जाता जाता एक नजर इथेही........

Friday, September 18, 2009

रव्याची खीर.


रव्याची खीर अतिशय सोपी व चटकन होणारी आहे. कधी कधी अचानक पाहुणे आले किंवा गोड खाण्याची हुक्की आली पण मोठ्ठा घाट घालायचा नसल्यास सहज करता येते. राजस गुणांची असून खाल्ल्यावर छान वाटते ( सूदिंग ), पोट अजिबात जड होत नाही.

जिन्नस

  • दोन टेस्पून रवा
  • तीन कप दूध
  • अर्धा कप पाणी
  • अर्धा कप साखर( जास्त गोड हवी असेल तर प्रमाण आवडीनुसार वाढवावे )
  • अर्धा चमचा तूप, आठ-दहा काड्या केशर, दोन चिमूट वेलदोडा पूड
  • दहा-बारा बदामाचे काप, दहा-बारा काजू ( ऐच्छिक )

मार्गदर्शन

जाड बुडाच्या पातेल्यात तूप व रवा घालून मध्यम आचेवर पाच मिनिटे भाजावे. रव्याचा रंग शक्यतो बदलू देऊ नये. रवा भाजला गेल्याचा वास सुटला की त्यात पाणी गरम करून घालावे. सगळ्या गुठळ्या मोडून त्यात साखर घालावी. साखर विरघळली की दूधही गरम करून घालावे. मिश्रण व्यवस्थित ढवळून त्यात वेलदोडा पूड, केशराच्या काड्या, बदाम व काजू घालून दहा मिनिटे चांगले शिजू द्यावे. मधून मधून ढवळावे. ( खाली लागू देऊ नये.) गरम गार जशी आवडत असेल तशी बदाम कापाने सजवून वाढावी.

टीपा

दूध पटकन लागू शकते म्हणून सतत ढवळावे. चुकून लागल्यास अजिबात न ढवळता( खरवडता ) वरची खीर दुसऱ्या पातेल्यात ओतून घेऊन शिजवावी म्हणजे जळका वास लागणार नाही.

5 comments:

  1. Aga he ase perfect badaam kapales tari kase? Kamaal aahe!! Badamache sundar kaap kase karavet yachihee kruti takayala havis majhyasarakhyansathee. ;)

    ReplyDelete
  2. Chan ahe recipe..Photo farch avadla!

    ReplyDelete
  3. प्रभावित, अग मी कुठले कापतेय..:) हे मशिन प्रेस्ड आहेत ग.मात्र मी योग्य त्या आकाराचे शोधून शोधून काढून अरेंज केलेत. बदाम भिजवून आपण काप करू शकतो पण ते इतके कोरडे व पातळ होत नाहीत मध्ये मध्ये तुटतात.:( आभार.

    पर्ल स्वागत व आभार.:)

    ReplyDelete
  4. खुपच छान ! मला खुप आवडते रव्याची खीर. त्यात आपण ओलं नारळ पण टाकु शकताो ना?

    ReplyDelete
  5. संगीता ब्लॊगवर स्वागत! हो हो. नारळ टाकता येईल. बरेचदा रव्याच्या खीरीत वेगळे काहीही टाकले तर खातांना ते मधेमधे आल्यासारखे वाटते. खीरीचा एक सुदिंग इफेक्ट थोडासा कमी होतो. परंतु ज्याला आवडत असेल त्याने नक्कीच थोडासा ओला नारळ घालायला हरकत नाही.

    आवर्जून टिपणी दिलीत, धन्यवाद!! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !