जाता जाता एक नजर इथेही........

Monday, November 30, 2009

सारे चित्त जगी लागो, मुखी जपे राम......

" अग मेल्यांनो काय खीखी लावलीये गं कधीपासून? बरं खिदळताय तर संपूर्ण बत्तिशी दाखवा. तिथे कशाला चोरी मारी करताय? रोजचं मेलं कोणीतरी माझ्या जपाच्या वेळी तडमडत असतं. एकही दिवस मनासारखा जप काही होत नाही. " आजी करवादत होती. आम्ही सगळे तोंड दाबून लांब पळून गेलो. मग दुपारी आजोबा जेवायला आले तशी मी हळूच विचारले, " आजोबा, मला एक प्रश्न पडलाय. आम्ही सगळ्यांनी खूप चर्चा केली पण.... . तसे प्रश्न अजून एका माणसाला विचारू शकतो पण तो विचारल्यावर उत्तर मिळणार नाही्च मात्र जे हातात असेल त्याने मार मिळेल म्हणून कोणाचीच हिंमत नाही. तुम्ही विचाराल का?" आजोबांनी हळूच आजीकडे नजर वळवली आणि लागलीच माझ्याकडे पाहत डोळ्यांनीच विचारले.... प्रश्न हिच्याबद्दल आहे का? मीही लागलीच होकारार्थी मान हालवली तसे आजोबांनी, " चिंगे, आज दुपारचे जेवण सुखासुखी होण्याची लक्षणे बिलकुल दिसत नाहीयेत. विचार विचार तू.... नाहीतरी आता बिगूल वाजलाच आहे. तेव्हा होऊन जाऊ दे. "

हे ऐकताच आजीने हातातले चांदीचे तुपाचे सतेले दाणकन आपटले आणि कमरेवर हात ठेवून उभी राहिली. तिचा अवतार पाहून अर्धी बच्चेकंपनी टेबलाखाली गेली. मी आणि आत्तेभाऊ तग धरून होतो. आईचा-काकूचा चेहरा ताणला गेलेला, आत्या टेबलाखाली हाताने नको नको च्या खुणा करत होती. मी गावचेच नसल्यासारखी शांतपणे वरण भात कालवायला सुरवात केली. वर आजीला म्हटले, " आजी अग तूप वाढ ना. विसरलीस का?" " चिंगे, तू आजोबांना काय विचारणार होतीस ते विचार आधी मग मिळेल तूप. अगोचर झालीय कारटी. अजून दहावं ही लागलं नाही पण सगळ्यांना घेऊन दिवसभर खीखी-खूखू चालूच. आता का वाचा बसलीये? विचार म्हणते ना. " आमची आजी अतिशय प्रेमळ पण आता तिला नेमकी शंका आलेली .... ही कारटी नक्कीच काहीतरी आपल्याबद्दलच अगोचरपणा करू पाहत होती. मग ती बरी सुखासुखी जेवू देईल मला. तोवर आजोबा आपले मस्त तब्येतीत जेवत होते.
माझी छोटी न कळती भावंडेही आपल्याच तालात होती.

आता सुटका नाही तेव्हा कर नाही तर डर कशाला या आवेशात मी एका दमात आजोबांना विचारले, " आजोबा, देवाचा जप करताना आजूबाजूला काय चालले आहे हे कसे कळते हो? डोळे तर बंद असतात ना? आणि ते चित्त का काय ते देवापाशी मग स्वयंपाकघरात कोणी हळूच साय खाल्ली, कोणी खिदळले का कुचकुच केली, स्वयंपाकीणकाकू पाच मिनिटे उशिराने आल्या तर ते कसे बरे कळते? म्हणजे आम्हाला आपले रोजचे रट्टे द्यायचे संध्याकाळी शुभंकरोती-पाढे म्हणताना...... मेल्यांचे सगळे लक्ष पडवीत कोण आलेय, आज जेवणात काय गोड आहे यात लागलेले. मग चुकतीलच ना पाढे. आम्ही तर इतके लहान आहोत तरी आम्हांला रागे भरतात आणि स्वतः मात्र देवासमोर पाटावर बसून सगळ्यांवर बारीक लक्ष वर खेकसतही राहायचे. याला काय जप म्हणतात का? " पुढे काय रामायण घडले असेल ते मी वेगळे सांगायला नकोच. माझ्यामुळे सगळ्या मुलांना दुसऱ्याच दिवशी केलेल्या पॉट आइसक्रीम मधले खारट आइसक्रीम दिले गेले. मोठी मोठी टपोरी जांभळे उतरवली गेली आणि मोजून फक्त दहा दिली गेली. सगळ्यात कहर म्हणजे पत्र्याच्या थियेटरमध्ये सगळे सिनेमाला गेले पण आम्हाला मात्र घरी वॉचमन कडे सोपवून.


हा प्रश्न मला आजही सुटलेला नाही. मी अशी अनेक माणसे पाहिलीत, स्वतःवरही हे प्रयोग करून पाहिलेत. पण नेमके असे का होते याचे समर्थनीय उत्तर मिळत नाही. अशाच एक जरा लांबच्या आजी जपाची माळ घेऊन बसायच्या, त्याही बरोबर माजघर आणि स्वयंपाकघर याच्या मधल्या तबकडीत. कुठेही जरासे खुट्ट जरी वाजले की यांचा पट्टा सुरू. पुन्हा हातातल्या जपमाळेचे मणी ओढणेही चालूच. अगदी मेल्या, रांडेच्यापासून सगळ्या शिव्याही देत असत त्याच वेळी. अनेकदा लक्षनामाचा संकल्प सोडलेला असे. तो पुराही करत सात दिवसात.... पण तो हा असा.....
, आहे ना गंमत.

आता या नाम:स्मरणांत खरे मनोभावे नाव किती वेळा बरे घेतले असेल आजींनी? शिवाय याचा गाजावाजा तो किती. जो तो वचकून. कधी कधी हे आठवले की मी जपाची माळ घेऊन बसते. वाटते इतक्या गंमती पाहिल्यात तेव्हा आपण आपले मन-चित्त एकाग्र करून फक्त १०८ वेळा देवाचे नाव घेऊ शकतो का ते पाहावे. अगदी प्रामाणिकपणे सांगते.... जेमतेम दहा जास्तीत जास्त पंधरा मणी... की लागलीच मन लागते भरकटायला..... की पुन्हा स्वतःलाच एक थप्पड मारून त्याला पकडून जागेवर आणते व पुन्हा पहिल्यापासून सुरवात करते..... पण उपयोग शून्य. ये रे माझ्या मागल्या चालूच. " सारे चित्त जगी लागो, मुखी जपे राम, देह प्रपंचाचा दास, हाच एक नेम, फिरे अंतराळी आत्मा, सोडूनि देह सारा.... " असेच माझे होऊ लागते.

कुठल्या कुठल्या आठवणी अचानक उफाळून येऊ लागतात. ध्यानी मनीही नसलेली माणसे समोर उभी ठाकतात. अगदी लहानपणी केलेल्या खोड्या.... हट्ट... आठवणीतून आठवणी..... कधी चांगल्या घटना...... तर कधी दुःखदायी प्रसंग. काही गोष्टी कायमच्या हद्दपार झाल्यात असे वाटू लागलेले असते नेमक्या त्याच वाकुल्या दाखवत, " मी बरे अशी विसरू देईन तुला " असे म्हणत राहतात. वाटले की जपमाळ घेऊन बसलो ना की असे होत असेल. दुसरे काहीतरी करून पाहावे. मग ते केंद्रबिंदूकडे एकटक पाहणे प्रकार सुरू केले. तिथे तर मन अजूनच रानोमाळ भरकटू लागले. तोंडाने काही म्हणायचे नाही आणि थोड्यावेळाने आपण नक्की काय पाहत होतो याचा विसर पडावा इतके वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे बिंदू जिकडे तिकडे दिसू लागायचे. तशात मनाने कधी कोंकणातले घर गाठलेले असायचे तर कधी भूमितीचा दहावीचा तिमाहीचा पेपर. गेली अनेक वर्षे हे असे प्रयत्न करणे मी थांबवलेले नाही आणि आताशा मनाचे भरकटणे फारच वाढू लागलेय. त्याचेही बरोबरच आहे ना. आजकाल त्याचे कुरण फारच विस्तारलेय. कसले सात समुद्र घेऊन बसलात हे बेटे इतरांनाही पकडून आणू लागलेय स्वतःबरोबर.

वार्षिक परीक्षा सुरू असली की या भरकटण्याला तर उत येत असे. धडेच्या धडे पानेच्या पाने उलटून होत मग घड्याळ्याच्या आवाजाने डोळे खाडकन उघडत.... बापरे! तासभर गेला. काय काय वाचले आणि किती लक्षात आहे ते पाहावे तर या ओळींवरून डोळे फिरले होते यावरही विश्वास बसत नाही. मग पळापळ.
पुढे पुढे ऑफिसमध्ये कुठले लेक्चर, सभा वगैरे असली ना की हटकून हे भरकटणे घडत असे. अनेकदा समोरचा मनुष्य काय बोलतोय ते ऐकत त्याला हो हो म्हणत निरीक्षण सुरूच. बोलण्याची लकब, उभे राहण्याची ढब. काही खास अंगविक्षेप. मला वाटते आजीकडूनच नकळत हे इतके पक्के धडे मिळालेले आहेत की आता ते सहजी अंगात भिनून गेलेय. चला काहितरी फायदा झालाच आहे म्हणायचा. आपण बोलतोय आणि समोरच्याचे डोळे एकटक आपल्यावर खिळलेत की समजून जावे हा भरकटलाय..... जसे तुम्ही आता वाचता वाचता आपल्याच कुठल्याश्या आठवणीत घुसला आहात. तुम्ही तसे आणि मी पोस्टच्या विषयापासून भरकटायला लागायच्या आत थांबतेच........

20 comments:

 1. पहा जमले तर प्रयत्न करून.

  लक्ष भरकटू दे त्याला परत आणू नका... थोड्या वेळाने ते आपोआप जाग्यावर येईल. तोपर्यंत जप मात्र मनस्वी म्हणजे कोणावरही न चिडता "ठेविले अनंते तैसेची रहावे ... " प्रमाणे चालू ठेवायचा अन् व्यवहारही जपाचा!

  ReplyDelete
 2. पॉट आइसक्रीम मधले खारट आइसक्रीम, मोठी मोठी टपोरी जांभळे मोजून फक्त दहा, पत्र्याच्या थियेटरमध्ये सिनेमाला गेले पण आम्हाला मात्र घरी वॉचमन कडे सोपवून... भारीच शिक्षा आहेत ह्या... :D

  आठवणी मुंगयांच्या वारुळासारख्या असतात. एक मुंगी बाहेर पडली की तिच्या मागुन कश्या असंख्य मुंग्या बाहेर पडतात. तश्या आठवणी सुरू झाल्या की एका मागुन एक मग येतच जातात.
  ... व.पु.

  शेवटी आजीबाईचा बटवा हा असाच ... कधीही न रीता होणारा... :)

  ReplyDelete
 3. हा हा हा...अगदी बरोबर..पुष्कळदा दुपारनंतरच्या मिटिंगमधलं बरचसं डोक्यावरुन जातं तेव्हा फ़क्त mom (min of meeting) चा आधार असतो....आजकाल ब्लॉग्ज वाचतानापण भरकटते आणि मग कॉमेन्टायचं राहतं....:)

  ReplyDelete
 4. aaj khoop divasaanni sandhi milali ikade yenyaachi, aani pahileech post tujhi baghitali.

  mastach lihile aahes. japamaal gheun basalelee majhi aaji aathavalee ekadam :)

  ReplyDelete
 5. मस्त लिहीलेस गं...माझ्या सासऱ्यांना आम्ही अशीच ताकीद दिली होती पुजा करताना गप्प बसत जा म्हणून....अग नुसताच देह देवासमोर....बाकि कान, नाक, डोळे आमच्यावर आणी घरभर....सतत बडबड नको होते त्यांची पुजा ....
  पण तू मात्र सही हं!!! आजी पण ग्रेट....शिक्षा जबरा होत्या एकदम....

  ReplyDelete
 6. नेहमीप्रमाणेच सुं द र.मी ना ह्ळुह्ळु फॅन व्हायला लागली आहे तुझी.

  ReplyDelete
 7. एका ट्रेनिंग सेशन मधे त्यांनी नेमकं हेच करायला सांगितलं होतं. एका ठिकाणी शांत बसुन मन भरकटायला मोकळं सोडा म्हंट्लं होतं.. आणि त्या वेळेस पुर्ण शरिर स्थिर ठेवा म्हंटलं होतं.. मजा येते. करुन बघा..

  ReplyDelete
 8. ह्याला मल्टीटास्किंग म्हणतात :)
  आपल्या पुर्वजांनी त्याचा शोध लावला आहे....

  पोस्ट अत्यंत खुमासदार आहे...

  ReplyDelete
 9. रोहन अरे किती रडलो आम्ही या शिक्षांमुळे:D.
  हो ना कधीही न संपणा~या आठवणी. बाकी आपण दोघेही वपुंचे पंखे..:)

  ReplyDelete
 10. अपर्णा हीही...अग दुपारची मिटिंग असली की मग अर्धा वेळ निद्रादेवीचा अमंल आणि उरला अर्धा वेळ इतर कसे पेंगत पेंगत जागे असल्याचे भासवत आहेत....हे पाहून धमाल येते.कमेंटायचं राहतयं...हेहे.

  ReplyDelete
 11. शिरीष स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.
  तुम्ही म्हणता तसे होते काही वेळा. थोडावेळ मन भटकून पुन्हा येते जागेवर. अर्थात पुन्हा फार काळ टिकेल असे नसले तरी....इथे घरात मी एकटी. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता त्यामुळे चिडण्याचीही संधी नाही.:) हळवेपणाचा अतिरेक होऊ लागतो....

  ReplyDelete
 12. गौरी बरेच दिवसात दिसली नव्हतीस. मलाही आठवण येत होती.:) आभार.

  ReplyDelete
 13. संवेदना....:). धन्स गं.

  ReplyDelete
 14. महेंद्र अरे अगदी हेच आम्ही काही मैत्रिणी जमून करायचो....पण त्यावेळी बाकीच्या काय करत आहेत याकडे प्रत्येकीचे लक्ष....:P.आणि मनाला असे सोडले ना की तेही हट्टी मुलासारखे कोरा चेहरा घेऊन बसे.मग कोणाची तरी विकेट पडेच तोवर...की खिदळायला सुरवात...:D

  ReplyDelete
 15. तन्वी अग दोन दिवसांनी आजीचा राग जरा ओसरल्यावर ती पुन्हा आमचे अतिलाड करू लागली तशी तिला भली मोठी शिक्षा ठोठावली गेली....कसली सांग.... रोज रात्री सगळ्या नातवंडाना दोन गोष्टी सांगायच्याच आणि त्यांची लांबी भली मोठी असली पाहिजे.:) आजीने एकही दिवस नेम चुकवला नाही. चुकून आम्ही झोपून गेलो तर उठवून ऐकवायची.... :D पण नेम म्हणजे नेम.

  ReplyDelete
 16. आनंद हो ना. मल्टिटास्कींग खरेच, फक्त थोडी गडबड. एकही काम लक्ष देऊन होईना.:) प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

  ReplyDelete
 17. अगदी मनातली पोस्ट आहे ही!!! अहो, आमच मन तर विचारूच नका कधीच एका जागी नसत निव्वळ भटकंती चालू असते!!!कधी कुठे भटकेन हे सांगता येत नाही!!

  ReplyDelete
 18. मनमौजी बरेच दिवसांनी दिसलात.....:) आभार.

  ReplyDelete
 19. Suman आपले स्वागत व आभार.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !