जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, August 4, 2009

आधीच फार उशीर झालाय


माझ्या चांगल्या मित्राची आई व माझी एकदम गट्टी होती/आहे. मित्र व त्याची बायको.... तीही जवळची. आमचे सूर नेहमीच जुळलेले, जवळचे. संवाद हलकेफुलके, दररोजचे असोत नाहीतर गहन, गंभीर असोत... त्यात जीव आहे का उगाच वरवरचे आहेत ते काही क्षणातच कळते. अनेकवेळा दर दोन वाक्यात रस्ता बंद ची पाटी दिसू लागते. मग पुढे काही काळ शांतता अन , " मग, बाकी काय म्हणतेस? किंवा अजून काय? " असे ऐकू येऊ लागले की समजावे निघायची वेळ झाली आहे. नंतर ओढून ताणून कितीही प्रयत्न केला तरी संवाद घडणार नसतोच. काही वेळा अगदी जवळच्या आपल्या माणसांबरोबरही असेच तुटलेले, हरवलेले बोल त्यांचा आवाज शोधताना दिसतात.

मित्राची आई..... अगत्यशील, हसरी..... विनोद जाणणारी/करणारी, घराला सदैव जोडण्याच्या प्रयत्नात असणारी सगळ्यांच्या आईसारखीच एक. माझ्या लेकावर त्या सगळ्या घराचा फार जीव होता. येणेजाणेही खूप होते. अनेकदा वाटे आपल्या घरांना जोडणारा पूल टाकायला हवा. म्हणजे मग मोठ्ठा फेरा वाचेल. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून येताना आई खाली दिसल्या. मला पाहून हात केला. मी थांबले. जवळ जाताच म्हणाल्या, " चल गं, जरा घरी जाऊयात. " खरे तर मी अतिशय दमले होते. एकतर ऑफिसमध्ये परीक्षा सुरू होत्या, दिवसभर उसंत नव्हती. येताना संपूर्ण उभे राहून यावे लागलेले. हातात भाजीची जड पिशवी अन घरी वाट पाहत असलेला स्वयंपाक. तोच खेळत असलेला लेक हाताला येऊन लटकला. ममा ममा म्हणत ओढू लागला.

त्याला जवळ घेऊन, " थोडासा वेळ खेळतोस का? आजीला ना माझ्याशी बोलायचेय. मी आजीशी बोलून आलेच, चालेल का? पटकन येते." अशी समजूत काढून पुन्हा खेळायला पाठविले. हा सगळा वेळ आईंनी माझा हात धरून ठेवला होता. तो गेला तसे आम्ही दोघी त्यांच्या घरी आलो. आई पाणी घेऊन आल्या. इतकी तहान लागली होती की घटाघट दोन ग्लास पाणी प्यायले. " बस गं. मला माहीत आहे तू दमली आहेस. पण कधीपासून तुझी वाट पाहत होते. तुझ्या मित्राला काय झालेय गं आजकाल? " पाहता पाहता आईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. हात थरथरत होते. काळजाला जिव्हारी जखम झाल्यासारख्या त्या आतल्या आत तडफडत होत्या. मला काहीच उमजेना. सांत्वन तरी कसे करावे?

शेवटी मी नुसताच हात हातात घेऊन बसून राहिले. पाच-सात मिनिटांनी त्या थोड्या शांत झाल्या. " आई, काय लागलेय एवढे मनाला? मित्र काही बोलला का? भांडण झाले का? का माझी मैत्रीण काही म्हणाली? सांगा मला. मी काय करू शकेन माहीत नाही पण निदान तुम्हाला थोडे बरे वाटेल. ( मला व्यक्तिशः हे असे दुसऱ्याला सांगून हलके वाटते हे पटत नाही. ) " आई सांगू लागल्या, " श्री, अगं गेल्या आठवड्यात डॉक्टरकडे जायचे म्हणून मी आणि लेक निघालो. लिफ्ट आली. जाळीचा दरवाजा उघडून आत जाताना लेकाला माझा स्पर्श झाला. अन तो जो भडकला. जोरात दार आपटून बंद केले आणि चष्मा फेकून दिला. खाली पोचेपर्यंत संताप संताप करून घेतला. पोचलो तेव्हा मीच उचलून चष्मा दिला त्याच्या हातात तर याने उंदराची शेपटी धरावी तसा धरला. शेवटपर्यंत घातला नाहीच.

हा चाळिशीला आलेला माझा लेक, चांगला तीस वर्षांचा होईतो आई आई करणारा. सतत बोलणारा, हसणारा, अवतींभोवती घोटाळणारा अन असे काय झाले गं आता की माझा ओझरता स्पर्शही त्याला चालत नाही. बरेच दिवस/वर्षे असेच काहीतरी चाललेच आहे. एकदा विचार गं, काय आहे त्याच्या मनात? इतकी आई नकोशी का झाली आहे. दोन शब्द सरळ बोलत नाही की आई तू कशी आहेस हेही विचारत नाही. डॉक्टरकडेही बरोबर आला कारण तो त्याचा मित्र आहे, मग आईला का एकटे धाडलेस.... ओरडेल ना म्हणून आला. नेहमी तिरसटून बोलतो. का, असा काय गुन्हा मी केलाय ते तरी कळू दे ना मला? "

माझ्याकडे यावर ना सांत्वनाचे काही शब्द होते ना धीराचे. मी कुठलेही आश्वासनही देऊ शकत नव्हते. मित्र कितीही जवळचा असला तरी मी त्याला हा प्रश्न विचारू शकेन का आणि समजा विचारलाच तर तो उत्तर देईलच ही शक्यताही कमीच होती. शिवाय मैत्री तुटण्याची व पर्यायाने माझ्या मैत्रिणीला व आईंनाही दुरावण्याची शक्यताच जास्त होती. थोडक्यात सगळ्यांचीच घुसमट झाली असती. पण म्हणून मी आईंच्या वेदनेकडे दुर्लक्षही करू शकत नव्हते. त्यांच्या हातावर जरासे थोपटत मी निरोप घेतला.

खाली उतरून आले अन लेक गेटमध्ये उभाच होता. धावत येऊन त्याने कमरेला घट्ट मिठी मारली, " ममा किती वेळ केलास गं? मी कधीचा तुझी वाट पाहतो आहे. चल, चल लवकर घरी. " असे म्हणत तो मला ओढू लागला. माझ्याशिवाय त्याला काहीच दिसत नव्हते. आई आणि आई, बस. मी हातातली पिशवी खाली ठेवून त्याला घट्ट जवळ ओढून घेतले. तोही मला अजूनच बिलगला. त्याचा तो स्पर्श माझ्यात साठवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न मी केला. माझे मन हळवे झाले होते. भविष्यात काय असेल या आशंकेने भ्यायले होते.

माझा हा मित्र..... सुसंस्कारित, शिकलेला, मितभाषी, सगळ्यांशी प्रेमाने-सलोख्याने वागणारा... पण आई मात्र काही वेगळेच सांगत होत्या. त्या कशाला खोटे सांगतील. अन तेही माझ्यापाशी .... जर मी मित्राला विचारले आणि खोटे असेल तर..... नाही नाही खोटे नक्कीच नाही. मग हा असे का वागतोय? अनेकदा विचारायचा प्रयत्न केला पण प्रश्न ओठांवर येऊन थबकतो. नुकतेच मला कळले की त्याचे बाबा गेले. बाबा तर गेलेत आता आई एकट्याच........ गेल्या दहा वर्षात आईंकडे येणेजाणे असले तरी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मला देता आलेले नाही. दरवेळी त्या अजूनच थकलेल्या, खचलेल्या दिसतात. पुढच्या मायदेशाच्या भेटीत मात्र त्याला विचारावे असे ठरवतेय. फार तर काय, तुझा काय संबंध असे म्हणेल, हरकत नाही. पण या मायलेकातला पूल जोडण्याचा प्रयत्न करायलाच हवा. तोही लवकरात लवकर. आधीच फार फार उशीर झालाय.

( मित्राचे खरे नाव द्यायचे नव्हतेच परंतु उगाच दुसरे/खोटे नाव द्यावे असे न वाटल्याने देण्याचे मुद्दामहून टाळले आहे. )

8 comments:

  1. काय योगायोग आहे..आत्ताच काही दिवसांपुर्वी मी व माझी एक मैत्रीण आमचा निराळ्या अर्थाने असाच संवाद झाला. म्हणजे माझा लेक आताच वर्षाचा होतोय म्हणून तो कुठुनतरी आपल्याकडे हात मोठे करुन मस्त जवळ येतो आणि तिचा आता चारेक वर्षांचा म्हणजे I am not a baby anymore म्हणणारा. ती माझ्याकडे येणार्या माझ्या लेकाकडे पाहुन म्हणत होती अगं नंतर हे जवळ येत नाहीत वगैरे अर्थात इथे थोडं वेगळं प्रकरण आहे. आई-मुलात असेही गैरसमज होऊ शकतात म्हणजे थोडं विचित्र वाटतं नाही???

    ReplyDelete
  2. हो ना गं, मला दोघेही सारखेच जवळचे आसल्याने मला फार त्रास होतोय.आई-मुलांमध्ये असेही घडू शकते हे पटतच नाही.
    आभार.

    ReplyDelete
  3. Bhanas, kay ga arth hyacha, mhanje tuzya navacha ? ki manas chya chalee war aahe he ?
    Ag Baba gele na tyache tar to aaee lach doshee samajat asel pratyaksat tas kahee hee nasoon mhanoon ha durawa kenva tari tyalach tyachee chook samjel an aaee chi kshama suddha magel.

    ReplyDelete
  4. आशाताई, आभार. भानस-भाग्यश्री नचिकेत सरदेसाई.:)
    मित्राचे बाबा नुकतेच म्हणजे अगदी महिन्याभरापूर्वी गेलेत हो. काय त्याच्या मनात सलतेय कोण जाणे.

    ReplyDelete
  5. त्या तुझ्या मित्राची गोष्ट वाचून मला असं वाटलं की, आई - मुलामध्ये कांही गैरसमज किंवा समस्या नसेलही.
    पण तरीही मुलगा आईशी तसा वागला. याचं कारण, त्या क्षणी त्याच्या मनोविकाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल.
    तो कदाचित एखाद्या निराळ्याच समस्येला कुरवाळीत बसला असेल आणि त्या नेमक्या क्षणी त्याला अगदी लहानसाही व्यत्यय नकोसा झाला असेल.

    माणसाचं मन कधी कधी टाईमबॉम्ब होत.

    अरुण दादा

    ReplyDelete
  6. अरुण दादा,तसे असेल तर फारच उत्तम रे. परंतु आईंच्या म्हणण्यानुसार बरीच वर्षे असेच सुरू आहे. तू म्हणतोस तेच खरे आहे, माणसाचे मन कधी कधी टाईमबॊंम्ब होते. कसे आणि किती चमत्कारीक रिऎक्ट करेल हे सांगताच येत नाही.
    आभार.

    ReplyDelete
  7. aaeechaa sparsha koNatyahi vayat nakosaa waatU shakato? aaNi kaa? yaachaa vichara karatye :(

    tujhaa blog khup mast aahe. savada milela tas tas wachatye ek ek.

    ReplyDelete
  8. श्यामली स्वागत व आभार.
    अनाकलनीय म्हणणार नाही परंतु अवघड आहे ’मन’.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !