जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, March 28, 2009

कॅच मी इफ यू कॅन...

गेली दोन वर्षे आम्ही डिसेंबर महिन्यातील शेवटच्या पंधरवड्यात आठ ते दहा दिवस फ्लोरिडा आणि तिथून क्रूज घेऊन उबदार वातावरणाचा आनंद गोळा करायला जात आहोत. डिसेंबर महिन्यात जाण्याची दोन कारणे. एक म्हणजे ह्या मिशिनगच्या अतिथंड, साचलेल्या बर्फाच्या ढिगांपासून काही काळ सुटका आणि दुसरे पोराची सुट्टी. गेल्या वर्षीची क्रूजची मजा आठवून आणि चार दिवस कमी पडले म्हणून ह्यावेळी सात दिवसांच्या सफरीवर जाण्याचे एकमताने ठरले. प्रत्येक दिवस एका आयलंड ची सफर हवी असे माझे मत होते. आता एवढे पैसे खर्च करायचे तर किमान बरेच काही बघायला हवेच. नवरा आणि मुलगा ह्याच्या एकदम विरुद्ध. मुलाचे म्हणणे म्हणजे सगळे दिवस लवकर उठायचे. दिवसभर खूप वणवण करायची कारण परत कुठे येणार आहोत इथे. म्हणजे मजा राहिली बाजूला सात दिवसांची सजा होणार. मी नाही येणार. नवऱ्यानेही री ओढली. मलाही मनातून त्यांचे म्हणणे पटलेले होतेच. मग मीही ताणून धरले नाही.

बरेच पर्याय पाहिल्यावर, सात दिवसांची ' कॅरेबियन आयलंडस ' ची क्रूज आम्ही बुक केली. शनिवारी सुरू होऊन पुढच्या शनिवारी संपणार होती. पहिले दोन दिवस बोटीवरच धमाल, आराम, शोज आणि मस्त खाणे-पिणे, मधले तीन दिवस तीन आयलंडस, शेवटचे दोन दिवस पुन्हा धमाल, आराम. नवरा-मुलगा खूश होते. आता आम्ही सगळे आतुरतेने ट्रीपच्या दिवसाची वाट पाहू लागलो.

मुलगा त्याच्या कॉलेजच्या गावाहून निघायच्या आदल्या दिवशी घरी येऊन पोचणार होता. दुसऱ्या दिवशीची पहाटे सहाची फ्लाईट आम्ही घेतली होती. क्रूज दुपारी चारला सुटणार होती. डेट्रॉईट ते फ्लोरिडा सारा तीन तासांचा प्रवास. गेल्या वेळेचा अनुभव गाठीशी असल्याने सगळे नीट होणार अशी खात्री आम्ही बाळगून होतो. बुधवारी रात्री पासून बर्फ पडायला सुरवात झाली. पाहता पाहता वादळ सुरू झाले. गुरवारी सकाळ पर्यंत दोन फुटापेक्षा जास्त बर्फ पडला. संपूर्ण दिवसभरातील सगळ्या फ्लाईट रद्द झाल्या. आता वादळ थांबेल मग थांबेल अशी आशा आणि प्रार्थना आम्ही करीत राहिलो. शेवटी त्याचे मन भरले तेव्हाच ते थांबले. दुसऱ्या दिवशी आश्चर्य म्हणजे मुलाची फ्लाईट वेळेवर निघाली आणि वेळेवर डेट्रॉईट ला पोचली. आम्हाला थोडा हुरूप आला. चला आज बर्फाचे भविष्यही नव्हते म्हणजे उद्या आमचे विमान नक्की वेळेवर निघणार. सगळी तयारी झाली. मध्यरात्री अडिचला आम्ही घर सोडले.

घरापासून विमानतळ, तासाचे अंतर. बर्फामुळे गाडी खूपच सांभाळून आणि हळू चालवावी लागते म्हणून आम्ही लवकरच निघालो होतो. दहा मिनिटांत बर्फ पडू लागला. पाहता पाहता मोठे मोठे तुकडे पडायला लागले. आम्ही वेळेवर पोचलो, आठ दिवस गाडी पार्किंग लॉट मध्ये ठेवायची होती, ते सोपस्कार पार पाडून शटल घेऊन विमानतळावर पोचलो. चेकिंग झाले, विमान वेळेवर सुटणार होते. आम्ही आता ट्रीपच्या मूडमध्ये येऊ लागलो. बोर्डिंग झाले. आमची ही फ्लाईट आम्हाला अटलांटाला घेऊन जाणार होती. तिथून मायामीची कनेक्टिंग फ्लाईट घेऊन आम्ही साडेअकराला मायामीला पोचणार. अटलांटा व मायामी चे व्हेदर् एकदम छान होते. त्यामुळे एकदा का डेट्रॉईट मधून आम्ही वेळेवर निघालो की जिंकलो.

विमान हळूहळू निघाले. रनवेवर लागण्या आधी इतक्या प्रचंड बर्फवृष्टीत प्रत्येक विमानाचे उड्डाण होण्या आधी डिआईसींग( पंखावरील, गतिरोधक झडपांवरील व रडारवरील बर्फ पूर्णपणे काढून टाकणे ) करणे अत्यंत गरजेचे व अपरिहार्य असते. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता असते. विमान हळूहळू निघाले आणि डीआईसींगच्या लाइन मध्ये जाऊन थांबले. सहा वाजले होते. साधारण वीस मिनिटे लागतात हा सोपस्कार पूर्ण होण्यासाठी. म्हणजे अगदी साडेसहाला जरी आम्ही उड्डाण केले तरी आठपर्यंत अटलांटा. पुढची फ्लाईट आठपंचेचाळीसची होती. आदल्या दिवशी त्यांनी ती वीस मिनिटे उशीरा सोडली होती कारण डेट्रॉईट ची फ्लाईट लेट होती. म्हणजे सगळे काही अजूनही आव्याकयात होते.

सहाचाळीस झाले अजूनही आमच्या प्लाईटचे डिआईसींग सुरूही झाले नव्हते. मुलाने विचारले, " आई आपली पुढची फ्लाईट कितीची आहे? " मी आठ-पंचेचाळीस असे सांगितल्यावर एकदा बाहेर पाहिले एकदा घड्याळ आणि तो गाढ झोपला. पोराने एकदम प्रॅक्टिकल ऍप्रोच घेतलेला. नवऱ्याचे ब्लडप्रेशर वाढलेलेच होते. त्यात आता काहीही झाले तरी क्रूज गाठायचीच हे त्याने ठरविलेले. म्हणजे आता कितीचा फटका बसणार हा विचार करण्यात मी दंग झाले. शेवटी एकदाचे सात वाजून दहा मिनिटांनी विमान निघाले.

अटलांटाला पोचलो तोवर कनेक्टिंग फ्लाईट जी काल त्यांनी थांबविली होती ती आज वेळेवर गेलेली होती. आम्ही पळत मदत कक्षात गेलो. सुदैवाने तिथली बाई अतिशय चांगली होती. हसून तिने स्वागत केले, सगळे कथन ऐकून तिने आम्हाला धीर दिला. तुमची वेकेशन नक्की होणार आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे, ही खात्री बाळगा. मी पाहते लवकरात लवकर तुम्ही मायामीला कसे पोचाल. शोधाशोध करून साडेअकराच्या फोर्ट लॉउडरडेलच्या फ्लाईटचे तिकिट दिले आणि शुभेच्छाही दिल्या. आम्ही आता थोडेसे शांत झालो. दोन तास होते म्हणून थोडे अटलांटा एअरपोर्टवर भटकलो. मनात थोडी धाकधूक होतीच.

साडेअकराचे विमान होते म्हणून अकराच्या आसपास गेटवर आलो. पाहिले तर दहा मिनिटांचा डिले दाखवत होते. अकरावीस झाले पण आमचे विमान अजूनही लागले नव्हते. हळूहळू आमचा धीर सुटायला सुरवात झाली. आता पंचवीस मिनिटांचा डिले दिसत होता. आणि आमचे विमान लागले, हुश्श..... बोर्डिंग झाले. इथे डिआईसींग करायचे नसल्याने विमान रनवेला लागले आणि उडालेही. आमचा टांगलेला जीव जरा विसावला. पावणेदोनला आम्ही फोर्ट लॉउडरडेल ला पोहोचलो. एकच बॅग चेकईन केली होती तिही पटकन आली. तिथून पोर्टला जायचे होते जिथे क्रूज आमची वाट पाहत होती. विमानतळावरून बाहेर येऊन टॅक्सीची चौकशी केली असता कळले की पोर्टवर जायला साधारण चाळीस मिनिटे लागतात. पण नेहमीच ट्रॅफिक असतो, तेव्हा आज किती वेळ लागेल कोण जाणे. हंम्म्म्म...... म्हणजे अजूनही नकटी काही संपली नव्हती. आता घास अगदी तोंडाशी आला होता.

टॅक्सी निघाली। चला इथवर पोचलोय म्हणजे आपल्याला नक्की क्रूज मिळणार असे आम्ही एकमेकांना सांगत होतो त्याचवेळी मनात मात्र साशंकता भरून राहिली होती। आश्चर्य म्हणजे नेहमीच असणारा ट्रॅफिक आज नव्हता. अखेरीस त्याला तरी आमची दया आली होती. तीन वाजता आम्ही क्रूज च्या दरवाज्यात पोचलो. सामान उतरवले, टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन, आभार मानून क्रूजवर बोर्ड करण्यासाठी आवश्यक सोपस्कारांच्या लाइन मध्ये जाऊन उभे
राहिलो. पुढचे सगळे पटापट झाले आणि आम्ही आमच्या केबीन मध्ये बॅग्ज टाकल्या. अडथळ्यांची शर्यत पार करून एकदाचे आम्ही कार्निवलच्या सर्वोच्च डेकवर समुद्राचा खारा वारा खात फुललेल्या चेहऱ्यांनी उभे एकमेकांना टाळ्या देत होतो. आता कोणीही आमचा आनंद हिरावून घेणार नव्हते.

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !