जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, February 27, 2010

होळी रे होळी, पुरणाची पोळी......

आमची आई अगदी न चुकता दर वर्षी होळीला पुरणाची पोळी करत असे. तिने केलेल्या पोळ्या अगदी एक सारख्या, तब्येतीत पुरण भरलेल्या अजिबात कुठूनही न उकललेल्या. आईच्या हातच्या मऊसूत पुरणाच्या पोळ्या म्हणजे पर्वणीच. जेव्हां जेव्हां ती त्या करत असे त्या प्रत्येक वेळी मी निदान एक तरी पुरणाची पोळी करून पाही. पण जिकडून तिकडून पुरण बाहेर येऊन चिकटल्याशिवाय ती पोळी काही होत नसे. मी केलेली पोळी कशीही असली तरी मी ती आनंदाने खात असे पण मन मात्र खट्टू होई. आईच्या कश्या इतक्या सुंदर होतात, मलाच का जमत नाही याचे दुःख पुढे दोन चार दिवस त्रास देई की पुन्हा आई नव्याने त्या करायला घेईतो मी विसरून जाई.

लग्न झाल्यावर एकदा सासू-सासरे चार दिवस पुण्याला गेले असता मी मुद्दामहून अर्धा दिवसाची रजा टाकून आज पुरणाची पोळी करून नचिकेतला चकित करायचे असे ठरवून घरी गेले. आई करताना पाहिलेले आठवून आठवून सुरवात केली. डाळ शिजवून घेतली पण पाणी पूर्ण काढले गेले नाही. गूळ नेमका कमी भरला....., तर त्यात काय कमी तर कमी. अर्धा गूळ व अर्धी साखर घालून करू, पण आज मागे हटायचे नाही. पक्का निर्धार केलेला. एक डोळा घड्याळाकडे ठेवून भरभर कामाला लागले होते. मुळात डाळीत थोडे पाणी शिल्लक राहिलेले त्यात साखर व गूळ वितळून मिश्रणाला चक्क कटाच्या आमटीचे स्वरूप आले आणि माझा धीर खचला. तरी नेटाने पंधरा मिनिटे ते आटते का याचा प्रयत्न केला पण फारसा काही फरक पडला नाही. उलट आच वाढविल्याने तळशी करपू लागले. या मिश्रणाचे आता नक्की कशात रुपांतर होतेय तेच समजेना, जीव खालीवर होऊ लागला. चव मात्र खरेच बरी लागत होती.
हे काय वाटीत घालून का देऊ खायला. म्हणजे तो नक्की हसेल आणि सगळ्यांना माझी फजिती सांगेल. या नुसत्या कल्पनेनेच वैतागून मी तो सगळा राडा उचलला, पिशवीत भरला. सोबत चार साध्या पोळ्याही घेतल्या आणि चक्क घराशेजारच्या बागेपाशी बसणाऱ्या आजीला देऊन आले. मनात सारखे वाटत होते ती आजीपण म्हणत असेल, काय ही पोर आहे. साधी पुरणपोळीही जमेना होय.

पुरणपोळी जमलीच नाही ती नाहीच वर अर्धा दिवसाची सुटीही फुकट गेली.
माझ्या फजितीचा नचिकेतला मी मुळीच पत्ता लागू दिला नाही. संध्याकाळी बाहेर जाऊन मस्त हादडून आलो. पण कुठेतरी मनात सल राहिलाच. पुढे बरीच वर्षे मी या पुरणपोळीच्या वाटेला गेलेच नाही. वेळ कुठे आहे इतका या सबबीखाली टाळत आले. होळीला बिल्डिंगमधलीच एक मैत्रीण बनवून देत असे तेव्हा तिच्याकडूनच आणत असल्याने तसे अडलेही नाही. पण २००० साली अमेरिकेत आलो आणि आता आपण जर पुरणपोळी केली नाही तर खायला मिळणारच नाही हे जाणवले. मनाचा हिय्या करून पुन्हा एकदा होळी नसताना पुरणपोळीचा घाट घातला आणि वल्ला! जमल्या. शोमूने अगदी आडवा हात मारला ते पाहून इतक्या वर्षांचे खट्टू मन आनंदून गेले. लागलीच फोन करून आईच्या कानाशी लागले. तिला ही बातमी देऊन थोडी कॉलर ताठ करून घेतली.

आता वर्षातून दोन-तीनदा तरी होतातच म्हणजे करतेच. हो ना, नाहीतर पुन्हा काहीतरी चुकायचे. उद्याच होळी तेव्हा आज केल्यात. लगे हाथ कृतीही टाकतेय.

सगळ्यांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


जिन्नस
  • चार वाट्या चण्याची डाळ
  • चार वाट्या चिरलेला/किसलेला गूळ ( शक्यतो पिवळा गूळ घ्यावा )
  • कणीक दोन वाट्या, तांदळाची पिठी दोन वाट्या
  • दोन चमचे वेलदोडा पूड, एक चमचा जायफळ पूड ( आवडत असल्यास ) थोडे केशर (वासापुरते)
  • अर्धी वाटी तेल व दोन चिमूट मीठ व तीन-चार चमचे तूप
मार्गदर्शन
चण्याची डाळ स्वच्छ धुऊन एका मध्यम भांड्यात जरा जास्तच पाणी घेऊन त्यात डाळ व चार थेंब तेलाचे घालून प्रेशरकुकरमध्ये ठेवावे. मध्यम आचेवर तीन शिट्ट्या करून घ्याव्यात. प्रेशर गेले की लागलीच काढून चाळणीवर डाळ ओतावी. डाळीतले सगळे पाणी निथळून घेऊन एका भांड्यात ठेवावे. या पाण्याचीच कटाची आमटी करता येते. या गरम डाळीतच गूळ व केशराच्या काड्या घालून मध्यम आचेवर पुरण शिजवून घ्यावे. साधारण दहा मिनिटात शिजते.शिजत आले की चमचाभर तूप त्यात टाकून मिनिटभर शिजवून आच बंद करावी. आचेवरून काढून पुरण जरा निवले की वेलदोड्याची व जायफळाची पूड घालून पुरण मिक्सरमधून/ पुरणयंत्रातून/ पाट्यावर वाटून एकसंध गोळा करावा.

गव्हाची कणीक प्रथम पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावी. थोड्या पाण्यात अगदी घट्ट भिजवून साधारण तास-दिडतास झाकून ठेवावी. नंतर पाणी व मीठ लावून खूप वेळ मळून मऊ परंतु ताणता येईल अशी करून घेऊन एका भांड्यात अर्धी वाटी तेल घेऊन त्यात बुडवून ठेवावी. थोडी कणीक घेऊन त्याचा मोठ्या लिंबाएवढा गोळा करावा. कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेऊन कणकेच्या गोळ्यात घालून त्याचा उंडा करावा. तांदुळाच्या पिठीवर अतिशय हलक्या हाताने परंतु पुरण अगदी पोळीच्या कडेपर्यंत नीट पसरेल असे लाटावे. शक्यतो न चिकटणाऱ्या तव्यावर टाकून नाजूकपणे भाजावी. उलटताना ती फुटणार नाही याची काळजी घ्यावी. बदामी रंगावर भाजून घ्यावी व तूप घालून खायला द्यावी. आवडत असल्यास सोबत दूधही द्यावे.

टीपा
ताजी पुरणाची पोळी तूप-दुधाबरोबर सुंदर लागतेच परंतु शिळी पुरणाची पोळी ( दुसऱ्या दिवशी ) जरा जास्तच छान लागते. तेव्हा करताना हमखास पाचसहा तरी पोळ्या दुसऱ्या दिवशीसाठी राहतील या हिशोबाने कराव्यात. मी पुरण शिजत आले की त्यात एक चमचा तूप टाकते. त्यामुळे पुरणाची खुमारी हमखास वाढते. पुरण मऊ झाले पाहिजे. गूळ किंवा डाळ राहू देऊ नये अन्यथा लाटताना पोळी फुटत राहण्याची शक्यता असते. अशी पोळी फुटली की भाजताना त्रास होतो.

24 comments:

  1. वा वा.. पुरणाची पोळी, तोंडाला सुटलंय पाणी. यमक जुळत नाहीये ते माहित्ये हो. पण आपलं उगाच काहीतरी. :-) ...

    थोड्या पोळ्या इथे पण पाठवा.. तसं आम्ही पण करणार आहोत. पण backup प्लान म्हणून ;-)

    ReplyDelete
  2. मस्तच गं बयो!!! आमची माय पण करते सुंदर मऊसुत पुरणपोळ्या.....तोंडात विरघळणाऱ्या!!
    मगर हम अभी प्रॅक्टिस करते है और जरा बरा जमता है ...अब तुम्हारे रेशिपी को वाचकर और सुधारणा करेंगे!!!
    बाकि फोटु मस्तच....होळीच्या अनेक अनेक शुभेच्छा!! तुला , नचिकेतदादाला आणि शोमुला.....

    ReplyDelete
  3. या होळीला घरी जात नाहीये, म्हणुन एक आठवडा उशीरा पोळी खायला मिळेल, तो पर्यंत फोटोवरन समाधान...
    होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  4. भाग्यश्री
    कोणत्याही पदार्थाची कृती देताना तू त्यासंबंधीच्या काही टिप्सही देतेस त्यामुळे नव्याने तो पदार्थ करणारा चुकण्याची शक्यता जवळ जवळ उरत नाही. सरावाने पदार्थ करणार्‍याला तुझ्या लेखनातला नेमकेपणा जाणवतो आणि बरे वाटते. त्याबद्दल तुझे खास कौतुक!!!
    आई

    ReplyDelete
  5. पोळी सही झालीय...तोंडाला पाणी सुटलेय..बाकी इथे माझ्या सासुबाई आल्या की आम्ही होळी करतो म्हणजे त्या असेपर्यंत अधुनमधुन पुरणपोळी खात राहातो..त्या पोळ्या करायला लागल्या की त्यांना पाहाणे हा एक आवडता उद्योग असतो...इतक्या गोल पोळ्या आणि कुठेही पुरण गोळी लागल्यासारखं बाहेर नसतं...अगदी त्रिज्या,परिघ सगळं नीट मोजता येईल इतकी गोल...आणि चव तर अहाहा....

    ReplyDelete
  6. आणि तू किती नशीबवान आहेस..आईची कॉमेन्ट आहे :)

    ReplyDelete
  7. होळीच्या हर्दिक शुभेच्छा....मस्तच झालाय लेख..मी पण लग्नानंतर पहिल्यांदा जेंव्हा पुरण्पोळी बनवली तेंव्हा चण्याच्या डाळी ऐवजी तुरीची डाळ शिजवली होती.माझी काही मग डाळ शिजली नाही असल्या घाटासमोर....तु तुझी डाळ बागेतल्या आजींना तरी देउ केलीस..मी तर उचलुन मंदीरात...डायरे्क्ट.. आपले देव माणसं गं..संभाळुन घेतात ग आपल्याला..[:फ][:)]

    काय हो की नाही???

    ReplyDelete
  8. मी पुरणपोळी करण्याच्या वाटेला कधि जात नाही. प्रशांतमधुन आणल्या आणि दुधा तुपात बुडवुन खल्ल्या :)
    होळीच्या शुभेच्छा!
    सोनाली

    ReplyDelete
  9. मस्त.. आज वाढणाऱ्या पोटाची काळजी न करता मस्त हादडली पुरणाची पोळी. अगदी वाटी मधे तुप घेउन..
    :)

    ReplyDelete
  10. होळी रे होळी . . .पुराणाची पोळी!!! आज आडवा हात मारलाय पोळ्यांवर!!! होळीच्या शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  11. हेरंब,करून हादडल्यात ना पुरणपोळ्या...:) backup ची गरज पडणारच नाही याची मला खात्री होतीच. हेहे...

    ReplyDelete
  12. तन्वी, गौरा-इशान व अमितलाही होळीच्या अनेक शुभेच्छा!मी खाल्ली बरं का तू केलेली पोळी, मस्तच. असे आयते बसून किती दिवसात खाल्ले नव्हते. थांकू.

    ReplyDelete
  13. आनंद,होळी-धुळवडीच्या अनेक शुभेच्छा!:)

    ReplyDelete
  14. आई,मस्त वाटले तुमची टिपणी पाहून.नमस्कार.

    ReplyDelete
  15. अपर्णा, मजा आहे बुवा तुमची.:)तू केलीस का आज?

    ReplyDelete
  16. माऊ, हो बाई. आपली देवमाणसेच... घेतात सांभाळून.तुरीची डाळ...:P, तू पण ना... :))

    ReplyDelete
  17. सोनाली, मी प्रशांतला फार फार मिस करते गं.पुरणाची पोळीही मिळते का.... मजा आहे. आता आले की एकदा चाखून पाहायला हवी. मला ते अंगुरी गुलाबजाम आणि नाचणीची शेव भारी आवडते प्रशांतकडची. अहाहाSS....
    आयर्नची पहिलीच होळी आणि रंगपंचमी असेल ना? त्याला मावशीतर्फे केशराचा रंग लाव गं.:)

    ReplyDelete
  18. महेंद्र, हादडल्यास ना पोळ्या.बरे झाले. नाहितर सुपर्णाचे कष्ट फुकट गेले असते ना... :)

    ReplyDelete
  19. मनमौजी, आम्ही पण. काल आधी ताजी ताजी खाल्ली आणि आज पुन्हा हादडली. दमलो....:)
    होळीच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  20. प्रशांत का जवाब नही.
    आर्यनला लावला बर का केशराचा रंग, तुमच्यातर्फे सुद्धा. मागच्या वर्षी त्याचा शितळ शिमगा केला होता, त्याचे पोस्ट आणि फोटो पण टाकलेत त्याच्या ब्लॊगवर.
    सोनाली

    ReplyDelete
  21. होळी आणि धुळवडीच्या दिवशी बायकोने प्रेमाने केलेल्या किमान १५ पोळ्या हादडल्या. फोटो उशिराने का होईना टाकतो ... :D

    ReplyDelete
    Replies
    1. रोहना, अरे खाताना तू राक्षसगणात गेला होतास की काय.. :P :D :D

      Delete
  22. अगं आई गं! वाचुन आणि व्हर्च्युअली खाऊन सताठशे ग्रॅम वजन वजन वाढलं गं ! फ़ोटो तर इतका सुंदर की थेट उचलून तोंडात तुकडा टाकावा असं वाटलं.

    ReplyDelete
  23. shinu, अगं गुळाची आहे ना... बिनधास्त खा गं.... अभिप्रायाबद्दल धन्यवाद. बरे वाटल गं....:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !