जाता जाता एक नजर इथेही........

Monday, October 12, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........६



पटण्यापासून सिलीगुडी हे जवळ जवळ ५०० किमीवर आहे. आमचे बुकिंग गेले असल्याने आता मिळेल त्या ट्रेनने जायचे असे ठरले होते. त्यामुळे पटण्याच्या धर्मशाळेला टाटा करून आपापली बोचकी सांभाळत सगळे पटणा स्टेशनला पोचले. जिकडेतिकडे लोक पथाऱ्या पसरून लवंडले होते. मधूनच पोरे खेळत होती. स्टॉलवाले चाय चाय, पकोडे, कलाकंद वगैरे आवाज जोरदार लावत होते. फलाट ठासून भरलेला होता. सगळे गांगरलेच. जरा सामान तरी टेकवायला जागा शोधावी तोच एक पॅसेंजर ट्रेन आली.


" अहो मामा कुठे आहेत? ही नाही ना आपली गाडी? " असे कोणीतरी विचारतेय तोच मामांचा लांबून आवाज आला, " अरे अरे सामान कुठे टेकवताय? पळा पळा, पकडा रे हीच गाडी आहे आपली." मग तिथे एकच रणधुमाळी माजली. कोण कुठे पळतेय तर कोण कुठे. तिकिटे मामांकडे. त्या गोंधळातही काळेकाकांनी ओरडून विचारले, " अहो तिकिटे तरी द्या ना ज्याची त्याची. नाही म्हणजे मामा, नेमके तुम्हीच खाली राहिलात तर? तो टीसी काय ऐकेल का आम्हाला? " म्हणणे रास्त होते. पण वेळ कुठे होता तेवढा. यावेळी मात्र आमचे बाबा चपळाईने मुसंडी मारून घुसले व त्यांच्या मागोमाग मी, आई व भाऊ, गायतोंडे, शेट्ये, नाईक, काळे व जेठे इतके सगळे भरभर चढले. दुसऱ्या दरवाज्याची खिंड लेलेंकाकांनी लढवली व एकदाचे सगळे एकाच डब्यात चढले. अगदी महाराज व हरकाम्याही भांडी व शिध्याच्या पोत्यासकट मधल्या पॅसेजमध्ये विसावले.

मंडळी स्थिरावली. निदान कोणी खाली राहिले नाही ही खुशी होतीच. हो ना नाहीतर पुन्हा वाट पाहावी लागली असती. आणि हे अंतर काही जवळ नाही. पॅसेंजर ट्रेनने घेतलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला चुकवला. कधीतरी प्रचंड अंत पाहून तिने आम्हाला एकदाचे सिलीगुडीला पोचवले. तोवर मध्यरात्र झाली होती. सारख्या धावपळीने व ट्रेनच्या प्रवासाने आम्ही इतके थकलो की आता आजारीच पडायला सुरवात होणार असे वाटू लागले. त्यात पटणा व सिलीगुडी यातील हवामानात बराच फरक होता. एकदम थंड वाटू लागलेले. जन्म गेला मुंबईत असे सगळे, थंडी कोणी कधी पाहिलीय. त्यामुळे जरा जास्तच वाजत होती.

इथे चक्क गेस्टहॉउस होते. छोट्या छोट्या का होईना पण प्रत्येकाला वेगळ्या खोल्या व बाथरूम्स होती. घर सोडल्यापासून पहिल्यांदाच थोडा तरी फॅमिली टाइम मिळणार असल्याने सगळे खूश झाले. पहाट होत आलेली अजून झोपलोही नव्हतो त्यामुळे उद्या थोडे आरामात उठा. सिलीगुडीतच फिरू आणि परवा पहाटेच दार्जिलींगला जाऊ असे मामांनी सांगितल्याने जे झोपले ते डायरेक्ट सूर्य माथ्यावर आल्यावरच उठले.

गरम पाणी एक एक बादली. तेही काही कडकडीत नव्हते. दुपारीही जरा थंडच वाटत होते. कोमट पाणी पार निवूनच जाईल या भीतीने आम्ही पटापट अंघोळी केल्या व तयार झालो. बरेच जण आवरून खाली फिरत होते. नेहमीप्रमाणे राजेकाकू व नाईककाकू बाथरुममध्येच पाणी नासत होत्या. पण आज इतर कोणाला त्याचे सोयरसुतक नव्हते. त्यांना राहू दे कपडे धूत आपण जाऊयात यावर गेटमध्ये जमलेल्या घोळक्याचे एकमत झालेले. आल्या एकदाच्या अन आम्ही निघालो.

हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले हे गाव टुमदार आहे. कांचनगंगेचा नजारा दिसतो. मंदिरे पाहून कंटाळलेले असल्याने प्रथम अभयारण्याला भेट देऊयात असे मामांनी ठरवले होते. '


महानंदा वाईल्ड लाईफ अभयारण्य २०एक किमी वरच होते. त्यामुळे पटकन पोचलो. हत्ती, रायनो, मोर व बरेच इतरही प्राणी दिसले. एकंदरीतच या अभयारण्यात खूप मजा आली. मुले तर रायनो समोरून हालतच नव्हती. पण वेळ कमी असल्याने निघावे लागलेच. वाटेत काही चहाचे मळे लागले मग तिथे थोडावेळ हुंदडलो. डोळ्यांना अगदी ट्रीट होती इथे. थंड हवा आणि पाहावे तिकडे हिरवाई आणि दूरवर बर्फाच्छादित शिखरे. अतिशय आल्हाददायक वातावरण होते. पुढे जेव्हां आल्हाददायक म्हणजे कसे असा प्रश्न आला तेव्हां आईने हे आठव असे सांगितले

भूगोलात वाचलेली तेस्ता नदी हीच असे चित्रा सांगत होती. मग तिथे मधूनच उडणारे काही वेगळेच पक्षीही दिसले. तिथून निघालो ते थेट काली मंदिरात पोचलो. तिथे नवीन लग्न झालेली बरीच जोडपी दिसत होती. पुजाऱ्याकडून कळले की हॅपी मॅरिड लाईफ साठी सगळे कालीदेवतेचा आशीर्वाद घ्यायला येतातच. आमच्या बाबांनी लागलीच संधी साधून घेतली, " बिच्चारे! घ्या बाबांनो आशीर्वाद, जरूरी आहेच त्याची. घी देखा हैं अभी जिंदगीभर बडगा देखना है ना. तो कालीमाँके आशीशकी कदम कदम पे जरूरत पडेगी। " आजूबाजूची सगळी नवीन जोडपी खीखी करून हसू लागली. आमच्या आईने, " कळलं बरं का. हे बरं जमत बोलायला. चला तुम्हाला काही गरज नाहीये मातेच्या आशीर्वादाची. तेव्हां निघा इथून. " असे म्हणत तरातरा प्रवेशद्वारच गाठले. अजूनच हशा पिकला आणि सगळे निघाले.

इस्कॉन हरे कृष्ण मंदिर

मग इस्कॉन हरे कृष्ण मंदिर पाहून होईतो संध्याकाळचे आठ वाजून गेले. इथल्या बाजारपेठेची माहिती आल्या आल्या गेस्टहॉउसवाल्याने समस्त महिला मंडळाला पुरविली होती. त्यामुळे त्यांना बाजारात जायचे होते. पण उद्या पहाटे अडीचला निघायचे आहे आणि आज खूप दमलोय आपण चालून चालून तेव्हां गुमान जेवा आणि गपगार पडा असा मामांनी दम भरला. उद्या नाहीतर परवा नक्की बाजारात जाऊ आपण असे आश्वासन घेऊन महिलामंडळ राजी झाले.

जेवणे झाल्यावर मामांनी पुन्हा एक क्लास घेतला. उद्या पहाटे अडिचला शार्प निघायचे आहे. दार्जिलीगचा टायगर पॉंईंट गाठायचा आहे. तिथून सन राइझ अप्रतिम दिसतो तेव्हां कुठल्याही स्थितीत हे दृश्य चुकता नये. मी पुन्हा घेऊन जाणार नाही. आणि कोणा एका दोघांमुळे चुकले तर खबरदार असा सज्जड दम दिला. जवळजवळ ९० किमी चा रस्ता आहे. इथल्या छोट्या ट्रेनचे तिकीट मिळालेले नसल्याने आपण जीप करून जाणार आहोत. खूप थंडी असणार तेव्हां माकड टोप्या, स्वेटर सगळे चढवा. आणि कृपया इतक्या पहाटे कोणीही कपडे धुऊ नका.

एखादी गोष्ट करू नका असे निक्षून मामांनी सांगितले की दोघांतिघांच्या अंगात संचार होई. करू नका म्हणजे काय? आम्ही करणारच. अर्थात दरेवेळी माणसे बदलत होती हे बरे होते. ठरल्याप्रमाणे दोनच्या आधीच सगळे उठले. गरम गरम चहा व मुलांना बरोबर आणलेला बोर्नविटा पाजून जरा तरतरी आली तसे आवरून सगळे पावणेतिनाला खाली उतरले. मामा खूश झाले. अरे वा! विद्यार्थी सुधारले वाटते.


सिलीगुडी ते दार्जिलींग प्रवास

जीपवालेही हजर होते. थंडीने दात अक्षरशः कडकड वाजत होते. तीन जीपमध्ये सगळे कोंबून सुसाट निघाले. जीप बंद असल्या तरी वारा फटीफटीतून घुसत होताच. एरवी किती जण भरलेत हो जीपमध्ये अशी कुरबूर झाली असती पण आज तेवढीच एकमेकांची उब घेत गुण्यागोविंदाने सगळे निसर्ग पाहत होते. साधारण पाचच्या जरा पुढेच आम्ही पोचलो या सन राइझ पॉंईंटवर. टायगर पॉंईंटला सन राइझ पॉंईंटही म्हणतात.


टायगर पॉंईंटवरून दिसणारे कांचनगंगा

ही वाजलेली सगळी थंडी एका क्षणात भरून निघावी असा नजारा समोर होता. सूर्य अजून उगवायचा होता. त्याच्या नांदीच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. केशरी, गुलाबी लालसर आभाळाची झाक कांचनगंगे वर सांडलेली. पाहता पाहता सूर्यदेवाचे आगमन झाले आणि संपूर्ण आसमंत व बर्फाच्छादित शिखरे त्याच्या कोवळ्या किरणांनी उजळून निघाली. चमचमणारे निरनिराळ्या आभांनी माखलेले बर्फ वर्णनातीत दिसत होते. कोणीही काही बोलत नव्हते. अगदी लहान मुलेही तल्लीन होऊन ही उधळणं एकटक पाहत राहिली. बराच वेळ आम्ही तिथे होतो. हळूहळू सूर्य खूप वर आला तसे तिथून निघालो. डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे काय याचा अनुभव घेतला. आमच्या सुदैवाने धुके अजिबात नव्हते.

मग तिथून डोंगर उतारावर लावलेले चहाचे मळे पाहिले.


बुद्ध मठ इथेही होतेच.



पद्मजा नायडू हिमालयन झूऑलॉजिकल पार्कमध्ये फारच मजा आली. पांडा, चित्ता व तिबेटियन कोल्हे शिवाय भली मोठी अस्वले पाहायला मिळाली. मुलेच काय मोठी माणसेही अगदी रमली होती.


मग रेल्वे स्टेशनला लागूनच असलेले, १९३९ साली बांधलेले ' धिरधाम मंदिर' पाहून थोडे पुढे असलेल्या मोटर स्टँडलाच लागून असलेल्या बाजारात महिलामंडळ व मागोमाग इतरही सगळे घुसले. मुख्यत्वे ' वेगवेगळ्या चहा पावडरची खरेदी व थोडे थोडे चीज ' सगळ्यांनी घेतलेच.


टॉय ट्रेन
सिलीगुडीला परत जाताना प्रसिद्ध टॉय ट्रेनने परत जायची प्रत्येकाची इच्छा होती. पण आमचे जीपवाले अडून बसले. शेवटी दुधाची तहान ताकावर भागवत सगळ्यांनी उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये बसून घेतले व फोटोही काढले. दार्जिलींग ते सिलीगुडी हा प्रवास या ट्रेनने करायलाच हवा एकदा तरी. मी मागे लागलेय नचिकेतच्या पुढच्या मायदेशाच्या वारीत जायचे का आपण. पाहू कितपत यश येतेय. आलेच तर पुन्हा एक पोस्ट लिहावी लागेल. हा.... हा..... हा..... पण यावेळी मात्र फोटो व व्हिडिओ क्लिप्सची रेलचेल होईल. अरे भाई टेक्नॉलॉजीका कुछ तो फायदा होना हैं ना.

मग जीपने पुन्हा खाली उतरलो. दार्जिलींग मध्ये खूप काही पाहून झाले नसले तरी जे पाहिले तेच अप्रतिम असल्याने सगळे खूश होते. जेवणे झाली. चांगलीच थंडी जाणवत होती. केव्हातरी मध्यरात्री जोरजोरात गायतोंडे काकांचा आवाज येऊ लागला मागोमाग काकूंच्या रडण्याचा आवाज. काय झाले, काय झाले करत सगळे गोळा झाले तर गायतोंडे आजी तापाने फणफणल्या होत्या. चांगला चार च्या पुढेच ताप चढलेला. चार चार गोधड्या घातल्या होत्या तरी त्यांची थंडी थांबेना. मग मामांनी डॉक्टर्स ब्रँडी आणून बळजोरीने त्यांना पाजली. तरीही थंडी व ताप कमी होईना. आता काय करावे?


तेवढ्यात कोणाचे तरी लक्ष गेले, गायतोंडे आजींची तीन-चार नऊवारी पातळे वाळत घातलेली दिसत होती. मामांनी ते पाहताच आजींना विचारले, " आजी, कधी धुतलेत हे सगळे? " तश्या थरथरत आजी म्हणाल्या, " पहाटे दिडाला उठून सगळे उठायच्या आधी भरभर पिळून टाकली रे. पण पाणी बर्फासारखे गार होते त्यामुळे हातपायांची बोटं इतकी सून्न झाली की नंतर साडीही गुंडाळता येईना. पण तू आधीच दटावले होतेस आणि मी घातला घोळ. मग कोणालाच सांगितले नाही. आता मी काही जगत नाही. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या ट्रीपचा सत्यानाश होणार आता. किती मूर्खपणा केला मी. " असे म्हणत त्या रडू लागल्या. सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. पण आजींची हालत पाहून सगळ्यांना खूप वाईट वाटत होते.

पहाटे पाचला गेस्टहॉउसवाल्याच्या ओळखीच्या डॉक्टरला उठवून आणले मामांनी. त्यांनी इंजेक्शन दिले-गोळ्याही दिल्या व झोपवून ठेवा म्हणाले. दुपारी येतो परत पाहायला. जर ताप उतरला तर कदाचित तुम्हाला सोडतो नाहीतर आज मुक्काम केलेला बरा, असे म्हणून डॉक्टर गेले. गायतोंडे काका व काकू वैतागले होते पण आईला रागावले नाहीत. अगदी उश्यापायथ्याशी बसून होते. पुन्हा सगळे झोपले. असेही मुले फारशी उठली नव्हतीच. मग जरा आरामातच उठून ऊन खात गेस्टहॉउसच्या आवारात खास दार्जिलींग टीचा आस्वाद घेत बसले. मामा म्हणाले, " समस्त महिलामंडळाची सिलीगुडीचे बाजारपेठ पाहायची इच्छा नडली. तेव्हां आता संधी मिळालीय तर पळा सगळ्या. तोवर आम्ही पत्ते लावतो. " मग काय पोरे-टोरे घेऊन सगळ्या काकवा व आई बाजारात गेले.

किडूकमिडूक खरेदी करून दुकानदारांना भाव करताना भरपूर पिळून- मुंबईचे आम्ही. बारगेनींग आम्हाला नका शिकवू हा वर तोरा, परत आले. आल्या आल्या गेस्टहॉउसवाल्याला उत्साहाने हे बघ ते बघ अमुक किमतीला आणले असे दाखवायल्या गेल्या. तर त्याने अरे बहेनजी पहले बोलते तो ये पप्पू को साथ भेजता ना. अपनाही दुकान हैं, एकदम सही दाम और माल भी बढिया. अभी आप लोग खाली फोकट महंगा दाम देके आये ना. चूक चुक..... " हा चुकचुकाट जखमेवर मन लावून मीठ चोळल्यासारखा इतका वेळ त्याने केला की शेवटी लेलेकाकूंचे रक्त खवळले. काही ऐकू नका गं मेल्याचे उगाच आपल्याला वाईट वाटावे म्हणून ढाकतोय. " चूप रे, उगाच हमको उल्लू मत बनाना हां सांगून ठेवते. महाग तर महाग तेरेको क्या. तू अपना काम कर. " असे त्यालाच दटावून डायनिंग हॉलमध्ये गेल्या.


फोटो जालावरून/टॊय ट्रेनचा फोटो- ओळखा बरे?

क्रमश:

10 comments:

  1. अरे वा..माझ पोस्ट पण सिलिगुडी च्या भागातल्या आठवणिंवरच आहे. योगायोग !!! :)

    ReplyDelete
  2. Kasale mast lihitiyes...माणसांच्या स्वभावांच्या छटा लिलया मांडतेस....पुढचे छाप लवकर...

    ReplyDelete
  3. महेंद्र,नवीन पोस्ट आली होय.वाचते आता.:)

    ReplyDelete
  4. तन्वी खूप काळ लोटलाय ना गं या ट्रीपला जाऊन. काही प्रसंग जणु छापले गेलेत मनावर:).बरे वाटले तू लिहीलेस.

    ReplyDelete
  5. मजेमजेचा सुरु आहे प्रवास... आणि तुम्हि सुरेख वर्णन करत आहात. हम पंछी एक चाल के ह्या मालिकेची आठवण येते... वाट बघतेय पुढच्या भागाची.

    ReplyDelete
  6. गाय्तोन्दे आजींचा प्रसंग लय झाक झला...मला तर खुडकन ह्सायाले आले...तू म्हटल्या प्रमाणे कोणी ना कोणी तरी मामना
    चॅलॅंज करतेच आणि सटकून आपटते मग.....मग आजीन बर वाटले का नंतर?
    मजेशीर आणि माहितीदायक झाली आहे पोस्ट....

    ReplyDelete
  7. रोहिणी प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  8. तर काय गणेश. मी म्हटले तसे नशीब दरवेळी वेगळे कोणीतरी असायचे नाहीतर बहुतेक सगळ्यांनी मिळून धोपटलेच असते एकाला.:)

    ReplyDelete
  9. मी पण १० वर्षांपूर्वी गेलो होतो, दर्जिलिंग, कलकत्ता ला....awesome place to be.... its still there on my mind... दार्जिलिंग ते गंगटोक रस्ता पण एकदम सुंदर आहे. दोन्हि बाजूंना हिरवे-गार डोंगर, मधुन खळखळत वाहणारी तिस्ता नदी, आणि नदीकाठाने गेलेला हाय-वे....simply amazing

    ReplyDelete
  10. आमचे गंगटोक नाही झाले पण तू म्हणतोस ते खरेच.काही ठिकाणे स्मरणात पक्की राहतात.
    प्रसन्न, मन:पूर्वक आभार व दिवाळीच्या अनंत शुभेच्छा!!!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !