जाता जाता एक नजर इथेही........

Friday, October 23, 2009

नको म्हटले होते ना, तरीही...........सफळ संपूर्ण.

कालच्या धावपळीने सगळेजण अतिशय दमले होते तरीही सकाळी सातसव्वासातला उठले. आता फक्त दीड दिवस उरला होता. उद्या रात्री घरी जायला निघायचे होते. हैदराबादमध्ये अनेक ठिकाणे पाहायला हवीच या यादीत मोडणारी असल्याने वेळाचे नियोजन करणे जरूरीचे होते. चारमिनार, सालारजंग म्युझियम, नेहरू झूऑलॉजिकल पार्क व ’ लाद ’ नावाने प्रसिध्द -बांगड्या व मोत्यांचा बाजार हे पाहायचे व वेळ उरलाच तर मग अजून एकदोन ठिकाणे पाहू असे ठरले. " चला आवरा पटापट तोवर महाराज नाश्ता बनवेल तो खाऊ आणि प्रथम चारमिनार पाहू. " असे मामांनी सांगताच जोतो आवरू लागला. पावणेनऊला महाराजने तिखटमिठाच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी व दही असा भरपेट व मस्त नाश्ता दिला. तो खाऊन आम्ही निघालो.

जुन्या हैदराबादच्या मध्यभागी मोहम्मद कुली कुतुब शहाने महामारीपासून मुक्त केल्याबद्दल अल्लाचे आभार मानण्यासाठी १८० फूट उंची असलेला चारमीनार १५९१ मध्ये बांधला असून जमिनीपासून याची उंची १८० फूट इतकी आहे. प्रत्येक खांब हा १६० फूट उंचीचा आहे. इस्लामच्या प्रथम चार खलिफांचे प्रीत्यर्थ हे चार खांब असून चार मजले आहेत. सगळ्यात वरच्या मजल्यावर ४५ मोठी दालने नमाज पढण्यासाठी असून शुक्रवारच्या नमाजाकरिता येणाऱ्या खूप लोकांकरिता मोठा छज्जा आहे. लाईम स्टोन व ग्रॅनाइटचे संपूर्ण बांधकाम असून कझिया पद्धतीचा उत्कृष्ट नमुना आहे. जवळपास १५० पायऱ्या चढून वर गेल्यावर हैदराबाद शहराचा मनोरम नजारा पाहता येतो. मीनारांच्या आत अप्रतिम कोरीवकाम आहे. आवर्जून पाहावे असाच आहे. याच्या आसपासच हैदराबादचा अतिप्रसिद्ध बाजार भरतो. आई व सगळ्या काकूंना या बाजारात खूप काही घ्यायचे होते.

आम्ही गेलो तेव्हा आजच्या अतिप्रसिद्ध बिर्लामंदिराचे बांधकाम सुरू होते. संपूर्ण संगमरवरात बांधलेले हे मंदिर पुन्हा जायचा योग येईल त्यावेळी जरूर पाहायला हवे.



नेहरू झूऑलॉजिकल पार्क प्रचंड मोठे असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस त्याच्यासाठी ठेवावा. आज सालारजंग म्युझियम व बायकांची खरेदी करूयात असे म्हणत सगळे म्युझियम कडे निघालो. सालारजंग म्युझियमची स्थापना १९५१ साली झाली असून एकंदर ७८ खोल्यांमध्ये जवळपास ४०,००० वेगवेगळ्या वस्तू, शिल्पे, दुर्मिळ पुस्तके, कुराण, वेगवेगळ्या देशातील उत्तमोत्तम पेंटिंग्ज, पुतळे व मोजताही येणार नाहीत इतकी लढाईस उपयुक्त हत्यारे- रत्नजडित तलवारी, ढाली, चिलखते, लोखंडाचे मुकुट, जोडे आणि अनेकविध गोष्टी पाहायला मिळाल्या. खूप मोठी दालने व अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहता पाहता अंधार पडला. खूप विविध घड्याळेही पाहायला मिळाली. एकात प्रत्येक तासाचे टोले द्यायला एक माणूस खाडकन दरवाजा उघडून येई व टोले देऊन गायब होई. तर दुसरीकडे एक कोंबडा येत असे व चोचीने लंबकावर प्रहार करी. हे टोले पाहायला आम्ही ताटकळत उभे होतो. मस्त मजा आली. अजूनही प्रचंड संख्येने टांगलेल्या तलवारी, भाले , ढाली मला चांगल्याच लक्षात राहिल्यात. थोडी भीतीच वाटली होती त्या पाहताना. तलवारींच्या मुठीवर व जांबियांच्या म्यानावर जडविलेले पाचू, नील व माणके मनात घर करून राहिलीत.

चला चला बांगड्या-मोती बाजार वाट पाहतोय हो आमची असा समस्त महिलामंडळाने धोशा लावला तसे मामा म्हणाले, " अरे आल्यासरशी तुम्हीही घ्याकी पाहून मग तिथेच म
स्त चाटच्या गाड्यांवर खाऊ-मजा करू. आजची आपली शेवटची रात्र आहे हे लक्षात आहे ना?" खायचे नाव निघाले तसे काकामंडळही निघाले. " अतिचेंगटपणा करू नका गं, काय त्या बांगड्या, मोतीबिती घ्यायचे त्या घ्या पटापट. कितीही भाव केलात तरी ते तुम्हाला गंडवणार आहेतच. " कधी नव्हे ते गायतोंडे काकांनी खोचक पवित्रा घेतला आणि लागलीच सगळ्यांनी त्यांची री ओढत आटपा बरं का लवकर अशी ताकीद दिली. " अरे कमाल झाली अजून पोचलोही नाही त्याआधीच सुरवात. हे पाहा तुम्ही वेगळे फिरा आम्ही लेकींना घेऊन फिरतो. दीड तासानेजिथून वेगळे झालो तिथे भेटू." असे शेट्येकाकूंनी सांगून टाकले. सगळ्या पोरांना बाबांनी सांभाळायचे व पोरींना आयांनी अशी वाटणी झाली आणि ' लाद बाजारात ' आम्ही घुसलो.

अलीबाबाचा खजिनाच दिसावा अशीच माझी तरी अवस्था होती. काय पाहू आणि काय काय घेऊ. एरवी कधीही फारसे काहीही हट्ट करून न मागणारी मी आईला जे दिसेल ते घे ना गं म्हणू लागले लाखेच्या आरशाचे छोटे तुकडे जडविलेल्या सुंदर रंग व वेगवेगळी नक्षी असलेल्या बांगड्या, डझनावारी बांगड्यांचे सेट्स, मोत्याच्या नाजूक बांगड्या, तिनचार रंगातील मोत्याच्या बांगड्या, गळ्यातले व कानातली. जरदोजी काम केलेले शरारा, साड्या, घागरे-चोळ्या डोळ्यांचे पारणे फेडत होत्या. जिकडेतिकडे नुसता लखलखाट होता. पेट्रोमॅक्सच्या मोठ्या मोठ्या बत्त्यांचा पिवळा प्रकाश बांगड्या व इतर दागिन्यांवर पडून त्या अशा काही चकचकत होत्या की कोणीही प्रेमात पडावे. पूर्ण सहलीत आमच्या आईने फारसे काही घेतले नव्हते इथे मात्र तिने मनापासून खरेदी केली. मला चार चा एक असे तीन सेट्स घेतले. स्वतःला आठचा एक असे चार व आम्हा दोघींना मिळून सुंदरसा मोत्यांचा एक सेट घेतला. जरदोसी काम केलेली मोरपिशी रंगाची घागरा- चोळीला घेतली. पुढे चांगली चार-पाच वर्षे मी कितीतरी वेळा ती घालून मिरवत होते. आमच्या आजीसाठीही आईनेगदी हिऱ्यासारख्या दिसणाऱ्या सात खड्यांच्या कुड्या घेतल्या. ही खरेदी करू तितकी थोडीच होती पण पैसे खूप कमी असल्याने सगळ्या काकूंनी आवरती घेतली शिवाय परतायची वेळही झाली होतीच.

मग तिथेच चाट, बिर्याणी, नवाबी सब्जबहार सोबत कुलचा व नंतर खास हैदराबादी रसमलाई खाऊन खरेदीच्या आनंदात परतलो.

सुंदर बांगड्या व घागरा-चोळी माझ्यासाठी घेतली आहे या आनंदामुळे
मला झोपच येईना. दर पाच मिनिटाने मी बांगड्या व ड्रेस पाहत होते. माझ्या अंथरुणाशेजारीच मी खरेदीची पिशवी ठेवली होती आणि तिचे बंद हातात घट्ट धरूनच केव्हातरी झोपून गेले .

आज रात्री घराकडे परतायला निघायचे होते. सकाळी सगळे जरा लवकरसेच उठले. संपूर्ण दिवस नेहरू झूऑलॉजिकल पार्क साठी ठेवला असला तरी आरामात आवरून चालण्यासारखे नव्हते. पार्क सकाळी नऊला उघडतो तेव्हा आपण त्या दरम्यानच तिथे पोचलो तर बरेच काही पाहता येईल असे मामांनी सांगितल्यामुळे कोणीही रेंगाळले नाही. अगदी राजेकाकू व नाईककाकूंनीही आज धोबीघाट न करता पटकन आवरले. महाराजने आज लवकर उठून साधा डोसा व मसाला डोसा बनवला होता. त्याचा सुगंध संपूर्ण धर्मशाळेभर पसरला होता. काल रात्री इतके पोट फुटेस्तोवर जेवलेले कधीच पचले होते. महाराजने वर्दी देताच सगळे जण डोसामय होऊन गेले. " आत्ताच भरपेट खाऊन घ्या रे म्हणजे बाहेर जेवायला नको. संध्याकाळी जेवून निघू काय." इति मामा.



सुतार पक्षी


रसना अगदी तृप्त झाल्यावर आम्ही निघालो. साडेनऊला पार्कमध्ये शिरलो. १९६३ साली बांधलेले एकंदर ३०० एकर जमिनीवर पसरलेले हे प्रचंड मोठे पार्क आहे. जवळजवळ १५०० जातींचे पशू-पक्षी-फुलपाखरे-सरपटणारे जीव असून खास आकर्षण म्हणजे ' लायन सफारी ' ' टायगर सफारी ' ' बेअर सफारी ' व ' बटरफ्लाय सफारी '. आज आम्ही मुले फार खूश होतो. इथेही लहान मुलांची टॉय ट्रेन आहे. या सगळ्या सफारी राईडस केल्या व ट्रेनमध्येही बसलो. सीताफळे म्हणजे अगदी जीव की प्राण आहे माझे. नेमके पार्कच्या गेटवर सीताफळांची रास होती. आम्ही सगळ्यांनी खूप सारी घेतली व दिवसभर तीच खात होतो. मामांनी दोनतीन वेळा म्हटलेही, " अरे दोन-तीनच खा बरकां, नाहीतर त्रास होईल. " पण कोणी लक्ष दिले नाही त्यांच्याकडे. असेही उद्या तर घरीच जायचे होते आणि सीताफळाने कोणी आजारी पडते का?

हत्ती, सिंह, वाघ, खूप वेगवेगळे पक्षी त्यांची घरटी, अनेकविध आकर्षक फुलपाखरे-त्यांची विलक्षण रंगसंगती व डिझाइन्स पाहून अचंबित होत होतो. माकडे, अस्वले, सोनेरी हरणे, कोल्हे, लांडगे, रानडुकरे गणतीच नाही इतके प्राणी आहेत इथे. तीच तऱ्हा पक्षांची. संध्याकाळी पाच वाजता पार्कच बंद होणार म्हणून नाईलाजाने निघालो.


धर्मशाळेत पोचल्यावर सगळी मोठी माणसे सामान आवरू लागली. मी, भाऊ, चित्रा, गिरीश, नीलिमा, नितू, अशोक व रवी तिथेच लंगडी, लपाछपी खेळण्यात रमलो. सात वाजत आले तसे जेवायला चला रे च्या हाका येऊ लागल्या. सीताफळे व पाणी याशिवाय काहीच खाल्ले नव्हते दिवसभरात व पायाचे तुकडे पडतील इतके चाललो होतो. त्यामुळे खूप भुकेजलेलो. महाराजने शेवटच्या दिवसाचे म्हणून खास जेवण बनवले होते. हैदराबादी शाही पुलाव, कोफ्ता करी, दही वडे व सेवयां.

जेवताना सगळे काका महाराजला म्हणू लागले, " अरे बाबा तू इतके सुंदर जेवण जेवायची सवय लावलीस आता घरी गेले की फार जड जाणार आहे रे. घरी कोण देणार हे आम्हाला तिथे आपला नेहमीचे मुळमुळीत भाजी-पोळी व ताक भात." आता हे ऐकल्यावर महिलामंडळ गप्प थोडेच ना बसणार होते. मग झाली जुगलबंदी सुरू.
महाराज मात्र खुशीत होता. मेहनतीचे चीज झालेले. त्याने आवरायला घेतले तसे सगळे पांगले. नऊला धर्मशाळेला रामराम करून स्टेशनवर पोचलो. गाडी लागलेली होतीच. रिझर्वेशनही होते. पोटोबा पूर्ण पॅक असल्याने आता कधी ब्रह्मानंदी लावतो असे झाले होते सगळ्यांचे. आपापल्या जागा पकडून बर्थवर उश्या- पांघरुणांची जमवाजमव होईतो गाडी सुटली सुद्धा. आम्ही चाळीस जण असल्याने अर्धा डबाच प्रत्येकवेळी आम्ही व्यापत असू. मग इकडून तिकडे बोलायचे म्हणजे ओरडूनच बोलावे लागे. पडल्यापडल्या मोठ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. कान लावून ऐकत होते पण मध्येच कधीतरी झोप लागून गेली.

जाग आली तीच कापी कापीच्या आरोळ्यांनी.
या मद्रासी फिल्टर कॉफीचा सुगंध खासच असतो. एकतर आम्हाला कधी कोणी चहा-कॉफी पिऊ देत नसत. त्यामुळे आज कॉफी मिळणार ही पर्वणीच होती. " आई, मला पण हवी गं कॉफी.... " अरे पण हे काय.... शब्द बाहेरच येईनात नुसतीच हवा. घसा पूर्ण बसला होता. मी मुकी झालेले. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण हवेशिवाय काही निघेना म्हटल्यावर मला रडूच कोसळले. आई पाहत होती आणि हसत होती. मग तिने मला जवळ घेतले व म्हणाली, " अग कालच्या सीताफळांचा परिणाम आहे हां. नको घाबरू तू काही मुकी झालेली नाहीस. " तिचाही आवाज काही नेहमीसारखा नव्हताच पण निदान आईला बोलता तरी येत होते. लागलीच चित्रा, अशोक, नीलिमा, गिरीशकडे पळाले तर काय मज्जाच मज्जा. सगळेच फुसफुसत होते. कोणालाच बोलता येत नव्हते. तरी मामांनी सांगितलेले की जास्ती सीताफळे खाऊ नका...... पण ऐकले असते तर ना. काका-काकू मंडळींनाही बाधले होते पण बोलत होते सगळे.

पाहता पाहता सहल संपत आली. पुणे गेले तसे सगळेच खूप हळवे होऊ लागले. गेले एकोणतीस दिवस आम्ही चाळीसजण लगातार एकमेकांबरोबर होतो. सुरवातीला काही थोड्या ओळखीचे तर काही पूर्ण अनोळखी आणि आज एका घरातले होऊन गेलेलो. लहान वयात इतर कुठलीही टेन्शन्स, विचार नसतात ना. मनसोक्त हुंदडता येतं, कोण काय म्हणेल हा विचारही शिवलेला नसतो. छोट्या छोट्या गोष्टींतला मोठ्ठा आनंद व क्षुल्लकशा कारणाने वाहिलेल्या गंगायमुना....:) इतकी सारी माणसे व प्रत्येकाची निराळी तऱ्हा तरीही एक महिना सगळेजण एकमेकाला सांभाळून घेत होते. कुरबुरी झाल्याच-साहजिकच आहे पण कोणीही ताणून धरले नाही. गोखलेकाकू-गायतोंडे आजींमुळे गाड्या चुकल्या. अचानक मुक्काम करावा लागला पण सगळ्यांनी सहकार्य केले तेही मनापासून. वेळप्रसंगी अगदी एकमेकांच्या बॅग्ज उचलण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत मदती केल्या गेल्या. मामांनी कधीच प्रोफेशनल दृष्टिकोन ठेवला नाही. सगळेच त्यांच्या घरचेच होतो व त्यांनी अगदी प्रेमाने जास्तीत जास्त सोयी, खाण्यापिण्याची चंगळ पुरविली. हॅटस ऑफ मामा. खूप खेळलो, हुंदडलो. आजही यातले काही मित्र-मैत्रिणी आवर्जून आठवण काढतात/मेल करतात. हीच तर खरी कमाई .

दादर आले. सगळे भराभर उतरले. हो ना नाहीतर जावे लागायचे पुढे. भरल्या अंतःकरणाने सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. पुढच्या सहलीचे पाहू नंतर पण निदान महिन्याभरात सगळे पाच गार्डन मध्ये भेटू आणि मस्त भेळीचा बार उडवू असा ठराव एकमताने पास झाला व आपापल्या घरी निघालो. एक महिना सहल व इतकी दूरवर आणि अनेक ठिकाणे, या सगळ्यांचा एकूण खर्च किती आला असावा?? काही अंदाज मंडळी?किती म्हणताय? चार-पाच हजार.... तुम्हाला हो काय वाटतेय- त्यापेक्षा जास्त? हा... हा..... अंदाज चुक्याच तुम्हारा. फक्त रुपये २,२००/-
आम्हा चार जणांचे एकूण रुपये १,७००/- मामांना आगाऊ दिले होते. ट्रीपच्या मध्ये थोडी गडबड झाल्याने अजून रु.१००/- वर दिले व खरेदी-खाणे-पिणे मिळून वर रु.४००/- खर्च झाले. आमच्या बाबांकडे पै न पै चा हिशेब लिहिलेला आहे. गेल्या वर्षीच्या मायदेशाच्या भेटीत या डायऱ्या काढून त्यातले खर्चाचे आकडे पाहून आई-बाबा व मी खो खो हसत होतो. खरेच वाटत नाही मला. आजकाल चाळीस माणसांना घेऊन एकवेळचे ' शिवाप्रसाद ' ला जेवायला गेलो तर सात-आठ हजार पुरतील का नाही कोण जाणे. आणि आम्ही फक्त बावीसशे रुपयांत तीस दिवस धमाल केली. असा दुर्मिळ योग पुन्हा येणार नाही पण सहलीचा आदर्श ठरावा अशी ही आमची सहल अविस्मरणीय झाली.


हे तेरा भाग आवर्जून वाचणाऱ्या सगळ्या माझ्या मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार. प्रवास वर्णने वाचणे बरेचदा कंटाळवाणे होते त्यात हे इतके लांबलचक. सांभाळून घेतलेत-प्रोत्साहन दिलेत खूप आनंद वाटला.

फोटो जालावरून
समाप्त.

8 comments:

  1. छानच झाला प्रवास...तुमच्यासोबत आम्हिही जवळपास महिनाभर फिरत होतो... :)... मजा आली.

    ReplyDelete
  2. रोहिणी आभार गं:)

    ReplyDelete
  3. हे हे हे.....नको म्हटले होते ना मामांनी, खाल्लीत तरी सिताफळं......गेल्या दोन तीन दिवसात चूकल्यासारखं होत होतं कारण तुम्ही सगळे निमुट मामांच ऐकत होतात.....
    मजा आली पण वाचून.....हुश्श!!!आलो एकदाचं घरी असं तुझ्याबरोबर म्हणावसं वाटतय....

    ReplyDelete
  4. chhanach jhali sahal tumachi. aani naav agadee saarth aahe pravaasavarnanaacaM. aata sahal kaadhalee tar devasache 2200 rupaye puranar naaheet 4 maanasaamnaa :)

    ReplyDelete
  5. अग तर काय मामांचे ऐकायचे नाही असा जणू नियमच झाला होता:D चुकून दोन दिवस शहाण्यासारखे वागलो होतो तर मामांना चुकल्यासारखे वाटले असेल ना...हीही. तन्वी, आवडेल मला तरी पुन्हा असे जायला. फक्त धर्मशाळा आता झेपणं कठीण आहे गं.....:)

    ReplyDelete
  6. गौरी अग आजकाल साध्या हॊटेलची रूमही २००० च्या पुढेच आहे तर बाकीचे काही विचारायलाच नको.तुमचे मन:पूर्वक आभार.:)

    ReplyDelete
  7. अहो भाग्यश्रीताई तुम्ही ते सर्व लिहा पण ते खादाडीचे फ़ोटो आधी हटवा.आज चांगलं बाहेर वाढदिवसाची एका हॉटेलमध्ये पार्टी होती तिथलं खाऊन पिऊन वाचतेय तरी भूक लागलीय....पण काहीही म्हणा तुमच्याबरोबर आम्हाला पण घरी पोहोचल्यासारखं वाटतंय....आणि ते सिताफ़ळांचं प्रकरण बाक मस्त..कुणाला गप करायचं असेल तर ही ट्रिक वापरली पाहिजे....मजा आली...

    ReplyDelete
  8. हेहे...चला आता घरी पोचलो सुट्टी संपली.कामाला लागायला हवे.:)अगं सिताफळाने खरेच आवाज बसतो गं.आम्ही नंतरही एकदा सिझनमध्ये अशीच स्वस्त आणि मोठी सिताफळं मिळाली म्हणून घेतली आणि चापली तर काय दुसरे दिवशी संपूर्ण घरात शांतता. जोतो गरम पाणी पित होता दिवसभर..हाहा
    अनेक आभार अपर्णा.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !