जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, November 29, 2009

गोळ्यांची कढी

जिन्नस

 • एक वाटी डाळीचे पीठ
 • दोन चमचे तांदुळाचे पीठ
 • दोन चमचे तिखट, दोन चमचे धने-जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला
 • एक वाटी घट्ट गोड दही
 • दोन-तीन तमालपत्रे, दोन लवंगा, चार मिरे, छोटा तुकडा दालचिनी, दोन लाल सुक्या मिरच्या
 • आल्याचा छोटा तुकडा व दोन लसूण पाकळ्या ठेचून, मूठभर कोथिंबीर चिरून
 • दोन चमचे तेल व दोन चमचे तूप
 • जिरे, हिंग, हळद, मीठ

मार्गदर्शन

डाळीच्या( बेसन ) व तांदुळाच्या पिठात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हिंग, धने-जिरे पूड, चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला व दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालून जरूरीपुरते पाणी घालून घट्ट भिजवावे. पसरट भांडे घेऊन त्याला किंचित तेलाचे बोट लावून घट्ट भिजवलेल्या गोळ्याचे रोल करून घेऊन वाफवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. किंवा छोट्या गोटीएवढे गोळे करून घेऊन वाफवावेत. एकीकडे घट्ट दह्याला अर्धा चमचा डाळीचे पीठ लावून घुसळून ठेवावे.

एका पातेल्यात तूप घालून त्यावर जिरे, लवंगा, मिरे, दालचिनी, तमालपत्र व ठेचलेले आले-लसूण घालून मिनिटभर परतावे. नंतर त्यावर हिंग, हळद व सुक्या लाल मिरच्या घालून परतून घ्यावे. त्यावर घुसळलेले दही, चवीनुसार मीठ व आवडेल इतके पाणी घालून ढवळून वाफवलेले गोळे घालून झाकण ठेवून एक सणसणीत उकळी आणावी. गरम गरम वाढावे.

टीपा
ही कढी खूप पातळ करू नये. तसेच हळद गोळ्यांमध्येही घातलेली असल्याने फोडणीत जरा कमीच घालावी. दही आंबट असल्यास आवश्यकतेनुसार साखर घालावी. कढी आंबट असू नये. तितकीशी छान लागत नाही.

6 comments:

 1. काय गंमत आहे ... कालच खाल्ले हे मी इकडे बोटीवर... इंडियन कुक आहे इकडे... त्यामूळे किमान महिनाभर निषेध कांसल .. ;)

  ReplyDelete
 2. रोहन, जरा घाबरतच टाकली पोस्ट. हेहे...
  अरे वा!हे ब्येसच झाले रे...

  ReplyDelete
 3. अग! माझे सखे कस ग, मनातले लिहितेस. पोस्ट रात्री वाचते आता सकाळ पर्यंत थांबायलाच हवे.

  ReplyDelete
 4. aai harabharyaachee daal bhijavoon, vaatoon tyaachyaa golyaamchi ashi kadhi karate. mast laagate. navarobaalaa aavadat naahi vishesh, tyaamule mi phakt aai kade adhoon madhoon khaate -svatah karat naahi :)

  ReplyDelete
 5. गौरी नवरोबाला दोनतीन वेळा खिलवं कदाचित जाईलही आवडून. अर्थात आईच्या हातची सर कुठली यायला....:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !