जाता जाता एक नजर इथेही........

Friday, January 15, 2010

विमान चुकल्यापासून पुढचे काही तास........

विमान तर चुकले होते पण त्याचे दुःख करायला वेळच नव्हता. लगोलग कुठल्या विमानाने लवकरात लवकर जाता येईल त्याचा शोध व सोपस्कार पार पाडायला हवे होते. हा काउंटर गेट नंबर ४२ वर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेलच. झाले पुन्हा आमची वरात लळत-लोंबत ७५ वरून ४२ कडे निघाली. जेमतेम दोन गेटस ओलांडली तोच लेकाचा फोन आला. अरेच्या! हा तर उडाला होता ना? मग फोन........ आजकाल विमानातून फोन इतक्या सहजी लागतो की काय? का हा अजून इथेच आहे........ हा शेवटचा विचार मनात तरळताच मी धावणे बंद करून चक्क बसकण मारली व फोन घेतला.

म्हणतात ना नेहमी कुशंकांच बरेचवेळा खऱ्या होतात.... तसेच झालेले. सुतारपक्षी उडलाच नव्हता. त्यांच्या विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता. आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा पार्ट गोडाउन मधून येणार होता. त्यामुळे कमीतकमी एक तास तरी विमान उडू शकत नव्हते.
या प्रकारामुळे त्याच्या विमानातील बऱ्याच लोकांचे अटलांटावरूनचे कनेक्शन चुकणार होते. म्हणून त्यांना इथेच उतरून विमान बदलून घ्या असे सांगितले जात होते. लेक म्हणत होता, " आई, अग कमीतकमी दहा-बारा लोक ड्रॉप होत आहेत तेव्हा तुम्ही पाहा तुम्हाला माझ्याबरोबर येता येईल का ते. " मग काय पुन्हा एकदा रेसचे घोडे दौडायला लागले. गेट नंबर ७३ ते गेट नंबर २४ ( लेक गेट नंबर २४ वर होता ) यावेळी ५० गेटसची रेस होती. बाहेर १४/ १५ फॅरनाईट टेंपरेचर असल्यामुळे एकावर एक कपडे आणि वर जाड कोट चढवलेला. आता इतके धावून धावून आमचा उकडलेला बटाटा झाला होता. कसेबसे एकदाचे पोचलो २४ नंबर वर.

तिथे कोणाचाच पायपोस कोणात नाही अशी स्थिती झालेली. विमानातून उतरून आलेले सगळेच पिसाटलेले दिसत होते. साहजिकच आहे. पहाटेपासून येऊन दोन्ही रांगांतून सगळ्यांचा पुरा पिट्ट्या पडला होता आणि आता काय तर विमानात बिघाड. त्यातून ज्यांचे आमच्या सारखे अगदी डोळ्यासमोर चुकले होते ते लोक तर अजूनच चिडचिडले होते. खरे तर इथे लोकांमध्ये बऱ्यापैकी पेशन्स असतो. निदान दाखवतात तरी. पण आजची परिस्थिती वेगळी होती. त्यात ख्रिसमस. ज्याला त्याला प्रियजनांकडे जायची ओढ होती. या गदारोळात तरीही नवऱ्याने प्रयत्न केला. पण आम्ही पोचेतोच रिकाम्या झालेल्या जागा भरल्या होत्या. आता माझ्यातले धावायचे सोडाच चालायचेही त्राण संपले होते.


पुन्हा आमचा मोर्चा ४२ नंबर कडे वळवला. नवरा म्हणाला तू ये हळूहळू मी होतो पुढे. मानही वर न करता हातानेच मी त्याला जा जा केले. बिचारा, खरे तर तोही दमलाच होता. तरीही गेला धडपडत. मी जेव्हां ४२ वर पोचले तेव्हा एकंदर पाच कुटुंबे आमच्यासारखीच दमछाक करून आलेली दिसली. एक चिंकू कुटुंब कॉउंटरवर झगडत होते. दोन नंबर नवऱ्याचा होता. आमच्या मागे एक मेडिटरेनिअन अगदी ताजे ताजे लग्न झालेले कपल होते.
त्यांच्या मागे पंजाबी फॅमिली आणि लास्ट नंबर एक मेक्सिकन मुलगी होती. एक जात सगळ्यांचे चेहरे ताणलेले.

चायनीज फॅमिली मोठी होती. आजी-आजोबाही सोबत होते. त्यांना सहा तिकिटे हवी होती पण एका विमानात मिळत नव्हती. मग काय, ती चिंकी अशी काही कडकडायला लागली की मला ते अगदी ओळखीचेच दृश्य वाटू लागले. तिचे शब्द मला कळत नसले तरीही आविर्भाव आणि आवाजातला चढउतार भावना व्यवस्थित पोचवत होता. चिंकू नवरा बिचारा त्या काउंटरवालीशी एकीकडे बोलत होता एकीकडे बायकोला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. शेवटी मनासारखे त्यांचे गणित काही जमलेच नाही. आजी-आजोबा व एक नातवंड एका फ्लाईटने आणि चिंकू-चिंकी व तान्हे लेकरू दुसऱ्याने. पण एवढ्यावरच चिंकू फॅमिलीचा आमचा संबंध संपला नाही बरं का........

त्यांचे हे रामायण घडत असतानाच आमच्या मागेच असलेल्या नवपरिणीत दांपत्यात ' अती सुखसंवाद ' घडत होता. म्हणजे काय की नवी नवलाई असतानाही दांपत्यजीवनात कश्या अनेक घटना विविध प्रकारचे रंग भरत असतात याचा धडा त्यांना मिळत होता. खरे तर आधी माझे त्या दोघांकडे एक नजर टाकण्यापुरतेच लक्ष गेले होते. या चिंकू फॅमिलीत मी दंग असताना अचानक शेजारी काहीतरी धडपड झाली. आपण समोर पाहत असलो तरी डोळ्यांच्या कोपऱ्यातून बरेच काही दिसत असतेच. तो नव्यानेच झालेला ' नवरा ' ( २८-३० चा असेल ) ' बायकोला ' जरा चुचकारायला गेला होता आणि इतका वेळ दाबून ठेवलेला तिचा राग अंगार बनून बिचाऱ्यावर बरसला. बिचारा. ते कदाचित तिच्या आई-वडिलांकडे चालले असावेत. पहिलाच सण असेल त्यांचा. म्हणजे काय आहे ना.... ख्रिसमस हा त्यांचा सण नसला तरी बहुतेक सगळेच मनवतात आपापल्या पद्धतीने. कोणी फिरायला जाईल. कोणी आई-बाबांकडे जाईल. थोडक्यात सुटी मजेत घालवायची हे प्रत्येकाच्या डोक्यात. आज पहिल्याच दिवशी सगळ्यांच्या बेतावर पाणी पडले होते. आणि अजून किती काळ असाच फुकट जाणार आहे हेही समजत नव्हते. मग काय या वावटळीत सापडलेल्या यच्चयावत बायका आपापल्या नवऱ्यांवर या सगळ्याचे खापर मनापासून फोडत होत्या. ( मी ही आलेच बरं का त्यात....... ) आणि नवरे स्वत:ची चूक नसतानाही बापुडवाणे होऊन खिंड लढवत होते.

तो तिला जवळ घेऊन समजावायचा प्रयत्न करीत होता आणि तिचा संताप अनावर झालेला. त्याला जोरात ढकलून अतिशय कुचकट आवाजात ती काहीतरी बोलली आणि हाताची घट्ट घडी घालून त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. तिच्या हाताची घडीच इतकी आवळलेली होती की बहुतेक तिला दुखलेच असेल. पण हट्टाने ती तशीच उभी होती. जणू सांगत होती, " नो नो .... नो. मी बिलकुल आत्ता तुझे काहीही ऐकणार नाहीये. " त्याने एक-दोन मिनिट तिची देहबोली काय संदेश देतेय याचा अंदाज घेतला आणि खांदे उडवले. शांतपणे खिशातून हेडफोन्स काढले... आयपॉडला लावले आणि गाणी ऐकायला सुरवात केली.

तिला अर्थातच हे दिसत नव्हते पण मला ती दोघेही दिसत होती. हसू आवरायचा खूप प्रयत्न करूनही माझ्या चेहऱ्यावर थोडेसे पसरलेच. कदाचित तिने ते टिपले असेल किंवा काय कोण जाणे अचानक ती गर्रर्रर्रर्रकन मागे वळली तर ह्या पठ्ठ्याने डोळे बंद करून मस्त ठेका धरलेला. काय सांगू, ती अशी काही पिसाटली ना... खसकन त्याचा आयपॉड खेचला आणि रांगेच्या पट्ट्यांखालून तडतडत चालू पडली. आम्ही तिथून निघेपर्यंत परत आलीच नाही. आता मी हे पाहतेय हे त्याला कळलेच होते. शिवाय पंजाबी फॅमिलीही हा प्रेमळ संवाद पाहत होतीच. आम्हा सगळ्यांकडे पाहून तो मस्त हसला आणि कानाचे हेडफोन्स काढून खिशात ठेवून उभा राहिला. ना तिला पाहायला गेला ना वैतागला. मला बाबा आवडला त्याचा आविर्भाव. ( असे माझ्या नवऱ्याने केले असते तर आवडले असते का हे मात्र विचारू नका बरं का....... हा हा...... )

चिंकू गोतावळा हालला तसे आम्ही दोघे युद्धाला सज्ज झालो. कॉउंटरवरची बाई समंजस व चांगली होती. लोकांच्या मनस्थितीची तिला जाण असावी. ती मनापासून प्रयत्न करीत होती आम्हाला मदत करण्याचा. पण दिवसभरात सॅन फ्रॆन्सिस्कोला जाणारी एकच डायरेक्ट फ्लाईट होती. तीही दुपारी ३.५० ला आणि ती फुल होती. साडेनऊपासून तीन पन्नास पर्यंत कुठल्याही कनेक्टिंग फ्लाईटचे एकही तिकीट उपलब्ध नव्हते. शेवटी संध्याकाळी सहा वाजताची अटलांटा कनेक्शन असलेल्या विमानाची दोन तिकिटे तिने आम्हाला दिली व ३.५० च्या फ्लाईटसाठी स्टँड बायवर टाकले. वर म्हणाली, " आजचा हा भयंकर घोळ पाहता तुमचे लक जोरावर असेल तर कदाचित त्या विमानातील कोणा दोघांची तुमच्या सारखीच फ्लाईट चुकेल आणि तुम्हाला त्यांच्या जागेवर जाता येईल तोवर मजा करा." तिकिटे हातात घेऊन गेट नंबर पाहिला तर.......... गेट नंबर ७८ ही अक्षरे माझ्याकडे जीभ काढून वेडावून दाखवत असल्याचा भास झाला.


क्रमश:

7 comments:

 1. Alaskala jatana amhi asech blooington-chicago-peoria-chicago-st louis-seattle ase firlo.

  Aplya hatat kahihi naste mhanje kay te ashaweli kalte. Nashib cruisechya adhi 1 purna diwas hota te.

  ReplyDelete
 2. माधुरी खरे आहे गं. गेल्या वर्षीची क्रूज कशी गाठली ते अजूनही मला चित्रपट पाहावा तसे आठवतेय.:)
  आभार.

  ReplyDelete
 3. छान लिहिलय.....flight चुकली की काय काय दीव्य करावे लागते हे जाणून आहे....प्रसंग शब्दात छान मांडला आहे...
  असच छान लिहित जा

  ReplyDelete
 4. विशेष उल्लेखनीय शब्दप्रयोग ... १. आमचा उकडलेला बटाटा झाला होता. २. विमानातून उतरून आलेले सगळेच पिसाटलेले दिसत होते. ३. एक चिंकू कुटुंब कॉउंटरवर झगडत होते. ४. गेट नंबर ७८ ही अक्षरे माझ्याकडे जीभ काढून वेडावून दाखवत असल्याचा भास झाला.

  हाहा... मज्जा आली वाचताना पण तुमचे तेंव्हा काय झाले असेल तो विचारही करायला नको. :(

  ReplyDelete
 5. अतुल देशमुख स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद.:)

  ReplyDelete
 6. रोहन प्रसंग घडून गेल्यावर त्यावेळी ताणामुळे दिसूनही न पोचलेल्या अवतीभोवती घडणा~या घटना नंतर आठवल्या की मजा गंमत वाटते.:) आभार.

  ReplyDelete
 7. खुपच छान लिहिलंय हे पोस्ट. सगळी चित्रं डॊळ्यापुढे उभी राहिली :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !