने जेवण तयार ठेवले होते. दरवळणाऱ्या अन्नाच्या सुगंधाने भूक एकदम खवळून उठलेली. भरभर हातपाय धुऊन सगळे पानावर आले. महाराष्ट्रीयन-टिपीकल आपले घरचे जेवण-वरण-भात, खीर, बटाट्याची भाजी, कोशिंबीर-चटणी व पोळ्या खाऊन खूप दिवस झाले होते. आज महाराजने असे साधेच पण सगळ्यांचे आवडते जेवण बनवलेले. मग काय हाता-तोंडाची लढाई सुरू झाली. अगदी लहान मुलेही वरण-भात-तूप-लिंबू आनंदाने खात होती. 





रात्री सगळ्यांची छान झोप झाल्याने नेहमीपेक्षा भरभर आवरून महाराजने केलेला सुंदर उपमा खाऊन ' नंदनकानन अभयारण्य ' पाहावयास निघालो. प्रत्येकाने पाहावेच असे हे अभयारण्य असून एका बाजूला बोटॅनिकल गार्डन आहे ज्यात अनेक दुर्मिळ झाडे पाहावयास मिळाली. तिथेच एक निसर्गनिर्मित जलाशयही आहे. येथील अनेक बागांना देवांची नांवे दिलेली आढळतात. अभयारण्यात निसर्गसौंदर्याची मुक्त उधळणं दिसतेच व दुर्मिळ असे पांढरे वाघ, खूप वेगळेच व मोठे सरडे तसेच साप व नागाच्या अनेक जाती पाहावयास मिळाल्या. खूप वेगवेगळे रंगीबेरंगी पक्षीही होते. येथे असलेल्या छोट्या ट्रेनमधून आम्ही बच्चेकंपनी फिरलो. फारच मजा आली. सिंह, निलगीरी कोल्हा, मूस व हिमालयातील मोठे काळे अस्वल आणि काळी बदकेही होती. जवळजवळ ८० जातीचे पक्षी असून पांढराशुभ्र मोरही होता. मला तर पांढरा वाघ व मोर आहेत हे कधीही खरे वाटले नव्हते. मुले कोणी हालतच नव्हती यांच्यासमोरून. मग पुढे सगळ्या सरपटणाऱ्यांच्या बागेत गेलो. मोठ्या मोठ्या मगरी, कासवे, सरडे व साप होते. लांबून पाहूनही भीती वाटतेच. एकंदरीत अभयारण्यात फार मजा आली.
इथले अत्री कुंड फारच प्रसिद्ध असल्याने सगळ्यांना तिथे जायचे होते. गंधकाचे गरम पाण्याचे झरे असलेल्या या कुंडात स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात असे म्हणतात. आम्ही काही स्नान केले नाही. आई म्हणाली, " खबरदार पाण्यात उतराल तर. नसलेले त्वचारोग येतील. मेले कोण कोण येऊन डुबक्या मारत असेल. " आता डुबक्या मारण्यासाठीच तर बनवलीत ना ही कुंड पण आईला कोण सांगणार........
जाऊदे न उतरलेलेच बरे. मात्र आजूबाजूचे हिरवेगार गवत व सुंदर निसर्ग पाहून मन प्रसन्न नक्कीच होते.




ओरिसा म्हटले की जगप्रसिद्ध असलेले ' कोणार्क चे सूर्य मंदिर ' पाहायला हवेच. ही सगळी ठिकाणे तशी जवळ जवळ नसल्याने प्रवासात फार वेळ जात होता. सूर्य मंदिर जवळ जवळ ६५ किमी इतके लांब होते. सूर्यदेवाचे हे मंदिर म्हणजे वास्तुकलेच्या आश्चर्यात मोडते. १३व्या शतकात बांधलेले असून चारीबाजूने संपूर्ण हिरवाई पाहावयास मिळते. सात घोड्यांच्या या रथाला २४ प्रचंड भव्य चाके असून एकेकाचा आकार १० फुटाचा आहे. येथील सगळेच भव्यदिव्य आहे. या मंदिरामागची आख्यायिका सांगतात की, भगवान कृष्ण व जांबवतीचा मुलगा सांब एकदा चुकून कृष्णाच्या बायकांच्या स्नानगृहात शिरतो. या त्याच्या चुकीमुळे संतप्त होऊन भगवान कृष्ण तू महारोगी होशील असा शाप देतात. पण जर तू सूर्यदेवाची मनोभावे आराधना करशील तर महारोगातून मुक्त होशील. वडिलांच्या सांगण्यानुसार सांब निघतो तो कौंडीत्य क्षेत्री पोचतो. तिथे कमळावर विराजमान भगवान सूर्यदेव दिसतात. इथेच बसून सांब मनोभावे सूर्यदेवाची आराधना करून शापातून मुक्ती मिळवतो. मंदिरात अनेक भव्य शिल्पे तसेच जीवन/ युद्ध प्रसंग चितारलेले आहेत. प्रेमाची महतीही अतिशय सुंदर रित्या व्यक्त केलेली आढळते. दरवर्षी ' कोणार्क नृत्य उत्सव व सूर्योत्सव ' असे दोन मोठे उत्सव साजरे केले जातात.
जवळच तीन किमीवर सुंदर बीचंही आहे. पांढरी स्वच्छ थंडगार वाळू, सुखावणारे आल्हाददायक वातावरण मनाला भारून टाकते. नेहमी करवादत असलेले लेलेकाकाही इथे समाधी लावून बसले होते. मात्र खूप मोठ्या मोठ्या लाटा उसळत असल्याने आम्हां मुलांना जेमतेम पावले बुडवण्याइतपतच पाण्यात जायला मिळाले. वेगाने येत फुटणाऱ्या लाटांच्या आवाजाने थोडे घाबरायला होत होते हे खरेच. आजूबाजूला बीच मार्केट आहे. या मार्केटमध्ये पंचधातूच्या देवतांच्या मूर्ती, वॉल हँगिग्ज, सूर्यदेवाची निरनिराळी चित्रे-धातूमधील प्रतिमा इत्यादी मिळते. थोडीफार खरेदी करून आम्ही निघालो.भुवनेश्वरातील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी असली तरी आता जग्गनाथपूरी गाठायचे ठरले होते. रात्री तिथेच मुक्काम करून उद्या दिवसभर फिरून झोपायला भुवनेश्वरी यायचे. त्याप्रमाणे पूरीच्या बीचेसची वर्णने गाईडच्या तोंडून ऐकून ऐकून आम्हा मुलांना तर कधी एकदा पाण्यात डुंबतोय असे झाले होते. पण त्याआधी मंदिरे पाहायची होती......
फोटो जालावरून
क्रमश:
तुमच्या लेखांसोबत आमचिही मस्त सफर होतेय... मजा येते आहे. पुढचा भाग येऊ देत लवकर. :) अजुन बरच फिरायचं बाकी आहे :)
ReplyDeleteरोहिणी,अग आता हत्ती गेला आणि शेपूट राहीलेय. पण या शेपटात धमाल आली. कोणीतरी आवर्जून वाचतेय हे पाहून अतिशय आनंद झाला. नाहीतर प्रवासवर्णन म्हणजे.....हा..हा...हा...:)
ReplyDeleteआभार.
आता तुझ्या वाचायच्या राहिलेल्या पोस्ट वाचतेय....बरं एकही भाग कसा सोडावा....मला वाटतय एव्हाना ’नको’ म्हटलेल्या गोष्टींच्या नादी कोणी लागेनासं झालय....मजा येतीये वाचताना...
ReplyDelete