जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, October 7, 2009

ब्रुशेटा


जिन्नस

  • शक्यतो गार्लिक ब्रेड घ्यावा. नसल्यास कुठलाही थोडा हार्ड ब्रेड चालेल .
  • तीन टोमॅटो बारीक चिरून
  • दोन चमचे जिरेपूड, एक/दोन चमचे लाल तिखट ( तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावे )
  • एक चिमूट गरम मसाला
  • दोन मोठे चमचे दाण्याचे कूट, दोन लसूण पाकळ्या ठेचून
  • मूठभर कोथिंबीर बारीक चिरून, एक हिरवी मिरची बारीक चिरून
  • दोन चमचे ऑलिव्ह ऑईल, नसेल तर आपले नेहमीचे तेल घ्यावे.
  • एक चमचा साखर व चवीनुसार मीठ

मार्गदर्शन

इटालियन, फेंच किंवा कुठलाही हार्ड गार्लिक स्लाइस ब्रेड घ्यावा. साधा ब्रेड घेतल्यास चार चमचे मऊ बटरमध्ये एक चमचा लसूण पेस्ट एकजीव करून सगळ्या स्लाईसना लावून घ्यावे. कढईत तेल घालून चांगले तापले की ठेचलेली लसूण, चिरलेली हिरवी मिरची व चिमूटभर आख्खे जिरे घालावेत. मिनिटभर परतून त्यावर चिरलेले टोमॅटो घालून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतावे. टोमॅटोची पेस्ट होऊ लागली की त्यात जिरेपूड, अर्धी कोथिंबीर, दाण्याचे कूट, गरम मसाला, लाल तिखट, साखर व चवीनुसार मीठ घालून सगळे एकजीव करावे. मिनिटभरातच मिश्रणाला पाणी सुटू लागेल. ओलसरपणा कमी वाटल्यास पाव वाटी पाणी घालावे. चांगले रसरसले की आचेवरून उतरावे. हे होत असताना एकीकडे सगळे ब्रेड तव्यावर दोन्ही बाजूने कुरकुरीत होतील असे शेकून घ्यावेत. गरम ब्रेडवर हे तयार मिश्रण पसरून त्यावर उरलेली कोथिंबीर भुरभुरून लागलीच खायला द्यावे. आवडत असल्यास टोमॅटोचे बारीक चिरलेले तुकडेही वरून टाकावेत. ब्रुशेटा व कुठलेही गरम सूप छान लागते.

टीपा

ब्रेड शेकताना तो कुरकुरीत झाला पाहिजे. ब्राउन रंगावर टोस्ट करावा. लसूण, जिरे, दाण्याचे कूट व असल्यास ऑलिव्ह ऑइल या सगळ्याची एकत्रित चव व टोमॅटोचा थोडासा आंबटपणा यामुळे हे गरमागरम ब्रुशेटा मस्त लागतात. पार्टीत स्टार्टर साठी सोपे व सगळ्यांना आवडेल अशी व लहान मुलांच्या पार्टीसाठीही एकदम हीट डिश आहे. पावभाजीच्या जवळ जाणारे असले तरी चवीला वेगळे लागते. मूळ ब्रुशेटाच्या कृतीत थोडा बदल करून आपल्या चवीच्या जवळ जाणारी हे ब्रुशेटा सगळ्यांना जास्त आवडतात.

6 comments:

  1. karun baghen ga bhagyashree..
    Chhan distey paakakruti..

    ReplyDelete
  2. हे बघ मला काहीही कमेंट टाकायचे नाही.....सकाळी सकाळी तुझ्या ब्लॉगवरचे पदार्थ पाहिले की आधिच भूक चाळवते माझी.....आता तर आमचा ज्यूनियर ब्लॉगर पण सोबत आहे....मम्मा मला हे खायचे म्हणून हटुन बसलीये स्वारी.....
    मस्त आहे रेसिपी....फोटो सही!!!!

    ReplyDelete
  3. मुग्धा आवडली का ते कळव ग. आभार.

    ReplyDelete
  4. तन्वी, ज्यूनियरचा हट्ट पुरवलास का? आवडले का ब्रुशेटा? झटपट होतेच आणि मस्त लागते.आभार.

    ReplyDelete
  5. फोटो तर मस्त आला आहे... भुक चाळवते खरी असे फोटो बघुन. ह्या विक़ॆंड ला करुन

    ReplyDelete
  6. रोहिणी अग नक्की आवडेल तुम्हाला.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !