जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, July 13, 2010

चिडचिडलेला दिवस अन घुसमटलेली, विकल रात्र......

कालपासून नुसते चाकावर गरगरतो आहोत. सकाळपासून एका मागोमाग एक लागलेल्या कामांचा फडशा पाडत शेवटी कसेबसे आम्ही संध्याकाळी पाचाला घर सोडले. शिकागो गाठेतो दहा वाजून गेले. सडक बांधकामाने तर अगदी पागल बनवून सोडलेय. पाच मिनिटाचा रस्ताही सरळ नेटका दिसत नाही. पाहावे तिथे केशरी पिंपे मन मानेल तशी घुसखोरी करत उभारलेली असतात. काही वेळा अगदी निगुतीने चादरीला टीप घालावी तशी एका रेषेत मांडून ठेवलेली. की मारा स्पीडला ब्रेक आणि आणा काटा एकदम ४५ वर. हा फ्लोरोसंट कलर भसकन डोळ्यात घुसतोच. त्यातून कामगार असले की गाडी अजूनच हळू चालते. इतके सारखे बांधकाम करूनही एक 'रोड ' धड असेल तर शपथ. मिशिगनमध्ये कुठल्याही सडकेवरून गेलात की धडामधुडूम व्हायलाच हवे. दोन दिवसात हाडे खिळखिळी. नंतर सवय होऊन जाते खरी.

मिशिगन म्हणजे ' मो-टाऊन ' ( मो-टाऊन ही उपाधी खरी मिशिगनमधील प्रचंड प्रसिध्द म्युझिक इंडस्ट्री व कलाकारांना मिळालेली आहे. एकदा यावर लिहायलाच हवे. ) तीनही बड्या मोटार कंपन्या इथेच. एकेकाळी मोठ्ठा दिमाख असलेले हे राज्य गेल्या काही वर्षांपासून पार झोडपले गेलेय. फोर्ड, क्रायस्लर व जीएम या तीनही बड्या धेंडाच्या झालेल्या पडझडीमुळे संपूर्ण मिशिगनची वाटच लागली. आता हळूहळू किंचित किंचित डोके वर काढतेय खरे पण मूळ पदावर यायला बहुदा सात-आठ वर्षे कमीतकमी. मला नेहमी वाटते, नेमके या राज्याचेच रस्ते इतके खड्डे-खुड्ड्यांचे का? का यामागेही याच मातब्बर कंपन्य़ांचा हात तर नसेल?

आजचा दिवस शिकागोत कामात कुठे संपला कळलेच नाही. कुठल्याही देशाच्या दूतावासात जाणे म्हणजे शिक्षाच. सरकारी कायदा गाढव असतो आणि कागदपत्रे संपूर्णपणे बिनडोक असतात याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर अगदी योग्य जागा. गंमत म्हणजे मी स्वत: १८ वर्षे सरकारी नोकरी केलेली असल्याने व अश्या अनेक गाढव नमुन्यांची अनेकदा भलामणही केलेली असल्याने धड मनापासून शिव्याही घालू शकत नाही. कितीही चिडचिडले तरी तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी स्थिती होत असल्याने, होणारा छळ मुकाट सोसत तटस्थ राहायची पराकाष्ठा करत राहते.

या सगळ्या वर्षांच्या गाढवपणातून एक जबरी धडा मी शिकलेय. " सरकारी कागदपत्रे कितीही हास्यास्पद-बिनडोक वाटली तरी त्यांची काटेकोरपणे व तत्परतेने पूर्तता करावी. चुकूनही कायदा कसा चुकीचा आहे व किती मूर्खासारखे हे फॉर्म्स आहेत. कसले दाखले-पुरावे मागता आहात? असे बोलू नये. उलट स्वत:ला सरकारी कार्यालयाची पायरी चढण्याआधीच दहा वेळा सांगावे, काहीही झाले तरी मी चिडणार नाही व असे का? हे कशाला आणखी हवेय? कोणी मूर्खाने कायदे केलेत? असे प्रश्न मनातही येऊ देणार नाही..... मोठ्यांदा विचारणे तर सोडाच. उगाच स्वत:चे डोके कातळावर कशाला फोडायचे नं? त्यापेक्षा कागदपत्रे मास्टर होण्याचा चंग बांधायचा. मग पाहा, डोक्याला मुळी कसलाच ताप होत नाही. चटचट फॉर्म्सचा फडशा पाडत सुटायचे. "

संयम ठेवून, म्हणतील तो कागद हाजीर करूनही शेवटी आज 'कागदपत्रे ' फक्त सुपूर्त झाली. प्रत्यक्षात हातात काहीच मिळाले नाही. आता फक्त वाट पाहायची. किती काळ.... कोण जाणे? किमान आठ ते दहा आठवडे....... त्यापुढे किती ते विचारायचेही नाही. दूतावासातील गदारोळात, एक जण रडकुंडी येऊन विचारताना ऐकले, " दीड वर्षे झाली वाटच पाहतोय. दरवेळी काहीतरी चुकतेच नाहीतर हरवतेच. आता मला नकोच आहेत ते कागद. बस झाले. माझे पैसे तरी परत द्या. " सरकार दरबारी जमा झालेले पैसे परत मागतंय हे खुळं. ती खिडकीतली बाईही भूत बघितल्यासारखी अवाक होऊन पाहत होती.

जेव्हां आपल्या आवाक्यातून, शक्यतेच्या परिघातून गोष्टी दुसऱ्याच्या कक्षेत, अशक्यता व अनिश्चिततेच्या पारड्यात झुकतात अशावेळी जितके शक्य असेल तितक्या चटकन मनाला अलिप्त करायचे. मुक्त करायचे. मी इतकी मेहनत करून, यातायात करून सगळी पूर्तता तर केली आहे पण आता हे लोक माझा फॉर्म हरवणार तर नाहीत नं? किंवा मी लावलेल्या फोटोतलाच एखादा गहाळ झाला तर? एक ना दोन.... नुसती शंकांची भुतावळ. हे मोहोळ लगोलग हटवून टाकायचे आणि ' आल इज वेल ' म्हणत बिनधास्त व्हायचे. हे मी मारे सांगतेय पण च्यामारी इतके सहजी जमले असते तर काय हवे होते. डोके नुसते भणभणलेले. कधी नव्हे ते आज मी चक्क दहा वेळा ' आल इज वेल ' असे जमेल तितका घसा खरवडून ओरडत शिट्टी मारायचाही प्रयत्न केला. शिट्टीचे जाऊ दे.... ती काही वाजली नाही पण मस्त वाटले. नचिकेतची थोडीशी करमणूकही झाली. मग त्याने कचकचून दोन तीन शिव्या हासडत खऱ्याखुऱ्या शिट्ट्या मारल्या. वातावरण मस्त सैलावले. दूतावासाला डोक्यातून वजा केले अन परतीचा प्रवास सुरू केला.

अडीच तासांनंतर जॅक्सनजवळ आलो तर रस्ता एकदम 'मस्काच ' झाला. हल्लीहल्लीपर्यंत इथेही ती आडवीतिडवी पसरलेली पिंपे होतीच की. झाले वाटते काम पुरे इथले. गाडी रोडवरून पळतेय की हवेवर उडतेय असा संभ्रम पडावा इतका गुळगुळीत व चकचकीत रस्ता. सही आहे. अरेच्या! इथे जोरदार पाऊस पडलेला दिसतोय की. नुकतीच कात टाकलेला काळाशार रस्ता या पावसामुळे न्हाहून निघाला होता. रस्त्याच्या तकाकीत कडेच्या दिव्यांचा पिवळसर व गाड्यांच्या टेललाईटचा लालभडक रंग एकमेकात मिसळत रात्रीचा डोह थोडा ढवळत होते. दोन मैल जेमतेम गेलो असू तोच अचानक धुक्याचे लोटच्या लोट चहुबाजूने अंगावर येऊ लागले. मैलो न मैल पसरलेली शेती, रस्त्याच्या दोन्ही कडांनी दुतर्फा लागलेले आकाशाला गाठणारे ख्रिसमस ट्रीज, मेपल, ओक यातले काहीच दिसेना. जणू ती झाडे तिथे कधी नव्हतीच अशी अंतर्धान पावलेली. जिकडे पाहावे तिथे धुकेच धुके. ढगांचे भलेथोरले पुंजके अलगद रस्त्यावर उतरत होते. उडत, बागडत आमच्या कारवर क्षणभर रेंगाळून, आम्हाला त्यांच्या कवेत वेढून निमिषात दुसऱ्या ढगाकडे अल्लाद सोपवून पसार होत होते. या गडद धुक्याच्या लाटेवर स्वार होऊन तरंगत असतानाच एसडी कार्डातून लताचे स्वर्गीय स्वर ओघळू लागले....... झूम झूम ढलती रात..... पाठोपाठ, ये नयन डरे डरे ..... लड उलगडू लागली...... नयना बरसे रिमझीम......... त्या स्वरांत हरवत आम्ही मूक झालो........ दिन ढल जाये रात नं जाय... तू तो न आये तेरी याद सताये..... स्वरांचा कब्जा वाढत होता........ आंसू भरी हैं ये जीवनकी राहें, कोई उनसें कह दें हमें भूल जाये........ आठवणींचे जपमाळ हलकेच हातात आली........ भूली हुई यादों मुझे इतना ना सताओं, अब चैन सें रहने दो मेरे पास न आओं..........

पावसाने सचैल न्हाऊन कात टाकलेला काळाशार रस्ता, त्यावर लोळण घेणारे, आम्हाला कुरवाळणारे, लडिवाळ स्पर्शणारे - मिठीत घेणारे गडद धुके, पावसामुळे हवेला आलेला थंडावा त्याने मधूनच अंगावर उठणारी शिराशिरी, गात्रांना-मनाला सुखावणारा मृदगंध अन त्यात लताचे हृदयाला आरपार चिरत जाणारे स्वर..... पुढचे दोन तास गाडी मी चालवली का ती आपोआप माझ्या मनाबरोबर धावत होती........ कदाचित तीही माझ्यासारखीच भान हरपून, स्वत:ला -दुनियेला विसरून गेली असावी.

एका मागोमाग एक गाणी वाजत होती..... नकळत आठवणींच्या डोहात मी स्वतःला झोकून दिले..... काही विरलेली नाती, दुरावलेले स्पर्श, अनुभवलेले विलक्षण क्षण, चुकूनही पुनश्च ओठी न आलेले शब्द.... आवर्तनावर आवर्तने.... डोहाचा तळ जागा झाला.... ढवळला गेला.... जातच राहिला....... लता गातच होती..... आर्ततेने..... विकलपणे.... वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब हैं....... मला घुसमटवत, हुंदकवत...... सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे.........

25 comments:

  1. ahem ahem.....काहि खरे नाही ...श्री......[:फ]...........तु येच आता याहु ला..बघ कशी पिडते तुला.........[:)]

    ReplyDelete
  2. पहीले ४-५ पॅरा भारतातली वर्णने वाटली...

    ReplyDelete
  3. तुझ्याबरोबर मला देखील चिरंतर बरोबर रहाणारी ती गाणी ऐकू येऊ लागली.
    काही नवी गाणी सुंदर असतात परंतु अशी अमर नसतात.
    नाही का?
    :)

    ReplyDelete
  4. आनंद पत्रे +१
    बाकी गाणी अल्टिच!

    ReplyDelete
  5. उमे, नो प्रॉब्लेम. आपके लिये तो जान हाजीर हैं.:P

    ReplyDelete
  6. मुग्धा, धन्यू गं. बरेच दिवसांनी दिसलीस... :)

    ReplyDelete
  7. हा हा... आनंद, अंदाज पर्फेक्ट आहे तुझा. पण हे असेच पेशन्स ट्राय करणारे अनुभव कुठेही गेलास तरी येतीलच.:D

    ReplyDelete
  8. खरेच गं अनघा. कल की रात कुछ अजीब थी.... :)त्या अमर शब्द व स्वरांबरोबरच माझे ते सारे क्षण अमर करून गेली.

    ReplyDelete
  9. विद्याधर, अरे तिथे चाललेला न भूतो न भविष्यती प्रकार पाहून मती गुंगच झालीये. लोकं इतके अचाट व तद्दन वेडगळासारखे प्रश्न कसे विचारू शकतात???

    मला त्या दूतावासातील पोरींची खरेच खूप कणव वाटली. बिचा~या दिवसभर हजार लोकांच्या नानाविध शंकाकुशंका, वादविवाद व हास्यास्पद समजुतींना कश्या तोंड देत असतील. :(

    माहोल ही कुछ ऐसे बना था की ही अजरामर गाणी पुन्हा एकवार मनाला स्पर्शून-व्याकूळ करून गेलीत.

    ReplyDelete
  10. recently amhi pun tya keshri dabyanchya adthalyatun jaun alo...watag yeto....navin raste matra hawese wattat.........ani tya officemadhle lok janu oradnyasathich apan ahot ase samajtat..........

    MAdhuri

    ReplyDelete
  11. सही सही.. तुझ्या कलेक्शन मध्ये मस्त मस्त गाणी दिसताहेत..

    ReplyDelete
  12. श्री ताइ गाण्यांच कलेक्शन मध्ये मस्त आहे....

    आप+१..२...३..:)

    ReplyDelete
  13. माधुरी, अगं या रोड कंस्ट्र्क्शन ने तर अगदी वात आणलाय. आजकाल कुठलाच रस्ता केशरी पिंपावीना सापडतच नाही. गंमत म्हणजे शिकागोत शिरताना पंधरा मिनिटात तीन वेळा टोल नाका येतो आणि एकंदरीत सहा डॉलर द्यावे लागतात. ते सगळे रोड इतके भयंकर हॉरिबल आहेत नं... की इतके पैसे कशाला घेतात तेच कळत नाही.

    आणि दूतावासाबद्दल आणि एकंदरीतच परिस्थितीबद्दल काय बोलायचे.... :D

    ReplyDelete
  14. आहेत थोडीफार.:) हेरंब.... धन्यू.

    ReplyDelete
  15. योगेश, मला कमीतकमी वाद्ये वापरलेली व शब्दांचा अर्थ स्वरातून मनात झिरपणारी गाणी भावतात. :) धन्यू रे.

    ReplyDelete
  16. अरे सरदेसाई,
    तुमचा ब्लॉग म्हणजे अलिबाबाची गुहाच आहे की ! किती प्रकार आणि किती सुंदररीत्या मांडलेत ! जरा निवांतच आस्वाद घेत घेत सगळे वाचणार आता.
    खूप धन्यवाद !
    स्वाती आंबोळे च्या ब्लोगवरील कविताही एकदा जरूर पहा -
    www.paarijaat1.blogspot.com
    शशांक

    ReplyDelete
  17. शशांक,मन:पूर्वक दिलेल्या अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.आशा आहे तुम्हाला आवडेल.

    स्वाती आंबोळेंच्या कविता जरूर वाचून पाहते.:)

    ReplyDelete
  18. वरील सर्वांशी सहमत.
    सरकारी कामावरुन ’मंत्रालयात हत्ती’ ची गोष्ट आठवली. :)
    गाणी अल्टीमेट आहेतच!

    ReplyDelete
  19. लिखाणात मधेच चौकोन दिसतो ते काय आहे? तिथे दुवा द्यायचा होता का? आत्ताच वाचायला सुरु केल्याने अजून इस्टाईल समजली नाही, पण जे आहे ते झकास वाटले. सरकारी कायदे लोकांना जमीनीवर ठेवण्या करताच असतात, पुरषांना गळपट्ट्याची गाठ ढिली करायला लावतात. बायकांना नवर्‍या शिवाय अजून कोणीतरी मूर्ख आहे ह्याची प्रचिती देतात.

    ReplyDelete
  20. रानडेकाका, ब्लॉगवर स्वागत आहे व अभिप्रायाबद्दल धन्यवाद. :)

    तो चौकोन दिसतोय तिथे हसरा स्माईली टाकलाय.तुमचे शेवटचे वाक्य एकदम भारी...:D.

    ReplyDelete
  21. मीनल, धन्यू गं. ती कथा मस्तच होती.

    ReplyDelete
  22. तिथे पण असे रस्ते आणि बिनडोक कागदपत्र हयांचा त्रास आहेच का... काही सरकारी सोपस्कर खरच इतके हास्यास्पद असतात कि तिथे आपल्याला गाढवासारख वागण्याशिवाय पर्याय नसतो... बाकी गाणी खरच भारी आहेत...

    ReplyDelete
  23. long ride + favorite music = समाधि |-)

    ReplyDelete
  24. देवेंद्र, अरे काही विचारू नकोस. इतका रद्दड प्रकार चालतो ना... :(

    गाणी अप्रतिमच आहेत.
    आभार.

    ReplyDelete
  25. सौरभ +१००... :)

    धन्यू रे.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !