जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, February 9, 2012

तळ्यात का मळ्यात...

टिकली लावावी म्हणून आरशात डोकावले तिने. तारवटलेले डोळे. वाढत चाललेली काळी वर्तुळे. स्वत:ची म्लान छबी पाहून तिला भडभडून आले. अनावर झालेले कढ आटोकाट दाबत लेकाचे चिमुकले बोट आधारासाठी घट्ट धरत ती घराबाहेर पडली.

रिक्षा.... हाकेसरशी ब्रेक मारत रिक्षा थांबली. तिला-लेकाला घेऊन धावू लागली.
पाळणाघर.... ब्रेक..... लेकाचा पापा... टाटा. रिक्षा भरधाव.
ब्रेक.... स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर २. लेडीज स्पेशल.
चक्क खिडकीचा लाभ. एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... मन सैरावैरा.
पुन्हा एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... गालावर ओल.
’आज हवा पावसाळी झालीये नं... ’ शेजारणीशी सारवासारवी.

ऑफिस.... कामाचा डोंगर. दोन दिवसांनी डिपार्टमेंटल एक्झामचा रिझल्ट.
दिवसभर मार्कांची जुळणी... कोणी एका मार्काने पास तर कोणी नापास.
तळ्यात का मळ्यात...

कललेली दुपार.
ट्रिंग ट्रिंग....
सशाचे कान... काळजात धडधड....
घे... तुझाच आहे गं.
पावलं जडशीळ.... मार मार उडी मार... तळ्यात का मळ्यात... पावलं जडच.
मधल्या रेषेवर कधीच का उभं राहू देत नाही ?

फोन कानाला. खोल विवरातून अंधुकसे हॅलो...
पलीकडून सळसळता उत्साह....
" काय गं! बरी आहेस नं? असं काय मेलेल्या आवाजात हॅलो म्हणते आहेस? बरं ते सोड. ऐक.... "
श्वास बंद... कान बंद.... मन बंद. मधली रेषा. बास...
" अगं ऐकते आहेस नं.... आज संध्याकाळी अशोकची पार्टी आहे. मी येतो वेळेवर. तू जेवायची मात्र थांबू नकोस. कालच्यासारखा उशीर नाही करणार.... प्रॉमिस! बच्चू प्रॉमिस! बाय! "
फोन बंद...
तळ्यात का मळ्यात...

खच्चून भरलेली लोकल. पाठीला पाठ... पोटाला पोट.
मनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं!
देव शहाणा आहे. दु:ख वाटता येण्याची सोय त्याने ठेवलेलीच नाही. नो बार्टर सिस्टिम विथ सुखं-दु:खं.
बरंच आहे. कोणाकोणाला वाटणार आणि कोणाकोणाची घेणार...

स्टेशन... भाजी... पाळणाघर... रिक्षा... घर. देवापाशी दिवा. लेकाची गडबड... मऊ वरणभाताचा सुगंध... लेक तृप्त. डोळ्यावर पेंग.

ट्रिंग ट्रिंग..... " अगं मी बोलतोय. जेवलात नं? बच्चू झोपला का? मी निघतोच अर्ध्या तासात. साडेनऊला घरी. "

ती खिडकीत. रोजच्यासारखीच. जीवाची घालमेल.... रोजच्यासारखीच...
एक नजर घड्याळाकडे एक नजर खिडकीतून दिसणार्‍या अंगणाच्या तुकड्याकडे. रोजच्यासारखीच….

साडेदहा... रिक्षा... ब्रेक. नजरेत आशेचे दिवे... खाडखाड वाजणारी पावलं. विझलेली नजर...
तळ्यात का मळ्यात...

एक नजर घड्याळाकडे.... साडेअकरा.... साडेबारा.... सव्वा...
रिक्षा... ब्रेक..... गेटची करकर.... झोकांड्या खाणारी पावलं... हृदयात धडधड....खिडकी बंद.... दार उघडं.

जिन्यात हेलपाटणारे बूट... डोक्यावर ओढलेले पांघरूण... ओघळलेले दोन अश्रू.... सिंधूचं तळं...
कानावर गच्च दाबून धरलेले हात. तरीही फटीतून घुसलेले उलटीचे आवाज... आतडी खरवडून टाकणारे... मागोमाग व्हिवळणारे आवाज... असह्य आवाज...
" चुकलो गं मी. उद्या नाही... उद्या नाही.... "
श्वास बंद... कान बंद.... मन बंद.

ओठावर ओठ घट्ट दाबले तरी बाहेर आलेले शब्द, " एकदाचा मर तरी. तूही सुटशील आणि मीही..."

तारवटलेले डोळे... वाढलेले काळे... बरोबर मधल्या रेषेवर लाल भडक टिकली...
देवाब्राम्हणासमक्ष लावलेली... असोशीने लावलेली... प्रेमाचं प्रतीक... निर्णयाची भीषणता... बच्चूचे भविष्य... लाल भडक टिकली...

उगवत्या दिवसाचा एकच सवाल..... तळ्यात का मळ्यात....?????

31 comments:

 1. जब्बरदस्त झालीये ही कथा. एकदम वेगळी. एकदम वेगळी स्टाईल.. So non-Bhanas :)

  ReplyDelete
 2. एकदम वेगळी स्टाईल +१
  कथा म्हणण्यापेक्षा वास्तव आहे म्हणेन.. अवतीभवती बरीच घरटी उध्वस्त झालेली पाहिली आहेत.

  ReplyDelete
 3. कथा कुणाच्याही तळ्याचा ठाव घेणारी.... आणि मळा विषण्ण करणारी आहे :(नशीब मी पीत नाही:)

  ReplyDelete
 4. :) चांगली जमलीय कथा...एका वेगळ्या शैलीत.

  ReplyDelete
 5. किती जबराट वर्णन...hatts off to u....

  पण तितकाच मन हेलावणार ..विचार करायला लावणार सत्य....(काहींच्या आयुष्यातलं)

  ReplyDelete
 6. >>>मनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं!

  हे वाक्य असो की अगदी संपुर्ण पोस्ट/ कथा.... खूप हटके जबरदस्त उतरलीये गं....

  अंतर्मुख केलेस अगदी....

  ReplyDelete
 7. अनेकींची ही रोजची लढाई .. एका अर्थी शेवट नसलेली!

  ReplyDelete
 8. शेवट एकदम परफेक्ट... :) वास्तववादी.. :)

  ReplyDelete
 9. aaychya gawat....kay bhannat lihile aahe....aakhi katha chitrptasarkhi samor tarli. sundar...zakas...angawar sarkan kata aannari....mast mast...aawdleeee.
  pan kiti diwsane...awdhe diwas kothe bepatta ...awdha break bara nave ho)

  ReplyDelete
 10. मनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं!
  देव शहाणा आहे. दु:ख वाटता येण्याची सोय त्याने ठेवलेलीच नाही. नो बार्टर सिस्टिम विथ सुखं-दु:खं++++

  अगदी अगदी!!
  मस्तच पोस्ट ...

  ReplyDelete
 11. हेरंब धन्यू रे! फार जवळून तडफड बघितली आहे ही. :(:(

  ReplyDelete
 12. संकेत, हे वास्तव फार विचित्र आहे. उध्वस्त होऊनही सुटका नसणारे. :(

  धन्यवाद रे!

  ReplyDelete
 13. श्रीराज, कसं नं कळत असूनही लोकं थांबतच नाहीत. सगळं पणाला लावून गमवून बसतात. रोज दिवस उजाडला ( त्यांचा ) की प्रचंड अपराधी भावना आणि एकदा का सूर्य कलू लागला की...एकच पेला!

  ReplyDelete
 14. अनघा धन्यवाद गं!

  ReplyDelete
 15. आभार्स सुप्रिया! जळजळीत वास्तव खूप सार्‍या घरट्यांचं! :(:(

  ReplyDelete
 16. तन्वी आभार्स गं बयो! :)

  ReplyDelete
 17. खरेय सविता. काही वेळा या लढाईचे पर्यवसन आकलनाच्या बाहेरच्या गोष्टी करायला भाग पाडते. मग नेमके दुर्दैवी कोण कोण असा प्रश्न उभा राहतो.. सोबत कोलॅटरल डॅमेजही असतोच.

  ReplyDelete
 18. धन्यू रे रोहना !

  ReplyDelete
 19. प्रसाद, आभार्स रे! आणि माफी! हल्ली जरा जास्तीच ब्रेक होतोय. :(:(

  ReplyDelete
 20. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 21. धन्सं रे दीपक!

  बाकी मनाला मन चिकटत असतं तर... हा हा! काय काय रामायण महाभारत घडलं असतं नं! आता एक कथा लिहावीच का यावर... :D:D

  ReplyDelete
 22. भयानक वास्तव!! अंगावर काटा आणणारं!!

  ReplyDelete
 23. एक कथा लिहावी का यावर?
  नेकी और पुछ पुछ ??? हे हे हे लिहिते व्हा... :)

  ReplyDelete
 24. mazhich katha vatil

  ReplyDelete
 25. किती तरी सिंधुंच्या जीवनाचे वास्तव उतरवले आहेस या पोस्टनी . सुंदर लेखन .

  ReplyDelete
 26. आभार्स आशाताई!

  ReplyDelete
 27. >>एकदम वेगळी स्टाईल.. So non-Bhanas

  ++++

  ReplyDelete
 28. मनाला मन चिकटत असतं तर काय काय ऐकू आलं असतं नं!
  देव शहाणा आहे. दु:ख वाटता येण्याची सोय त्याने ठेवलेलीच नाही. नो बार्टर सिस्टिम विथ सुखं-दु:खं +11111


  ___/\___

  ReplyDelete
 29. धन्यू रे विद्याधर...

  ReplyDelete
 30. प्रियांका, आभारी आहे गं...

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !