जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, October 14, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........८


दोन दिवस तर भरभर संपले होते आणि अजून खूप काही पाहायचे होते. मामांनी सगळ्यांना सकाळी लवकर उठवले आणि पटापट आवरून घ्या म्हणजे कालीघाट काली मातेच्या मंदिरात सकाळीच जाऊ. गायतोंडे आजी आता बऱ्या होत्या. पण गोखलेकाकुंचे टाके दोन दिवसात काढायला हवे होते. गालावरच्या खुणा फिकटल्या होत्या. गेल्या दोन दिवसात नवीन घोळ कोणीही घातला नव्हता त्याने मामा जरा खूश होते. भरभर आवरून सगळे निघाले. पुन्हा माणसाने ओढायच्या रिक्षातूनच.


कालीघाटला पोचलो. कालीमातेचे हे मंदिर १८०९ साली राजा बसन्त रॉय चौधरी यांनी आदीगंगेच्या तिरावरील कालीघाट येथे बांधले असून ५१ शक्ती पिठातील एक मानले जाते. कालीमातेचे हे अतिशय उग्र रूप असून मातेची जीभ सोन्याची व हात चांदीचे आहेत. नेमके दुर्गापूजेचे दिवस असल्याने देवळात प्रचंड गर्दी होती. कालीमातेची आरती थोड्याच वेळात होणार असल्याने आम्ही थांबलो. मोठ्या मोठ्या झांजा, ढोलं यांच्या गजरात अनेक पुजारी दीडशे-दोनशे दिव्यांच्या दीपमाळेने देवीची आरती तल्लीन होऊन करत होते. मुलांना थोडावेळ छान वाटले पण मग आम्ही कंटाळलो. मात्र सगळ्या आयांना खूपच आनंद झाला होता. नंतर बरेचवेळा ऐकले, " कालीमातेची आरती मिळाली, बरे वाटले हो. " शेवटी एकदाची आरती संपली, प्रसाद घेऊन आम्ही निघालो.


तोवर दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. सकाळी फक्त चहा-दूध आणि उगाच काहीतरी खाऊन निघालेले असल्याने भयंकर भूक लागलेली. तेव्हा आता उदरभरणाची सोय पहिली असे ठरले. कलकत्ता आणि ट्राम हे अतूट समीकरण. पण आल्यापासून आम्ही अजून एकदाही बसलो नव्हतो मग ट्रॅमने जाऊ आणि अस्सल बेंगॉली जेवण जेवूयात. नाहीतर राहूनच जाईल. ट्राम मिळाली. अर्धा तासापेक्षा जास्ती वेळ आम्ही ट्रॅमची सफर केली. खूपच मजा आली. ती काही फार जोरात जात नसल्याने बरेच लोक पळत पळत येऊन पकडत होते. मध्येच उतरून जात होते. मला चांगले आठवतेय दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर आमच्या अगदी घराखाली ट्रॅमचा थांबा होता. गिरगाव पर्यंत आम्ही ट्राम मध्ये बसून अनेकदा गेलोय असे आई नेहमी सांगे. मला मात्र मुंबईत ट्राम मध्ये बसल्याचे आठवत नाही. नंतरही बरीच वर्षे रूळ होते पण ट्राम मात्र बंद झाल्या.कुठल्याश्या बाजारात पोचलो तसे ट्रॅममधून मामांनी उतरवले. मग खास बेंगॉली खानावळीत गेलो. तिथे मात्र थोडी गंमत-अडचण निर्माण झाली. आम्ही, काळे व लेलेकाका मासे-मटण न खाणारे व बाकीचे सगळे ताव मारणारे. शाकाहारी जेवण होते म्हणा पण लेलेकाकांना फार शंका येऊ लागल्या. शेट्ये-नाईक-जेठे-गायतोंडे , अधिकारी व मामा स्वतः सगळे खूश होते. अगदी ओरपून जेवले. शाकाहारी जेवणात झोल, कोफ्ता व तोरकारी आणि भात. नीट नाव आठवत नाही पण ' छचरी ' का असेच काहीसे नाव होते. सगळ्या भाज्या लांब लांब चिरून राईचे तेल, खसखस व कलौंजी वापरून केलेल्या भाजीची चव फारच मस्त होती. आम्ही मुलांनी रोशगुल्ले व चमचम इतके खाल्ले की शेवटी अगदी लहान मुले पेंगायला लागली. मासे खाणाऱ्या सगळ्यांची चंगळ झाली होती. एकदम प्रसिद्ध ' माछेर झोल ' व इतर भूना मच्छी-मटणही खाल्ले. एकंदरीत आकंठ जेवून सगळे आहारले. घरी जाऊन थोडा वेळ झोप काढू आणि मग पुन्हा बाहेर पडू असे ठरवून मस्त दोन-तीन तास गाढ झोपून टाकले.


संध्याकाळी रबींद्र सरोवर पाहायला गेलो. हयाचे आधीचे नाव ढकुरीया लेक असे होते. हे सरोवर मुद्दाम बनवले गेलेय. प्रचंड मोठे आहे-७३ एकर जागेवर पाणी असून त्याभोवती इतर गोष्टी वसवल्या गेल्यात. १९५८ साली सरोवराचे नाव बदलून महान रबींद्रनाथ टागोरांचे नाव दिले गेले. आजूबाजूची झाडी, झुडपे खूप वर्षांपूर्वीपासून आहेत असे गाईड सांगत होता.

उद्या दुपारनंतर भूवनेश्वरला जायला निघायचे ठरले होते. आता पुढचे टाईमटेबल कोलमडून चालणार नव्हते. हळूहळू घरी जायचे वेध सगळ्यांनाच लागले होते. कलकत्त्यात खूप काही पाहायचे राहून गेले होते तरीही मंडळी आनंदात होती. मामा म्हणाले की आता रात्र झालीच आहे तेव्हा जेवून घेऊ आधी. नंतर धर्मशाळेच्या जवळच फिरा, काही खरेदी असेल तर उरकून घ्या. उद्या सकाळपासून देवीच्या विसर्जनाची धूम सुरू होईल. तेव्हा खूप गोंधळ असेल मग फार काही फिरता येणार नाही.

जेवून गायतोंडे आजी, गोखले काकू व अजून दोघेतिघे काका अशी काही मंडळी झोपली. आम्ही बाकीचे फिरायला बाहेर पडलो. बरेच जण असल्याने एकत्र चालणे शक्य होत नव्हते. मग नकळत छोटे छोटे गट तयार झाले तरीही सगळे एकमेकांच्या जवळजवळच होते. मी, भाऊ, गिरीश, चित्रा, गायतोंडेकाकूंचा रवी, शेट्येकाकूंचा अशोक व जेठेकाकांची नीलिमा हात धरून फिरता फिरता नकळत आईबाबांपासून बरेच पुढे आलो. याठिकाणची देवी पाहा, तिकडे चाललेला माकडाचा खेळ पाहा मध्येच ठेल्यांशी थांबून कुल्फी खाल्ली. काही वेळाने चित्राच्या लक्षात आले की इतर कोणी दिसत नाहीये. ती खूप घाबरली. पण गिरीश सोडून तिने कोणाला आपण हरवलोय हे सांगितले नाही.

" चला रे आलो तसेच परत जाऊ बरं का आता, आणि कोणीही एकमेकांचे बोट बिलकूल सोडायचे नाही. गिरीश त्या टोकाला तू राहा रे . " असे म्हणून आम्हाला मध्ये घेऊन ते दोघे उलटे फिरले. रवी व नीलिमा व माझा भाऊ यांनी आई कुठेय असे विचारायला सुरवात केली. दोन मिनिटातच ते रडूही लागले. मग मात्र चित्रा भांबावली. एका दुकानाच्या पायरीवर आम्ही सगळे बसलो . गिरीशने सगळ्यांना सांगून टाकले, " ए उगाच रडू नका. आपण सगळे हरवलो आहोत. तेव्हा रडलात तर लोकांना कळेल आणि मग कोणीतरी आपल्याला पळवेल. तेव्हा चूप. आपण शोधू आई-बाबांना. " हे त्याने सांगताच अशोक आणि मी पण रडायला सुरवात केली.

डोळ्यासमोर काय काय दिसू लागले. दादरच्या रेल्वे ब्रिजवर नेहमी एक कुबड असलेला हातपायांच्या काड्या झालेला मुलगा बसलेला दिसायचा. एक आंधळा गाणारा एकदम छोटा मुलगाही नेहमी पाहिलेला. आईने बरेचदा सांगितलेले, " हात सोडून जायचे नाही कुठे. लहान मुलांना पळवतात हं का वाईट लोक आणि मग असे लुळे-पांगळे-आंधळे करून भीक मागायला लावतात. " मला रडण्याचे उमाळे येऊ लागले. " चित्रा अग आपल्याला कोणी पळवले तर काय होईल गं? मा्झे डोळे काढले तर मी काय करू? " हे माझे बोलणे ऐकताच लहान मुले तर मोठ्याने रडू लागली आणि चित्राने एक जोरदार फटका दिला मला.


काय कोण जाणे कोलकत्त्यात आल्यापासून बलराज सहानी यांनी मला झपाटले होतेच. मला लागलीच त्यांचा वक्त सिनेमा आठवायला लागला. शिवाय दादरला जागोजागी यादों की बारात ची पोस्टर्स लागली होती व त्यातही असेच सगळे लहानपणी हरवतात असे कोणीतरी सांगताना ऐकलेले आठवू लागले. मी गिरीशला विचारले , " मी आणि भाऊ दोघेही हरवलोत. म्हणजे मग आमच्या आई-बाबांना आता कोणीच नाही. तुमच्या सगळ्यांच्या आईला निदान एकतरी मूल उरले आहेच." तसे गिरीश पटकन म्हणाला, " अग त्यात काय, जेव्हां काही वर्षांनी आपण सापडू ना परत त्यांना तेव्हा नवीन भाऊ-बहीण असेल ना सगळ्यांकडे. " कोणाला काही कळले नाही चित्रा सोडून. तिने गिरीशला चांगले चार फटके मारले.

तोवर लोक थांबून थांबून पाहू लागली होती. ही इतकी लहान मुले कोणाची? शिवाय रडता आहेत पाहून दोघीतीघी मावश्या-काकू थांबून विचारू लागल्या. पण चित्राने कोणाला काही सांगितले नाही. एकतर त्या काय बोलत होत्या हेही कोणाला कळत नव्हते. दुकानदारही उतरून आला. त्याने हिंदीत चित्राला विचारले , " कुठे जायचेय तुम्हाला? मी नेऊन घालतो. " पण अनोळखी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही हे पक्के पढवले असल्याने तिने नाही नाही आम्ही जाऊ ना. असे म्हणून आम्हाला सगळ्यांना बोटाशी धरून चालायला सुरवात केली.

तोवर मोठ्या माणसांनाही कळले होते की मुले हरवलीत. ते सगळे आम्हाला शोधत होतेच. खरे तर आम्ही एकाच मोठ्या रोडवर होतो पण बरेच लांब आल्याने व प्रचंड गर्दीमुळे काही समजत नव्हते. मामांचा हरकाम्या व महाराजही आम्हाला शोधत शोधत खूप पुढे आले आणि रडणारे आम्ही त्यांना दिसलो.
" म्हळी गयो रे " म्हणत त्यांनी आम्हाला धरले आणि पळतच आई-बाबांकडे नेले. आता आई-बाबा खूप रागावणार याभितीने आधीच अर्धमेले आम्ही मोठे भोकाड पसरून रडू लागलो होतो. अगदी चित्राही रडत होती. बहुतेक आईच काय सगळ्या काकूही आपल्यालाच ओरडतील याची भीती तिला असावी.

आम्हाला पाहताच आई-बाबांनी घट्ट जवळ घेतले. तेही सगळे रडत होतेच. लागलीच धर्मशाळेत परतलो. मुले मोठी माणसे सगळेच फार घाबरले होते. मोठ्ठा भयंकर प्रसंग ओढवला होता. गायतोंडे आजी म्हणाल्या, " कालीमातेचीच कृपा म्हणायची रे बाबा, लेकरं सापडली. आता दोरे बांधून ठेवा सगळ्यांना. कारट्यांनी प्राण कंठाशी आणले अगदी. " मामाही लागलीच म्हणाले, " मोठी माणसे घोळ घालत होती तो काय कमी होता म्हणून तुम्ही पोरांनी सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवलेत अगदी. "

आपापल्या पोरांना आया कवटाळून बसल्या होत्या. आणि मला आठवले, " आई अग आम्ही सापडलोच नसतो तर तू लागलीच नवीन भाऊ किंवा बहीण आणली असतीस का गं?" आई अवाक, " कारटे काहीही अगोचरपणा करू नकोस. कोणी सांगितले तुला हे. का तुझेच डोके चालतेय इतके? आं... " आता ती एक धपाटा घालणार हे पाहून मी लागलीच गिरीश काय म्हणाला ते सांगून टाकले. बिचारा गिरीश
. मला काय माहीत की हे असे सांगायचे नसते. गोखलेकाकांनि फटकवून काढले त्याला. इतर आयांनी " गोखलेकाकू, नाही म्हणजे जरा आवरा त्याला. फारच चुरचूर बोलतोय की. " असे म्हणून आणखी आगीत तेल ओतले. हे पाहून मी घाबरून गेले, माझे काय चुकले ते मला कळत नव्हते. मग सगळे पांगले-झोपले.

दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन होते. दुपारची गाडी होती. प्रथमच रिझर्वेशन मिळणार होते. सकाळी थोडावेळ सगळे आपापल्या पोरांची बखोटे धरत बाहेर पडले. मी गिरीशशी बोलायचा दोनतीनदा प्रयत्न केला पण त्याने कट्टी घेतली होती माझ्याशी. मग मला पुन्हा रडू येऊ लागले. दुपारपर्यंत तो फुगूनच बसला होता.
देवीच्या भव्य मिरवणुका पाहून आम्ही परत आलो व जेवून भूवनेश्वरला निघालो. गाडीत बसल्यावर चित्राने हा फुगा फोडला. २५ उठाबश्या या बोलीवर गिरीश माझ्याशी बोलायला तयार झाला आणि त्याने त्या मोजून मोजून काढूनही घेतल्या माझ्याकडून.

फोटो जालावरून
क्रमश:

8 comments:

 1. sagalee series vachayala vel jhalela nahee.. pan ajache post avadale. tevadhech vachale tarihee entertaining hote. :) Jerry Seinfeld cha episode kasa .. kuthunahee pahila tari entertaining asato... agadi tase. :)

  ReplyDelete
 2. प्रभावित अगं तुझी गडबड सुरू आहे ना. वाच सावकाश.:) उगाच औपचारीकपणे आभार मानत नाही ग. भापो.

  ReplyDelete
 3. तरी मी म्हणतच होते येव्हढी ज्य़ुनियर प्रजा आहे अजून कोणी हरवले कसे नाही....येउ शकणाऱ्या सगळ्या अडचणी आल्या तर!!!
  मजा येतीये लिही पुढचे.....फिरतोय आम्ही तुझ्याबरोबर....

  ReplyDelete
 4. taree mhatalaM ajoon bacche kaMpanee ne kaahee ghoL kasaa naahee ghaatalaa sahaleemadhye :)

  ReplyDelete
 5. आपणास आणि कुटुंबियांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!

  ReplyDelete
 6. हे हरवणे प्रकरण सगळ्यांनाच घाबरवून गेले गं तन्वी. नंतर आम्ही मुले आई-बाबाला सोडून फारसे लांब गेलोच नाही.

  ReplyDelete
 7. गौरी ते म्हणतात ना ’सौ सुनारकी एक लोहारकी’ तसा घोळ घातला बच्चेकंपनीने. नशीब हरवलो नाही.

  तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या अनंत शुभेच्छा!!!

  ReplyDelete
 8. भूंगा सदिच्छाबद्दल आभार.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !