जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, March 25, 2009

आदतसे मजबूर ...

राम मारुती रोड,ठाणा. समर्थ भांडारच्या समोरच्या दुकानाच्या लाइनमध्ये वूडलँड-चप्पल-बुटाचे दुकान होते, माझ्यामते अजूनही आहे. ही घटना दहा वर्षांपूर्वीची. मी सकाळी बाराच्या सुमारास दुकानात गेले होते. अजिबातगर्दी नव्हती. फक्त एकच बाई होती. दोन कर्मचारी आणि दुकानदार स्वत:. सगळे तिच्याभोवती घुटमळत होते. दहामिनिटे झाली तरी कुणीही मला येऊन काही विचारेना. मी थोडी गोंधळले, मनात म्हटले, " हम्म्म...मोठे गिऱ्हाईकदिसतेय. मग आमच्या सारख्याकडे कशाला लक्ष द्यायचे. जावे का निघून इथून." तेवढ्यात दुकानदाराचा आवाजकानी पडला. तो हळू आवाजात पण जरबेने बोलत होता. " तुम्हाला पुन्हा सांगतोय, पर्स मधील पट्टा काढून ठेवाआणि जा इथून." ती बाई जोरात ओरडत होती, " खोटा आरोप करू नका, मी काहीही घेतलेले नाही." मी अवाक. दुकानदाराने फोन उचलला आणि म्हणाला," थांब, आज बोलावतोच पोलिसांना." हे एकले मात्र तसे तिने पट्टाकाढून ठेवला आणि बडबडत तरातरा निघून गेली.


हे सारे डोळ्यांनी पाहूनही माझ्या मनाला खरे वाटत नव्हते. माझा हबकलेला चेहरा पाहून दुकानदार म्हणाला, " काय सांगायचे, ह्या अशा बायकांनी फार वैताग दिलाय. तिच्या नवऱ्याने हातापाया पडून सांगून ठेवलेय म्हणूनगप्प बसतोय. रोग आहे म्हणे हा. कसले काय हो. चांगल्या दोन द्यायच्या ठेवून काय जाईल पुन्हा चोरी करायला. चांगले पैशेवाले लोक आणि दळभद्री लक्षणे." हे असे प्रकार मी ऐकून होते पण पाहिले नव्हते. खरेच चांगलीसुखवस्तू दिसत होती. ह्यात कसला आनंद तिला मिळत असेल कोण जाणे. बरे तिचा नवरा, मुले तिला घरातकोंडूनही ठेवू शकत नाहीत आणि सतत बरोबर राहू शकत नाहीत. एखादे दिवशी कोणीतरी चोरी केली म्हणूनझोडपतील सुध्दा. कठीणच आहे.


काही दिवस गेले मी ती घटना विसरले नव्हते पण थोडी मागे पडली. ऑफिसमधून येतायेता समर्थ भांडारात गेले. तिथे फार आरडाओरडा ऐकू आला. गर्दी ही होतीच. थोडे पुढे जाऊन पाहिले तर कॅशियर ने एका बाईला धरले होतेआणि तो पर्स दे म्हणून ओरडत होता. नीट पाहिले तर तिच होती. बाप रे! काय हे, घेतला मोठा धोंडा स्वतःचडोक्यात घालून. तोवर तिचा नवराही येऊन पोचला. अक्षरशः: हातापाया पडून तिला घेऊन गेला. नंतर कॅशियरशीबोलताना समजले की हे असे तिने काहीतरी उचलणे अनेक वेळा झालेय. किती वेळा सोडून द्यायचे. आमचीहीनोकरी आहे ना? पकडले नाही म्हणून आमच्या पोटावर पाय यायचा. खरेच होते ना त्याचे.


हे असे लोक बरेच ठिकाणी दिसतात. चोरी कोणीही केली तरी वाईटच. गुन्हाच, मग त्याला शिक्षाही द्यायला हवी. पण ह्यांना कोण धडा शिकवणार? आणि ते शिकतील का त्यातून काही. हा रोग आहे मान्य, पण पहिली चोरीपाठीशी घातली गेली नसती तर कदाचित ही माणसे ह्याचा शिकार झाली नसती. अनेक जण पाहुणे म्हणून गेले कीहमखास काहीनं काही यजमानांच्या घरातले उचलतातच. पैसे तर काय तुझ्या खिशात आहेत तोवर तुझे माझ्याखिशात आले की माझे. आपल्याच माणसांवर आरोपही करता येत नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार. आणि हेच ह्यालोकांना बरोबर माहीत असते. पुन्हा कांगावा करण्यात पटाईत.


अशा लोकांना आणि समाजाला यापासून कसे बरे सोडवायचे?

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !