जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, December 19, 2010

कुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...

रविवारची संध्याकाळ कलत आलेली. बिल्डिंगच्या चौकात खेळणारी लहान मुले आता लवकरच आईच्या-बाबाच्या हाका येतीलच या होर्‍याने अजूनच जोर चढून ओरडाआरडा करत पकडापकडी खेळत होती. खिडकीत उभे राहून मी गुंगून त्यांचा खेळ पाहत होते. नकळत त्या मुलांच्यात ओरडत इकडून तिकडे पळणारा, खदखदून हसणारा शोमू मला दिसत होता. मी वर उभी आहे हे लक्षात येताच पळतापळता मान वर करत माझ्याकडे पाहून हात हालवून पुन्हा खेळात रममाण होणारा, क्रिकेट खेळताना स्वत: एकाच जागी उभा राहून ओरडून ओरडून मित्रांना धावडवणारा, तळातल्या आजींकडे जाऊन हक्काने पाणी व गोळ्या मागणारा.... कालचक्र मनाने भराभर उलटे फिरवायला सुरवात केलेली. तेवढ्यात बेल वाजली. तंद्री भंगली. खाली पाहिले तर खेळून दमलेली मुले- मुली बेंचवर, पायर्‍यापायर्‍यांवर कोंडाळे करून बसून गप्पा मारू लागलेली. कोण बरं आलंय असे म्हणतच मी दार उघडले तर एक दहाअकरा वर्षांची मुलगी चेहर्‍यावर गोड हसू व हातात एक वही घेऊन उभी.

"काय गं? तुला यशदा हवी आहे का? चुकून माझी बेल दाबलीस का? "

" नाही नाही. काकू, यश आणि मी बरोबरच वरती आलो. मी ना तुमच्याकडेच आलेय. "

" नाव काय गं तुझे? कोणाची तू? " मी तिला ओळखलेच नव्हते. गेली अकरा वर्षे मी सलग तिथे राहत नसल्याने बरेच नवीन चेहरे मला प्रत्येकवेळी दिसतच.

तिने तिचे नाव सांगितले. थोडे बोलून हातातली वही पुढे करून म्हणाली, " काकू, आमच्या शाळेतून ना अंधमुलांना मदत यासाठी डोनेशन जमा करायला सांगितलेय. जो जास्त डोनेशन जमवेल त्याला सर्टिफिकेट व दोन पुस्तके बक्षीस मिळणार आहेत. तुम्ही मदत कराल? "

" हो तर. दे बरं तुझी वही इकडे. " असे म्हणत मी तिच्याकडून वही घेतली. एका पानावर नीटपणे भाग पाडून सुवाच्य अक्षरात सुरवात केलेली होती. मी एक एक नाव वाचत होते. त्यापुढे दिलेले डोनेशनही वाचत होते. ५०/ १०० याशिवाय आकडे दिसतच नव्हते. क्वचित २५ चा आकडा दिसत होता. जवळ जवळ ३४-३५ नावे होती. तिच्याजवळच्या पर्समध्ये खूप पैसे जमलेले दिसत होते. माझे नाव लिहून पैसे तिच्या हातात ठेवले. ती खूश झाली. पैसे मोजून घेऊन तिने पर्समध्ये ठेवले व मला थँक्स म्हणून ती दोन पायर्‍या उतरली.

न राहवून मी तिला म्हटले, " सांभाळून जा गं. बरेच पैसे जमलेत बरं का तुझ्याकडे. सरळ घरीच जा आता. का येऊ तुला तुझ्या बिल्डिंगपाशी सोडायला. "
" नको काकू. मी जाईन नीट. " असे म्हणून उड्या मारतच ती खाली उतरली.

खिडकीतून तिला जाताना पाहत होते.... मन नकळत पुन्हा मागे गेले. माध्यमिक शाळेत नुकतेच पाऊल ठेवलेले. उगाचच कुठेतरी आपण मोठे झालोतची भावना. तिसरीतल्या भावाला बोटाशी धरून बसने एकटीनेच जाण्याची जबाबदारी. तसं पाहू गेल्या चौथी व पाचवीत फारसे काहीच बदललेले नसते. पण बालमनाचे गणित वेगळेच.

आमच्या लाडक्या देसाईबाई वह्यांचा भारा एका हाताने लीलया सांभाळत वर्गात शिरल्या. ती अशी वर्षे होती जीवनातील की, ' बाई - सर' ही दैवतं होती. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. कित्येकदा मी आईलाही म्हणे, " हॆं, काय गं तुला इतकेही कसे माहीत नाही. आमच्या देसाईबाईनां या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट खडानखडा माहीत असते. " आई गालातल्या गालात हसे व म्हणे, " खरंच की. तुझ्या देसाईबाईंनी सांगितले की सूर्य उत्तरेला उगवतो तर तुम्ही मुले त्यालाही होच म्हणाल. " असे काहीच्याकाही आई बोलली ना की मला फार राग येई. नाकाचा शेंडा लाललाल होऊन जाई. " हो, हो. म्हणेनच जा मी. आणि बरं का, सूर्य उत्तरेलाच उगवलेला असेल बघ त्यादिवशी. " देसाईबाईंविषयी काहीही ऐकून घेण्याची माझी बिलकुल तयारीच नसे.

बाईंनी टेबलावर वह्यांचा भारा ठेवला. बाईंना कधीही, " अरे आता शांत बसा. लक्ष द्या इकडे... " वगैरे प्रकार करावेच लागत नसत. आम्ही सगळी मुले त्यांच्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाने भारावून जात असू. डोळे, कान,चित्त सारे एकवटलेले. बाईंनी बोलायला सुरवात केली, " दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आपण तलासरीच्या आश्रमासाठी पैसे गोळा करणार आहोत बरं का. तुमचे तर हे पहिलेच वर्ष आहे. आता तुम्ही थोडेसे मोठे झाला आहात. तेव्हां थोडं जबाबदारीने - समंजसपणे वागायला शिकणार ना? " सगळ्यांचे एका सुरातले, " हो.. " " छान. मग आता ही मी कुपनांची पुस्तके आणलीत. प्रत्येकाने यातली दोन,तीन किंवा चार पुस्तके घ्या. जो जास्तीत जास्त कुपने खपवेल त्याला 'श्यामची आई' पुस्तक बक्षीस म्हणून दिले जाईल. आई बाबांना छळायचे नाही हं का मात्र. " सगळी मुले बाईंच्या भोवती जमली. त्यात मी ही होतेच. उत्साहाने चार कुपन पुस्तिका मी मागून घेतल्या. दहा-वीस-पंचवीस व एक रुपयाचे. तीन इंच बाय दोन इंच अशी छोटीशी पातळ कागदाची, गडद गुलाबी रंगाची कुपन पुस्तिका होती एका रुपयाची. पंचविसाचा रंग फिकट निळा, विसाचा फिकट हिरवा व दहा पैशाचे लिंबूटिंबू.

संध्याकाळी उत्साहाने चिवचिवत आईला पुस्तके दाखवली आणि मागोमाग कोणाकडून किती किती पैसे मी मिळवून आणेनची यादीही तिला ऐकवली. आईने शांतपणे सारे ऐकून घेऊन हातात एक छोटीशी पर्स देऊन गाल कुरवाळून जा म्हणाली. आमच्या चाळीत घाटीमामांच्या दोन खोल्या होत्या. त्यातली एक तर आमच्या शेजारीच होती. माझ्या मनाने कधीचाच हिशोबही करून टाकलेला. वीस व पंचवीस चे पुस्तक तर आजच संपून जाईल ही खात्रीच होती मुळी. माझे नेहमीच लाड करणारे काका-मामा-मावश्या, मी नुसते पुस्तक पुढे करायचा अवकाश लगेच ते कुपन फाडतील आणि माझ्या पर्समध्ये नाणी येऊन विसावतील. पण कसचे काय. भरवशाच्या म्हशीला टोणगा तशातलीच गत झालेली. बालमनाला व्यवहारी गणित कुठले उमगायला. दोन तास फिरून फक्त तीनच कुपने फाडली गेली तीही दहा पैशाची. हिरमुसली होऊन दमून मी घरी आले. माझा चेहरा व डोळ्यातले पाणी पाहून आई काय झालेय ते समजून गेली. " अगं, दोन आठवडे आहेत अजून कुपने खपवायला. खपतील गं. लगेच डोळ्यात पाणी कशाला... " तिने समजूत काढली पण ती मनोमन जाणून होती, लेकीचे मन दुखणारच आहे.

पुढचे सारे दिवस शाळेतून आल्याआल्या मी मोहिमेवर पळे. रोज हिरमुसली होऊन परते. स्वप्नातही फक्त फेर धरून नाचणारी कुपने, चल पळ, असे उगाच खर्चायला पैसे कोणाकडे आहेत ’ असे म्हणत तोंड फिरवणारे काका किंवा कधीकधी मी एकटीनेच फक्त सगळी कुपने खपवल्यामुळे सगळ्या वर्गासमोर शाबासकी देणार्‍या देसाईबाई व असूयेने पाहणारी मुले इतकेच येत होते. दोन आठवडे कितीतरी उंबरे झिजवूनही दहा पैशाचे पूर्ण पुस्तक व विसाची तीन/पंचवीस चे फक्त एक कुपन मी खपवू शकले. सोमवार उजाडला. आज पुस्तके व मिळालेले पैसे परत करायचे होते. एक रुपयाचे एकही कुपन न खपल्याने व इतकुसे पैसे बाईंना द्यायचे.... मला रडूच कोसळले. तसे आईने हळूच एक रुपयाचे एक कुपन फाडले व पर्समध्ये रुपया ठेवला. इतका आनंद झाला मला. आईला मिठी मारून मी शाळेत गेले. बक्षीस मला मिळणे शक्य नव्हतेच. पुढे दरवर्षी हे कुपन प्रकरण माझा असाच जीव काढत राहिले. कित्येक वर्ष माझ्या स्वप्नांचा ताबा घेऊन माझा छळवादही केला त्यांनी. शोमू शाळेत गेल्यावर पुन्हा एकदा या कुपनांनी घरात प्रवेश केला. पण पोरगं मात्र याबाबतीत नशीबवान. गोडबोल्या लीलया पैसे जमवी. त्याचा तो खुशीने फुललेला चेहरा पाहून मी माझी ती भयावह स्वप्ने विसरून गेले. जणू त्याच्या रूपात मीच पर्स भरभरून पैसे गोळा करत होते.

आज तिच्या पर्समधले अडीच तीन हजार पाहून मी पुन्हा एकदा कुपनांचा मेळ घालू लागलेली. कुठे ती दहा पैशाची कुपने आणि कुठे हे शंभर रुपये.... माणसांची दानत वाढली आहे की मिळणारा पैसा?? का दोन्हीही.... का मनोवृत्ती बदलली आहे? यादीतली इतर नावे व त्यासमोरचे पैसे वाचून नाईलाज होतोय का अहमिका.... का पैशाचीच किंमत कमी झाली आहे? जे काय असेल ते असो पण आजच्या मुलांना निदान दुष्ट स्वप्ने तरी पडत नसावीत....

36 comments:

  1. श्री ताइ..शाळेचे दिवस आठवले...मस्त लिहल आहेस.

    ReplyDelete
  2. आम्हालापण सांगितलेलं असं करायला. पण आम्हाला बक्षिसाबद्दल काही बोलले नव्हते. तरी मला पहिलं बक्षिस मिळालेलं. ३०० रुपयांच्यावर काही रक्कम जमावली होती. मज्जा... :D

    ReplyDelete
  3. कदाचित मुलांना 'न दुखावणे' हा भाग असू शकतो, मुले जास्त बोल्ड झाली आहेत पूर्वीपेक्षा (अस प्रत्येकच पिढीला वाटत हा भाग वेगळा!) , किंवा खरच सामाजिक जाणीव वाढली असेल, किंवा पन्नास रुपयांची किंमतही कमी झाली असेल .. माहिती नाही बदल कशामुळे झाला तो!

    ReplyDelete
  4. तायडे अगं अगदी अगदी असेच विचार मनात येत असले तरी ईतके व्यवस्थित कधीच मांडता आले नसते मला...
    मनातलं लिहीलस बघ... अगं परवच एक मुलगा इथेही असाच कुपन घेऊन आला होता, त्याला ५००बैझे द्ययचे की १ रियाल असा माझा आणि अमितचा वाद झाला, माझ्या मते ५०० बैझे म्हणजे जवळपास ६० रुपये असा हिशोब आणि अमितचे मत अश्या कामाला पैसे देताना हिशोब कसला करतेस वगैरे...
    पण नंतरच्या गप्पांमधे असेच आपल्या लहानपणीच्या १रुपये, २रुपये मिळायचे त्याची आठवण झाली होती :)
    माझीही आई अशीच सगळ्यात शेवटी एक जरा मोठी रक्कम द्यायची आणि मग मला खूप आनंद व्हायचा!! :)

    मस्त झालयं पोस्ट... शेवटचा पॅरा मस्तच...

    ReplyDelete
  5. आम्हाला ते घरकमाई का काय ते असायचे.. मग कोणाकोणाच्या घरी जाऊन छोटी-मोठी कामे करून ५-१० रुपये मिळवायचे... :) मज्जा यायची..

    ReplyDelete
  6. सहीच रे सौरभ. एकदम कॊलर टाईट... मज्जा. :)

    ReplyDelete
  7. aativasa, अनेक धन्यवाद.

    मुले जास्त बोल्ड झाली आहेतच. :) त्याचबरोबरीने पटकन पैसे काढून दिले जातात... मग ते सहजी शक्य आहे म्हणूनही असेल आणि सामाजिक कर्तव्य म्हणूनही असेल... गोळाबेरीज उत्तम होतेयं हेच खरं.

    ReplyDelete
  8. तन्वी खूप खूप धन्यू. :)

    अमितचे म्हणणे बरोबर असले तरीही बरेचदा ना लागोपाठ डोनेशनसठी मुले येत राहतात. कोणाला हिरमुसले पाठवणे शक्यच नसते. पण सारखे तरी किती पैसे देत राहणार... हे कारण त्यावेळी प्रकर्षाने असू शकेल. शिवाय आवकही अत्यंत मर्यादित होती ना.

    ReplyDelete
  9. यस्स... घरकमाई हे ही एक मस्त प्रकरण होते. अर्थात तेही पैसे शाळेतच द्यावे लागत पण तरीसुध्दा मज्जा येई. शिवाय ना खाऊही मिळे बहुदा त्याबरोबर. :) रोहन तुम्हालाही शाळेतच द्यावे लागत की... ?

    ReplyDelete
  10. शाळेमध्ये आम्हाला सुद्धा हा उपक्रम करायला सांगितला होता.
    ५ -१० रुपये देणे म्हणजे देणे असा वाटत नाही आजकाल.....म्हणजेच रुपयाची किंमत कमी झाली आहे असा म्हणायला हरकत नाही.

    ReplyDelete
  11. खुपच छान झालीये पोस्ट. विचार साखळी सुंदर मांडली आहेस. सुरुवातीला रम्य त्या बालपणाच्या आठवणी आणि शेवटी अपरिहार्य वास्तव.. मस्तच..

    >> अगदी असेच विचार मनात येत असले तरी ईतके व्यवस्थित कधीच मांडता आले नसते मला...
    +१

    ReplyDelete
  12. AJKhare, सुस्वागतम!

    खरे आहे. पंचवीस पैशापर्यंतची नाणी तर इतिहासजमाच झालीत. तिच्या यादीत पंचवीस रुपये ही तुरळकच दिसून आले.

    अभिप्रायाबद्दल धन्यवाद. :)

    ReplyDelete
  13. अम्म! शाळेतले दिवस आठवले गं ताई! आम्हाला दरवर्षी ते भारतिय सैन्य निधीसाठी १ रु, वाले चिकटणारे छोटे झंडे खपवायला लागायचे. खपले नाही की खाउच्या पैशातुन आम्हीच ते विकत घेउ आणि कंपासपेटी किंवा मळकटलेल्या शर्टावर लावून फिरत असू! धम्माल! आभार काही जुन्या आठवणी शाळेच्या, डोळ्यांत तरळल्या!

    ReplyDelete
  14. होय होय... आम्हाला पण शाळेतच द्यावे लागायचे.... पण मी स्वतःसाठी पण १-२ वेळा अशी कमाई केलेली आहे... :) अर्थात काम करून... :D

    ReplyDelete
  15. धन्यवाद हेरंब. :)

    ReplyDelete
  16. दीपक, ही अशी खपली नाही की शेवटी खाऊच्या पैशातून आपणच विकत घेण्याचे प्रकार नववीपासून झालेच. :) पण पाचवी ते आठवी बसचे हाफ तिकिटच मुळी ५ पैसे होते. वाचवून वाचवून कितीसे पैसे जमणार... :( आता आठवले की फार गंमत वाटते.

    धन्यवाद रे.

    ReplyDelete
  17. अगं, हे शाळेत कधी केलेलं नाही..पण न सध्या हे दर दिवाळीला आमचे वॉचमन एक वही घेऊन फिरतात ना..त्याची आठवण झाली. म्हणजे कसं ते मला नेहेमीच वाटत कि वाढवून आकडे टाकतात! म्हणजे मग समोरच्याला त्याहून कमी रक्कम देणे हे एकदम कमीपणाचच वाटलं पाहिजे! :)
    पोस्ट नेहेमी सारखीच छान झालीय. आईसमोर डबडबल्या डोळ्यांची तू दिसलीस मला.
    श्यामची आई मिळालं नाही पण मग वाचलंयस कि नाही?! :)

    ReplyDelete
  18. शाळेचे दिवस आठवले...मस्त .....

    khup chaan mandalas itakach mhanen....khupach chaan post aahe....keep it up buddy...:)

    ReplyDelete
  19. आम्हालापण कराव लागल होत हे शाळेत असताना...आठवल ते सगळ...नक्की माहीत नाही पण सभोवतालची महागाई वैगेरे बघता आता अश्या वेळी अगदी कमी पैसे देण,बर्याच लोकांना लाजिरवाण वाटत असाव ...

    ReplyDelete
  20. श्यामची आई वाचले तर. :)
    आणि ते वाढीव आकड्यांचे म्हणतेस ना, मलाही नेहमी असेच वाटते. डॆंबिसपणा नुसता.

    धन्यवाद अनघा.

    ReplyDelete
  21. अपर्णा, धन्यू गं. शाळेत प्रत्येकाला यातले काहितरी करावेच लागलेयं.

    ReplyDelete
  22. देवेंद्र, तू म्हणतोस ना तसेच होतेय रे. बरेचदा लागोपाठ इतकी मुले येतात की किती पैसे द्यायचे सारखे. बरं न द्यावे तर मुलांना वाईट वाटतेच शिवाय सोसायटीत चर्चा... :(

    आभार.

    ReplyDelete
  23. शाळेतले दिवस खरंच किती सुंदर होते ना... ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा आठवले...

    मनोवृत्तीचं म्हणशील तर ती बदललेय अस नाही वाटत बघ... कदाचित मिळणारा पैसा वाढला असावा :)

    ReplyDelete
  24. आम्हाला तर `खरी कमाई' करायला लागायची शाळेत.
    म्हणजे घरोघर हिंडून त्यांना `मी तुमचे काय काम करून देऊ , म्हणजे तुम्ही मला त्याबद्दल पैसे द्याल ...' असे विचारून कमाई करून, ती देणारयाची सही कागदावर लिहून घ्यावी लागायची !!!
    असे जास्ती जास्त पैसे एका आठवड्या मिळवावे लागायचे !!
    आणि त्यावेळेस घराघातील माणसे ` धान्य निवडून दे, वर्तमानपत्र वाचून दाखव, बाजारातून भाजी आणून दे, इत्यादी ...!!
    आणि एक काम केल्यावर जेमतेम १ रुपया मिळे. असे करत २५ रुपये जमले म्हणजे शाळेच्या फळ्यावर नाव लिहिले जाई .
    असे झाले तर मग स्वर्गाला हात टेकल्याचा आनंद ..... पण एकदाच मिळाला फक्त :(

    ReplyDelete
  25. Hi,

    We have shortlisted this article for Netbhet eMagazine Dec 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.

    Please provide your full name and email id.
    Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

    Regards,
    Sonali Thorat
    www.netbhet.com

    ReplyDelete
  26. नक्कीच श्रीराज, शाळेतले दिवस सुंदरच होते. खूपच कमी ताण असलेले निर्मळ, सहज, मोकळा कालखंड. :)

    मिळणारा पैसा वाढला व त्याअनुषंगाने प्रेशर वाढलेयं बहुदा.


    धन्यवाद.

    ReplyDelete
  27. राजीव, या खरी कमाईची एकदा मज्जाच झालेली.

    माझ्या एका मित्राकडून एक आज्जी रोज पालेभाजीची जुडी निवडून घेत. आठवड्यानंतर रोजचे पन्नास पैसे प्रमाणे रु.३.५० पैसे व एक वाटीभर मेथीची भाजी व गरमगरम भाकरी मिळाली. त्या शहाण्याने ती मला देऊन माझ्याकडून मी चालत येऊन साठवलेले पन्नास पैसे उकळले होते. :D

    आभार. :)

    ReplyDelete
  28. सोनाली, स्वागत व आभार.

    नेटभेट च्या अंकासाठी माझा लेख निवडल्याबद्दल आभार. मला आनंदच आहे आपण माझा लेख निवडलात. :)

    ReplyDelete
  29. परिचित, ब्लॊगवर स्वागत आहे. :)

    हा हा... सेम पिंच. पण पुन्हा कुपनपुस्तके आली की ये रे माझ्या मागल्या सुरूच... दुर्दम्य आशावाद आणि तोही इतरांवर अवलंबून.

    आभार.

    ReplyDelete
  30. बायो गं ब्लॉगाचे नवे रूपही छान वाटतेय गं... आणि

    एक लाखाचा टप्पा पार केल्याबद्दल त्रिवार त्रिवार अभिनंदन गो!! लिहीत रहा राणी... :)

    ReplyDelete
  31. तन्वी, धन्यू गं. आवर्जून कळवलेस, आनंद झाला.

    ReplyDelete
  32. मस्त.. आमच्या लहानपणी नेव्हीचे , आर्मिचे झेंडे ( खिशावर लावायचे) ते विकायला द्यायचे. दहा पैसे किम्मत असायची. आणि खरं सांगतो, लोकांना तेवढे पैसे पण देणे जिवावर यायचे.

    ReplyDelete
  33. अगदी अगदी. दहा पैसे असे खर्च करायचे म्हणजे अनेकांच्या कपाळावर आठ्याच पडत. त्यांनी नको म्हटले की इतके वाईट वाटायचे रे.

    आजकाल मुलांचे खुललेले चेहरे पाहून खूप छान वाटते.:)
    धन्यवाद महेंद्र.

    ReplyDelete
  34. आमच्या शाळेत दोन रूपयाची वीस तिकिटं द्यायचे खपवायला...एकदम आठवण झाली... :)
    लोकांची दानत वाढलेली नाहीये...स्टेटसची काळजी वाढलीय :P

    ReplyDelete
  35. अगदी अगदी. विद्याधर, त्या यादीतल्या नावांमधे ७५% लोकांची मुले शाळेत. म्हणजे त्यांच्या मुलांनाही हे कधी ना कधी करावेच लागत असेल. आणि उरलेले ही यादी सगळेजण वाचणार या प्रेशरखाली.... :( माझे नाव लिहीताना माझाही क्षणभर गोंधळच उडालेला. पण लगेच स्वत:चा केविलवाणा चेहरा समोर आला... इतरांचे काय कोण जाणे पण ते पैसे मी केवळ तिच्या चेहर्‍यावरची खुशी पाहायला दिले.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !