जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, August 18, 2011

भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे

पानात डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून लोणचे, चटणी, कोशिंबीर प्रकार सगळ्या घरांमधे हटकून आढळतात. कोशिंबीरीचेही मी समजू शकते परंतु भाजीला पर्याय म्हणून भाजीसारखे लोणचे खाणारी बरीच जण आहेत. कच्च्या करकरीत कैरीचे ताजे लोणचे, करवंदाचे, भोकराचे, उसळी मिरची, लिंबू+मिरची, उपासाचे गोडाचे लिंबाचे लोणचे, आंबोशी आंब्याचे बेगमीचे लोणचे, ताज्या भाज्यांचे चटकन संपणारे फेसून मोहरी लावलेले लोणचे ( फारच सुंदर लागते हे चवीला... आणि मस्तकात चढतेही झकास ), मिठाच्या पाण्यात मुरवत घातलेल्या बाळकैर्‍या, आवळे अती उत्साही कोणी असल्यास व प्रचंड आवडते म्हणून कार्ल्याचे, माईनमुळ्याचे, अखंड रायआवळ्य़ांचेही. लहानपणी केव्हांतरी मामाने तिवारीकडच्या भरल्या लाल मिरच्यांचे लोणचे आणले होते. तसे माझे व लोणच्यांचे फारसे सख्य नाही. भाज्यांचे ताजे लोणचे वगळता आंबट लोणची प्रकार भावत नाही मला. कसे कोण जाणे पण या मिरच्या मात्र खूप आवडल्या, मनात घर करून राहील्या. गेल्यावेळी कोरम मॉल ( ठाणे ) मधे तिवारीचे ( गिरगावातल्या ) दुकान आले आहे कळताच धाव घेतली. बरीच गर्दी होती, नेहमीचे पदार्थ दिसत होते पण लोणची दिसेनात. म्हणून तिथे असलेल्या दोघांना विचारले तर त्यांनी कानावर हात ठेवले. खरे तर त्यांना फारशी माहीतीच नव्हती आणि इंटरेस्टही नव्हता. गिरगावात जाऊन आणायचा मोह होत होता पण तितका वेळ नव्हता. पुढच्यावेळी पाहू म्हणून नाद सोडला खरा पण इथे आल्यावर ’ एशियाना ’ ( एशियन मार्केट ) मधे अचानक लाल मिरच्या दिसल्यावर मात्र राहवले नाहीच.

साहित्य :
दहाबारा ताज्या लाल मिरच्या
चार चमचे बडिशोपेची पूड
तीन चमचे लाल तिखट
चार चमचे गरम मसाला
दोन चमचे मोहरीची पूड
दोन चमचे मेथीचे दाणे भाजून पूड करून
दोन चमचे धण्याची पूड
पाच चमचे मीठ ( कोरडे )
दोन मध्यम लिंबाचा रस
दोन चमचे आमचूर
गरम करून थंड केलेले तेल एक कप







कृती :

लाल मिरच्या स्वच्छ धुउन पुसून कोरड्या कराव्यात. देठ काढून चमच्याच्या मागच्या टोकाने आतल्या बियाही काढून टाकाव्या. एका ताटात बडिशोपेची पूड, लाल तिखट, गरम मसाला, मोहरी, मेथी, धण्याची पूड, मीठ, आमचूर घेऊन त्यात लिंबांचा रस व चमचाभर तेल घालून सगळे मिश्रण चांगले एकजीव करावे. नंतर मिश्रण मिरच्यांमधे घट्ट ( ठासून ) भरावे. एका कोरड्या बरणीत या भरलेल्या मिरच्या ठेवून वरून गरम करून थंड केलेले तेल ओतावे. मसाला थोडासा उरलेला असेल तर तोही वरून त्यात घालून बरणीचे झाकण लावून हलवून ठेवावे. दर दोन दिवसांनी बरणी हलवावी म्हणजे तेल चांगले मूरत जाईल. साधारणपणे महिनाभराने मिरच्या खाण्यायोग्य होतील. या मिरच्या करायला फारच कमी वेळ लागतो मात्र नंतर महिनाभर धीर धरायला हवा. अर्थात या धीराचा मोबदला पुरेपूर मिळतोच. अतिशय चविष्ट लागते हे लोणचे. बडिशोपेचा एक वेगळाच स्वाद, मधूनच मेथीचा किंचित कडवटपणा, आमचूर व लिंबामुळे आलेली चटकमटक चव... नेहमीच्या लोणच्यांपेक्षा एकदम हटके व चविष्ट.



टीपा :
कच्च्याचं बडीशोपेची पूड करावी. भाजून करू नये. लगेच स्वाद बदलून जाईल. मोहरीचीही पूड न भाजताच करावी. मात्र धण्याची पूड धणे भाजून घेऊनच करावी. मेथीची पूड चुकूनही न भाजता करू नये. प्रचंड कडू होते.
गरम मसाला आयत्यावेळी करून घालायचा झाल्यास लवंगा, मिरी, दालचिनी, तमालपत्र, दगडफूल, चक्रीफूल, जिरे, शहाजिरे वेगवेगळे भाजून घेऊन कोमट झाल्यावर त्याची पूड करावी.
संपूर्ण कृतीत पाण्याचा अंश बिलकूल असता नये. लोणच्याला त्यामुळे बुरशी धरू शकते.
सगळे जिन्नस हाताने कुस्करून चांगले एकजीव करावेत. दोन लिंबाचा रस या सगळ्यात जिरून जातो.
दोन तीन दिवसांनी बरणी हलवायला विसरू नये.
’ चहाचा चमचा ’ हे प्रमाण घ्यावे.

13 comments:

  1. :) मस्त ! दिसतंय पण काय सही !
    इतके मस्त मस्त पदार्थ करतेस...तर आता मी ठरवलंयच ! पुढल्यावेळी तिथे आले की तुझ्याकडे राहिल्याशिवाय अजिबात परतणार नाही बघ मी ! :D

    ReplyDelete
  2. अनघा, त्यानिमित्ताने का होईन येशील तर खरी. :) आणि गेल्यावेळची ठाण्याची वारी तुझी उधार आहे बरं का... काय म्हणशील ते खिलवेन. तू ये फक्त... :)

    ReplyDelete
  3. मला ती बाटली हवी :)

    ReplyDelete
  4. गौरी, अगं जरासा हात पुढे कर की... :D:D

    धन्सं!

    ReplyDelete
  5. बयो किंवा बये म्हणते हवं तर...हे सगळ आम्हाला बनवून द्यायला तुम्हे यहा आना पडेगा...
    रच्याक या मिरच्या घोवाला नक्की आवडलीत अश्या दिसताहेत...(आणि बरणी पण मस्त आहे...)

    ReplyDelete
  6. @अनघा +१
    @ भानस,
    ताई मजा आहे बाबा तुझ्या घरच्यांची !!! :D

    ReplyDelete
  7. अपर्णा, अगं खयाली पुलाव पकवलेत ना आपण... :D:D तेव्हां पाहू क्या क्या करनेका... :)

    धन्यू!

    ReplyDelete
  8. श्रीराज, कधीमधी माझीही मजा असते. आयतं खिलवतो नचिकेत... :)

    ReplyDelete
  9. >> मला ती बाटली हवी :)

    बाटली गौरीला दे आणि मला बाटलीतलं लोणचं :)))

    ReplyDelete
  10. हेरंब, मी आधी क्लेम लावलाय ... त्यामुळे लोणच्यासकट बाटली माझी ... श्रीताई तुला दुसरी बाटाली भरून बनवून देईल ना :D

    ReplyDelete
  11. Maydeshi aaley... tujha contact no mail kar mhanje bolu :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !