जाता जाता एक नजर इथेही........

Friday, September 10, 2010

कधी कुठल्या क्षणी कोण कुठे कसे....

त्यादिवशी नेहमीसारखीच धावतपळत ट्रेन पकडली. लेडीज स्पेशल असल्यामुळे सगळे डबे आपलेच म्हणून मिळाली. अन्यथा दहा मिनिटांची फोडणी होतीच. चला आजच्या दिवसाची सुरवात छान झाली या आनंदात मी डब्यात वळले आणि खिडकीजवळची एकजण खुणावू लागली. ये इकडे. मी लगेच तिच्या दिशेने सरकले. मनात मांडे खात होतेच. घाटकोपरला उतरेल तरी किती छान होईल. अगदीच नाही नाही तर दादर नक्कीच, तरीही चालेलच की. तोच ती उठून उभी राहिली. मी एकदम चकित. तिने नजरेनेच खुणावले, " बस की आता. " मी लगेच स्वत:ला खिडकीशी झोकून दिले. तिची पर्स मांडीवर घ्यावी म्हणून तिच्याकडे पाहत पर्सला हात लावला. तशी ती म्हणाली, " अगं मी उतरतेय मुलूंडला. तू बस आरामात. " असे म्हणून ती दाराजवळ सरकली. चक्क विंडो सीट, तीही अशी अचानक लॉटरी लागल्यासारखी. पावसाचे दिवस होते. मधूनच हलकी हलकी सर येई. थोडासा शिडकावा अंगावर करत हुंदडून जाई. त्या तुषारांशी मग वार्‍याची झुळूक लगट करू लागे. थोडेसे कुंद तरीही आल्हाददायक वातावरण पसरले होते. नजर हळूहळू डब्यात फिरू लागली.

सगळ्या बायकाच असल्याने लेडीज स्पेशलमध्ये नेहमीच एक मोकळेपणा, क्वचित थोडा बिनधास्तपणाही पाहायला मिळे. आपल्याकडे कोणी रोखून पाहत असेल अशी पुसटशी शंकाही जेव्हां मनात डोकावत नाही तेव्हा आपण इतके सहज वागत असतो, त्याचा प्रत्यय हमखास लेडीज स्पेशलमध्ये पाहावयास मिळतो. मला समांतरच परंतु विरुद्ध बाजूस चौघींचा ग्रुप बसला होता. सगळ्या पस्तीस-चाळिशीच्या असाव्यात. डब्यात इतका चिवचिवाट, खिदळणे, टिकल्या-पिनांच्या डब्यांची देवाणघेवाण, मधूनच कोणीतरी खास करून आणलेला ढोकळा, इडली चटणी चा समाचार तर कोणाची क्रोशांची लढाई. या सार्‍या कोलाहलात त्या चौघींची स्तब्धता फार जाणवू लागली. काहीतरी बिनसले होते. थोडे निरखून पाहिल्यावर जाणवले, प्रत्येक जण एकमेकीची नजर चुकवतोय. आणि त्यातही खास करून एकीची तर फारच. आता मला अस्वस्थ वाटू लागले. इतकी मस्त खिडकी मिळालेली. तशात किंचितश्या गारव्याने अंगावर छान शिराशिरी उठत होती. खयालोंमे जायचे सोडून नेमके यांच्याकडे का लक्ष गेले म्हणून मी स्वत:लाच कोसायला सुरवात केली. त्यांचे काय बिनसलेय हे मी त्यांना जाऊन विचारू शकत नव्हते आणि आता हा विचार किती काळ ( ??? ) माझा पिच्छा पुरवेल या विचारानेच मी चिडचिडू लागले.

तोच नेमकी ' ती ' उठली. विक्रोळीला उतरायचे असावे तिला. उरलेल्या तिघींना तिने टाटाही केला नाही की त्यांनीही निरोपाची कुठलीच चिन्हे दाखवली नाहीत. डब्यातून मधल्या पॅसेजच्या गर्दीत मिसळताना अचानक ती म्हणाली, " नेमके काय सांगायचे असेल गं त्याला? तो गेला नं तेव्हापासून हा विचार मला सोडतच नाही. चांगलं दारात उभा राहून मला सांगू पाहत होता, तर मी चक्क दुर्लक्ष करून उद्याच्या ऑफिसची तयारी करायला घेतली. ते पाहून तो हसला आणि म्हणाला, " बरं, बरं. तू आवर, मी आलोच पान खाऊन. मग सांगतो गंमत. " आणि गेला तो गेलाच. जर मी ऐकून घेतले असते तर कदाचित आलेली ’ ती ’ वेळ टळली असती. कदाचित ’ तो ’ खालीच गेला नसता. आता सारेच संपलेय. तो गेलाय, त्याची अव्याहत बडबड शांत झाली आहे. काळ जातोय तसतसे सगळे रुळतील, मार्गस्थ होतील. सत्य स्वीकारून, पचवून पुन्हा उभारी धरतील. मीही धरेनच पण प्रश्न अनुत्तरितच राहील. काय करू गं या प्रश्नाचे आता? " त्या तिघीचे डोळे काठोकाठ भरलेले. आम्हा ऐकणार्‍यांचेही. डब्यात एक चमत्कारिक शांतता पसरली. दोन क्षणातच स्टेशन आले, ती उतरून गेली. नवी फौज ताज्या दमाने आत घुसली, भरभर स्थिरावली. आपापल्या मैत्रिणी शोधून हल्लागुल्ला सुरू झाला.

वाटले, डब्यानेही नकळत एक सुस्कारा सोडला असावा. त्या तिघी व आम्ही आजूबाजूच्या काही जणींनी आवंढा गिळला, डोळ्यातले कढ डोळ्यातच जिरवले. सामान्य अवस्थेत येण्याचा आपल्या परीने प्रयत्न करू लागलो. मन मात्र तिच्या प्रश्नात अडकून पडले. खरेच अनेकदा आपणही असे वागतो. समोरचा उत्साहाने, आवेगात काहीतरी सांगायला येतो आणि केवळ कामे समोर दिसतात म्हणून आपण त्याचा हिरमोड करतो. कधी टीव्हीवर फालतू काही चालू असते त्यात अडकून ( खरे तर अनेकदा हे डेली सोपच सुरू असतात. कोणीतरी कोणाचा कपाटाने छळ करत असते नाहीतर कोणीतरी भेकत असते.... तद्दन फालतूपणा समजत असूनही चिडचिडून आपण टक लावून पाहत बसतो. ) मुलं काही सांगायला आली/ नवरा/बायको महत्त्वाचं बोलत असली तरी आपण दुर्लक्ष करतो किंवा त्यांच्यावर अकारण खेकसतो. तो विषय तिथेच थांबतो. कधीकधी असा कायमचाच थांबतो.

थोडेसे आत्मपरीक्षण केले तर जाणवते, की मी स्वत:च अश्या अनेक गोष्टी थांबवून - थोपवून ठेवल्यात. मीच काय आपण सगळेच करतो आहोत हे. असेच ऑफिसमधले ओळखीचे एक जण. मी लागले तेव्हा असतील पन्नाशीचे. मुलांची शिक्षणं होत होती. मुलीचे लग्न तीन चार वर्षात करायचे होते. सरकारी पगार तो कितीसा, त्यात सगळी मोट बांधायचा उरापोटी प्रयत्न. कटिंग घेताघेता एकदा म्हणाले, " श्री, अगं तुला सांगतो. फार फार इच्छा आहे मला एकदातरी सगळ्यांना घेऊन काश्मीरला जायची. आणि हसू नकोस बरं का पण डोक्यात एक विषय कधीपासून घुमतोय. जरा फुरसत मिळाली ना की कादंबरी लिहिणार आहे. बघशीलच तू. एकदम पर्फेक्ट प्लॉट आहे. सगळी जुळणी झालेली आहे आता फक्त झरझर कागदावर उतरवायचे. " हे लिहितेय मी आत्ता..... अंगावर शहारा आला. डोळ्यासमोर ते जसेच्यातसे आजही दिसतात मला. हे सांगताना त्यांचे लकाकणारे डोळे, भारलेला चेहरा, त्या प्लॉटमधली त्यांची गुंतवणूक ..... सारे सारे दिसतेय.

पगाराच्या दिवसाची वाट पाहणे आणि मिळाल्यावर तीस दिवसांच्या तक्त्यावर मेटाकुटीने त्याचा ताळमेळ जुळवणे यातच जीव हलका होऊ लागला. दुखणी-बहाणी, मुलांच्या मागण्या रोजचे नवीन काही होतच होते. तरीही मधूनमधून काश्मीर आणि प्लॉट यांना संजीवनी मिळत होती. एक दिवस सकाळी नेहमी माझ्या आधी येणारे ' ते ' दिसले नाहीत. दुपार झाली फोनही आला नाही. साहेबांनाही थोडे चमत्कारिक वाटले. असे कधी झालेच नव्हते. दिवस कलला, घरी जायचे वेध लागले आणि फोन वाजला...... आमचे ऑफिस तिथेच थिजले. महिन्याचा तक्ता जुळवताना आयुष्याचा आलेख ढासळला होता. एक लेखक जन्माला येण्याआधीच संपला. आजही माझे विचार त्या प्लॉटशी येऊन अडकतात. काय असेल त्यांच्या मनात?

अनेकवेळा क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीही आपण उगाचच पुढे ढकलत राहतो. ज्या सहज शक्य असतात पण वेळ कमी या एकमेव सबबीखाली छोटेछोटे संवाद, आनंद, भेटी, एखादी वस्तू राहून जाते अन मग ती राहूनच जाते. वेळेची किंमत कधी समजेल, वेळ निघून गेल्यावर.... मग तेव्हा ती समजून तरी काय फायदा. आपण सगळे हे टोक समजूनही थोडीशी सवड मिळाली की करूच या आशेवर-दिलाशावर स्वत:ला मागे टाकत जातो. सवड काही मिळत नाही, ती कधी मिळणारही नसते कारण ती काढावी लागते. हे सत्य समजून अमलात येण्या आधीच अवचित बोलावणेच येते. न टाळता येणारे बोलावणे.

अनेकदा समाज, रुढी, कर्तव्ये, लोकं काय म्हणतील हे आपल्या मनानेच उभे केलेले बागुलवु्वांचे दोर आपल्याला नाचवत असतात. कळूनसवरून आपण त्यांच्या तालावर घुसमटलेल्या मनाने नाचत राहतो. रात्री गादीवर पडलो की या छोट्या छोट्या इच्छाआकांक्षाची भूत छतावर डोकी वर काढतात. पाहता पाहता छत भरून भिंतीवर सरकतात. अन आनंदचा डायलॉग सारखा समोर येत राहतो, " ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जहांपनाह, उसे न आप बदल सकते हैं और न मैं, हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है, कब, कौन, कैसे उठेगा कोई नहीं बता सकता... " खरेच आपण सगळेच केवळ बाहुल्या आहोत. तो शक्तिशाली बाहुल्यांमध्ये प्राण फुंकतो अन माप भरले की क्षणात दोर कापून टाकतो. आपण म्हणतो मी हे केलं मी ते केलं, मी अमुक करेन - तमुक करेन.... खरंच का? कधी कुठल्या क्षणी कोण कुठे कसे....

20 comments:

  1. ...म्हणून म्हणतात नं....प्रत्येक क्षण जगावा. आजचाच दिवस हाताशी आहे, असं जगावं.
    फक्त हे अर्ध अधिक निसटून गेल्यावर कळतं.
    पोस्ट सुंदर.
    :)

    ReplyDelete
  2. नेमकी तिच तर गोची आहे नं... :(
    धन्यू गं.

    ReplyDelete
  3. >>अनेकदा समाज, रुढी, कर्तव्ये, लोकं काय म्हणतील हे आपल्या मनानेच उभे केलेले बागुलवु्वांचे दोर आपल्याला नाचवत असतात.


    + 1
    सहमत आहे, दुसर्‍याला काय वाटेल ह्या प्रश्नात आपल्याला काय हवे होते हेच आपण विसरुन जातो.

    ReplyDelete
  4. भारी विचार माण्ड्ला आहेस तू. असे बरेच प्रसंग येतात आणि मागाहून विचार करतो की काय असेल बर त्याच्य मनात??

    ReplyDelete
  5. तुमची पोस्ट फार चांगली आहे. आवडली मला.

    अनेकदा एखादी गोष्ट हातातून निसटली की त्याची खंत जास्त जाणवत राहते. ज्यांत रस नाही त्यात आपण आयुष्य घालवतो. पण जगण्याची धांदल इतकी झाली आहे की ज्या गोष्टी मनापासून करायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला वेळ नाही. ही (मानवी जीवनाची) शोकांतिका आपणच ओढवून घेतलेली असते. कारण त्यातून बाहेर पडण्याचीही एक वेगळी किंमत मोजावी लागते - ज्याला आपण फारसे तयार नसतो. दुस-यांचे ऐकून घेणॆ तर लांबच राहिले, स्वत:चे तरी आपण ऐकतो का?

    ReplyDelete
  6. rajkiranjain, आणि जेव्हां गोष्टी हातातून पार निसटतात तेव्हां आयुष्याची खंत लागून राहते.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  7. हो नं गं अपर्णा, हे असे उत्तर न मिळणारे प्रश्न फार छ्ळवादीच. :(

    ReplyDelete
  8. aativas, अभिप्रायाबद्दल अनेक आभार. आवर्जून प्रतिक्रिया दिलीत आनंद झाला.
    जगण्याची धांदल... अगदी अगदी. तसेच झालेय. आणि कळतेय पण वळवता येत नाही. :(

    ReplyDelete
  9. अग ’ती’ आणि ’ते’ दोघेही एकदम धक्का देउन गेले...मी ही कशात व्यस्त असलो कि असच दुर्लक्ष केल आहे बरयाच जवळच्या लोकांकडॆ....कधी कधी विचार केला कि खुप लागतात हया गोष्टी मनाला...मी सुदधा तुझ्यासारखा अनुभव थोड्याफ़ार फ़रकाने घेतला आहे...ते त्यांचे शब्द असे फ़िरत राहतात ना डोक्यात कि काय सांगु...

    ReplyDelete
  10. देवेंद्र, आभार. अनावधानाने केलेल्या गोष्टीची बोच आयुष्यभर छ्ळ करते. :(

    ReplyDelete
  11. भानस, काल 'कास्ट् अवे' बघितला आणि आज तुझा हा लेख... आणि त्याचा एकत्रीत परिणाम अवर्णनीय आहे...खरंच अगदी योग्य भाष्य केलयस जिवनावर

    आणि हो... तुझे हल्लीचे पोस्ट वाचल्यानंतर मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय...मग ती कितीही सुंदर असो ;)

    ReplyDelete
  12. श्रीताई,
    अगं काय हा योगायोग बघ...
    मी तुझी पोस्ट आज वाचतोय... आणि काल मी असंच काहीतरी लिहिलं होतं...
    बरेचदा समजण्याच्या पलिकडलं आणि एकंदरच आपल्या आवाक्यापलिकडलं असतं सगळं! :(

    ReplyDelete
  13. >> अनेकवेळा क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीही आपण उगाचच पुढे ढकलत राहतो.

    अगदी खरंय.. जिथे पुढच्या श्वासाचीही शाश्वती नाही तिथे हे असलं पुढे ढकलत राहणं म्हणजे खरंच छोट्याछोट्या सुखांपासून स्वतःला वंचित ठेवणं..

    बाकी 'आनंद'ने सांगून ठेवलंच आहे !!

    ReplyDelete
  14. अर्रर्रर्र.... श्रीराज, इतकं मनावर नको घेऊ रे. :D

    ReplyDelete
  15. विभी, योगायोग आहेच. :)

    समोरून ट्रेन येतेय...तरीही क्रॉस करणार्‍याला नेमक्या क्षणी मागे ओढून जीव वाचवणारा दुसरा कोणी त्यावेळी असणे हा निव्वळ योगायोग की उपरवालेकी योजना... म्हटले तर संदर्भ लागू शकतात म्हटले तर सगळेच अनाकलनीय...

    आभार.

    ReplyDelete
  16. जान हैं तो जहान हैं
    वरना सब कुछ बेकार हैं
    न जाने हम कब सिखेंगे
    मर मरके जीना कभी तो छोडेंगे, शायद....

    आभार हेरंब.

    ReplyDelete
  17. अंतर्मुख करणारं लिहिलंय तू...

    ReplyDelete
  18. >> अनेकदा समाज, रुढी, कर्तव्ये, लोकं काय म्हणतील हे आपल्या मनानेच उभे केलेले बागुलवु्वांचे दोर आपल्याला नाचवत असतात.

    बहुत खुब...

    वाचल्यानंतर मनात एकदम सन्नाटा पसरला...

    ReplyDelete
  19. खरेच आहे ना रे... अतिशय छोट्याछोट्या गोष्टी करतानाही अनेकदा लोकं काय म्हणतील या विचाराने त्या केल्याच जात नाहीत... :(

    धन्यवाद सौरभ.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !