जाता जाता एक नजर इथेही........

Monday, March 2, 2009

खरपूस मसाला भेंडी.


























जिन्नस
३५/४० कोवळ्या व भरण्यास योग्य अशा भेंड्या.
तीन चमचे चण्याच्या डाळीचे पीठ.
दोन चमचे दाण्याचे कूट
मध्यम कांदा
दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस
एक चमचा बडीशेप
अर्धा चमचा गरम मसाला
दिड चमचा धणेजिरे पूड
एक चमचा लाल तिखट
एक चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चार लसूण पाकळ्या
दोन चमचे साखर
एका लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
दहा चमचे तेल

मार्गदर्शन

भेंड्या स्वच्छ धुऊन पुसून मध्ये एकच उभी चीर पाडावी। कांदा, कोथिंबीर बारीक चिरावी. डाळीचे पीठ खमंग भाजून घ्यावे. खोबऱ्याचा कीस , बडीशेप भाजून घ्यावे. गरम मसाला व धणेजिरे पूड गरम करून घ्यावी. लसूण, भाजलेले खोबरे व बडीशेप मिक्सर मधून काढावे. एका भांड्यात हे सगळे जिन्नस आणि दाण्याचे कूट, लाल तिखट, साखर, चवीनुसार मीठ, एका लिंबाचा रस, हिंग व हळद घ्यावेत. हाताने कुस्करून चांगले एकत्र करावेत. कांद्याला मीठ-साखरे मुळे पाणी सुटते व एका लिंबाचा रस यामुळे मिश्रण चांगले मिळून येते. हे मिश्रण भेंड्यांमध्ये भरावे. मसाला उरल्यास वाटीत ठेवावा. शक्यतो पसरट फ्रायपॅन घ्यावा. त्यात चार चमचे तेल घालावे. हलक्या हाताने एकएक भेंडी तेलावर ठेवावी. सगळ्या ठेवून झाल्या की बाजूने तीन चमचे तेल सोडावे. मध्यम आंचेवर सात/आठ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर झाकण काढून अलगद सगळ्या भेंड्या उलटवून पुन्हा तीन चमचे तेल सोडावे. झाकण ठेवू नये. गॅस मध्यमच ठेवावा. दहा मिनिटाने पाहावे जर अजून थोड्या खरपूस आवडत असल्यास पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. भेंड्या काढून घेतल्यावर जर मसाला उरला असेल तर तो छान परतून घ्यावा व तो भेंड्यांवर भुरभुरावा.

टीपा

स्टार्टर साठी केल्यास सगळ्यांना खूप आवडते. तिखटाचे प्रमाण आवडीनुसार बदलावे. लहान मुलेही आनंदाने खातात.

2 comments:

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !