जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, October 11, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........३

जरा लोळूया म्हणता म्हणता मोठी माणसे चक्क डाराडूर झोपली. मुलांना झोप कुठली. मग आम्ही सगळे लपाछपी, लंगडी खेळलो. निघाल्यापासून प्रथमच थोडे खेळायला मिळाले होते. मग भांडणे, पडापडी ओघाने आलेच. त्यातून अगदी लहान मुले होती त्यांना आम्ही खेळायला घेतले नाही म्हणून ती भोकाड पसरून बसलेली. त्यांचे रडे ऐकून आपल्याला ओरडा बसेल म्हणून शेवटी चित्रा सगळ्या लहानग्यांना एकत्र करून शाळा शाळा खेळली. गिरीशने तशातही पिटी टीचर बनून दोघांतिघांना फटकवून काढले. कवायती करवून करवून बिचाऱ्यांना इतके दमवले की त्याला घाबरून नंतरचे तीन-चार दिवस आम्हा तिघांकडे ती बिलकूल फिरकली नाहीत.

चार वाजता महाराजाने बनवलेल्या चहाच्या दरवळाने प्रथम आया उठल्या. नवऱ्यांना उठवायच्या भानगडीत न पडता मधल्या चौकात असलेल्या पारावर बसून मस्त गरम गरम चहा घेत घरगुती गप्पांचा फड जमवून बसल्या. ह्या अशा गप्पा ऐकायला मला भारी आवडे. " अग, त्याचे असे झाले ना.......... " सुरू झाले की लागलीच कान टवकारले जात. मग ज्ञानात बरीच नवीन भर पडे. एरवी आई ओरडे, " काय गं मोठ्या माणसांच्या गप्पा ऐकतेस. चल ऊठ इथून. अभ्यास कर त्यापेक्षा. " पण आज तिचे लक्षच नव्हते. आणि तीही ऐकण्याचे कामच जास्त करत होती.

यांच्या गप्पा अगदी रंगात आलेल्या तोच आतून एकेकाच्या बाबांचे आवाज येऊ लागले. " अग SSSS, आहेस कुठे? काय चहाकडे पाहाल का नाही? कधीपासून नुसत्या खिदळता आहेत लहान मुलींसारख्या. " इति लेलेकाका. त्यांची री ओढत सगळेच बाबालोक हाकारू लागले तश्या आया वैतागून उठल्या. लेलेकाकूंचा आवाज एकदम अनुनासिक झाला. " अहो, घरी नाही आहात तुम्ही. कधीपासून एकावर एक वरताण घोरताय मेलं एक मिनिट झोप लागेल तर शपथ. आणि चहा महाराजने कधीचाच तयार केलाय. आमचा झाला सुद्धा आता आटपा लवकर. नाहीतर नालंदा राहून जाईल. " चहा घेऊन आवरून निघेतो इतका उशीर झाला की मामा म्हणाले आता नालंदा बंद होईल तेव्हा मार्केट मध्ये फिरून येऊया.
शहीद स्मारक

आम्ही निघालो ते थेट शहीद स्मारकाशी मामा घेऊन गेले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात शहीद झालेल्या सात तरुणांचे हे स्मारक आहे. ही सातही मुले नववी-दहावीत शिकणारी. स्वातंत्र्यांच्या प्रेरणेने भारलेली, प्राणांची आहुती देऊन मोकळी झाली. उमाकांत प्रसाद सिन्हा. रामानंद सिंग. सतीश प्रसाद झा. जगतपती कुमार. देवीपदा चौधरी. राजेंद्र सिंग व रामगोविंद सिंग. यातील जगतपती फक्त कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता बाकीची सगळी नववी-दहावी. स्वातंत्र्यलढ्याशी थोडीथोडी ओळख होऊ लागली होती. त्यामुळे खूप भरून आले. तशाच भारावलेल्या अवस्थेत या वीरांना खडी सलामी देऊन आम्ही निघालो.



मधुबनी पेंटिंग्ज

इथली ' मधुबनी पेंटिंग्ज ' अतिशय प्रसिद्ध असून फार प्राचीन काळापासून ही चित्रे काढली जात आहेत. मग तीच दाखवायला मामा आम्हाला घेऊन गेले. आज इतकी वर्षे होऊन गेलीत पण अजूनही मधुबनी पेंटिंग्ज नीट लक्षात राहिलीत. ही चित्रे बिहार मधील खेड्यातील बायका घरची कामेधामे आटोपली की काढत. भाज्यांचे बनवलेले रंग, कोळसा अशी साधने वापरून आपापल्या झोपड्यांच्या मातीच्या भिंतीवर काढत असत. बहुतांशी निसर्गावर आधारीत चित्रेच जास्ती. मायथॉलॉजिकल चित्रही बरीच पाहायला मिळाली. तसेच चंद्र, सूर्य यांना केंद्रबिंदू ठेवून ही चित्रे काढत. आम्ही पाहिली त्यावेळी कापडावर, कागदावर व काचेवर काढून विकावयास ठेवलेली होती. प्रत्येक चित्रातून संदेश व संवाद साधण्याचा प्रयत्न दिसून येतो. सगळ्यांनी एक तरी चित्र विकत घेतलेच, अजून आईने जपून ठेवले आहे.


कलाकंद
मग उगाच थोडे इकडेतिकडे करून आम्ही धर्मशाळेत परतलो. मामांच्या महाराजाने अगदी मन लावून खास पाटणा बेत बनवला होता. ' दही चुरा छिनी व कलाकंद त्याबरोबर आचार व जाड रोट्या ' हे दही चुरा छिनी हे आपल्या फिरनीशी अगदी मिळते जुळते आहे. दमलो होतोच आणि इतके चविष्ट जेवण जेवल्यावर मी कधी झोपले ते कळलेही नाही. मधूनच लहान मुलांच्या किरकिरीचा व आयांच्या काय कारटी आहेत जरा झोपूही देत नाहीत अशा करवादण्याचे सूर कानावर अंधुक अंधुक पडत राहिले.

निघून आठ दिवस होऊन गेलेले कळलेच नाहीत. मामांनी सकाळीच एक मोठठा क्लास घेतला. असे केलेत तर ट्रीपचा आराखडा चुकेल सगळा तेव्हा आजपासून मी निघा म्हटले की निघायचे असा दम मोठ्या माणसांना भरला. मग त्यावर गोखले,लेले काकू व आमची आई यांनी अगदी, " आमच्या मुळे कधीच उशीर होत नाही हं का. आम्ही नेहमीच आटोपून तयार असतो. इतरांनाच जरा सांगा, नुसता चेंगटपणा करत बसतात. हे काय घर आहे का आपले? आवरावे पटापट असेल त्यात जमवून घ्यावे पण नाही. यांच्या मुळे दुसऱ्यांना किती त्रास होतो तेही कसे कळत नाही मी म्हणते. " असे म्हणत गायतोंडे काकू-आजी व नाईक, शेट्ये काकूंकडे पाहत नाके मुरडली. मग शत्रुपक्षानेही हल्ला सुरू केला तसे मामांनी सगळ्यांना चूप केले. आता आवरणार की आजचा दिवसही फुकट घालवणार? खरे तर आज गया-बुद्धगया पाहून रात्री परत यायचे होते. पण अजून नालंदाही पाहून झाले नाही. पुन्हा म्हणणार मामांनी काही दाखवलेच नाही.

या क्लासचा थोडा परिणाम झाला आणि नेहमीपेक्षा कमी वेळात आवरून मंडळी नालंदा पाहायला निघाली.


फोटो जालावरून
क्रमशः

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !