जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, December 1, 2010

रिसीविंग एंड ला पुन्हा मीच...

ठाण्यात रिक्षावाल्यांची मक्तेदारी ' मनसे 'ने मोडून काढली. मुजोर रिक्षावाल्यांना जरब बसवली. ' मीटर जॅम ' आंदोलनाच्या बातम्यांनी ऑगस्ट महिन्याचे काही दिवस चांगलेच गाजवले. इतक्या दूरवर असून आणि रोजचा सध्यातरी या समस्येशी माझा संबंध नसला तरीही हे वाचून मी खूश झाले होते. निदान आता काही दिवस तरी सुखावह जातील. रिक्षावाले अडवणूक करणारच नाहीत, सुतासारखे सरळ चालतील, सौजन्य रिक्षा चालवतील वगैरे भ्रामक कल्पना रंगवल्या नसल्या तरी किमान काही नाठाळ दंडुकेशाहीला घाबरून तरी तेरड्याचा रंग तीन दिवस दाखवत नीट वागतील, इतकीच माफक अपेक्षा धरली होती. तशातच मायदेशाची वारी ठरली. अनेक प्रकारे आनंद झालेला त्यात मनसेनेही भर घातलेली. रिक्षा अशी हाक मारताच किंवा चक्क मला येताना पाहून रिक्षावाला आपसूक माझ्यापाशी येऊन थांबेल. मी स्थानापन्न झाल्यावर रिक्षा सुरू करून माझ्या गंतव्य स्थानाच्या घोषणेची शांतपणे वाट पाहून मी ती करताच हलकेच मीटर पाडून आनंदाने रिक्षाला गती देईल. माफक आनंद म्हटल्यावर किमान इतपत माफक स्वप्न पडणारच की...

दादरला होतो तोवर रिक्षाचा संबंध कधीच आला नाही. तुरळक अपवाद वगळता. मात्र लग्न होऊन घाटकोपरला आल्यापासून रिक्षा शिवाय माझे पाय हालेचनात. आख्खे दोन्ही बाजूचे दादर, शिवाजीपार्क, नायगाव पासून माटुंग्यापर्यंत न कुरकुरता चालणारे पाय अडेलतट्टूचे धोरण स्वीकारत जागच्याजागी उभेच राहू लागल्यावर रिक्षा ला पर्याय उरलाच नाही. मग हळूहळू ' मन ' निरनिराळी कारणे शोधून रिक्षाच्या गरजेचे हिरीरीने समर्थन करू लागले. चालल्याने बरेच फायदे होतात... व्यायाम होतो, पैसे वाचतात, मनाला व शरीरालाही ऐदीपणा जडत नाही, वगैरे वगैरे क्षीण प्रयत्नांना पद्धतशीर हाणून पाडण्यात येऊ लागले. मग मीही समंजसपणे स्वतःला रिक्षाच्या स्वाधीन करून टाकले. काही काही देणी कितीही प्रयत्न केला तरी चुकवता येतच नाहीत ती देऊनच चुकवावी लागतात. त्यातलेच हे एक असे समजून आनंदाने व नेमाने देऊ लागले.

अर्थात माझ्या प्रामाणिक व आनंदाने आदान प्रदान करण्याच्या वृत्तीला रोज लहान मोठे सुरुंग लागत व वकुबानुसार मनाला भगदाडे पडत. काही दोन-पाच मिनिटात बुजत तर काही छळ करत. काहींशी तिथल्यातिथे दोन हात करायला व समोरून आलेले लगेच परतफेड करायलाही मी शिकू लागले. काही वेळा तर काहीबाहीच तोंडातून निघून जाई. मग अजून छळवाद. चिडचिड... स्वतःवर, रिक्षावाल्यांच्या मुजोरपणावर आणि फायनली माझ्या त्यांच्यावरील अवलंबित्वावर... पण रोज मरे त्यावर किती रक्त जळवायचे?? शेवटी सहनशक्ती चा मंत्र अंगी भिनवत मी स्वतःला रिक्षा+अरेरावी ला सोपवून टाकले.

जसं पाणीपुरी म्हटली की भय्या दिसतो तसेच काहीसे रिक्षांचेही समीकरण आहे. सत्तर टक्के भय्ये आणि उरलेल्या तीस टक्क्यात मराठी, गुजराती व इतर अगदीच तुरळक. अजून मुंबईत तरी मी बांगलाबाबू, किरिस्ताव सायबा किंवा दक्षिणी अण्णा सर्रास रिक्षा हाकताना पाहिलेला आठवत नाही. आता या सत्तर टक्केवाल्यांची जवळपास पूर्णतः ( निदान सकृतदर्शनी तरी... मनातून त्यांची मुजोरी कधीच जाणार नाहीच.... ) आणि तीस टक्के वाल्यांची काही प्रमाणात तरी मनमानी, ' मनसे 'ने संपवली असेल हे गृहीत धरून मी ठाण्यात दुसऱ्याच दिवशी रिक्षाला आवाज दिला....

एरवी, " थांब रे बाबा " अशी डोळ्यात अगतिकता घेऊन हाक मारणारी मी, ' मनसेच्या राजशक्ती ' भरोसे चक्क आवाज देती झालेली ... (स्वतःचा तो खणखणीत आवाज ऐकून थोडीशी दचकलेही... उगाच आवाज ऐकन दुर्लक्षण करत निघून गेला म्हणजे.... ) पण तीर आयमीन गळ्यातून आवाज सुटलाच होता. रिक्षावाला गचकन थांबला. माझ्यापासून दहा पावलांवर. मानही वळवण्याचे कष्ट न घेता आरशातून माझ्याकडे पाहत होता. मनात पाल चुकचुकली. या पालीही फार प्रामाणिक बुवा. नेमके कुठे चुकचुकायचे हे बरोब्बर कळते यांना. चुकीच्या वेळी कधीच चुकचुकायच्या नाहीत. पावले अजूनही तितकीच अडेलतट्टू. वय वाढते तसे बरेच काही बदलत जाते असे कानांनी ऐकून आहे पण पावलांना ऐकायला येतच नाही, हा नवीन शोध त्याक्षणी सप्रमाण त्यांनी मला दाखवला. रिक्षावाला पलायनवादाचा मार्ग अनुसरेल या भीतीने पायांना दहाच पावले फक्त असे गोडीगुलाबीने पटवत मी भरभर रिक्षा गाठली आणि नेहमीचा, " तीन हात नाका चलोगे? " चा प्रश्नार्थक सूरच काय तो प्रश्नच बाद करून स्थानापन्न झाले.

" हूं... " एखादा मस्तवाल बैल कसा मातीला ढुसण्या मारत हुंहुं ... आवाज काढेल तसाच तो हूं ... कानावर आदळला. समोरच लावलेल्या मोठ्या आडव्या आरशात रिक्षावाल्याचे पानाचा तोबरा भरलेले मुखकमल दिसले आणि ' हुं ' चे रहस्य सुटले. तीन हात नाका... झटक्यात व ठसक्यात सांगून मी त्याच्यावरची नजर हटवून बाहेर पाहू लागले. मात्र कान व डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्या पुढच्या पावित्र्याचा अंदाज घेत होतेच. " हुं... " पुन्हा हुं... आता काय? नाकाला चुण्या पाडत त्रासिक मुद्रेने मी त्याच्याकडे डायरेक्ट पाहिले तर..." हुं... उंहू... " सोबत हाताने, ' नाही जाणार - उतरा खाली ' चा इशारा...

सकाळचे फक्त दहा वाजलेत, म्हणजे ही जेवणाची वेळ नाही की चहाचीही वेळ नाही ( ऑफिशियली... बाकी चहाला खास काळ वेळ व स्थळही नसते. तो कुठल्याही क्षणी ' हो. कटिंग चालेल की ' मध्येच मोडतो शी मी +१ ). आत्ता गाडी रस्त्यावर आणली असेल त्यातून तीन हात नाका म्हणजे कुठले टिंबकटू ही नाही, तरीही हा चक्क उतरा म्हणतो. मनसेची भीती जाऊ दे पण त्याशिवायही याने मला नाही म्हणायचे कुठलेच कारण मला दिसत नव्हते. कुठे झक मारली आणि आवाज दिला असे मला होऊन गेले. पालींचा चुकचुकाट कल्ला करू लागला. निदान कारण तरी कळून घ्यावे म्हणून मी ( पोकळ ) उंच आवाजात त्याला विचारले, " क्यों, क्या हुआ? दस बजे हैं वो भी सुबह के और तुम ना बोलते हो... मीटर जॅम भूल गयें क्या? " नाईलाजाने तोबरा रिता करत रस्त्याला बापाचा माल असल्यागत रंगवून गर्रकन माझ्याकडे फिरत तिरसटपणे म्हणाला, " एकदा सांगून समजत नाही का? उतरा खाली. सकाळचे दहा का रात्रीचे दहा हा सवाल नसून माझ्या मर्जीचा सवाल आहे. आणि ते मीटर जॅम फक्त भय्यासाठी वापरायचे, माझ्याकडे नाही. कळलं का? " तो खरेच मला हाताला धरून उतरवायला कमी करणार नाही या भीतीने मी खेटर खाल्ल्यासारखी पटदिशी खाली उतरले. पुन्हा एकदा तुच्छतेने पाहत पीक टाकून तो निघून गेला. बापुडवाणी मी आणि बापुडवाणा रस्ता पाहातच राहिलो.

खरेच का ते मीटर जॅम फक्त भय्यासाठीच....? का फक्त त्या दोन तीन दिवसांपुरतेच असेल त्यांच्यासाठीही??? आता हे जाणून घ्यायला पुन्हा एकदा हात दाखवून अवलक्षण करणे भागच होते. ती वेळही पावलांच्या कृपेने लगेचच आली.

यावेळी मात्र ' कोरा ' आवाज काढत मी रिक्षाला ' हाक ' दिली. रिक्षा अगदी समोरच थांबली. पावले खूश. घाईघाईने बसायला उतावीळ झालेली. आधीच्या अनुभवाने मी जडशीळ उभी. " तीन हात नाका चलोगे ... ?? " " बहनजी ऐसे भी चलनाही हैं तो क्यों पुछते हों? बैठिये, जहा कहोगी लेके जाउंगा " मनाच्या आधी पावलांनी नोंद घेतली आणि मी रिक्षात बसलेही. रिक्षावाला भय्याच होता हे उघड आहेच. विचार केला जरा छेडावे... अंदाज येईल याच्या - यांच्या मनात काय चाललेय याचा.

" आपने ना नही बोला, अच्छा लगा। " मी विषयाला तोंड फोडले.
" मार खानेसे तो बच जाउंगा ना... "
" मतलब अगर डर नही होता तो ' ना ' बोलते क्या? डर तो वक्त के साथ कम होता रहेगा और जो बात मनसे नही दंडुके की वजह होती है उसका मतलब और आयू भी कम ही होती हैं। ना बोलना गलत हैं ऐसा आपको नही लगता? "
" बहनजी, मैं मानता हूं की रिक्षावालोंकी मनमानी बहोत सरचढ चुकी हैं। पर क्या सिर्फ हमही लोग मनमानी करते है? नही ना? फिर हमको ही दंडुका काहे मारत हो?? ' ठोकरे ' सिर्फ ठुकाई करना जानत हैं पर ये जानने की उसे जरुरत ना हैं की उसके अपने भी कैसे कैसे माज दिखाते हैं| उसे भी कभी देखे तो पता चलेगा... ठुकाई जात देखके नही कारण और बर्ताव देखके होनी जरुरी हैं, क्यों? "

दहा मिनिटांपूर्वीच खाल्लेले खेटर अजूनही चेहऱ्यावर रेंगाळत होतेच तोच याचा हा प्रश्न आणि तळतळ. रिसीविंग एंड ला पुन्हा मीच... आपल्यांची बाजू घ्यायची प्रबळ इच्छा मनात असूनही.....

24 comments:

 1. अगदी असंच होतं.. आपल्याची बाजू घ्यायची असूनही घेता येत नाही.. आपल्यांच्याच विचित्र वागण्यापायी.. फक्त रिक्षावाले अशा अर्थाने नव्हे.. जनरल आयुष्यातही !!

  ReplyDelete
 2. असेच होत राहते... उपायही सापडत नाही. सापडला तरी उपयोग होईलच याची खात्री नाही...

  धन्स हेरंब.

  ReplyDelete
 3. "बहेनजी, अब नितीश कुमार आये हैं, तो हम अब अपने अपने गाँव वापस जाने कि सोच रहे हैं. बाडबिस्तरा लेके! तो फिर अब तो आपको ये आप के जो मऱ्हाठी भाई लोग है ना उनपे हि भरौसा रखना पडेगा!"
  हे भय्या लोकांचं दिलासादायक म्हणणं मी पेपर मध्ये वाचलं. बाकी तुला जो अनुभव आला त्यावर काय बोलणार! XX आलेला आहे! आपल्या नेत्यांना त्यांच्या वागण्यातील त्रुटी दिसत नाहीत...दूरदृष्टी नाही...बाकी काय बोलणार!

  ReplyDelete
 4. masttttttt..post..he asech aahe..aapalich maanase aapalyaala daga detat..aapan maatr ugaach dusaryaanaa keval doshi tharavato..uttam anubhav...

  ReplyDelete
 5. Tumchi post kharach khup chan zali aahe. Pan ek thanekar ani ricksha hya vahan prakarach far jivalyach naat aahe. Tas pahil tar "bhaiyye" navapramane bhavasarkhi madat kartat, lambch bhad aasel, vel avel asel kiwa ekdhadi vaisk vaikti asel te yetil pan...aaplech lok madatila yenar naahit...Stationwarchi phili rikshachi line pahili aahe...te sangtil to rate dyaycha..total sagle marathi....pan tya pahilya line madli ricksa na kelelich bari ka te tumhala mahit aselch....

  ReplyDelete
 6. नितीश कुमार येवो नाहितर अजून कोणी बाडबिस्तरा जैसे थे च असेल. शेवटी पोटाचा सवाल आहे ना...

  कशाविरूध्द आवाज उठवायचा याला महत्व नसून राजकारण कशातून साधता येईल हेच जोवर पाहीले जाईल तोवर असा आनंदीआनंदच चालणार.

  धन्यवाद अनघा.:)

  ReplyDelete
 7. उमा, याचेच तर जास्त दु:ख वाटते. समोर रोखलेले बोट एकच असते बाकी वळलेली तीनही स्वत:कडे हेच सोयीस्कर दुर्लक्षले जात राहते... :(

  धन्यू गं.

  ReplyDelete
 8. आश्विनी, ठाण्यातून पूर्ण दहा वर्षे रोज सकाळ संध्याकाळ स्टेशन -रिक्षा चुकली नाही. चांगलाच अनुभव आहे मला त्या लाईनचा... :(

  अभिप्रायाबद्दल धन्यू गं.

  ReplyDelete
 9. काय कमेंटावे कळत नाही गं... आपलेच दात आपलेच ओठ अशी अवस्था आहे ही!!
  त्या रिक्षावाल्याचे पटतेय की शिक्षा जात पाहून नाही वृत्ती पाहून करावी!!

  भैय्यांचा उपद्रव हा वेगळा मुद्दा जरी मान्य केला तरी त्यामूळे मराठी लोकांना बेमुर्वतखोरसारखे वागायचा परवाना मिळत नाही....कठीण आहे ताई!!

  पोस्ट आणि चहाबाबतचे मत एकदम सही :)

  ReplyDelete
 10. अगं ताई..
  सुक्याबरोबर ओलंही जळतंच कधीकधी!!!

  ReplyDelete
 11. तर काय... आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणत चडफडत राहतो आपण. :(

  धन्सं गं तन्वे.

  ReplyDelete
 12. विद्या... आणि मग हे असं जळलेलं ओलं का? का? चा छळ करत राहतं...
  धन्यू रे.

  ReplyDelete
 13. काय कमेन्टु ते कळत नाही.बाकीच्यांनी बरंच काही लिहीलं पण आहे..तुला वाईट वाटणार नसेल तर एक सांगु?? तू परत आल्यानंतर चिडचिडी झाली असशील तर ते काढून टाक आणि एक खमंग रेसिपी टाक ब्लॉगवर....मला सध्या थोडं पण तळतळीचं वाचायला त्रास होतोय पण तुला प्रतिक्रिया देतेय...कळावे लोभ आहेच...:)
  अपर्णा...

  ReplyDelete
 14. अगं नाही गं अपर्णा... कोणावर चिडायचे, सांग?

  आणि खमंग काहितरी टाकले तर अजून त्रासशील म्हणून टाळत होते... बरं बरं, टाकतेच छानपैकी काही... :) तू काळजी घे.

  टिपणीबद्दल आभार.

  ReplyDelete
 15. संवेदना असली की असे त्रास होत राहतात - त्याच्यासोबत जगायला शिकण्याशिवाय पर्याय नसतो!

  ReplyDelete
 16. aativas, असेच होते खरे. आणि पर्याय नसतो हे कळत असूनही त्रास टळत नाही.

  अनेक धन्यवाद.

  ReplyDelete
 17. छान लिहील आहेस. पण आपला मराठी बाणा शिवसेना म्हणते म्हणुन किंवा मनसे म्हणते म्हणूनच का जागा होतो. आपल्या गल्लीत (गावात / राज्यात..........) सगळेच शेर असतात. हाच भय्या बिहारमध्ये कसा वागेल ?. अर्थात गरीब टॅक्सीवाल्याला माराव हे मलाही पटत नाही पण मराठीत आवाज केला की सध्या बरा आदर मिळतो हे दीलसे कबुल करायला हवच. पण तो मनसे नसुन डरसे असतो नाही का? असो. परत तुला सुर सापडलाय अस वाटतय.

  ReplyDelete
 18. मैत्रेया, तुझी टिपणी पाहिली की अनेक गोष्टी आठवतात. :) धन्यू रे.
  डरसे मिळणारा आदर ( का जुलमाचा रामराम ) आणि आपल्या ( खरे तर नक्की आपले कोण असते हा एक यक्ष प्रश्नच आहे... उत्तर नसणारा किंवा प्रसंगानुरूप आपल्याला हमखास तोंडघाशी पाडणारा... )माणसांनी दाखवलेला माज दोन्हीं डाचणार्‍याच. :(

  ReplyDelete
 19. माझं मत जरा वेगळं आहे. कदाचित दुखावेल पण सांगावसं वाटतं. इकडे कोणा राजकीय पक्ष किंवा रिक्षावाल्यांवर मत देण्यापेक्षा, आपण नागरिक म्हणुन किती सजग वागलो तेपण (तेच) पाहिलं पाहिजे. माझ्यामते तरी (जेवढं ऐकुन आहे) कोणी रिक्षावाला गिऱ्हाईकास नियमांनुसार एवढ्या उद्दामपणे ऐकवून उतरवू शकत नाही. तिकडेच तुम्ही त्याला तोंडघशी पाडायला पाहिजे होतं. मी रिक्षावाल्यांना कमी लेखत नाही, पण ते सेवा पुरवणारे आहेत. त्यामुळे जर त्यांच्यासारखा कोणी डोक्यावर चढुन मिऱ्या वाटत असेल तर मग आपल्याला कोणाकडुनही (मग तो नेता असो वा आणि कोण) एका दुर्बळाला मिळते तशीच सेवा मिळणार.

  ReplyDelete
 20. सौरभ, इतकी ताकद माझ्या मनगटात असती तर... पण दुर्दैवाने एका विवक्षित पायरी पर्यंतच तोंडाने भांडता ( वाद हा शब्द जिथे कुचकामी ठरतो )येते. त्यातून कोणी असभ्य बोलू-वागू लागला की नकळत भीती शिरकाव करतेच. माझ्या नवर्‍याने-लेकाने अगदी तुझ्यासारखीच प्रतिक्रिया दिली.

  जिथे शब्दाने व नियमाने लढता येते तिथे मी माघार घेत नाही, प्रयत्न सोडत नाही. http://sardesaies.blogspot.com/2009/04/blog-post_30.html यावरून ही घटना आठवली.

  अजून एक अशीच घटना एक दोन दिवसात टाकते. मत देशील... सर्विस इंडस्ट्रीत असूनही सेवा न देताही तथाकथित हक्कांची वसुली करण्याचा आग्रही प्रयत्न कसा होतो याचा नमुना...

  धन्यू रे.

  ReplyDelete
 21. खरं आहे. मराठी रिक्षावाले जास्त उद्धट असतात हा माझा पण अनूभव आहे. पोस्ट मस्त झाली आहे.
  हे मिटर जाम वगैरे थोतांड आहे, काही अर्थ नाही त्या मधे.. एक जनरल टीपी समज हवंतर.

  ReplyDelete
 22. महेंद्र, तू म्हणालास ना असेच वाटले एकंदरीतच. :(
  दोन दिवसांचा तमाशा...

  धन्यू.

  ReplyDelete
 23. रिक्षाच्या बाबतीत नाही पण असा अनुभव मी सुद्धा घेतला आहे ....आणि खरच तेव्हा मनापासून वाटत असतानाही मी समोरच्या व्यक्तीची बाजू घेवू शकलो नाही...

  ReplyDelete
 24. असे जेव्हां आपल्याला करावे लागते त्याची बोच फार काळ लागून राहते. :(

  अभिप्रायाबद्दल आभार देवेन. माफी, पोच द्यायला उशीर झाला.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !