जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, March 24, 2009

तुमचीही कोणीतरी वाट पाहत आहे....


आजी गेली तेव्हा मी अमेरिकेत होते. १३ जानेवारी,२००१-भोगीचा दिवस. सकाळी मुलगा आणि नवरा आपापले डबेघेऊन गेले. घरातले आवरत एकीकडे मी मेल पहात होते. सासूबाईंचा मेल होता. दुःखद निधन. मी घाईघाईने मेलपाहिला, " अरे देवा!!" आजी गेली होती. बराच वेळ मला काहीच समजत नव्हते. रडूही येत नव्हते. हे खरे आहेह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आजही बसत नाही. मी आईला फोन लावला. आईने सांगितले की फारसा त्रास होता आजी गेली. तीन-चार तास हॉस्पिटल मध्ये होती. बोलतही होती. अटॅक आला होता. डॉक्टरांनाच सांगतहोती, मला काही कुठे दुखत नाही. लवकर घरी पाठवा. पुन्हा एक अटॅक आला आणि गेली.

आजोबा गेले त्यावेळी मी तशी लहानच होते.त्यांच्या अनंत आठवणी आहेतच. मलाठकीम्हणणारे कोणीराहिलेच नाही. आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारी दोन माणसे, त्यातील एक निखळले ही जाणीव झाली. पणत्यावेळी आजी होती. आजीशी जास्त जवळीक म्हणूनही असेल कदाचित. आता आजीही गेली. आजीच्या आठवणीदाटून आल्या. आम्ही खूप लांब आहोत ह्याची जाणीव सतत त्रास देतेच. माणूस जवळ असला म्हणजे नेहमीचउपयोग होतो असे नसले तरी किमान तो जवळ असतो. आम्हाला तेही शक्य नाही. आजीचे कोणालाही काही करावेलागले नाही तिचे कुठलेच हाल झाले नाहीत. आपले माणूस गेले की दु: सगळ्यांनाच होते,कोणी ते दाखवतेकोणी मनात ठेवते.

वाटले आजी देवाकडे गेल्यावर सैरभैर झाली असेल. तोच तिला आजोबा भेटले असतील. त्यांनी," काय बबे, कशीआहेस गं?" असे विचारत जवळ घेतले असेल. मनाला थोडा आधार वाटला. आजी वर एकटी नाही, तिचे सगळ्यातप्रिय माणूस आहे आता तिच्याजवळ. माणसाचे मन कसे वेडे असते, दु:खातही सुख शोधते. माझा मुलगा लहानअसताना नेहमी विचारीत असे," माणसे का मरतात? मरण टाळणे शक्य आहे का?" तेव्हा मी त्याला सांगे," अरेकोणी देवाघरी गेलेच नाही तर या पृथ्वीवर उभे राहायलाही जागा उरणार नाही." हे सत्य आपल्या माणसाच्यामृत्यूने पचवावे लागले की असह्य असते. आणि मनात येते, का? का?

आठवणींची एकच गर्दी झाली. मला ताप भरला आहे आणि मी तिची आठवण काढते आहे हे कळताच ती लागलीचयेत असे. तांदुळाचे लाडू तेही फक्त तिच्या हातचेच मला अतिशय आवडतात म्हणून कोणीही मुंबईस जायलानिघाले की पेढेगाठी डबा भरून ती धाडून देई. आम्ही तिच्याकडे गेलो किंवा ती आमच्याकडे आली की दररोजरात्रीची गोष्ट कधी चुकली नाही. ती जवळ घेऊन पापे घेई त्यावेळी तिच्या तोंडाला गोडसर वास येत असे. आजहीमला तो जसाच्या तसा येतो. रावळगावला सुटीसाठी आम्ही जात असू, ते दोन महिने कधीच संपू नये असे वाटे. आम्हाला आवडते म्हणून कधी गव्हाचा चीक, तर कधी लसणाची चटणी आणि गरम भाकरी त्यावर मोठालोण्याचा गोळा .कधी पॉटमधले आइसक्रीम, बादलीभरून ऊसाचा रस. कोठीत पडलेली आंब्याची रास. दुपार-रात्रजेवणाची चंगळ.

सकाळी तुळशीला पाणी घालून फेऱ्या घालणारी आजी. संध्याकाळी देवाला दिवा लावून नमस्कार करणारी आजी. आजोबांची घरी येण्याची वेळ झाली की, कधी बैंगणी तर कधी अंजिरी, कधी लाल चौकडा तर कधी गर्द हिरवीनऊवारी साडी नेसून. केसांचा छानसा अंबाडा त्यावर बारीक जाळी, छोटेसे ड्बल मोगऱ्याचे दोन पाने असलेले फूलत्यावर खोवून. पावडर, कुंकू लावून, दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन,उजवा पाय दुमडून ती पार्टिशनच्या मागे उभीराही. हे कधीही चुकल्याचे मला आठवत नाही. चहा झाला की व्हरांड्यात किंवा बागेत बसून गप्पा मारीत असे. कर्तबगार पुरषाची खरी अर्धांगींनी. आजी काहिशी तापटही होतीच. खूप काळ ती काही बोलत नसे पण डोके फिरलेकी मग वाटेल तसे बोले. सगळे जरा दबकूनच असत.

आजोबा गेले आणि आजीची रया गेली. तिची सोनसळी कांती करपल्या सारखी झाली. चारही मुले जवळ होती. पणसगळी आपापल्या व्यापात आणि कुटुंबात गुरफटलेली. सगळे आपलेच असले तरी फक्त आपलेच असणारे माणूसनाही याची तिला मनोमन जाणीव असावी. तिने स्वत:ला सांभाळले. चौऱ्यांशी वर्षांची झाली तरी खुटखुटीत राहिली. स्वतः:चे मन कशात कशात रमवत राहिली. सगळ्या मुलांकडे जाऊन ती राही, तिथून निघताना तिथला स्विचऑफ करी आणि दुसऱ्याकडे जाई. हे कसे तिला साधले होते कोण जाणे. तिच्याही नकळत ती निर्मोही झालीअसावी.

मागे जाऊन एकएक प्रसंग आठवले की कळते, संवाद होणे किती आवश्यक आहे. आमच्याकडे ती जेव्हां येई तेव्हाजसे आमचे उद्योग बदलत होते तसे तिचे प्रश्नही बदलते होते. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्र-मैत्रिणीबद्दलती विचारी, कधी जाते कधी येते ह्या वेळा हिला पाठ. मला वाटे कशाला हिला कळायला हवे हे. माझ्या मूड नुसार मीतिला ह्याची उत्तरे देई. पण स्वत:हून काही सांगत नसे.मी माझ्याच नादात दंग असे. आता वाटते, माझ्याशीबोलण्यासाठी माझ्या आवडीचे कारण ती शोधीत असे. जेणेकरून मी तिच्याशी जास्त वेळ गप्पा करेन. मीऑफिसला जाऊ लागले तशी, माझी कॉन्ट्रॅक्ट बस आज पाच मिनिटे उशीरा आली. किंवा अग, कावळा सारखाकावकाव करीत होता. मी म्हणे, " अग आजी, कावळा कावकाव नाही तर काय चिवचीव करेल." नातीशीबोलण्याची हि सारी निमित्ते होती. आमच्याकडे ती आनंदी असे पण तो आनंद अजून जास्ती वाढवणे माझ्याहातात असूनही त्यासाठी लागणारी क्रिया घडली नाही ह्याचे फार दु: होते. हेतुपुरत्सर दुसऱ्याला आनंद द्यायलाहवा हे कळत नव्हते.

ह्यातून आणिक एक सत्य समोर आले. नवरा-बायको किंवा आजच्या बदलत्या सहजीवनाच्या संकल्पनेनुसारआपला सहचर सदैव बरोबर हवा. ती एकच व्यक्ती अशी आहे की ज्याला नेहमीच आपल्यात स्वारस्य असते. आपण हवेसे असतो. आयुष्यभर आपली डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारे आपले माणूस. दिवसाकाठी अनेकनिर्र्थक गोष्टी आपण बडबडत असतो. त्या गोष्टीही तितक्याच उत्सुकतेने ऐकणारे, त्यावर चर्चा करणारे, कधीमधीओरडणारे. संपूर्ण जगाचा राग ज्याच्यावर काढता येतो, तो तल्लीन होऊन पाहत असलेले दूरदर्शनचे चॅनल खटकनबदलून टाकले तरी तेही तितक्याच तन्मयतेने पाहणारे. रात्री उठून पाणी देणारे...... यादी भलीमोठी होईल, ती पूर्णकरणारे एकमेव माणूस.

आजीची खोली तिच्याशिवाय ओकीबोकी झाली. माणसाचे असणे आणि नसणे यात किती काय सामावलेले आहे. आपण सगळेच जाणता-अजाणता एकमेकांना दुखावत असतो. फक्त स्वत:चाच विचार करतो, आणि त्यासाठीकडवटपणे वागतो. माणूस गेला की जाणवते थोडे गोड बोलणे, आवर्जून विचारपूस करणे, प्रेम दर्शविणे हे सहजभाव किती महत्त्वाचे मनाची खात्री करून देणारे आहेत," आपलेही कोणीतरी आहे. आपणही आपल्या माणसांनाहवेसे आहोत." ही भावना संजीवनी बुटीचे काम करते. आणि ही संजीवनी आपल्या सगळ्यांच्या अंत:करणातठासून भरलेली आहे, देर आहे ती वाटण्याची.

आजी गेली, शेवटचा तंतूही तुटला. आता सगळ्यांना एकत्र बांधणारे कोणीच नाही. ह्या एवढ्या मोठ्या जगातआपली माणसे फारच थोडी आहेत, काही रक्ताची आणि काही आपण मैत्ररूपाने जोडलेली. माझ्यापरीने मी माझीमाणसे जीवापाड जपतेच आहे, तुम्हीही जपत असालच. अपेक्षा विरहित प्रेम, आतून उमटलेले हसू आणि दोन गोडबोल. बस आणिक कशाचीही आवश्यकता नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष(जालावरील संवाद) नक्कीच जमेल. तुमचीहीकोणीतरी वाट पाहत आहे.....ह्याची अनुभूती करून देणारा आनंददायी संवाद!!!

4 comments:

  1. kharech khup mast aathavni aahet...
    dolyat pani yete...
    mazi aajji suddha ashich hoti..mi donahi aajobana pahile nahi,donahi aajjicha sahavas khup milala.
    aathavni tajya kelyas

    ReplyDelete
  2. आता हा लेख वाचून मला माझ्या आजीची भरभरून आठवण येत आहे ... तिला भेटायला मला अजून १०-१२ दिवस आहेत ... :(

    ReplyDelete
  3. धन्यवाद रोहन.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !