जाता जाता एक नजर इथेही........

Monday, August 24, 2009

कणसाचे वडे




जिन्नस

* पाच/सहा कणसे.
* उकडलेले तीन मध्यम बटाटे.
* सहा पावाचे तुकडे.
* तळण्याकरिता तेल.
* पाच/सहा लसणाच्या पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या,
* पेरभर आले, मूठभर चिरलेली कोथिंबीर,
* एक चमचा जिरे, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ.

मार्गदर्शन

कणसे किसून घ्यावीत. इथे मिळणारी कणसे खूप गोड व रसाळ असल्याने किसताना बराच रस निघतो. जास्ती वाटल्यास कणसाचा कीस थोडा पिळून घ्यावा. त्यात उकडलेले बटाटेही किसून टाकावेत. पावाचे तुकडे कोरडेच मिक्सरमध्ये टाकून बारीक भुगा करून टाकावेत. लसूण, मिरची, आले व जिरे वाटून घालावेत. चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट व मीठ घालून सगळे मिश्रण एकजीव करावे. मिश्रण खूप सैल वाटत असल्यास त्यात अजून दोन/तीन पावाचे तुकडे मिक्सरमधून काढून घेऊन टाकावेत. कढईत तळण्याकरिता पुरेसे तेल घेऊन तापत ठेवावे. चांगले गरम झाले की आच मध्यम करून प्लॅस्टिक पेपरला किंचित पाण्याचा हात लावून वडे थापावेत किंवा हातावरच गोल आकार देऊन तळावेत. सोनेरी रंगाचे झाले की लागलीच टिशू पेपरवर टाकून अतिरिक्त तेल काढून टाकावे. गरम असतानाच सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर वाढावेत. सोबत ताज्या स्ट्रॉबेरीजचा थंड मिल्कशेक असल्यास अगदी महाबळेश्वरच्या खयालोमें कधी गेलात कळणारही नाही.

टीपा

आच अजिबात वाढवू नये नाहीतर वरून पटकन सोनेरी होतात परंतु आत मात्र ओलेच राहतात. पावाचे तुकडे ( मग ते स्लाइस असो की बेकरीतले पाव असोत ) नेहमी कोरडेच मिक्सरला टाकून चुरा करूनच घालावेत. म्हणजे ते ओले करून पिळून जो लगदा होतो तो होत नाही शिवाय हा चुरा मिश्रणात नीट एकत्र होतो, तिखट-मीठ व्यवस्थित लागते.

4 comments:

  1. भानस,
    छान रेसिपी..मी व्हेज वडे करुन पाहिले होते तेव्हा ब्रेडच्या तुकड्यांमुळे बरेच तेल ओढले गेले.चुरा करायचे लक्षातच आले नाही. binding इथे साठी कॉर्नफ़्लॉवरची गरज आहे का?

    ReplyDelete
  2. धन्यवाद मीनल. कॊर्नफ्लॊवर मी घातले नव्हते.( गरज वाटली नाही) परंतु गरज वाटल्यास घालायला हरकत नाही.

    ReplyDelete
  3. वॊव..... मस्त दिसतायत, आईला करायला सांगतो आजच :P

    महाबळेश्वरला कॊर्न-पॆटिस मिळतात, एकदम अल्टिमेट असतात.... तुम्हि दिलेला फ़ोटो बघुन मला एकदम कॊर्न-पॆटिसचीच आठवण झाली...अर्थात, कणसाचे वडे पण तेव्हढेच अल्टिमेट असतील..... :)

    ReplyDelete
  4. प्रसन्ना,आमच्याकडे सध्या महाबळेश्वर सारखेच वातावरण आहे. म्हणून तर कॊर्न पॆटिस व मिल्क शेकची सारखी आठवण येत होती, मग केले.:)
    आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !