जाता जाता एक नजर इथेही........

Friday, December 11, 2009

मराठी माणसाला धंदा करता येतो का?

खरेच मराठी माणसाला धंदा करता येतो का? मी दादरची असल्याने आजूबाजूला मराठी वातावरण खूपच होते. अगदी गिरगाव इतके नसले तरी होतेच. त्यातून त्यावेळी गिरण्याही सुरू होत्या. तशा आजही तुरळक आहेत. पण ७५-७६ सालात दबदबा होता. दादर पूर्व आणि पश्चिम, नायगाव मग पुढे हिंदमाता, भारतमाता...... करत करत पार भायखळ्या पर्यंत आपले लोक होतेच. त्यामुळे बरीचशी मराठी माणसांची दुकानेही होतीच. सगळी चालत अशातला भाग नसला तरी संख्या जास्त असल्याने धंद्यात मराठी लोक मागे नाहीत असा आभास तरी निर्माण झालेला. मी तेव्हा बरीच लहान असल्याने अर्थात हे सगळे समजत नव्हते. आईने सांगितले अमुक अमुक दुकानात, वाण्याकडे, भाजीवाल्याकडे जा की जायचे बास. पुढे पुढे दादर बदलू लागले. आम्हीही पूर्वेकडून पश्चिमेला आलो. प्रभादेवी मंदिरापासून अगदी सात-आठ मिनिटावर, शिवाजीपार्क जवळ. एकंदरीत मराठीचा दबदबा होता. ' दादर ' हे माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचे. जणू आमच्या घरातले पाचवे माणूसच. एकदा या माझ्या ' प्रेमावर ' पोस्ट लिहायलाच हवी. दादरही चकित व खंतावलेले असणार मनातून नक्कीच माझ्यावर. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे तेव्हा प्रेमावरून पुन्हा समेवर यायला हवे.

तर हा प्रश्न अनेकदा अनेक जणांना पडतोच. मला व आईलाही त्यादिवशी पुन्हा एकदा पडला. आणि चक्क ' अजिबात नाही ' व ' नक्कीच करता येतो ' अशी दोन टोकाची उत्तरेही एकाच दिवशी अनुभवायला मिळाली. घडले काय की .... नाही असे नाही. अशी सरळ सुरवात करून नाही जमायचे
. " मंडळी आतापर्यंत खाण्यावरचे प्रेम व ते बनवण्यावरचे प्रेमही तुम्ही पाहिले आहेच. ज्या घरातल्या नवऱ्यांना स्वयंपाक करता येतो.... चांगला स्वयंपाक करता येतो ( याचा अर्थ ते तो करतात असा नाही बरं का. पण तो करता येत असल्याने किंचितसा हिंग जास्त पडला तरी बरोबर कळते. उच्छाद मेला. त्यापेक्षा चहा पण न येणारा नवरा बरा. किमान बायको देईल ते आनंदाने खाईल. असो. पुन्हा गाडी भरकटली. अग हे कंसात लिहिते आहेस, तेव्हा पुरे. ) त्यांच्या बायकांना कायम सावध पवित्रा घ्यावा लागतो. हा हा.... काही जणींना नक्कीच पटले असेल.

नवरा म्हणे यावेळी पितळेचे पातेले न घेता आलीस तर मी बटाट्याचे नाव टाकून देईन. खरे तर मला मनातून कोण आनंद झालेला. असे होईल का कधी? बटाटा म्हणजे याला जीव की प्राण. कधीही द्या हा नाही म्हणतच नाही. पण ..... हा पण फार वैताग आणतो. पितळेच्या पातेल्यातलीच भाजी हवी. काचऱ्या म्हणा, उकडून म्हणा..... खालची खरपुडी.... अगदी अहाहा...... होते त्याला. इथे पितळेचे पातेले आणले तरी त्याची कल्हई गेली की मग काय करायचे या सबबीखाली मी टाळलेले . बिनकल्हईच्या कळकटलेल्या भांड्यात काही करता येत नाही ना. मनातून मलाही आवडतात पितळेच्या पातेल्यात केलेले पोहे, काचऱ्या. त्यांची चव काही वेगळीच लागते. जसे निखाऱ्यावर भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव या कॉईलवर भाजलेल्या वांग्याला कशी यावी? चूल पेटवून त्यावर केलेली तांदुळाची भाकरी आणि पाट्यावर वाटलेली लसणाची ओल्या लाल मिरच्यांची चटणी.
या पोस्टचे काही खरे नाही राव...... इथे स्नो चे ढिगारे झालेत आणि गोठलेल्या अवस्थेत मी काय काय दिवास्वप्ने..... आय मीन खाणे खाते आहे.

म्हणून मग यावेळी ठरवून टाकले होते काहीही झाले तरी पितळेची लंगडी घेऊनच यायची. ठाण्याला जांभळी नाका, टेंभी नाका व इतरही काही दुकानात शोध घेतला. पण मनासारखी काही मिळाली नाही. मग कोणी म्हणे की जुन्याबाजारात मिळेल नक्की. तोही प्रयोग करून झाला. तिथे मस्त धमाल गमती झाल्या. ( अजून एक पोस्ट नक्की होणार यावर ) शेवटी आई म्हणाली की आपण नाशिकलाच घेऊयात. तिथे मनासारखी मिळेलच. असेही ठाण्यात फिरून दमलो होतोच व दुसऱ्याच दिवशी नाशिकला निघणार होतो. आईकडे येऊन पोचले. दोन दिवस भुर्रर्रर्रकन संपले. तिसऱ्या दिवशी सकाळी दहालाच आम्ही मायलेकी बाहेर पडलो ते थेट टकल्यांच्या ( नाशिकचे प्रसिद्ध सोनार ) दुकानाशी रिक्षा सोडली. आणि तिकडून पायी निघालो. तांबा-पितळ-काशांचे आणि स्टीलही आलेच, भांड्यांचा बाजार कापडपट्टित भरतो. पूर्वी इथे सगळी कापडपट्टीच होती परंतु आता चुकून एखादे दुकान दिसते. मात्र नाव अजूनही तेच राहिलेले आहे.

तिथे पाचसहा दुकाने पालथी घातली पण मनास काही येईना. इथे घूस तिथे विचार करता करता आम्ही एका मराठी दुकानात घुसलो. दोन वर्षांपूर्वीच्या पावसाने संपूर्ण दुकान पाण्याखाली दोन दिवस होते त्याच्या ठळक खुणा अजूनही चांगल्याच दिसत होत्या. दोन खणी दुकान तसे प्रशस्त होते. ठासून माल भरलेला होता. मालक होतेच. त्यांना पाहिले आणि मी चक्क त्यांच्या प्रेमातच पडले. साधारण पंचाऐंशीचे आसपास वय असावे आजोबांचे. एकदम खणखणीत आवाज, तरतरीत नाक आणि पूर्वी व्यायामशाळेत कमावलेले शरीर. धोतर, बंडी व गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर गंध. वर्ण किंचित रापलेला असला तरी गव्हाळ गोरेपण लपत नव्हते. गोड गोड बोलून धंद्याचे तंत्र जोरदार सांभाळलेले. पाच सहा नोकर होते. सगळे आजोबांच्या जवळ असावेत. मन लावून कामे चालली होती. लंगडी राहिली बाजूलाच आणि आम्ही काशाची भांडी पाहत बसलो. आजोबाही काय काय काढून दाखवत होते. त्यात इतर गिऱ्हाईकांशीही गोड बोलून बरोबर हवे ते देऊन माल खपवत होते.

हो नाही करता करता मी व आईने दहा काशाच्या वाट्या, दोन पेले, दोन ताटे व चमचे घेतले. काशाचा भाव चांगलाच जबर आहे बरं का. त्यातून एकदा जाऊन खरेदी झाली असे कधी होईल का?
लंगडी काही आजोबांकडे नव्हती. शिवाय ते म्हणाले की उद्या परत या ही सगळी तुला हवी असलेली भांडी चकचकीत करून ठेवतो. पैसे देते म्हटले तर म्हणाले नको मी कच्ची पावती बनवून ठेवतो. उद्याच हिशेब करू. आम्ही बर म्हटले आणि घरी आलो. दुसऱ्या दिवशी आवरून पुन्हा कापडपट्टी गाठली. आज आजोबा नव्हते. माझे मन जरा खट्टूच झाले. त्यांचा मुलगा होता. साधारण पंचावन्नाच्या आसपास वय असावे. दुकानात बरीच गर्दीही होती. आम्ही दोघी बाकड्यावर टेकलो. काल असलेल्यातला एक गडी पटकन पुढे आला व आमची सगळी भांडी तयार आहेत हे दाखवून गेला.

काउंटरवर फार गडबड होती. दोन बायका आजोबांच्या मुलाबरोबर घासाघीस करत होत्या. लग्नाचा आहेर होता. बरेच मोठे खटले असावे. त्यांना पूजेची उपकरणी व तांब्या-फुलपात्रे असे वाटायचे होते. हजार नग हवे होते. आता प्रत्येकी साधारण रुपये १००/१२५ लागतील असे पकडले तरी चांगली मोठी ऑर्डर होती. त्या बायकांचे हा घाट पाहा, फुलवातीचा दिवा घ्यावा की भोकाचा? ताम्हण असावे का? चर्चा सुरू होती. दुकानदाराने मदत करावी, पटापट निरनिराळे ऑप्शन्स समोर मांडावेत अशी साहजिकच त्यांची इच्छा होती. बरे सामान काही ५०/१०० चे घ्यायचे नव्हते. पण हे आजोबांच्या मुलाला कळते तर ना? हे साहेब चक्क सेलफोन वर बोलत होते.
नोकरच सारखे इकडून तिकडून धावत होते. प्रयत्न करत होते.

अर्धा तास झाला. शेवटी त्यातली एक बाई वैतागून म्हणाली , " अहो आता तुमचा तो सेलफोन बंद करा. नाहीतर जातो आम्ही इथून. केवळ आजोबांसाठी कधीचे ताटकळतो आहोत तर तुम्ही थांबेनाच झालात की. " यावर आजोबांच्या लेकाने शांतपणे सांगितले, " जातो म्हणताय? बरं ठीक आहे मर्जी तुमची. " आणि नोकरांकडे वळून, " अरे हे सामान उचलून टाका रे इथून. " त्या दोघी बाया तर उडाल्याच पण दुकानातले आम्ही सगळेही अचंबित झालो. एक नोकर त्या बायांना मनवू लागला तर दुसरा आजोबांना फोन करायला धावला. आणि आजोबांचा मुलगा शांतपणे सेलफोन वर बोलत राहिला. आता याला काय म्हणावे? इतके चांगले गिऱ्हाईक घालवले हातचे.

एकदाचे आमचे सामान घेऊन थोडीशी बिलाची हाणामारी करून आम्ही बाहेर पडलो. शेजारच्याच दुकानात लंगडीही मिळाली. खरेदी तर झाली. पण काम पूर्ण झाले नाही. लंगडी बिनकल्हईची होती. कुठलेही पितळेचे भांडे कल्हई लावलेले मिळतच नाही. म्हणजे आता कल्हई लावून घेणे भागच होते. त्याशिवाय वापरता येणार नव्हतीच. वाटले आता इथे जर हा एवढा मोठा बाजार आहे पितळेच्या भांड्यांचा तर कल्हईवाले पण असतीलच. पण नाही. जवळपास कोणीच बसत नाही. एकदम पार पंचवटीत ’ काळ्या रामापाशी ’ जा असे अनेक जणांनी सांगितले. तोवर दुपारचा दीड वाजला होता. आई दमली होती. ऊनही फार रणरणले होते. आता हे काम पूर्ण करूनच घरी जायचे असा निर्धार आईने केला होता. म्हणून आम्ही रिक्षा घेऊन काळ्यारामाशी आलो. रामाला मी गेल्या वीस वर्षात नमस्कार केला नव्हता. वाटले त्यानेच हा योग घडवून आणला असावा.

प्रथम कल्हईवाला शोधला. बरोबर मंदिरासमोरच आहे. त्यामुळे पटकन सापडला. तो गेला होता जेवायला. त्याची बायको होती. म्हातारी...... माझ्या आईपेक्षाही काहीशी मोठीच होती. तिने आम्हाला लांबूनच हेरले असणार. महा बेरकी म्हातारी.
आम्ही जवळ गेलो तशी, " या गं बायांनो. अग ऊन किती तापलया. वाईच टेका हिथे..... काय काम काढलसां? " टेका म्हणे..... कुठे कोण जाणे. अवतींभोवती तर काहीच दिसेना. आईने लंगडी दाखवली. " मग कितीला घेतली गो? अगो बाय मला आधी न्हाय का बोलायचे मी स्वस्तात आणून दिली असती. " वगैरे बोलून आम्ही कशा फसलोय हे दाखवून झाले. मग बोलता बोलता आईला, " तू कुठची गो माय? अमूक तमूकच्या वाड्यात यायची का तू लहानपणी? अग म्या पाह्यलयं ना तुला तिथे. चिमुरडी परकरी प्वार व्हती बरं का गं तुझी माय त्यावख्ताला. " हे वर मला. झाले आमच्या मातोश्री लागलीच खूश. कुठल्या कुठल्या आठवणी जुळवू लागल्या दोघी. आईला म्हटले अग ती उगाच काहीतरी फेकतेय. तर आईचे, " असू दे गं. पण ती खुणा बरोबर सांगते आहे. " शेवटी मी त्या दोघींना पकडून लंगडीवर आणले.

" आत्ता देतो बघ तुला झ्याक कल्हई लावून. आमचा म्हातारा गेलाय जेवायला. येईल तोवर याकी रामाला जाऊन. कसं? "नाहीतरी उन्हात तापत तिच्या गप्पा ऐकण्यापेक्षा गाभाऱ्यात जाऊन रामाचे दर्शन मला घ्यायचे होतेच. पण जाण्या आधी कल्हईचे किती पैसे होतील ते सांग असे मी विचारताच म्हणाली, " पोरी अग तुझ्या मायेला विचार. कदी जास्त पैका घेतला न्हाय बाय. अग घेऊन कुटे जायाचं हाय. समदं हितच सोडून जावं लागतयां नव्ह का. लय हाव बरी नव्हं. तू असं कर दीडशे रुपये देऊन टाक. काय? " मी आणि आई एकाचवेळी ओरडलो..... " काSSSय? अग लंगडीची किंमत सहाशे आणि कल्हईचे दीडशे? वर रिक्शाचे शंभर होणार ते वेगळे. राहू दे बाई तुझी कल्हई आम्हाला नको. " तशी माझा हात धरून तिने, " बरं राहू दे तुजं बी नग आणि माजं बी नग... सव्वाशे देऊन टाक. या जाऊन तुम्ही. तोवर मी म्हाताऱ्याला पकडून आणते. " असे म्हणून लंगडी घेऊन ती तुरतुर चालू लागली.

आम्ही दोघी कपाळाला हात लावत काळ्यारामाला गेलो. गाभाऱ्यात आत उतरून गेलो. नमस्कार केला. मन प्रसन्न झाले. मग बसलो तिथेच ओवरीत. अर्ध्या तासाने परत आलो तर म्हातारी गायब. आता काय करावे असे विचार करत होतो तोच समोरून एक म्हातारं बाबा आमची लंगडी घेऊन आले. " तुम्हीच का त्या बाया? हां म्हातारी म्हनली म्या. परं म्या आधीच सांगून ठेवत्योय... पन्नास रुपये घेईन. एक पैका पण कमी घेनार नाय. नंतर उगा किचकिच नगं, बघा जमतंय का? " तोच त्यांची सून आली आणि म्हातारबाबांना ओढून बाजूला घेऊन गेली. काहीतरी कुचकुच करून दोघे परत आमच्याकडे आले.

मी लागलीच म्हटले, " चालेल बाबा. द्या पटकन लावून. " तसे ते म्हणे, " म्हातारीने भाव केलाय नग का तुमच्यापाशी. मग बोलल्ला न्हायित त्ये . ( आता यांनी काही बोलू तरी दिले होते का? ) तिने सव्वाश्ये सांगितल्येत ना. मग त्येवढेच लागतील. बोला हाय का मंजूर तर आत्ता भट्टी लावतोय. नाय तर राहू द्या. " अडला हरी झालेला ना आमचा...... गुमान सव्वाशे रुपये देऊन कल्हई लावून घेतली. वर कसे उघडपणे फसलो यावर म्हातारबाबांनी शिक्कामोर्तबही करून टाकले. मलाच ऐकवले, " आमची म्हातारी लय हुश्शार. तिने बरोबर तुम्हास्नी हेरलं. खरं तर पन्नास सांगतानाबी माझी जीभ जड झाल्याली परं हिने तर डायरेक्ट सव्वाशे...... हाय पक्की मुरल्याली. धंदा माणूस पाहून करावा हे बराबर उमगलंय तिस्नी. " येतो येतो मराठी माणसालाही धंदा करता येतो.

12 comments:

  1. हा हा हा...दोन्ही अनुभव सही आहेत...फ़क्त या पोस्टमध्ये तू जरा जास्त भरकटलीस...जास्त थंडीचा परिणाम वाटतं....:)
    आता एक काम कर..."दादर" वर पण लिहुन टाक...न राहता मी पण लिहिलं तुझा तर जन्मसिद्ध हक्क...घालवु नकोस...

    ReplyDelete
  2. दोन्ही उदाहरणं अगदी टोकाची घेतली आहेत , पण असे लोकं दररोजच भेटतात. अगदी हाच सेल फोनवर बोलण्याचा अनुभव मला पण मराठी माणसाच्या आलेला आहे. .. चांगलंच निरिक्षण केलेलं आहे.. :)

    ReplyDelete
  3. हेहे...अपर्णा एकदम बरोबर ओळखलेस तू.:)आणि ही सुरवात आहे थंडीची.आगे आगे और देखना हैं....:(
    हो गं ’दादर’ वर केव्हांतरी लिहायलाच हवे.

    ReplyDelete
  4. महेंद्र तुम्ही त्या आजोबांना भेटला असतात आणि त्यांच्या मुलाला तर तिथेच दोन टोके होती. धंदा कसा करावा आणि करू नये याचे उत्तम उदाहरण. बाकी म्हातारीने लय गंडवल राव.... हा हा.

    ReplyDelete
  5. सही ....अगं बाय काय भांडी घ्यायची तर हिथे तिते जायचं नाय बगा...थेट भांडीबाजारात जायचं वो...लगे हात दहीपुलावर कापडं घ्यायची...फुलबाजारात सोन घ्यायच...बोहोरपट्टीतून काय हवे नगो बगायचे....येता जाता लागणाऱ्या शेकडो मंदिरात पुन्य कमावायचं.....काय नासिकचा विषय काढलास सकाळी सकाळी....अपर्णाची गाडी बघ कशी दादरवर अडकली...तशी माझी नासिकवर घसरली!!!!!!!!
    बाकी पोस्ट फिरलय पण वळणंही सुरेख आहेत....दोन्ही उदाहरणं सुरेख.....अग माझा नवरा तर जुन्या नाशकातल्या दुकांनांमधे येतच नाही म्हणतो त्या उर्मटांशी मी नाही बोलत!!!!!!!!निवांत सकाळी दहा वाजता आपण जावे तर हे लोक दुकान झाडत असतात वर कसलीच घाई नाही तुम्हाला गरज आहे मग थांबा नाहितर निघा!!!!!!!!!!!!
    बाकी रामासमोरची म्हातारी सही!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  6. पोपट झाला का बकरा केला?
    का मामा कोणी बनवून गेला?
    चुना लावला, का शेंडी लावली?
    असो वाचायला तरी चांगली पोस्ट गावली :)

    ReplyDelete
  7. प्रसाद मस्त झालीये चारोळी.....:)
    अरे एकदम सही गंडलो आम्ही. तेही उघडपणे. पुन्हा नको पण म्हणता येईना...उडायचे होते ना लगेच.

    ReplyDelete
  8. तन्वी एके काळी म्हणजे ८० सालातही कालिकेला जातो म्हटले की घरातले सगळे ओरडायचे.आणि आता कालिकेच्या कितीतरी प्रचंड पुढे नाशिक फोफावले. मेनरोडच्या आठवणी अजूनही आहेत.:)सांडव्यावरच्या देवीलाही नमस्कार करून आलतो त्याचवेळी.सरकारवाड्याची रयाच गेलीये. बाकी फुलबाजार अन सोनार यांचे गणित उलगडत नाय. तशी नाशकात आजकाल बरेच काही बदललेय म्हणा.
    अगदी खरेय अमितचे. माझा दुजोरा आहे. अग आमच्या मुंबईत पहाटे पाच पासून वर्दळ,अगदी अडीअडचणीला साखर, मीठ मिळतयं की.:)

    ReplyDelete
  9. पण त्या म्हातार बाबाचा नितळ स्वभाव तर नक्किच लक्षात आला.व्यक्ती आणि वल्ली मधलं पात्र म्हणुन सहज खपुन जाइल. आणि वर पुन्हा म्हातारीने तुम्हाला फसवलं... हे पुन्हा पुन्हा सांगुन डागण्या देणं म्हणजे तर........>!!!!
    बाकी पोस्ट खरंच खुपच मस्त झालंय..

    ReplyDelete
  10. महेंद्र अरे म्हातारबाबाने मस्त दमात घेतले मला व आईला. जणू काही आम्हीच त्यांना फसवत होतो.:D
    आणि म्हातारीने आईला काय मस्त घोळात घेतले होते...... हा हा.....आई अजूनही म्हणते बरं का...अग किती जुन्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आईचा हे म्हणतानाचा फुललेला चेहरा पाहीला ना की सव्वाशे रूपये वसूल होतात माझे.
    बाकी म्हातारबाबाने लावलेली कल्हई अजूनही शाबूत आहे बरं का. :)

    ReplyDelete
  11. hehehe bhari ha marathi manasa cha dhanda aata ch maza navara ne swata chi company suru keli aahe choti shi pan khup dhakdhuk aani vichar karun baghu ata kasa kay jamtoy marathi manas la dhanda :) -ashwini

    ReplyDelete
  12. आश्विनी अग होईल होईल सगळे नीट. अनेक शुभेच्छा व अभिनंदन!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !