जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, August 2, 2009

शेवटी करावेच लागले......


आज सकाळीच रोहनची ठाण्यातल्या मस्त मस्त ठिकाणांची खाण्याची पोस्ट वाचत होते. बटाटेवड्यांची चर्चा रंगली होतीच. माझ्याही आठवणीं व जिव्हा चाळवली गेल्याने काही जागा व चक्क फोडणीचे वासही येऊ लागले. सहा नंबरला-फास्ट लोकल मधून उतरता उतरता मागच्या जिन्याजवळच बटाटेवडे स्टॉल आहे. तुम्ही जर भुकेने घेरलेले असाल तर खाल्ल्याशिवाय जिना चढणारच नाही. हमखास नुकत्याच दिलेल्या लसणाच्या खमंग तडक्याचा वास आसमंतात दरवळत असतो. गरमागरम वडे तळणीत दिसत असतात. अशावेळी दुसरे तिसरे काहीही सुचूच शकत नाही. निमूट शरणागती, बस.


उकाड्याने घामाच्या धारा वाहत असोत किंवा जोरदार पावसाची सर कोसळत असो. ए. के. जोशी शाळेसमोरील मावशीची गाडी खुणावत राहते. दिवसभराची दमणूक, लोकलची हाणामारी मग भाजीपाला-किराणा करत आपण तिथवर पोचलो की भल्या मोठ्या कढईत पातळ कव्हरचे घरगुती वडे, मुगाची-मिरचीची, मिक्स भजी हाका मारून मारून बोलवत असल्याचे भास होऊ लागतात अन पावले आपसूक गाडीकडे वळतात. मिरची-मूग भजी बरोबर लसलशीत गरम वडा...........
. तृप्त.

सरस्वती मराठी शाळेच्या उजव्या हाताच्या गेटसमोर एक वडेवाले काका( इति माझा लेक- पहिली ते सहावी तो सरस्वतीमध्ये शिकलाय ) आहेत. शाळेची पोरे तर तुटून पडलेली असतातच परंतु आसपासचे सगळेच तिथे हमखास रेंगाळताना दिसतात. हे वडेवालेकाका दिवसभर नसावेत. शाळेच्या वेळातच मी पाहिलेय. लेक त्यांच्या ओली हिरवी चटणी व कोरडी लाल लसणाची चटणीवरही बेहद फिदा असे. अजूनही मायदेशात आलो की घर ठाण्यातच असल्याने वेळ मिळाला की हा पळतो वडा खायला.

तसे आमचा दादरचा सिंधीबाबा, छबिलदासचा मंजू (श्रीकृष्ण) हेही माझे फार आवडते वडेवाले. शिवाजीपार्कच्या चौकात ज्या पेट्रोलपंपावर बाँबस्फोट झाला होता त्याच्या बाजूलाच एक उडपी-तत्सम हॉटेल आहे. त्याच्याकडचा वडाही भन्नाट असतो. एकदा दुसरेच काही खात होतो अन आतून लसणाच्या खमखमीत फोडणीचा वास हॉटेलभर दरवळला. मग काय प्रत्येकाने पोटे भरलेली असतानाही एक एक प्लेट वडा खाल्ला. कुंजविहार, राजमाता यांचे वडे अतिशय प्रसिद्ध असले तरी मला व्यक्तिशः ते तितकेसे आवडत नाहीत. फारच सोडा जाणवतो शिवाय वरचे आवरणही फारच जाड असते. हे वडे मला घाऊक सरबरीत प्रकारातले वाटतात. तीस वर्षांपूर्वी दादर वेस्टला फुलबाजारातील मामा काणेंचा वडा अत्यंत प्रसिद्ध होता. लोकं कुठून कुठून खरेदीला येत व मामा काणेंचा वडा व पणशीकरांचे पीयुष पिऊनच घरी परतत.

दिवसभर हे असे कुठले कुठले वडे मनात घोळत राहल्याने संध्याकाळी तो खाणे अपरिहार्य होतेच. इथे आपल्यासारखी आयते खायला मिळण्याची चंगळ नसल्याने अपना हाथ जगन्नाथ चा मार्ग अवलंबून वडे बनविले अन हाणले. आता भरल्यापोटी ही पोस्ट टाकतेय. काय, वडे पाहून खावेसे वाटू लागले ना?

9 comments:

  1. किर्ती कॉलेजचा चुरापाव, आणि वडापांव, किंवा फाउंटनचा ( त्या उसाच्या रसाच्या गाडी जवळचा- ज्यावर सुनिल गावस्करचा फोटो लागलाय तो) आणि नविनंच सुरु झालेला शेजवान वडापाव, बटर वडापाव, -जम्बोवाल्याचा..
    ...........हुश्श!!! किती जागा आहेत नां? ... माझी सगळ्यात फेवरेट किर्ती कॉलेजचा वडापांव. ठाण्याला गेलात की कधी तरी मामलेदारची मिसळ खायला पण मस्त असते.आता भुक लागली, दिवसभर वेळ नाही एका ट्रेनिंगला बसायचंय एच आर च्या.. :(

    ReplyDelete
  2. महेंद्र,अरे ती मामलेदाराची मिसळ म्हणजे नचिकेतची जीव की प्राण. पण माझी हिमंत नाही होत. एकदा मिडीयम ट्राय केली तर जीव घाबरा झाला माझा. ताकावर ताकाच्या वाट्या प्यायले तेव्हा कुठे.....:D

    किर्ती कॊलेजचा चुरापाव व वडापाव मीही खाल्लाय. माझे माहेर तिथेच ना.( बॊम्बे फिल्म लॆबजवळ )चांगला असे. आता तू ट्रेनिंगमध्ये दिवास्वप्ने पाहात राहणार बहुतेक.
    आभार.

    ReplyDelete
  3. मला वाटलच होते.. उदया आलो कामावर की असा काही पोस्ट बघायला मिळणार आहे मला. हा..हा.. मस्त. इकडे जीव जळतोय माझा. अजून ५ दिवस आहेत हो. बरं तो ए. के. जोशी शाळेसमोर आहे तो आपटे वडेवाला ना.. तो पण मस्त आहे एकदम मस्त घरगुती वडे.

    बाकी दादर - शिवाजी पार्कला 'जिप्सी'ला सुद्धा मस्त ग्रिलड वड़ा मिळतो. आणि महेंद्र दादा म्हणतोय ना फाउंटनचा वड़ा तो तर मी दर शनिवारी किंवा रविवारी खायचो. N.C.C. यूनिट ला जाताना.

    वा सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या... :D

    ReplyDelete
  4. 'खाण्याला कमी नाही ठाण्याला'च्या तिसऱ्या भागात 'मामलेदार मिसळ'वर येतो आहेच मी... हाहा.. काही भन्नाट अनुभव आहेत तिकडचे.

    बाकी पुढची ५ दिवस मी सुद्धा दिवास्वप्न बघणार आहे ... :(

    ReplyDelete
  5. रोहन, कमाल झाली...जिप्सीच्या इतक्या जवळ राहून व अनेकवेळा तिथे जाऊनही तू म्हणत असलेला ग्रील वडा काही खाल्ला नाहीये. कदाचित हा गेल्या पंधरा वर्षात सुरू झाला असावा.Next time.
    ओह्ह...आपटे नाव आहे का त्यांचे, बरं बरं.
    :)

    ReplyDelete
  6. Next visit la Gokhle Road varil Durga cha Vada-pav test kara....1dum Best Asto ;)

    ReplyDelete
  7. प्रसन्ना स्वागत व आभार. नक्की नक्की. दुर्गाचा म्हणजे राजावत कडून स्टेशनकडे निघालो की लगेच- पूर्वीच्या कुंदन ज्वेलर्सच्या शेजारचा म्हणताय का?

    ReplyDelete
  8. yes,yes toch....aani barobar limbu sarbat pan try kara ;)

    ReplyDelete
  9. प्रसन्न, नक्की नक्की ट्राय करेन. आम्ही ठाण्यात राहायला आलो त्यावेळी तिथे वडा खाल्ल्याचे आठवतेय, पण त्याला आता फार वर्षे झालीत तेव्हा पुन्हा एकदा खायलाच हवा.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !