जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, March 22, 2009

थरारक

गोव्याच्या प्रेमात मी लहानपणापासून पडले आहे. चौथीत असताना आम्ही गोव्याला राहिलोत. खूप छान आठवणीआहेत बालपणीच्या. लग्न ठरल्यावर मी नवऱ्याला सांगितले की आपण हनीमून साठी गोव्याला जाऊया. त्यालाहीगोव्याला जावेसे वाटत होते. त्यामुळे लग्नाआधीचा एक वाद टळला.

ठरल्याप्रमाणे आम्ही गोव्याला जायला निघालो. मुंबई-गोवा सारा पंचेचाळीस मिनिटांचा खेळ. आम्ही दोघेही खूशहोतो. विमानात आमच्या सीट्स कडे जाताना नवऱ्याने संदीप पाटीलला पाहिले.तो आणि त्याची बायको हीगोव्याला निघाले होते. माझा नवरा ठार क्रिकेट वेडा, आचरेकर सरांचा शिष्य. त्याने ज्या क्षणी संदीप पाटीललापाहिले तो मला विसरून गेला. माझ्या दुर्दैवाने त्याच्या शेजारची सीट रिकामी होती. नवरा त्याच्या शेजारी जाऊनबसला तो शेवटपर्यंत. मला त्याचे वेड माहीत होते त्यामुळे मी खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या सौंदर्याचा आस्वादघेतला. असेही रागावून काही फायदा होणार नव्हता.

गोव्याच्या आमच्या वास्तव्यात बऱ्याच गमतीजमती झाल्या. पहिल्याच दिवशी संध्याकाळी आम्ही हॉटेलच्याचरे्स्टॉरंट मध्ये बसलो होतो. खूप गर्दी होती. थोड्यावेळाने एक जोडपे आले. आमच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षाने मोठेहोते. एकदम हसमूख, खूप गप्पा झाल्या. गोव्याची बरीच माहिती कळली. वेळ कसा गेला कळलेच नाही. निरोपघ्यायची वेळ आली आणि बोलता बोलता त्याने खिशातून बंदूक काढून टेबलवर ठेवली. दोन मिनिटे आम्ही वासून पाहात राहिलो. नंतर नवऱ्याने विचारले, खरी आहे ना? आमच्या कोणाही मित्र-मैत्रिणिकडे ह्यापूर्वी आम्हीअसे कुठलेही हत्यार कधी पाहिले नव्हते. तो हसला, म्हणाला " अरे खरीच आहे, तू पाहा की हातात घेऊन." मलातर भितीच वाटली. नवऱ्याने हातात घेऊन पाहिली, नेम धरून पाहिला. मग त्यावरून थोडी गंमत झाली आणि तेदोघेही गेले.

आम्ही दोघेही आमच्या रूमवर गेलो. माझ्या डोळ्यासमोरून ती बंदूक जाईना. त्यात माझ्या नवऱ्याने ती हातातघेऊन पाहिली होती. म्हणजे जर उद्या त्या माणसाने कुणाला काही केले तर माझ्या नवऱ्याचे ठसे... अरे देवा! नवरागाढ झोपलेला, मी त्याला गदागदा हालवून उठवले. मला वाटत असलेली भिती त्याला सांगितली तर त्याने चक्कहात जोडले. म्हणाला," अग असे काही होणार नाही, मला झोपू दे. तू बस विचार करीत, केव्हातरी झोप लागेलच." आणि तो गेला झोपून माझी धडधड थांबेचना. गोव्याचे सगळे दिवस आणि नंतरचे वर्षभर माझ्या डोक्यात कुठेतरीहे चक्र चालूच राहिले. ती बंदूक स्वप्नात येई आणि पोलीस आम्हाला शोधायला आलेत.

साऊथ गोवा/नॉर्थ गोवा ह्या दोन्ही टूर्स झाल्या, खूप मजा येत होती. चौथ्या दिवशी बहुतेक मी बरेच खारे काजूखाल्ले त्यामुळे असेल किंवा काय कोण जाणे पण मला उलट्या होऊ लागल्या. रात्रीपर्यंत माझी परिस्थिती जराजास्तीच बिघडली. नवरा थोडा घाबरून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर एकदम छानहोते, वयस्कर होते. त्यांना असे बरेच पेशंट पाहायला मिळाले असतील. त्यांनी धीर दिला,औषध दिले आणि फक्तदहीभात खायची परवानगी दिली. माझे तोंड अगदीच उतरले, वाईट वाटत होतेच, अपराधी भावना जास्त. त्यातभिती काही पाठ सोडत नव्हती. नवऱ्याने छान समजूत घातली. अजिबात वैतागलो नाही असे बरेच वेळा सांगितले. मनाला थोडे बरे वाटले. शेवटचा दिवस मस्त गेला. मला खायचीही परवानगी मिळाली होती. तो दिवस आम्ही खूपउंडारलो. बोटीची राईड झाली. मग दुसऱ्या दिवशी पॅकिंग झाले. दुपारी चारची बस होती आमची. हॉटेल ला टाटाकरून आम्ही गोवा सोडले.

प्रवास बराच मोठा त्यातून बसचा. आमच्या पुढच्या सीट्वर एका बॅंकेतले दोघेजण होते. ते दोघेही ब्रिजटुर्नामेंटसाठी गोव्याला आले होते. आमच्या आणि त्यांच्या गप्पा झाल्या, थोडी ओळख झाली. बसमध्ये बसूनआम्ही थोडे कंटाळलो. रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि आमची बस एका गावात जेवणासाठी थांबली. सगळेजणजेवायला उतरले. आम्हाला फारशी भूक नव्हती तरीही काहीतरी खाऊन घेऊया असा विचार करून हॉटेल मध्येगेलो. वेटरला पुलाव आणायला सांगितला. हॉटेल मध्ये खूप गर्दी होती. बऱ्याच वेळाने एकदाचा पुलाव आला. पणथंड. तसेच खायला सुरवात केली आणि पाहतो तो काय, पुलाव मध्ये एक मोठा खिळा होता. वेटरला बोलावूनदाखवले तर विचित्र हसत म्हणाला, " अहो नीट बघा खिळा नसेल मुळा असेल." आणि खिळा काढून फेकून दिला. आम्ही पुलाव खाताच उठलो. बील देताना मालकाला काय झाले ते सांगून पुलाव चे पैसे घेऊ नका असे सांगितले. तर त्याने उर्मटपणे ते काही चालणार नाही पाहिजे तर दुसरा पुलाव देतो पण पैसे द्यावेच लागतील. आम्हाला पुलावनकोच होता आणि आमचा बसवाला हाका मारीत होता म्हणून आम्ही बील देऊन निघालो. परक्या गावात इतक्यारात्री कुठे वाद घालत बसायचे असा विचार करून बस मध्ये बसलो.

थोड्यावेळाने खूप आरडाओरडा ऐकू येऊ लागला. खिडकीतून पाहिले तर हातात तलवारी, सुरे घेऊन काही माणसेसगळ्या बसेस मध्ये चढून कोणाला तरी शोधत होते. सगळेजण अतिशय घाबरून गेले होते. तेवढ्यात त्यातलेदोघेजण आमच्या बसमध्ये चढले. एक जण म्हणाला अरे तो ह्याच बसमधला होता, कुठे आहे शोधा त्याला. तेउतरून गेले आणि आमच्या पुढच्या सीटवर बसलेले दोघे पळतपळत येऊन सीटवर बसले. त्यांच्या मागोमागकंडक्टर आला. आणि ड्रायव्हर ने बस सोडली. ते दोघेही फार घाबरलेले होते. कुणालाच काही कळत नव्हते कायझाले आहे. आमच्या पुढच्या सीटवरील एकाच्या शर्टाच्या चिंध्या झालेल्या, त्याला बरेच लागलेही होते. थोड्यावेळाने त्याने सांगितले की आम्ही दोघे बील देऊन बाहेर पडलो आणि आमच्या मागे रांगेत ते उभे होते. त्यांनी सगळे काही एकले पाहिले होते-खिळा-मुळा प्रकार. त्यावरून त्यांची तिथे बोलाचाली झाली आणि हे सारेपुढचे रामायण घडले होते. बसमध्ये विचित्र सन्नाटा पसरला होता. सगळेजण मुंबईला पोहोचेपर्यंत घाबरलेलेचहोते.

आजही ती रात्र, त्या तलवारी घेतलेली माणसे आणि बॅंकेतले ते दोघे आठवतात. वाईट वेळ होती, देवाची कृपा काहीअघटित घडले नाही.

1 comment:

  1. हनीमूनलाच उलट्या ...P
    रच्याक,अजून maajh गोवा राहिलंच आहे....

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !