जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, July 10, 2011

मोकळीक...

जोरदार पावसाची चिन्हे दुपारपासूनच दिसत होती. अर्धा जून उलटला तरी म्हणावी तशी झड एकदाही लागली नव्हती. मेच्या शेवटास वळीव गाजावाजा करत कोसळला. पाहता पाहता चहुबाजूने काळे ढग घेरून आले. उन्हाच्या काहिलीने तापलेला वारा अचानक अंगात येऊ घातलेल्या बाईसारखा वेडावाकडा घुमू लागला. शुष्क, हल्लक पानांची स्वत:ला तुटू न देण्याची तारांबळ उडवत, भुईवरल्या कोरड्याठाक धुळीला मन मानेल तसे वारा दौडवू लागला. जिथे जिथे घुसता येईल तिथे तिथे घुसून वळीवाची दवंडी पिटू लागला. अरे तारेवरचे कपडे काढा रे, वाळवणं उचला रे, चा हाकारा कानी पडून मनांनी त्याची नोंद घेईतो मोठे मोठे टपोरे थेंब एकमेकाची पाठ धरत धरेवर कोसळू लागले. जे जे धारांच्या सपाट्यात सापडले त्या सगळ्यांना सचैल न्हाऊ घालत स्वच्छ करून टाकले. डांबरी रस्ते, झाडे, घरांच्या भिंती, गाड्या, माणसे, सारे सारे आंर्तबाह्य धुतले गेले. उन्हाचे तडाखे न सोसून अगदी कोरडीठाक झालेली डबकी, धुळभरल्या पाण्याने गढूळ भरून गेली. चातकासारखी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारी धरा अचानक आलेल्या त्या टपोऱ्या थेंबांच्या लगटीने काहीशी सुखावली. पण धारा तिरप्या होत्या. धरेला ठाऊक होतं. हे सुखं काही काळाचंच आहे. चांगला पाचसहा तास दणकून धुमाकूळ घालून जसा आला तसाच पाहतापाहता वळीव बरसवणारे काळे ढग घेऊन वारा पसार झाला तो झालाच.

त्यानंतर पुन्हा सुरू झाला तो असह्य उकाडा. उगाच एक तुकडा टाकून तोंड चाळवल्यासारखे करून पावसाने पुन्हा सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. शाळा सुरू होऊन आठवडा झाला. पोरांच्या रंगीबेरंगी छत्र्यांचे, पावसाळी चपलांचे कोरेपण संपेचना. गरगर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांना माखलेली धुळीची पुटं कोरडीठाक झाल्याने पुंजक्यापुंजक्याने गळू लागलेली. भिंतीच्या सांध्याजवळ चुकून जरी टेकलं गेलं की गुदमरायला होऊ लागलं. भिंतीचे कोरडे फूत्कार सोसेना झाले. हवेतील संपूर्ण आद्रता शोषली गेल्याने हवेलाच हल्लकपण आलेले. आजची सकाळ उजाडली तीच एक गदगदलेपण घेऊन. सूर्याच्या तापाने कळस गाठला. वाटले सूर्यही करपलाय. अंगाचा दाह त्यालाही सोसवेना झाल्यासारखा. समोर सापडेल त्या ढगाच्या पुंजक्यानं मागे तो लपू लागला. ते विरळ पुंजके त्याच्या तापाने अजूनच फाटत जाऊन सैरावैरा पळू लागलेले.

सूर्य आणि ढगांची ती पकडापकडी डेस्कवरून एकटक पाहत रमा बसली होती. ’आसमंतातली शुष्कता मोठी की अंतरंगातली... ’ याची शोधाशोध गेले काही दिवस सुरू होतीच. ’ ओलावा ’ कसा झिरपत जातो. मग ती ’ ओल ’ भिंतीतली असो की मनातली. तिला भिनून जाणेच कळते आणि जमतेही. रमेच्या मनातही अश्याच काही तीव्रतेने भिनून तिला सर्वांगी ओलेती करून अचानक हात आखडता घेत घेत शुष्क झालेल्या ओलाव्यांच्या पडलेल्या भेगा, करपट होऊन करवडलेल्या.

पहिली भेग न कळत्या वयातली, मग दुसरी, मग तिसरी.... प्रत्येकवेळी नवी आशा, नवा ओलावा. प्रत्येकाचा शेवट मात्र ठरलेला. पुन्हा उभारी. नव्याने मांडलेले गणित. आधीच्या भेगांच्या अनुभवाची उजळणी करून आखलेला रस्ता. डोळ्यात तेल घालून दिलेला पहारा... इतकुशीही चूक होऊ नये म्हणून दक्ष राहून केलेल्या वेगळ्याच चुका. तरीही शेवट ठरलेलाच..... का? का? उत्तर शोधूनही मिळत नाही... समोर दिसत राहतात त्या कातडीवरच्या फाकत चाललेल्या चौकटी. डोळ्याखालची वर्तुळं..... आणि साचलेला, ओरबाडणारा असह्य एकांत!

दुपार तापू लागली तसतसे कुठुनसे काळेकुट्ट ढग एकामागोमाग एक जमू लागले. पाहता पाहता आभाळ गच्च भरून गेले. सूर्याची भेदकता निष्प्रभ झाली. काळ्या ढगांची आक्रमक दाटीवाटी, सौदामिनीचे त्यांना कडाडून छेदत लखलखणे, पाठोपाठ तिला दाद देत त्यांचे रोरावतं येणे. मधूनच एखाद्या काळ्याकुट्ट ढगाला सोनेरी किनार लावत धडपडत डोकावणारा सूर्य. जीवन घेऊन बरसणाऱ्या थेंबांच्या आगमनाची वर्दी देण्याचा लाडका खेळ या साऱ्यांनी मांडलेला. ढगांनमधून मोकळे होते होत थेंब बरसू लागले. खिडकीत उभे राहून पापणीही न लववता रमा सृष्टिची धडपड पाहत होती. आजूबाजूला चाललेल्या गडबड गोंधळाचे स्वर कानावर पडत होते पण त्यात ती कुठेच असणार नव्हती. असेही तिला कोणीही गृहीतही धरले नव्हते.

" अगं, रमा कधीपासून खिडकीला चिकटली आहे. पाहिलेस का? "

" हो. पाहतेय. तिचे बरे आहे गं. कोण आहे घरी वाट पाहणारं? नाही वेळेवर पोचली किंवा मी म्हणते अगदी एखादा दिवस गेलीच नाही घरी तरी कुठली चिल्लीपिल्ली रडणार आहेत का नवरा वाट पाहणार आहे? तिच्या मर्जीची ती मालक. नाही तर आमची कुतरओढ पाहा. या मेल्या पावसालाही आताच कोसळायला हवे का? जरा संध्याकाळची लोकं गाड्यांमध्ये चढू देऊन अर्ध्या रस्त्याला लागू देत म्हणावं मग काय तो पड रे. पण नाही. चल चल, रमेसारखी मोकळीक नाही आपल्याला. " मैत्रिणींचे म्हटले तर सत्य म्हटले तर कुचकट भाव दर्शवणारे स्वर कानावर पडत होते.

’मोकळीक’.... खरेच!

आपल्याला काय सगळीच मोकळीक.

ना विचारणारं कोणी ना वाट पाहणारं कोणी.

पाशच नाहीत.

जे होऊ घातलेले, त्यांची घट्ट वीण घालणं आपल्याला कधी साधलंच नाही.

पण हा दोष माझा एकटीचा कसा?

तेही तितकेच कारणीभूत असूनही पराभूत मीच.

असं कसं?

खोल खोल, ओढाळ डोह मनात काठोकाठ भरून वाहत असतानाही भेगा कश्या पडत होत्या त्याचं कोडं कधी सुटलंच नाही.

आज पुन्हा एकदा टपोरे थेंब आसुसून कोसळणार आहेत!

आज पुन्हा एकदा धरेला मोकळीक मिळणार आहे!

तप्त गात्रे सुखावतील. तरारतील.

माझं मन चातक पक्षी झालंय...

पुन्हा एक दान पडू दे पदरात. फाटलेल्या ओठांना मिळू दे ती ओढाळ ओलसर उष्ण उब...

माणसांच्या या अथांग समुद्रात कुठेसा हरवलेला, माझा असलेला एखादा धागा त्या उलगडत जाणाऱ्या थेंबांच्या लडीला धरून माझ्या केसांवरून ओघळत अलगद मनात उतरू दे!

या धरेसारखेच मलाही तृप्त होऊ दे!

मॅडम, सगळे गेले कधीच. तुम्हीही निघा म्हणजे कुलूप लावून मलाही सटकायला. गाड्या बंद पडतील आता कधीही. चला चला.

हो हो. निघालेच बघ! तूही नीघ. घरी बायकोपोरं वाट पाहत असतील.

लिफ्टची वाट न पाहता लगबगीने चार जीने उतरत तिने गेट गाठले. छत्र्यांची लगबग, चपलांची धावपळ. लोंढे येत होते, भरभर गेट रिकामे होत होते. छातीभरून रमाने एक मोठा श्वास घेतला. ओढणी सावरली, पर्स खांद्याला लावून तिने छत्रीच्या बटणावर बोट दाबले. फटकन आवाज करत मिटलेल्या तारा मोकळे होण्यासाठी झेपावल्या. रमेला त्यांनी छत्राखाली घेतले. क्षणार्धात प्रत्येक तारेतून मोती घरंगळू लागले. किंचित गारवा चढलेली हवा, रंगीबेरंगी छत्र्यांवर आपटत उडणारे इंद्रधनू तुषार.... रमेला रमवू लागले. बंद पिंजऱ्यात कोंडलेली रमा त्या कोसळणाऱ्या लडींना धरून वरवर जाऊ लागली. घट्ट मिटलेले, भेगाळलेले ओठ मुक्त हसू लागले. पुन्हा एकवार नव्या आशेच्या लाटेवर तिने स्वत:ला झोकून दिले....... अपरिचिताच्या दिशेने झेपावत धरेसारखी ती मोकळी मोकळी होत गेली.... पाशाच्या भिंतीत गुदमरण्यासाठी!

22 comments:

  1. मोकळी धरा होते की पाउस ? - हा पण अनुत्तरित प्रश्न!!

    ReplyDelete
  2. :( आयुष्य किती किचकट आहे...

    ReplyDelete
  3. दोघेही! :) प्रत्येक मनामागे अन त्या त्या क्षणांमधे बदलत जाणारी व पुन्हा प्रश्न निर्माण करणारी उत्तरे...

    आभार सविता.

    ReplyDelete
  4. खरचं रे आनंदा!

    कधी साधं, सरळ, हसरं तर कधी सारंच फसवं...

    धन्यू.

    ReplyDelete
  5. आनंद पत्रेशी सहमत... खरंच आयुष्य हे असंच असतं बऱ्याच वेळी

    ReplyDelete
  6. अतिशय तरल, आर्त... अप्रतिम पोस्ट! रमेची अवस्था मात्र :(

    ReplyDelete
  7. सुंदर पोस्ट !!!

    ReplyDelete
  8. आभार श्रीराज.

    ReplyDelete
  9. विनायक, माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत!

    पोस्ट आवडल्याचे आवर्जून लिहीलेत, आनंद झाला. आभारी आहे.

    ReplyDelete
  10. धन्यू गं उमा.

    ReplyDelete
  11. पहिले दोन परिच्छेद अप्रतिम लिहिलेत...सगळं कॉपून खूप सारे "छान छान मस्त" लिहावं लागेल...:)

    अवांतर...पावसाची वाट पाहतेस त्यामुळे ते त्याच ताकदीने उतरलं का ग...:D

    ReplyDelete
  12. हम्म.. आलबेल आहेसं वाटणारं सारंच काही अगदी तसंच नसतं !! :((

    ReplyDelete
  13. शेवटचा परिच्छेद भिडला...सुंदर लिहिला आहेस.

    ReplyDelete
  14. हाहा... तिथे धुवाधार पाऊस आणि इथे पोळवणरी किरणे. पाउस पडतो का? हाच मुळात प्रश्न आहे.

    धन्यू गं अपर्णा.

    ReplyDelete
  15. अनेक उदा. पाहिलीत अशी हेरंब.:(

    धन्यू रे!

    ReplyDelete
  16. आभार्स अनघा. :)

    ReplyDelete
  17. रंगीबेरंगी छत्र्यांवर आपटत उडणारे इंद्रधनू तुषार.... रमेला रमवू लागले. बंद पिंजऱ्यात कोंडलेली रमा त्या कोसळणाऱ्या लडींना धरून वरवर जाऊ लागली. घट्ट मिटलेले, भेगाळलेले ओठ मुक्त हसू लागले. पुन्हा एकवार नव्या आशेच्या लाटेवर तिने स्वत:ला झोकून दिले....... अपरिचिताच्या दिशेने झेपावत धरेसारखी ती मोकळी मोकळी होत गेली.... पाशाच्या भिंतीत गुदमरण्यासाठी!
    -------------
    हा शेवट सुंदर. मस्त झाली आहे पोस्ट. आयुष्याचा हाही एक पैलू. पाश नसूनही स्वतंत्र नसलेली "रमा' वाचताना छान चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. जीवनाचा एक रंग उलघडला, अगदी हळूवार हाताने.

    ReplyDelete
  18. प्रसाद अभिप्रायाबद्दल धन्सं. आनंद झाला तुला पोस्ट आवडली हे ऐकून.

    ReplyDelete
  19. भावनांचा आलेख व्यक्त करायसाठीची शब्दनिवड आणि उपमा मस्तच! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !