दुःखातून लेखनाची निर्मिती होत असते, का?
शब्द, त्यातून उमटणारा सूर, त्याची तीव्रता, उदास भाव हे सारं
फोलपणातूनच वजनदार रूप धारण करतं.
मनाचा एखादा हळवा तंतू, उग्र रूप धारण करीत सगळे मनच काबीज करतो.
सुख, सुखाचा आनंद, समाधान हे सगळे तात्कालिक.
ते कधी सुरू झालं आणि कधी विरलं, सारच दिवास्वप्न.
दुःखाच्या डोहासारखे सुख कधी साठेल का?
स्वतःच्या पाऊलखुणांचे आभास ठेवून जाणार मनावर पसरलेलं धुकं जणू.
सुख गवसल्याचा जीवनांत असा फारच कमी कालखंड सापडेल,
तरीही त्या वितळत्या, तरल जाणीवेत माणूस गुंतलेला...
पण...
तत्परतेने जीवनाचा पण त्याच्या सहस्र करांनी धपाटे ओढतो.
माणूस जन्माला येताना अगणित नाती घेऊन येतो,
रक्ताची नाती.
जीव जसा जगायला लागतो तसे हळूहळू तो मानसिक बंध बांधतो.
त्याला हवेहवेसे, जे कधीही तो नाकारू शकतो. मात्र जन्माची नाती चिवट, मूळ घेऊन आलेली.
हा माझा, तो तुझा, ही भावनाच विनाशी. सगळे काही अशाश्वत, तरीही माणूस हव्यासी.
हि निर्मिती सुंदर, पण परिणिती भयंकर.
जन्मास आला, तेव्हा जीव एकटाच झगडला, नंतर नावाच्या लेबलात अडकला.
त्यातून सुरू झाले एक सांसारिक जंजाळ. तो विसरला, मुळात आपण एकटेच.
नात्यांच्या मोहात अडकून सुरू झाला प्रवास...
अव्याहत आकांक्षांचा, उर फुटेस्तोवर धावायचा, जीवघेणा प्रवास.
किती आशा-आकांक्षा पूर्ततेत बदलल्या आणि कितींची भूत आपल्याच
मानगुटीवर वेताळासारखी बसली. आपण सारे विक्रमदित्य.
तारुण्य स्वप्न पाहते, सुखाचे मनोरे रचते, पण
मानसिक वार्धक्य तिशीच्या आसपास रेंगाळायला लागते, अंगात भिनत भिनत
शरिरी वार्धक्याची जाणीव करतं आणि मन खचतं.
विषण्ण मने, विकलांग तने, काळाच्या ओघात धावतच असतात, पुढे काय?
शाश्वताच्या सीमारेषेवर माणूस हरप्रकारे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, अपयशी प्रयत्न,
कधी कधी...
अंतरताटव्यातून एखादे नाजूकसे फूल उमलते, तो त्याला जीवापाड जपू लागतो.
जणू तो स्वतःच एक हळवं रोपटे बनतो, त्या फुलाला लांबूनच पाहत तो जीव रमवतो.
आणि...
अकस्मात कुणीतरी धटिंगण त्याच्या रक्तवर्णी पाकळ्या चुरगळतो.
फूल आक्रंदन करते, त्याचे कोमल भावविश्व उध्वस्त झाले म्हणून आकांत करते, षंढ आकांत.
फूल धुळीस मिळते.
एक वेडा प्रवास संपला. अनावर ऊर्मी निमाल्या.
पुनःश्व एकटेपणा. घेरून टाकणारी शांतता. ज्वालामुखीतील शांतता.
अन, झपाटून टाकणारा सूड चेतायला लागतो, जे मिळत नाही ते ओरबाडायचे.
विचारांना विषारी धार चढते, मस्तकात रक्त उसळते.
नकळत द्वेषाची ठिणगी पडते. त्या मातीत मिसळून म्लान झालेल्या फुलाच्या भग्न अवशेषांना त्वेषाने चिरडते.
ते क्षीण, विकल फूल त्या धक्क्याने बरबाद होतं, अविश्वासाने करुण दृष्टिक्षेप टाकून कोमेजतं.
आणि...
सूडाचा प्रवास संपतो. विझतो, हताशपणे.
पुन्हा एकाकी, क्षीण दुबळ्या कुडीचा सुरू होतो उरला सुरला प्रवास आणि शेवटी विनाश.
No comments:
Post a Comment
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !