जाता जाता एक नजर इथेही........

Monday, October 5, 2009

अंगापेक्षा बोंगा जास्त, बोल मात्र रिसेशनला..........


भाड्याच्या घरात राहणे हे फारसे न मानवणाऱ्या मध्यमवर्गीय मनोवृत्तीत जन्मलेली मी गेले अडीच वर्षे भाड्याच्या घरात राहून जाम कंटाळले व वैतागलेही होते. होते का म्हणते ते पुढे लक्षात येईलच. म्हणजे कसे आहे ना की बालपण गेले दादरच्या टिपीकल चाळीत. दोन खोल्या व मागे गॅलरी. शिवाय पुढेही कॉमन गॅलरी होतीच. भाडे अगदीच नगण्य होते-ते अगदीच क्षुल्लक होते असे आत्ता वाटते तेव्हा तेच बरेच जास्ती वाटायचे व फुकट जात होते ही खंत जास्त होती-आईबाबांना. बहुतांशी जुन्या चाळींचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे पुर्व पश्चिम खोल्या, हवेशीर व भरपूर उजेड होता व खोल्याही मोठ्या होत्या. एकच अडचण होती-टॉयलेट्स मात्र बाहेर.

चाळ संस्कृती, म्हटली तर चांगली म्हटली तर त्रासदायक. आम्ही या सगळ्यात रुळलो होतो पण आई-बाबांना वाईट वाटत असे. अगदी प्रामाणिक पणे सांगायचे तर मला कधीही आमचे चाळीतले घर सोडून जावे असे वाटले नाही. कारण त्यात आम्ही राहत होतो. खूप जीव होता माझा घरावर. अनेक अडचणी कायमच्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर पाणी बिलकूल येत नसे. दररोज तीन मजले उतरून लोकांच्या घरातून मी व भाऊ छोटी कळशी कमरेवर व हातात बादली अशा पाचसहा खेपा मारून आईला मदत करायचा प्रयत्न करीत असू. अनेकदा चाळीत मोठी हाणामारी होई. बरे हे मारामारी प्रकरण इतके अचानक सुरू होत असे की काय घडते हे कळायच्या आत कोणाचे तरी थोबाड फुटलेले असे. आमच्याशी संबंधीत काही नसले तरी खूप भीती वाटे. आईबाबांनी मग लवकरच स्वतःचे घर शोधले आणि आम्ही ' भाड्याचे घर ' प्रकरणातून निघालो.

नंतर पुन्हा भाड्याचे घर इथे आलो तेव्हाच घेतले. अर्थात तुलना होऊ शकत नाही कुठल्याही दृष्टीने. इथे भौतिक सुख होते परंतु आपले कोणी नसल्याने एक चमत्कारिक कोरडेपणा, सुखसोयींनीयुक्त अलिप्तपणा होता. पण इलाज नाही. सगळेच कसे मिळावे. वर्षादिड वर्षात पुन्हा मध्यमवर्गीय मनोवृत्तीने उचल खाल्ली व आम्ही घर घेतले. २००२ मधली इकॉनॉमी एकदम वेगळी होती. फुगा फुगत होता व तो फुटेल अशी पुसटशी शंकाही कोणाच्या मनाला शिवत नव्हती.

आजूबाजूला बरेच जण मोठीमोठी घरे घेताना दिसत होते. मनात येई अरे वा! छानच आहे. पण आमची मधमवर्गीय मनोवृत्ती आलीच आडवी. अंगापेक्षा बोंगा मोठा नको. आपले अंथरूण पाहून त्याच्या आत राहतील एवढेच पाय पसरावे. घर घेतले, दोन्ही बाजूंची घरातली सगळी मंडळी येऊन राहून गेली. खूप आनंद झाला. होता होता एक दिवस नवरा म्हणाला, " चला, आवरायला घ्या. मिशिगनला जायचे आता. " मी एकदम गोंधळले. हे छोटेसे पण छान गाव, आपले घर सोडायचे या कल्पनेनेच डोळे भरून येऊ लागले. शेवटी आपला तिथला कार्यभाग संपला आहे तेव्हा शांत मनाने वास्तूला निरोप देऊन नवीन मालकाला सुखी ठेव गं असे म्हणून आम्ही निघालो.

आता अडीच वर्षे झाली अन पुन्हा एकदा भाड्याचे घर नकोसे वाटू लागले. त्यात आमचे लीजही संपत आले म्हणून घर घ्यावे ह्या मनात घोळत असलेल्या संकल्पनेची पूर्तता करता येते का पाहावे अश्या विचाराने मोहीम सुरू केली. प्रथम जालावरच बरीच शोधाशोध केली. कुठल्या एरियात घ्यायचे हे नक्की केल्यावर शोधाशोध जरा जास्त खोलात जाऊन करता येऊ लागली. आणि मग अनेक गोष्टी समोर आल्या. गेल्या वर्षीपासून एकएक करत मोठ्या मोठ्या धेंडांनी जाहीर केलेली दिवाळखोरी . त्यात मिशिगन हे 'मो-टाउन '. मो-टाऊन चे तीनही बीग जायंट संपूर्णपणे डुबलेले. मिशिगन च्या इकॉनॉमीचे अक्षरशः तीन तेरा वाजलेत. प्रचंड जॉबकटस झाल्याने सगळ्यात मोठा फटका बसलाय तो रियल इस्टेटला.

आधी आमचे आम्हीच घरे पाहत होतो. तीही नवीन कन्स्ट्रक्शनची. त्यामुळे फार काही जाणवत नव्हते. मात्र इतकी इकॉनॉमीची बोंबाबोंब सुरू असतानाही त्यांचे दर तसे चढेच वाटले. मग आमच्या ओळखीच्या रियलटरने एक एजंट दिली. एजंट असेल तर बायरला फार सोयिस्कर होते याचा अनुभव आम्हाला होताच त्यामुळे बरे वाटले. शिवाय आम्ही स्वतःही घरे पाहत होतोच. एका शनिवारी सकाळीच यादी घेऊन बाहेर पडलो. पहिलेच घर छान होते. नवीनच होते. कोणी राहून गेल्यासारखे वाटतच नव्हते. साहजिकच पहिला प्रश्न आला की का बरे घर सोडलेय या लोकांनी? घर सोडले नव्हते तर बँकेने जप्त केले होते. लोनचे हप्ते भरणे शक्य न झाल्याने घर गेलेले. आता नोकरीच नाही तर हप्ते कसे भरणार? वाईट वाटले. या लोकांच्या किती इच्छा, जीव गुंतला असेल या घरात. असे नाईलाजाने घर सोडताना किती त्रास झाला असेल. असे घर घ्यावे का? अर्थात प्रॅक्टीकली हा विचार चुकीचा असला तरी मनात आलेच. घर नक्कीच आवडले होते. किंमतही ठीक होती. विचार करू असे म्हणत आम्ही निघालो. असे घर घ्यावे का हा विचारच मागे पडावा असे अनुभव पुढे येत गेले.

त्या दिवशी आमच्या यादीतील दहा घरांपैकी फक्त एक घर असे होते की ज्यात मालक राहत होता बाकी सगळी बँकेने काढून घेतलेली घरे. काही घरात तर बरेच सामान पडलेले. काहीतरी भयंकर जीवघेणे संकट येऊन रातोरात पळ काढावा लागल्यासारखी माणसे घरातून परागंदा झालेली. एका घरात लहान बाळाच्या दोन बॉटल्स दुधाने भरलेल्या तश्याच होत्या. काही ठिकाणी मोजक्या वेळात उत्पात घडावा असे चित्र होते. सगळे घर उस्तरून जमिनीवर टाकलेले. स्वयंपाकघरात ग्रोसरी पडलेली. जागोजागी कपडे, वस्तू, खेळणी विखुरलेली. बऱ्याच घरांमध्ये इलेक्ट्रीसीटीही नव्हती. मात्र काही घरे एकदम स्वच्छ असली तरी एकप्रकारची उदासी भरलेली जाणवत होती. एका घरात किचनच्या सगळ्या कॅबिनेट्सचे नॉब्जही काढून नेलेले दिसले. तो दाखवणाराही हक्काबक्का झालेला. संध्याकाळी घरी आलो तेव्हा आम्हीच डिप्रेशन मध्ये गेलो. पुन्हा घर पाहायला जाण्याची इच्छाच होईना. घरातील दृष्ये आठवली की डिप्रेशन अजूनच वाढत असे. पण घर घ्यावेसे वाटत असल्याने पाहणे भागच होते.

नंतर आमच्या एजंट बरोबरही अजून दहा-बारा घरे पाहिली. सगळ्यांची अवस्था सारखीच. आताशा मला रस्तोरस्ती घरे पाहण्याचा नादच जडल्यासारखे झाले होते. त्यामुळे अगदी कुठेही पाटी असेल तरी ती मला बरोबर दिसत असे. तेव्हा लक्षात आले की गेल्या सहा महिन्यात रस्तोरस्ती प्रचंड संख्येने घरे विकायला आलीत व बायर नाहीत. मार्केट तीस टक्के खाली गेलेय. दोन वर्षांपूर्वी $५,००,००० किंमत असलेले घर आता $३,५०,००० ला ही विकले जात नाहीये. त्यात जॉब गेला तर इतके प्रचंड हप्ते भरणे कसे जमणार. पण हे सगळे कशामुळे घडलेय? जेव्हा सगळे वरकरणी आलबेल होते तेव्हा याच बँका लोकांच्या मागे होत्या. घराच्या किंमतींच्या ११० ते १२५% लोन देत होत्या. शून्य डाउन पेमेंट वर ११० ते १२५% टक्के लोन, मग लोकही मागचा पुढचा विचार न करता मोठी मोठी घर घेत सुटली. आता घर घेतले की मागोमाग फर्निचर आले. घर रिकामे कसे ठेवायचे? मग त्यासाठी पुन्हा डिपार्टमेंटल स्टोअर्सचे लोन. पुन्हा आमचे सगळे काही थाटाचे व एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच या मनोवृत्तीमुळे नुसते घेत सुटायचे. क्रेडिट कार्डही मुबलक पैसा पुरवत होतीच. कोणालाच धरबंद नव्हता.

अन झाले काय? फुगा फुटला. क्षणात बडी धेंडे हात वर करून मोकळी झाली. परिणामी धडाधड नोकऱ्या गेल्या. नवरा-बायको दोघांची नोकरी एकाच वेळी गेली त्यांना तर शब्दशः परागंदा होण्याची वेळ आली. एकाची गेली त्यांनाही घरे झेपणारी नव्हतीच. सहा महिन्यात जिकडे तिकडे होम फॉर सेलचे बोर्ड दिसू लागले. आता या सगळ्यांनी केलेल्या चुका बाकीचे लोक फेडत आहेत. म्हणजे बेजबाबदार पाहिजे तसे वागून, बडेजाव मिरवून गेले आणि बिचारे सांभाळून असलेले आता निस्तरताहेत. यात नेमकी चूक कोणाची हे ठरवता येणारच नाही. कारण बँकांनी पुरविले तरी आपल्याला झेपेल का हा विचार करण्याची गरज वाटलीच नाही. त्यात आजचा दिवस जगून घ्या मनसोक्त उद्या कोणी पाहिला आहे ही वृत्ती. बडा घर अन पोकळ वासा या उक्तीचा खरेपणा जिकडेतिकडे दिसतोय. घरे फोरक्लोजरमध्ये जाण्याचे प्रमाण अजूनच वाढणार आहे असाच अंदाज आजतरी वर्तवला जातोय.

बरे, आता झाले ते झाले. घरे जप्त झालीत. बँकांना ती खरोखरीच विकायचीत असे चुकूनही जाणवले नाही. एक घर खूप आवडले म्हणून प्रोसीजर काय असते हे विचारले असता कळले की बँकांनी जी किंमत लावली आहे ती किंवा त्यापेक्षा जास्त किंमत आपण ऑफर करायची. ऑफर करताना एक टक्का रक्कम भरायची व बँक तीन महिन्यांनंतर आपला निकाल कळवेल. तोवर तुमचे पैसे अडकलेले वर तुम्ही बांधलेले. नाहीतर सरळ नाद सोडून द्यायचा. म्हणजे कमालच झाली म्हणायची. तीन महिने वाट पाहून बँक नाही म्हणाली तर पुनःश्च हरी ओम. वरती बँक असे भासवतेय की गरज बायरला आहे त्यांना नाही. यामुळे घरे पडून राहण्यात अजूनच भर पडते आहे.

महिना दिडमहीना या चक्रातून भिरभिरल्यावर आम्ही चक्क भाड्याचेच घर बरे आहे, निदान या परिस्थितीत या निर्णयावर येऊन पोचलो. हे सारे अनुभवताना राहून राहून वाटत होते, अशी वेळ कोणावरही येऊ नये. अनेक घरांमधले त्या माणसांचे रेंगाळणारे अस्तित्व पाहून मन अस्वस्थ होऊन गेले. एकीकडे त्यांच्याबद्दल सहानुभूतीही होती तर एकीकडे स्वत:च्या करणीचीच फळे आहेत ही असेही वाटे. आजकालची आपल्याकडची परिस्थिती मला नीटशी माहीत नाही. पण इतकी वाईट नसावी असे वाटते. आतीतायी वेडेपणा करायची आपली प्रवृत्ती नाही. शिवाय सुदैवाने इतके मुबलक लोनही आपल्याकडे उपलब्ध होत नसावे-दहा वर्षांपूर्वी तरी होत नव्हते. आणि आपला संचयी स्वभाव असल्याने लहानपणापासून घुटी बरोबरच हेही बाळकडू मिळालेले आहेच. पगारातील वीस टक्के रक्कम अडीअडचणींकरिता राखून ठेवा. रिसेशन जगभरच आले असले तरी या लोकांना त्याचा जबर फटका बसलाय असे हे म्हणतात. पण याला जिम्मेदार कोण आहे? हे स्वतःच ना?

17 comments:

 1. If you get chance please watch "Houe of Cards" on CNBC. They repeat this program and you will get a very clear idea how real estate market went down. I had thought of writing about it on my blog in marathi but everytime I try I go into depression so its kind of half way thru....

  ReplyDelete
 2. घरं पहावं बांधुन म्हणतात ते कांही खोटं नाही. घर घेतांना इथे काय किंवा अमेरिकेत काय सारख्याच अडचणी!अंगा पेक्ष बोंगा अगदी समर्पक शब्द वापरला. काही दिवसांपुर्वी श्रीकृष्ण सामंतांनी याच विषयावर अमेरिकन काटकसरी होतोय म्हणुन एक लेख लिहिला होता.अमेरिकन्सच्या चादरी बाहेर पाय पसरणाऱ्या अमेरिकन्सचं छान वर्णन केलं होतं.
  शेवटी नविन घर शेवटी मिळालं की नाही ते लिहिलंच नाहीस . जर घेतलं नसेल तर बेस्ट लक....
  आम्ही अजुनही इथे कंपनीच्याच फ्लॅट मधे रहातोय. खरं सांगायचं तर वेळिच प्रयत्न न केल्यामुळे घर घेणं झालेलं नाही अजुन तरी. पण मुंबईला घर घ्यायची इच्छा आहेच. बघु या कसं जमतं ते..

  ReplyDelete
 3. अपर्णा नक्की पाहते.डिप्रेशन इतके येऊ लागले की शेवटी आम्ही आमची मोहीम काही काळासाठी तरी थांबवलीये.


  महेंद्र, कुठेही राहा घर घेताना अडचणी येतातच.नवीन घर( मग त्या वास्तूत आपणच पहिले राहणारे असू दे किंवा आधी कोणी राहत असलेले असू दे ) घेताना मनात खूप उत्साह, आनंद भरून असतो.जोरदार चर्चा, हे किती छान होते-ती जागा मध्यवर्ती आहे, एक ना दोन अनेक गोष्टींचा उहापोह होतो. यावेळी मात्र असे काही जाणवेनाच. जिकडे तिकडे उदासच वाटत राहीले. शेवटी सध्यातरी घेऊ नये असे ठरवले. शिवाय मिशिगनने अजून बॊटम लाईन गाठलेली नाही असा होरा आहे. अजून सहा महिने मार्केट खाली जाईल.:( तेव्हा थांबलेलेच बरे.
  आताशा मुंबईत घर घेणे म्हणजे फारच महाग झालेय खरे पण ठरवलेच तर होईल नक्की.:)तुम्हाला शुभेच्छा!

  ReplyDelete
 4. योग्य शब्द वापरलास ’अंगापेक्षा बोंगा जड’....पुण्यात तरी वेगळे काय झालेय....दुबईत गेलो होतो तिथेही हीच परिस्थिती.....२४,००० कार एअरपोर्ट वर सापडल्या, सगळे मालक रातोरात दुबई सोडून पळालेले.....मुळात लोकांना विचारच करायचा नाहीये, मटेरियलिस्टिक झालय सगळं....डिप्रेशन येतच गं!!! आणि आपण जात्यात नसलो तरी सुपात आहोत या जाणिवेने जागं व्हायला होतं!!!पुढच्यास ठेच आहे आपण शहाणे व्हावं हे उत्तम....
  बाकी भाड्याचे घर मलाही आवडत नाही...लहानपणापासुन स्वत:च्या घरात राहिल्यामुळे असेल पण आता नाईलाज आहे....

  ReplyDelete
 5. 'घर असावे घरा सारखे,नकोत नुसत्या भिंती'
  ................................. हे जे काही काव्य विचार आहेत ते माझ्या रुखवतात सुद्धा होते,
  सगळीकडे घरांच्या स्वप्नांना घर घर लागलीये असे दिसते.मस्कत मध्ये तर हालच हाल आहेत.ज्या प्रमाणात लोक येतात तेव्हडे बांधकाम नाही.रेट कळसाला आहेत.योग आणि नशिबाची साथ असावी हे सत्य स्वीकारावेच लागते.सकारात्मक फिलिंग आल्याशिवाय घर घेऊ नये.इथे घर पहिले कि लगेच आगाऊ रेट देऊन बुक करावे लागते,नाहीतर घर गेले.भारतात तर रेट कोटींमध्ये आहेत.असो शुभेश्च्या.
  अनुजा

  ReplyDelete
 6. ajun ghar ghyaycha anubhav nahi aala pan bhadyacha ghar shodhtanna barech anubhav aale..
  nukatach navin ghar(bhadyacha) milala...
  navra mhanat hota ki aapan second hand ghar vikat gheuya pan tu je lihila aahes te majhya manat hotach..chhan jhalay ga lekh..:)

  ReplyDelete
 7. घर घेताना किंवा बांधताना अडचणी या यायलाच हव्या नाही तर त्यात राहायची काय मजा??? मी पण गावाकडे गेले १ वर्ष झालय घर बांधतोय. . . पण अजुन पूर्ण नाही. .. होईल लवकरच!!

  ReplyDelete
 8. तन्वी तेच ना, आपण जात्यात नसलो तरी सुपात आहोतच हे विसरून अजिबात चालणार नाही.पण आजकाल लोकं वरवरच्या चकचकाटासाठी सारे काही करत असल्याचे सारखे दिसते.असो,किमान आपण सांभाळावे हे उत्तम.अनेक आभार.

  ReplyDelete
 9. अनुजा,गेल्या वर्षी ठाण्याला असताना काही जागा पाहिल्या. अग फुकट देतो तरी राहायला तयार नव्हते लोक २० वर्षांपूर्वी तिथे कोटीच्या हिशोबातच बोला अशी वेळ आली आज.:( बाकी हेच आपले घर असे जोवर आतून येत नाही तोवर घेऊच नये असेच मलाही वाटते. प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 10. मुग्धा छान वाटलं तुझी प्रतिक्रिया पाहून.इथे आणि मायदेशात घर घेणे ही प्रक्रिया सारखीच असेल पण तिथले कायमचे हा भाव मात्र का कोण जाणे इथे येत नाही,:(.मन इथे रुजत नाही( माझे ).

  ReplyDelete
 11. मनमौजी, एकदम बरोबर. गावाकडे घर बांधताय,ग्रेट. अनेक शुभेच्छा!लवकरच पूर्ण होऊ दे, मग दोन दिवस आम्हालाही येता येईल की राहायला. चालेल ना? आभार.

  ReplyDelete
 12. आपण वर्णन अगदी हुबेहूब केलेलं आहे. जो मी अभ्यास केला बातम्यांवरून इकडची परिस्थितीही काही वेगळी नाही. आई टी वाल्यांनी कर्मच्यार्यांना भरमसाट पगार दिले. सर्व खुश. त्यानुसार घरे घेतली. अगदी कमी वयात ३०-३५ लाखाचे कर्ज. आणि फुगा फुटला. माझ ठाम मत आहे प्रत्येकाने चादरी प्रमाणे पाय पसरावेत.काळ कसा येईल, भविष्याच्या पृष्ठांवर काय लिहून ठेवले आहे हे कोणीही जाणू शकत नाही. मी नेहमी याच नियमानुसार पाऊल उचलतो. आणि हो माझ अजून एक मत मांडू इच्छितो ज्या घरात पूर्वीच्या रहिवाश्याचे मन गुंतले असेल ते घेणे योग्य वाटत नाही. अर्थात हे माझे मत आहे.

  ReplyDelete
 13. रविंद्र कसे आहे ना, टाळी एका हाताने वाजत नाहीच तसेच आहे हे.त्यातल्यात्यात देणारा जास्त जबाबदार वाटतो. सहजी मिळतेय म्हटल्यावर घेण्याकडे कल झुकतो पण वेळ येताच देणा~याने हात आखडते नव्हे तर काढूनच घेतले.परिणाम इतका भयंकर झाला.
  खरे आहे आपले, कोणाचे मन गुंतलेले घर घ्यावे का नको असा प्रश्न येतोच मनात तेव्हां न घेतलेले बरे असे वाटू लागतेच.घर घेताना अनेक गोष्टी पडताळून पाहायला हव्यातच.
  प्रतिसादाबद्दल आभार.

  ReplyDelete
 14. khoop samarpak varnan kela aahes retail crisis che.

  punyaat aamhi asa ghar - ghar karat saha aath mahine phirat hoto temvhaa ek bank ne tabyat ghetalela ghar baghitala hote. ghar neet swacch kelele hote, tari pan kunala tari paise phedata aale naaheet mhanun lilaavaat nighalelam te ghar khoop dukkhi vaatalaM ... te ghenaryanee kiti swapnaM baghitali asatil na ... ashee itakee ghare ekadam baghanyachi vel aalyaavar depression yenaarach g.
  tumachya gruhasanshodhanala shubheccha.

  ReplyDelete
 15. गौरी प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. डिप्रेशन तर आलेच शिवाय २०१५ पर्यंत इथले रियल इस्टेट फक्त १५% च्या आसपास सुधारेल अशी आशा जाणकार वर्तवत असल्याने एकंदरीत भितीदायकच स्थिती वाटतेय.:(
  खरे आहे ग, त्यांची स्वप्ने,भावनीक गुंतवणूक तिथे असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे आपण जरी परिस्थितीला जबाबदार नसलो तरी मनात विचार आल्याशिवाय राहवत नाहीत.

  ReplyDelete
 16. khar aahe tujha, अंगा पेक्ष बोंगा agadi baribar, ghar hi ekach gost naste aayushyat karayala, mi hi kal ek yachyvarch post takli aahe, tujhy vicharashi agdi sahmat !

  ReplyDelete
 17. अजय तुझे स्वागत व अनेक आभार.खरे आहे. आता तुझी पोस्ट वाचते.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !