जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 16, 2010

भगरीची खिचडी

यावेळी नवरात्र व दिवाळी मायदेशी अतिशय आनंदात झाले. नवरात्राचे नऊ दिवसांचे माझे उपास नाशिकला आईकडे असल्याने चविष्ट होऊन गेले. भगर मला तितकीशी आवडत नाही आणि सारखा साबुदाणा/बटाटा खाववत नाही. म्हणून या दोन्ही पदार्थांना फाटा दिला आणि मस्त भगरीची खिचडी केली. करायला एकदम सोपी व अजिबात घास न लागणारी. गरम किंवा गार कशीही खाल्लीत तरी छानच लागते व उपासाच्या पदार्थांनी होणारे पित्तही होत नाही.

भगरीची खिचडी

वाढणी : तीन माणसांना पोटभरीची

साहित्य :

एक वाटी भगर

अडीच वाट्या गरम पाणी

दोन मध्यम बटाटे उकडून

दोन टेबलस्पून तूप

चार हिरव्या मिरच्या

पेरभर आले

मूठभर कोथिंबीर

एक चमचा जिरे

मूठभर भाजलेले शेंगदाणे किंवा दोन टेबलस्पून दाण्याचे कूट

स्वादानुसार मीठ ( आवडत असल्यास एक चमचा साखर )

एक लिंबू ( ऐच्छिक )

कृती :

कढईत मध्यम आचेवर भगर गुलाबी रंगावर कोरडीच भाजून घ्यावी. ( साधारण बारा ते पंधरा मिनिटे ) अडीच वाट्या पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल.

उकडलेल्या बटाट्याची साले काढून हलक्या हाताने कुस्करून घ्यावेत. ( अगदी पीठ करू नये ) हिरव्या मिरच्या खूप तिखट असतील तर फक्त पोट फोडून घ्याव्यात पण अगदीच कमी तिखट असतील तर बारीक चिरून घ्याव्या. आल्याचेही बारीक तुकडे करावे. कोथिंबीर चिरून घ्यावी. मध्यम आचेवर कढई ठेवून तूप घालावे. तापले की त्यात जिरे, आल्याचे व मिरचीचे तुकडे घालून मिनिटभर परतून त्यावर भाजलेले शेंगदाणे व कुस्करलेला बटाटा टाकून परतावे. बटाटा जरासा लालसर दिसू लागला की मोकळी झालेली भगर त्यावर टाकून सगळे मिश्रण नीट परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी. पाच मिनिटाने झाकण काढून स्वादानुसार मीठ घालून परतून पुन्हा एक वाफ आणून आचेवरून उतरवावे. कोथिंबीर व ज्याला हवे त्यास लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावे.


टीपा :

जितकी भगर घेऊ त्याच्या अडीच पट पाणी घ्यावे. कमी घेतल्यास नीट फुलत नाही व फार घास लागतो. चुकून पाणी कमी घेतले गेले तर कढईत भगर टाकून झाल्यावर पाण्याचा एक हबका मारून एक वाफ आणावी.

साखर आवडत असेल तरच घालावी. शक्यतो घालू नयेच.

शेंगदाणे नसतील तर कूट घालावे.

यात बटाट्याचा कीसही घालता येईल. कीस घालायचा झाल्यास फोडणीत शेंगदाणे घातल्यावर लगेच घालून झाकण ठेवून वाफ आणावी. कीस नीट शिजल्याची खात्री करूनच भगर टाकावी.

ओले खोबरे आवडत असल्यास कोथिंबिरी सोबत घालावे

हे ही ’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच। खाऊगल्लीतही असावे म्हणून....

33 comments:

  1. अहाहा ... झक्कास दिसतोय फोटू... रिवाजाप्रमाणे णी शे ढ घेऊन टाक लगेच :)

    बाकी 'दिवाळी मिक्स' मध्ये मी कॉपी बरोबर मारलेली.. हो की नाही? ;)

    ReplyDelete
  2. कहर... कहर सुरू झालाय... आता हा ब्लॉग १ महिना ban करावा लागणार... :P

    ReplyDelete
  3. हा हा... नक्कीच हेरंब. :) मला आवडले. धन्यू.

    ReplyDelete
  4. अर्रर्रर्रर्र... इतका जुलूम नको करूस रोहन. :P

    ReplyDelete
  5. :D मला एकदम ते बालगीतच आठवलं! 'खादाडखाऊ विहिण म्हणून सारी करती थट्टा..आता उठा! :)

    ReplyDelete
  6. आता मी रुसलेय गं अनघे... :D

    ReplyDelete
  7. ही रेसिपी मी आज घरी नेतोय :D

    ReplyDelete
  8. >>>कहर... कहर सुरू झालाय...

    +100


    अगदी असेच नाही तरी सकाळी नुसत्या चहावर तरी इथे येऊ नयेच....ताई फोटो नाही टाकू गं... नुसती रेशीपी टाकली तरी जमेल आम्हाला :)

    ReplyDelete
  9. निषेध.....
    मला एक कळत नाही..तु नेहमी वाढणी ३ माणसांची का सांगते ग????:P....मी यु एस ला आलीतरी तु ३ माणसांचेच बनवणार का???????
    उत्तम बनलय.............

    ReplyDelete
  10. मला खूप आवडते भगर... Thanks for reciepe...
    करून बघायला हवे... :-)

    ReplyDelete
  11. हेहे!!! नको गं राणी रुसू!!
    'कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढलं आम्हीं, विहिण म्हणून नशिबी आलात हो तुम्हीं!!' :p कित्ती गोड गाणं आहे ना! :D

    ReplyDelete
  12. फ़ोटु मस्त आहे...रिवाजाप्रमाणे नि..षे...ध....पाठवत आहे.. :) :)

    ReplyDelete
  13. हा लेख कॉपी करून माझ्या बायकोला पाठवण्यात आला आहे. :)

    ReplyDelete
  14. bhannat bhagar....yetya guruwari hich bhagar khanarrrrrr...jay khawoo giri

    ReplyDelete
  15. श्रीराज, तू करून खाऊ घालणार ना रे? कोणाला ते वेगळे सांगायला नकोच... :D

    ReplyDelete
  16. अगं तन्वी फोटू नाही टाकला तर तुम्हांला ’कहर’ कसा वाटेल... आणि त्यातला ’ह’ silent आहे ना... :)

    ReplyDelete
  17. उमा, फोटू पाहायचा सोडून नको ते कशाला पाहतेस गं? कसे बाई बरोबर शोधलेस ’३ माणसांचे’ गणित... :D
    तू ये तर आधी मग हवे तितके बनवू गं. :)

    ReplyDelete
  18. मैथिली तुला नक्की आवडेलच. नक्की करून पाहा. धन्यू गं.

    ReplyDelete
  19. खरचं अनघा, सुंदर गाणे आहे. बाहुला-बाहुलीचे लग्न लावतानाच्या आम्हा चिमुरड्यांची लगबग डोळ्यासमोर आली गं.

    ReplyDelete
  20. योमू, धन्यवाद. अजून संधी देतेच आहे तुला निषेधायची... :P

    ReplyDelete
  21. धन्यवाद मंदार. कळवा बरं आवडली का ते.

    ReplyDelete
  22. जय खाऊगिरी!! :)

    धन्यवाद प्राजक्त.

    ReplyDelete
  23. nashkat aahat tar dya ki mastpaiki bhagarrrrrr...majja yeel

    ReplyDelete
  24. praajakta, अरे मी आले की परत नोव्हेंमध्येच. असते तर नक्कीच... कोल्हापूरलाही येऊन फार वर्ष झालीत. पुढच्या खेपेस योग साधायला हवा. :)

    ReplyDelete
  25. :D भगर!!!??? कधी खाल्ली नाही. घरी गेलो की याची डोळी याची जिव्हा आनंद लुटेन. :)

    ReplyDelete
  26. ya ho aamhi tumchi wat pahu nakki.

    ReplyDelete
  27. सौरभ, अरे महाशिवरात्र/आषाढी एकादशीला हटकून होते भगर आमटी. कदाचित तुला वर्‍याचे तांदूळ माहीत असतील. :)

    ReplyDelete
  28. फोटो मस्त आहेच...फक्त मी पोचेपर्यंत सरली असेल :P

    ReplyDelete
  29. विद्याधर, तू येतोस का खायला सांग? मी परत करेन... :)

    ReplyDelete
  30. अप्रतिम...भगरीची खिचडी तर अनेकदा खातो पण काही गोष्टी उदा."पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल. " हा सुस (सुगरण सल्ला) आवडला..असे कधी केले नव्हते..मी तर भाजलेल्या भगरीत वरून गरम पाणी घालायचो...
    छान!!

    ReplyDelete
  31. सिध्दार्थ, ब्लॉगवर स्वागत आहे.:)

    टिपणी उपयोगी पडल्याचे वाचून आनंद झाला.
    अभिप्रायाबद्दल आभार. भेट देत राहा. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !