जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, August 26, 2009

लागण...
अहो नाही मी स्वाईन फ्लू किंवा इतर संसर्गजन्य रोगांविषयी नाही म्हणत आहे. हे तर शरिरी रोग आहेत. याच धरतीवर मनाचेही व्यवहार चालतात ना? हां तेच तेच हसणे, रडणे, कोमेजणे, स्थितप्रज्ञ होण्याचा आव आणणे, जाऊ दे बाई-मोठी लांबण लागेल. अगदी ताजेच उदाहरण घ्या.......गणपती आलेत. सगळ्या वातावरणालाही उल्हास, आनंद, भारलेपणाची लागण झाली आहे. स्वाईन फ्लूने बाप्पा येण्याआधी मानसिक दडपण सगळ्यांनाच आले होते व अजूनही ते आहेच. साहजिकच आहे, जिवाशीच गाठ म्हटल्यावर. पण जसजसा बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा उत्साह जोर धरू लागला.

सजावटीचे दररोज वेगवेगळे बेत, नवीन नवीन कल्पना, मग बाजारात घेतलेली धाव. इको फ्रेंडली करूयात का? का मागच्या वर्षीच्या डेकोचेच शक्कल लढवून एकदम वेगळेच काही बनवावे, एक ना दोन शेवटी आई ओरडते. अरे काय ते एकदा ठरवा आणि लागा कामाला. तिलाही लागण झालेली असतेच. भराभर हात चालतो, रवा-नारळाचे लाडू, चिवडा, खिरापत, मोदकाचे सारण, दररोज जिकडे तिकडे गोडगोड खाऊन सगळे कंटाळतील म्हणून मग मधूनमधून काहीतरी तिखटमाखट बेत- झणझणीत पावभाजी/ वडा सांबार/मिसळ व दहीभात, अहाहा..ss.. मातोश्री झिंदाबाद. हा सगळा बाप्पाच्या आगमनाचा परिणाम.

एकीकडे ही खाण्याची तयारी तर दुसरीकडे गौराई येणार, तिच्या साड्या, दागिने, फुले-गजरे. कपाटात ठेवलेली सासूबाईंची गर्भरेशमी अंजिरी रंगावर सोनेरी बुट्ट्यांची नऊवारी साडी आई नेसते, अंबाडा, नथ, हिरव्या बांगड्या..... आईही दुसरी गौरच दिसत असते. एरवी उगाच खडूसपणा करणारी आजीही हळूच म्हणते नातीला, " अगं आज दृष्ट काढ बाई तुझ्या आईची ". बाबा आईकडे कौतुकाने पाहत ' आहे बुवा ' असे खुणावतात तसे आई समाधानाने हसते. पाहा किती जणांना एकाचवेळी या आनंदाच्या संसर्गाने खूश करून टाकले.

सगळ्यात संसर्गजन्य बहुतेक हसणेच असावे. अगदी तान्हे बाळही तुम्ही त्याच्याकडे पाहून हसलात की तुमच्याकडे पाहून हळूच गाल वाकडा करते. पुन्हा पुन्हा हसलात की मोठ्ठे बोळके पसरून हसते. त्याच्या त्या निरागस आनंदाने तुम्हाला अजूनच हसू येते. हा संसर्ग अतिशय सुखावणारा. सोसायटीत खेळणारी सात आठ वर्षांची मुले- गृपगृपने खेळत असताना मध्येच खुसुखुसू हसताना दिसतात. एखाद्या नित्यनेमाने कावणाऱ्या आजीने ओरडायला सुरवात केली की जिन्यात लपून किंवा गाडीच्या पाठीमागे दडून आजीचा कानोसा घेत दाबलेले हसू किंवा कोणाचे बाबा हाकारत असतील आणि ते पोर घरी जायचे नाही म्हणून लपून बसले असेल की यांना जाम मजा येते. हसायचे नसतेही आणि ते दाबताही येत नाही.

' आम्हाला सगळ्या जगाची अक्कल आली आहे ' या वयाचे एक वेगळेच जग आहे. एखाद्याला टार्गेट करून त्याची यथेच्छ टिंगल करत हसायचे आणि तेही उघडपणे. ही मुले-मुली सतत हसतच असतात. अकारण-सकारण, अगदी क्षुल्लक निमित्तही त्यांना पुरते आणि मग तोच धागा पकडून ते स्वर्गापर्यंत जाऊन पोचतात. सेलवर बोलतात तेव्हाही बोलणे कमी आणि हसणेच जास्ती. फार हेवा वाटतो मला या मुलांचा. यांना पाहिले की नकळत चेहऱ्यावर हसू उमलतेच.

सकाळी सकाळी प्रसन्नपणे कोणी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, आवारात पडलेल्या प्राजक्ताच्या सड्यातली चार फुले आवर्जून तुमच्या हातात ठेवली की तो ताजेपणा हृदयापर्यंत पोहोचतो. मग तुमच्याही नकळत तुम्ही तो इतरांनाही वाटता. किंबहुना तुम्हाला आतून वाटणारा, जाणवणारा आनंद चेहऱ्यावर झळकत असतो तो अनोळख्यालाही त्या आनंदाचा यात्री करून घेतो. ही शृंखला तिच्या संसर्गात जोवर दम आहे तोवर अशीच वाढत राहते.

मैत्रिणींचा गोतावळा जमला की मग हा संसर्ग फोफावतो. अग त्यादिवशी ना..... आणी जी सुरवात होते खीखी करत हसायला. इथेही कारणांमध्ये प्रत्येक वेळी दम असेलच असे नाही परंतु मनामध्ये आनंद-सळसळता उत्साह- धमाल करायची असते. या गटाला वयाचे बंधन नाही. इथे अगदी सत्तरीच्या पुढच्या आज्याही एकत्र जमल्या की पदर तोंडावर धरून त्यांच्या तरुणपणातले काहीतरी आठवून किंवा नातू व नातसुनेची कशी नेत्रपल्लवी चालते हे सांगत खुदखुदून हसताना दिसतील. आणि मधली पिढी तर ना घर का ना घाट का अशी असूनही कधीमधी थोडा चावटपणा, तर कधी कॉलेजमधल्या स्टोरीजमध्ये रमून खिदळताना दिसतील.

हसण्याचा संसर्ग हा आपलाच आपल्यालाही होऊ शकतो. भुवया वर कशाला करताय, मी अगदी खरे तेच सांगतेय. तुम्हीही अनेकदा घेतला असेल हा अनुभव. ऑफिसला जायला निघालात, धावतपळत नेहमीची बस/ट्रेन पकडलीत. जरा स्थिरस्थावर झालात आणि कुणावर तरी नजर पडली की.... किंवा अचानक काहीतरी आठवते-फारच गमतीशीर घटना, कुठे काही वाचलेले, ऐकलेले जोक्स आणि मग हळूहळू हसू यायला लागते. आठवण घोळतच राहते मनात, तसे हास्याचे उमाळे येऊ लागतात. शी, लोकं म्हणतील अगदी वेडच दिसतंय प्रकरण. म्हणून दाबण्याचा प्रयत्न पण ते बेटे ऐकेल तर ना...... अगदी आवरेनासेच होते . असे झाले की मनाला द्यायचे सोडून आणि मनसोक्त हसून घ्यायचे. तुमच्या आनंदात लोकही सामील होतील. काय, काय म्हणालात? ते कसे सामील होणार? अहो एकतर म्हणतील खुळीच दिसतेय आणि मग स्वतःही खुळ्यासारखे हसतील नाहीतर त्यांनाही असेच काही पूर्वी घडलेले आठवेल मग त्यांच्या आठवणीच्या राज्यात रमून तेही हा संसर्ग मनमुराद अनुभवतील व ही आनंदाची शृंखला अशीच वाढत राहील.

4 comments:

  1. मस्त.....सकाळी सकाळी फ्रेश पोस्ट वाचून फ्रेशनेस ची लागण झालीये.....

    ReplyDelete
  2. अशीच हसण्याची लागण होते जेव्हा कोणितरी मजेशीर रित्या पडतं. हसु आवरता आवरत नाही. माझा एक मित्र खुर्चीवरुन असाच पडला होता कॉलेज कॅंटिन मधे. खाली डोकं आणि वर पाय अवस्थेत. तेव्हा अशी काही हसण्याची लागण झाली सगळ्यांना की त्या बिचार्‍याला उचलायचं सोडुन सगळे हसत बसले. मस्त झालं आहे पोस्ट.

    ReplyDelete
  3. रोहिणी, आभार. तर काय हे असं कोणी पडलं की हसू आवरतच नाही.:D

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !