जाता जाता एक नजर इथेही........

Monday, June 27, 2011

फणसाची भाजी

साकट्या फणसाची भाजी



वाढणी : आवडीनुसार व उपलब्धतेवर अवलंबून


साहीत्य:

साकट्या फणसाच्या फोडी किंवा मोठे तुकडे घ्यावेत.

फणसाच्या जोडीला घालण्यासाठी ओले वाल किंवा ओला मटार घालावा. ( साकट्याच्या फोडी चार वाट्या भरल्या तर एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त वाल/मटार घ्यावेत. या दाण्यांमुळे चवीत भर पडते आणि मुख्य म्हणजे भाजी वाढते!! काहीही भर नाही घातली तरी चालते.),

फोडणीसाठी:

भरपूर गोडे तेल (नेहमीच्या भाज्यांपेक्षा ह्या भाजीला तेल जास्त लागते.) मोहरी, हिंग, हळद, सुक्या लाल मिरच्या.

भाजीसाठी:

थोडे लाल तिखट, मीठ, गूळ (हिला गूळ भरपूर लागतो. पण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावा. हिला कोणत्याही मसाल्याची गरज नसते पण पाहिजेच असेल तर आवडीप्रमाणे मसाला घालावा.)

कृती:

साकट्या फणसाच्या फोडी किंवा मोठे तुकडे कुकरमध्ये उकडून घ्यावे. वाल किंवा मटार असल्यास तेही उकडावे. उकडताना पाण्याचा हबका मारावा. साकट्याचे तुकडे मोठे असल्यास ठेचून घ्यावे. फोडीही थोड्या ठेचाव्या म्हणजे भाजी चांगली मिळून येते.

पातेल्यात/कढईत तेल घालून ते चांगले तापले की मोहरी-हिंग-हळद यांची फोडणी करावी. फणस आणि दाणे एकत्र करून फोडणीस टाकावे. थोडेसे पाणी घालून शिजू द्यावे. नंतर लाल तिखट, मीठ व गूळ घालून परत एक सणसणीत वाफ आणावी. आधीच फोडी उकडून घेतल्या असल्यामुळे भाजी पटकन शिजते.

वरून घालावयाची फोडणी :

लहान कढईत जरा जास्तच तेल घालून नेहमी करतो तशीच मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. (फोडणी जास्त झाली तरी ती ठेवता येते आणि दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर घेता येते. फणसाच्या भाजीलाच संपली पाहिजे असे नाही.) त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. किंचित काळसर रंग येऊ द्यावा. ही फोडणी अतिशय खमंग लागते. पानात भाजी घेतल्यावर आवडीप्रमाणे वरून फोडणी घालून घ्यावी.



साकट्या फणसाची भाजी


ही भाजी म्हणजे कोकणची खास देणगी आहे. कितीही केली तरी अपुरीच वाटणारी आहे. कारण सकाळी खाल्ली तरी पुन्हा रात्री किंवा दुपारीही नुसतीच वाटीत घेऊनही खावीशी वाटणारी आहे. फणसाच्या दिवसात कमीत कमी ४/५ वेळा तरी व्हायलाच हवी. तरच जीभ काहीशी तृप्त होते.

कोवळ्या फणसाची भाजी


साकट्या फणसाच्या भाजीप्रमाणेच भाजी करावी. लहानलहान कोवळे गरे आणि कोवळ्याच आठळा असल्याने थोडी वेगळी लागते. पण याचीही चव जिभेवर रेंगाळत राहणारीच आहे हे नक्की!!

कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी



वाढणी : आवडीनुसार व उपलब्धतेवर अवलंबून


साहित्य:

कच्च्या फणसाच्या आठळा काढलेल्या गऱ्यांचे १ इंच लांबीरुंदीचे तुकडे , ठेचलेले किंवा चिरलेले आठळांचे बारीक (शेंगदाण्याच्या आकाराचे) तुकडे, (या भाजीत भरीला काही घालत नाहीत.)

फोडणीसाठी:

भरपूर गोडे तेल (नेहमीच्या भाज्यांपेक्षा ह्या भाजीला तेल जास्त लागते.) मोहरी, हिंग, हळद, चारपाच सुक्या लाल मिरच्या.

भाजीसाठी:

थोडे लाल तिखट, मीठ, गूळ (हिला गूळ भरपूर लागतो. पण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावा. हिलाही कोणत्याही मसाल्याची गरज नसते पण पाहिजेच असेल तर आवडीप्रमाणे मसाला घालावा.)

कृती:

ठेचलेले किंवा चिरलेले आठळांचे बारीक तुकडे कुकरमध्ये थोडेसे पाणी घालून उकडून घ्यावे. गऱ्यांचे तुकडे उकडायची गरज नाही कारण ते लवकर शिजतात. पातेल्यात/कढईत मोहरी-हिंग-हळद यांची फोडणी करून त्यावर फणसाच्या गऱ्यांचे तुकडे आणि उकडलेले आठळांचे तुकडे एकत्र करून फोडणीस टाकावे. त्यावर लाल तिखट व थोडेसे पाणी घालून शिजू द्यावे. आठळा उकडून घेतल्या असल्या तरी काही वेळा टणक राहतात. त्या नीट शिजल्या तर काजूंसारख्या चवदार लागतात. अर्थात जास्त शिजून त्यांचे पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर मीठ व गूळ घालून मंद आचेवर परत चांगली वाफ आणावी. भाजी तयार झाली.

वरून घालावयाची फोडणी :

लहान कढईत जरा जास्तच तेल घालून फोडणी करावी. (फोडणी जास्त झाली तरी ती दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर घेता येते. फणसाच्या भाजीलाच संपली पाहिजे असे नाही.) त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. किंचित काळसर रंग येऊ द्यावा. फोडणी खमंग लागते. पानात भाजी घेतल्यावर आवडीप्रमाणे वरून फोडणी घालून घ्यावी.

गरे आपल्या मूळ रंगामुळे आणि हळदीमुळे पिवळेपिवळे, आठळा मधूनच पांढऱ्या, मधूनच लालसर आणि मिरच्यांचे तुकडे लालचुटुक खमंग तळलेले असल्यामुळे ही भाजी दिसतेही अगदी देखणी! आणि चवीबद्दल काय सांगणार? मऊ लुसलुशीत गरे आणि काजूगरासारखे खमंग-गोड आठळाचे तुकडे!! पहिल्या दोन्ही भाज्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसणारी आणि वेगळी लागणारी फणसाच्या गऱ्यांची भाजी. कधीच संपू नये असे वाटणारी!!

टीपा:

कुठल्याही फणसाची भाजी करताना फोडी, तुकडे, अठळा ठेचायला विसरू नये. त्यामुळे त्या लवकर शिजतात व भाजी मिळूनही येते.

ही भाजी वर्षातून अगदीच एखाद दोनदाच होत असल्याने वरून घालावयाची फोडणी करताना तेल जरा तब्येतीतच घालावे. कमी तेल घालून फोडणी केल्यास ती तितकीशी चमचमीत लागत नाही.

ओला मटार/ वाल घालताना त्यांची चव पुढे येणार नाही इतपतच घालावेत. नाहीतर धड ना फणसाची चव धड ना वालाची चव.

या भाजीला कुठलाही मसाला शक्यतो घालूच नये. त्याने फणसाची मूळ चव मारली जाऊ शकते.

19 comments:

  1. भाजीत भाजी फणसाची
    भाग्यश्री माझ्या प्रीतीची !

    असा कधी कोणी उखाणा घेतला होता का गं ? ;)
    :D

    ReplyDelete
  2. आधीच्या पोस्टमधे उगाच म्हणालो की फणसाची भाजी आवडत नाही.. सपशेल माघार. फोटो बघून तर तोंपासु.. :)

    साकट्या म्हणजे?

    ReplyDelete
  3. हा हा... बयो, अगं तुझ्यासाठी खास राखून ठेवला होता बघ. :)

    अनघा लवकरच भेटू...

    ReplyDelete
  4. हेरंब, प्रत्यक्ष खाल्लीस की अजूनच प्रेमात पडशील. :) अरे ’ फणस ’ पोस्ट मधे या तिनही फणसांची माहिती दिली आहे पाहा नं.

    धन्सं.

    ReplyDelete
  5. हो.. अग कमेंट टाकली आणि चूक लक्षात आली :)

    ReplyDelete
  6. प्रत्यक्ष भाजी खायला न घालता अशा पद्धतीने छायाचित्रे दाखवून त्रास दिल्याबद्दल ही भाजी खाऊ घालण्याचा दंड ठोठावण्यात येत आहे हो.... फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे. (यावर उपाय तातडीने सुचवा)

    ReplyDelete
  7. बघ मी तुला आधीच म्हटलं होतं की मी ही भाजी खाल्ली नाहीये...आता प्लेट मध्ये पाहून खावीशी वाटली तरी कोण पार्सल पाठवणार आहे का.............??
    BTW अनघाचा उखाणा भारी आहे ....:)
    आणि एक ही पिवळी प्लेट आमच्याकडे पण आहे (फक्त भाजीची कमी आहे ग....कृ नो.घ्यावी..)

    ReplyDelete
  8. तुझ्या दोन्ही posts छान जमल्या आहेत. सगळं वाचून आपण सर्वांनी परत वांझोळ्याला जायची इच्छा झाली. अग, आत्ता गेलो ना तरी भाजी करयला फणस मिळेल. फक्त साकटा नाही मिळायचा. गऱ्यांचा मिळेल. नाहीतरी गऱ्यांची भाजी तुझी खायची राहिलीच आहे. कधी योग येईल तेव्हा खाऊ. कारण मुंबईतही गऱ्यांचे फणस म्हणजे पिकलेलेच मिळतात. कायग, तुझ्या आई-बाबांना फणसाची भाजी आवडते की नाही?
    लिहीत राहा.
    आई

    ReplyDelete
  9. प्रसाद, दंड मंजूर. :)

    आता फणस त्यातून भाजीचा तर मिळणे कठिणच दिसतेय रे. पोह्याचा भाजका पापड, कुळथाचे पिठले आणि भाकरी...हा उपाय कसा वाटतोय??

    ReplyDelete
  10. अपर्णा, आपण एकमेकींकडे आलोगेलो तर निदान टिनमधली तरी नक्की खाऊ घालेन. ( त्या चवीची खात्री नसली तरी... दुधाची तहान ताकावर... )

    धन्स गं.

    ReplyDelete
  11. आई, हो नं. गर्‍यांची भाजी खायची राहिलीच. यावेळी वेळ कमी पडल्याने देवळातही जायचे राहून गेले. मात्र खूप मज्जा आली. पोपटांचे शेवरीवरचे थवे, नारळांचा पहिला मोहोर...

    माझ्या आईला आवडते. बाबांना खाल्ल्याचे फारसे आठवत नाहीये. :)

    आभार.

    ReplyDelete
  12. zaks menu....aani hey sare bandhawr basun khanyacha bet.....kya bat hai!

    ReplyDelete
  13. तू काकूंकडुनच शिकलीस नं ही भाजी ?? म्हणजे मला लगोलग मिळण्याची शक्यता आहे गं :) ... बयो अगं जेमतेम मिळतय सध्या नेट, घरातलं पाऊण सामान खोक्यांमधे आहे गं, काही करू खायला म्हटलं तर आधि सामानाची जुळवाजूळव करावी लागते त्यात तुझ्या या पोस्टा.... छे बाई!!

    बयो मस्त दिसतय गं प्रकरण :)

    ReplyDelete
  14. तन्वी, अगं नाही. आपण देशावरचे. :) आपल्याकडे कुठले मिळायला फणस. तेही असे झाडावरचे उतरवून... नचिकेतच्या आईने शिकवली. :)

    धन्यू गं!

    ReplyDelete
  15. नमस्कार ताई,
    हि रेसिपी वाचल्यापासून कधी एकदा बनवून पाहते असे झाले होते,पण प्रोब्लेम हा कि कच्चा फणस आणणार कोठून शेवटी फ्रोझन फणस आणला.पण भाजी खूप छान झाली.मी हि भाजी पहिल्यांदाच केली पण आता मी आणि नवरोबा दोघेही फ्यान झालोय.खूप खूप धन्यवाद!
    पुष्पा

    ReplyDelete
  16. अरे वा ! फ्रोजन फणसाचीही छान झाली. अगं नाहीतर बरेचदा अश्या फ्रोजन भाज्या मुळात चवीला तितक्या चांगल्या नसतात.

    धन्यवाद पुष्पा! :)

    ReplyDelete
  17. छान रेसिपी! अस्सल कोकणी आज्ज्यांच्या हातची अनेकदा खाल्ली आहे ही भाजी!:-)

    ReplyDelete
  18. आईनं एकदा केलेली घरी, तेव्हाच खाल्लेली.. पुन्हा कधी योग आला नाही आजवर.. फोटो भन्नाट दिसतोय.. वर्षभर जुना असला तरी :P

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !