
हे ऐकताच आजीने हातातले चांदीचे तुपाचे सतेले दाणकन आपटले आणि कमरेवर हात ठेवून उभी राहिली. तिचा अवतार पाहून अर्धी बच्चेकंपनी टेबलाखाली गेली. मी आणि आत्तेभाऊ तग धरून होतो. आईचा-काकूचा चेहरा ताणला गेलेला, आत्या टेबलाखाली हाताने नको नको च्या खुणा करत होती. मी गावचेच नसल्यासारखी शांतपणे वरण भात कालवायला सुरवात केली. वर आजीला म्हटले, " आजी अग तूप वाढ ना. विसरलीस का?" " चिंगे, तू आजोबांना काय विचारणार होतीस ते विचार आधी मग मिळेल तूप. अगोचर झालीय कारटी. अजून दहावं ही लागलं नाही पण सगळ्यांना घेऊन दिवसभर खीखी-खूखू चालूच. आता का वाचा बसलीये? विचार म्हणते ना. " आमची आजी अतिशय प्रेमळ पण आता तिला नेमकी शंका आलेली .... ही कारटी नक्कीच काहीतरी आपल्याबद्दलच अगोचरपणा करू पाहत होती. मग ती बरी सुखासुखी जेवू देईल मला. तोवर आजोबा आपले मस्त तब्येतीत जेवत होते.

आता सुटका नाही तेव्हा कर नाही तर डर कशाला या आवेशात मी एका दमात आजोबांना विचारले, " आजोबा, देवाचा जप करताना आजूबाजूला काय चालले आहे हे कसे कळते हो? डोळे तर बंद असतात ना? आणि ते चित्त का काय ते देवापाशी मग स्वयंपाकघरात कोणी हळूच साय खाल्ली, कोणी खिदळले का कुचकुच केली, स्वयंपाकीणकाकू पाच मिनिटे उशिराने आल्या तर ते कसे बरे कळते? म्हणजे आम्हाला आपले रोजचे रट्टे द्यायचे संध्याकाळी शुभंकरोती-पाढे म्हणताना...... मेल्यांचे सगळे लक्ष पडवीत कोण आलेय, आज जेवणात काय गोड आहे यात लागलेले. मग चुकतीलच ना पाढे. आम्ही तर इतके लहान आहोत तरी आम्हांला रागे भरतात आणि स्वतः मात्र देवासमोर पाटावर बसून सगळ्यांवर बारीक लक्ष वर खेकसतही राहायचे. याला काय जप म्हणतात का? " पुढे काय रामायण घडले असेल ते मी वेगळे सांगायला नकोच. माझ्यामुळे सगळ्या मुलांना दुसऱ्याच दिवशी केलेल्या पॉट आइसक्रीम मधले खारट आइसक्रीम दिले गेले. मोठी मोठी टपोरी जांभळे उतरवली गेली आणि मोजून फक्त दहा दिली गेली. सगळ्यात कहर म्हणजे पत्र्याच्या थियेटरमध्ये सगळे सिनेमाला गेले पण आम्हाला मात्र घरी वॉचमन कडे सोपवून.

हा प्रश्न मला आजही सुटलेला नाही. मी अशी अनेक माणसे पाहिलीत, स्वतःवरही हे प्रयोग करून पाहिलेत. पण नेमके असे का होते याचे समर्थनीय उत्तर मिळत नाही. अशाच एक जरा लांबच्या आजी जपाची माळ घेऊन बसायच्या, त्याही बरोबर माजघर आणि स्वयंपाकघर याच्या मधल्या तबकडीत. कुठेही जरासे खुट्ट जरी वाजले की यांचा पट्टा सुरू. पुन्हा हातातल्या जपमाळेचे मणी ओढणेही चालूच. अगदी मेल्या, रांडेच्यापासून सगळ्या शिव्याही देत असत त्याच वेळी. अनेकदा लक्षनामाचा संकल्प सोडलेला असे. तो पुराही करत सात दिवसात.... पण तो हा असा.....

आता या नाम:स्मरणांत खरे मनोभावे नाव किती वेळा बरे घेतले असेल आजींनी? शिवाय याचा गाजावाजा तो किती. जो तो वचकून. कधी कधी हे आठवले की मी जपाची माळ घेऊन बसते. वाटते इतक्या गंमती पाहिल्यात तेव्हा आपण आपले मन-चित्त एकाग्र करून फक्त १०८ वेळा देवाचे नाव घेऊ शकतो का ते पाहावे. अगदी प्रामाणिकपणे सांगते.... जेमतेम दहा जास्तीत जास्त पंधरा मणी... की लागलीच मन लागते भरकटायला.....
की पुन्हा स्वतःलाच एक थप्पड मारून त्याला पकडून जागेवर आणते व पुन्हा पहिल्यापासून सुरवात करते..... पण उपयोग शून्य. ये रे माझ्या मागल्या चालूच. " सारे चित्त जगी लागो, मुखी जपे राम, देह प्रपंचाचा दास, हाच एक नेम, फिरे अंतराळी आत्मा, सोडूनि देह सारा.... " असेच माझे होऊ लागते.

कुठल्या कुठल्या आठवणी अचानक उफाळून येऊ लागतात. ध्यानी मनीही नसलेली माणसे समोर उभी ठाकतात. अगदी लहानपणी केलेल्या खोड्या.... हट्ट... आठवणीतून आठवणी..... कधी चांगल्या घटना...... तर कधी दुःखदायी प्रसंग. काही गोष्टी कायमच्या हद्दपार झाल्यात असे वाटू लागलेले असते नेमक्या त्याच वाकुल्या दाखवत, " मी बरे अशी विसरू देईन तुला " असे म्हणत राहतात. वाटले की जपमाळ घेऊन बसलो ना की असे होत असेल. दुसरे काहीतरी करून पाहावे. मग ते केंद्रबिंदूकडे एकटक पाहणे प्रकार सुरू केले. तिथे तर मन अजूनच रानोमाळ भरकटू लागले. तोंडाने काही म्हणायचे नाही आणि थोड्यावेळाने आपण नक्की काय पाहत होतो याचा विसर पडावा इतके वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे बिंदू जिकडे तिकडे दिसू लागायचे. तशात मनाने कधी कोंकणातले घर गाठलेले असायचे तर कधी भूमितीचा दहावीचा तिमाहीचा पेपर. गेली अनेक वर्षे हे असे प्रयत्न करणे मी थांबवलेले नाही आणि आताशा मनाचे भरकटणे फारच वाढू लागलेय. त्याचेही बरोबरच आहे ना. आजकाल त्याचे कुरण फारच विस्तारलेय.

वार्षिक परीक्षा सुरू असली की या भरकटण्याला तर उत येत असे. धडेच्या धडे पानेच्या पाने उलटून होत मग घड्याळ्याच्या आवाजाने डोळे खाडकन उघडत.... बापरे! तासभर गेला. काय काय वाचले आणि किती लक्षात आहे ते पाहावे तर या ओळींवरून डोळे फिरले होते यावरही विश्वास बसत नाही. मग पळापळ.

