जाता जाता एक नजर इथेही........

Monday, February 22, 2010

सहज घडलेला संवाद अन रेंगाळणारे प्रश्न ....

मायदेशी जाताना एकदा अ‍ॅमस्टरडॅमवर साडेचार तासांचा हॉल्ट होता. पहाटे साडेपाचला विमान पोहोचले तेव्हा विमानतळावर जरासा शुकशुकाटच होता. आमच्या फ्लाईटमधलेच बावीस-पंचवीस प्रवासी, ज्यांना पुढे मुंबईला जायचे होते त्यांचीच काय ती गर्दी आमच्या व आसपासच्या चार गेट्स मिळून होती. हळूहळू विमानतळ जागा होऊ लागला तोवर थोड्या ओळखी करून घेऊन तीनचार ग्रुप्स तयार झाले. गप्पांना रंग चढू लागला.

प्रत्येक जण मनात जाणून असतो, आज भेटलेली माणसे पुन्हा भेटण्याची शक्यता फारच कमी आहे. आधीपासून ओळख नसते आणि पुढे फारशी टिकणार-वाढणार नसते. क्वचित एखादा अपवाद. त्यामुळे व नुसते बसून वेळ कसा जाणार म्हणूनही बोलण्यात खंड पडत नव्हता. तसे विषय नेहमीचेच. कुठे राहता, काय करता, घरी कोण कोण आहे, कुणाकडे चालला आहात? वगैरे. म्हटले तर साधे-निरुपद्रवी म्हटले तर ओघाओघात बरीच माहिती मिळू शकेल असे. कोणी सावध पवित्रा घेऊन बोलत होते. काही जण, प्रश्नांना सहजी बगल देत होते. तर काही विचारणाऱ्यालाच प्रतिप्रश्न विचारत होते.

मी ज्या ग्रुपमध्ये बसले होते त्यात मुंबई - पुण्याचेच, वेगवेगळ्या वयाचे लोक होते. तीन जोडपी होती. एक अगदी तरुण होते. लग्नाला दोनच वर्षे झालेली होती. आल्यापासून प्रथमच मायदेशी जात होते त्यामुळे कधी एकदा पुण्याला आपापल्या घरी पोहोचतो असे त्या दोघांनाही झाले होते. बरोबरच वाचलेत, " आपापल्या " च लिहिलेय. ते दोघे पुण्याला पोचताच तो त्याच्या आईकडे व ती तिच्या आईकडे जाणार होती. तिचा नुसता चिवचिवाट चालला होता. तोही मित्रांबरोबर कसा पूर्वीसारखी धमाल करेन च्या नादात होता. दोघांनीही जोरदार प्लॅन्स आखलेले. ट्रेकिंग, सिनेमे, रात्र रात्र कट्ट्यावर जागरणे, खादू-पिदू पार्ट्या. गोव्याला मात्र दोघे मिळून चार दिवस जाणार होते. बोलता बोलता त्यांनी प्रेम कसे जमले- हिने कसे मला तंगवले, मग दोघेजण सहा महिने कसे बोलत नव्हतो पासून अगदी हनीमूनच्याही गंमती सांगून मोकळे झाले. त्यावर आम्ही सगळ्यांनी जाम खेचली त्यांची. खूपच मजा आली.

दुसरे जोडपे ' आजी-आजोबा ' होते. लेकाकडे सहा महिने राहून परत निघाले होते. मुंबईतच-सायनला राहणारे. दोघांनाही आपल्या घरी पोचून कधी एकदा गोकुळच्या दुधाचा आले घालून केलेला चहा पितो असे झाले होते. आजींचे सारखे चालू होते, " कसला गं तुमच्या त्या नीळ्या बुचाचा पांचट चहा, शी.... अगं, लाल बुचाचे दूधही आणून पाहिले हो. उगाच तोळामासा फरक. समाधानच नाही. आपल्या गोकूळच्या दाट दुधाचा चहा म्हणजे अमृत आहे बघ. " अमेरिका त्यांना आवडली होती पण फक्त थोड्या वास्तव्यासाठी. कायमचे राहण्याची त्यांची बिलकुल तयारी नव्हती. आजोबा तर जास्तच वैतागले होते. त्यांना एकट्याला फारसे कुठे जाता येत नसल्याने सारखे मुलावर नाहीतर सुनेवर अवलंबून राहावे लागत होते. त्याची त्यांना फार कटकट झाली होती. वैताग आहे नुसता, साधा पब्लिक ट्रान्स्पोर्ट नाही या अमेरिकेत. आमच्या मुंबईत या म्हणावं, हात दाखवला की रिक्षा थांबतेय. बस-ट्रेन्स नुसता सुळसुळाट. अग, कुठून कुठेही कसे पटकन जाता येते. जीव उबला माझा. आता गेलो ना घरी की पहिला बाहेर पडेन आणि एकटाच मस्त चक्कर मारून येईन.


तिसरे जोडपेही ज्येष्ठ नागरिकच होते पण साठीतले. अजून नोकऱ्या सुरू होत्या. महिनाभरासाठीच लेकीकडे आले होते. दोघांनाही ऑफिसचे वेध लागले होते. रोटरी, जॉगिंग क्लब, मित्रमंडळ, विकांताच्या मैफिली सगळ्यांची आठवण काढत होते. मी आणि अजून दोन माझ्यासारखेच एकटे प्रवास करणारे. त्यातला एक एम.एस. करत होता आणि दुसरा पस्तिशीचा, लग्न करण्यासाठी निघालेला. म्हणत होता, " निघायच्या आधीच आईने मोठी यादीच तयार ठेवली आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात त्याचा फडशा पाडून, मुलगी पसंत करून शक्य झाल्यास लग्नही उरकायचेय. " आता लग्न ही काय उरकायची बाब आहे का? त्यातून ते उरकून लगेच अमेरिकेत येण्यासाठीच्या तिच्या सोपस्काराला लागायचे. म्हणजे या दोघांना एकमेकांची मने जुळणे वगैरे सोडाच पण साधी जुजबी माहितीही होणार नव्हती. पंधरा दिवसापूर्वी न पाहिलेल्या-माहीत असलेल्या दोन माणसांचे झटपट उरकलेले लग्न.

दोन्ही ज्येष्ठ जोडपी या लग्नाळू तरुणाची गंमत करत होते. आजींनी कशी मुलगी हवी आहे? इतका उशीर का केला? हेही ओघात विचारून घेतले. त्याचा फोन नंबरही घेतला. तरुण जोडप्यातला नवरा या लग्नाळूला सारखा सांगत होता, " अरे चांगला सुखी जीव आहेस कशाला नको त्या खोड्यात स्वत:ला अडकवून घेतोस. माझ्याकडेच बघ, काय होतो मी आणि काय झालोय मी. मित्रा अजूनही विचार बदल. वेळ गेलेली नाही. मात्र एकदा का गळ्यात हार पडला की जीवनभर बस ' हार ही हार ' सोच लो. " असे म्हणत बायकोकडे पाहून डोळे मिचकावत होता. ती पण, " असं काय बच्चमजी, महिनाभर मजा करून घे मग दाखवते तुला माझा प्र-हार. " असे म्हणत वेडावत होती.

हे सगळे ऐकताना मध्येच एमएस करणारा पोरगा, " लग्न कशासाठी करायला हवे? आणि न करणेच कसे उत्तम " याचे तावातावाने विश्लेषण करू लागला. आठदहा मिनिटे त्याची तात्त्विक बडबड कशीबशी ऐकल्यावर सीनियर आजोबा ताडकन उठले आणि त्याला खाजगीत नेऊन काहीतरी असे सांगितले की तो गप्पच बसला. मग एकएक करून सगळे पुरूष आजोबांच्या कानाला लागून आले आणि खोखो हसत होते. आजींनी, यांची नेहमीचीच काहीतरी पाचकळ कोटी असेल असे म्हणत नाक मुरडले. उरलेल्या आम्हा तिघींना मात्र जाम उत्सुकता लागली. त्या दोघींच्या नवऱ्यांना कळल्यामुळे विमानात बसल्या बसल्या या दोघी त्यांच्याकडून वदवून घेणार होत्याच पण माझे काय...... आजोबांनी काय सांगितले असेल हा प्रश्न अनुत्तरितच आहे आणि अजूनही मला छळतो आहे. किती हा अत्याचार.

गेटवरही फार गजबजाट झाला होताच. चेक-ईनची लाइन लागली तसे आम्ही सगळे उठलो. सोपस्कार पार पाडून आतल्या लॉउंजमध्ये आल्यावर फोन नंबर्सची देवाण घेवाण झाली आणि बोर्डिंगला सुरवात झाली तसे सगळे पांगले. मुंबईला पुन्हा इमिग्रेशनच्या वेळी आम्ही सगळे भेटलो. निरोप घेऊन जोतो मार्गाला लागला. तसे पाहिले तर फक्त चार तासांची ओळख. पण त्यात आम्ही सगळेच अगदी मोकळेपणाने एकमेकांशी बोललो, थोड्या टवाळक्या केल्या - टर उडवली. आजींनी आजोबांच्या घोरण्याच्या सुरस कथा ऐकवून ऐकवून मस्त करमणूक केली. आजी- आजोबांनी एकदोन वेळा वडिलकीच्या अधिकाराने आम्हाला झापलेही.

हे साडेचार तास इतके सहजी आणि आनंदात गेले की घरातून निघताना याच तासांचा का वैताग वाटत होता आपल्याला, असे वाटून गेले. तसे पाहिले तर काही खास घडलेच नव्हते तरीही वेळ मजेत गेला. मस्त अड्डा जमला होता आमचा. अनेकदा अश्या काही तासांपुरत्याच ओळखी-सहवास घडतो. माणसे मनात छाप सोडून जातात.

आता हेच पाहा ना, त्या लग्नाळूचे लग्न जमून लागलीच झाले असेल का? आवडले असतील का ते एकमेकांना? का घाई घाई झाली असे वाटत असेल मनातून. आता दोन वर्षांनंतर ती दोघे कशी असतील? नवीनच लग्न झालेल्यांचा उत्साहाने ओसंडून जाणारा प्रकार आजही तसाच तितकाच ताजा-भरभरून वाहणारा असेल ना? दोनाचे तीन झाले असतील कदाचित. डायपर आणि जागरणे जोरावर असतील. एमएस करणाऱ्याचे लग्नही झाले असेल ( क्रेडीट आजोबांना ) आणि आजोबांची आठवण त्याने नक्कीच काढली असेल. बायकोला किस्सा ऐकवून दोघे खोखो हसले असतील. आजी-आजोबा आपल्या विश्वात-गोकुळच्या दुधाच्या अमृततुल्य चहात-स्वातंत्र्यात रममाण असतील. एकदा त्यांना भेटायला जायलाच हवे. त्यानिमित्ते आजींच्या हातचा मस्त चहा व गेले इतके दिवस छळणारा प्रश्न तरी सुटेल.

( ऍमस्टरडॅम मधल्या ए ऐवजी अ कसा लिहिता येईल? मला जमतच नाहीये.... )

23 comments:

  1. होते कधी कधी अस...काही वेळा आपल्या नकळत किंवा वरच्यावर कोणाच बोलण आपल्या कानावर पडत.पण त्यात काही खंड पडला कि उगाच उत्सुकता लागुन राहते आपल्याला त्या अपुर्ण गोष्टीची..पुढे काय झाल असेल म्हणुन...इथे तर ते आजोबानी चक्क त्याला बाजुला घेउन सिक्रेट सांगीतल होत मग काय रेंगाळणारच ना प्रश्न...

    ReplyDelete
  2. सरळ त्या आजोबांना जाऊन विचारायचं ना की "आजोबा, काय सांगितलंत त्यांना सगळ्यांना ते मलाही सांगा. उगाच झोप लागायची नाही तोवर :D"

    ReplyDelete
  3. davbindu, तर काय. बाकी आजोबांनी लग्न आणि लाईफचा काहीतरी जबरा फंडा सांगितला असणार.:)

    ReplyDelete
  4. हेरंब, अरे मी आजींना दोनतीनदा विचारले रे. आजोबांना विचारायला घाबरले, न जाणो आजींच्या भाषेतले आणिक काही तरी बोलले असते तर माझी तंतरली असती ना...

    ReplyDelete
  5. dn,’अ‍ॅ ’ बद्दल धन्यवाद. ए पेक्षा हा अ‍ॅ नक्कीच चांगला वाटतोय.

    ReplyDelete
  6. मजाच आहे..खरंय प्रवासातल्या ओळखी खरंतर विसरण्यासाठी असतात पण माझंही तुझ्यासारखंच आहे माणसं लक्षात राहतात आणि त्यातुन जर असा आजोबांसारखा कुणी असेल तर?? हम्म...कठिण आहे...बाकी तुझे आजी-आजोबांचे डायलॉग्ज सरळ माझ्या सासु-सासर्‍यांसाठी चिकटवुन टाक....

    ReplyDelete
  7. आमचाही मस्त जमला होता कंपू पहिल्यांदा अमेरिकेले चाललो होतो तेव्हा. अजूनही संपर्कात आहोत सगळे. एक जर्मन पत्रकार एक अमेरिकास्थित मराठी व्यावसायिक व मी.
    छान लिहिलं आहे.आजोबांकडून उत्तर मिळाल की लगेच सांगा ! हा (दोन वर्षांपूर्वीचा) एमएस वाला वाट पाहतो आहे !

    ReplyDelete
  8. अपर्णा, अग प्रत्येकवेळी कोणी न कोणी भेटतेच आणि स्वत:ची छाप सोडून जातेच.:) अर्थात माझा स्वभावही आहेच कारणीभूत... गप्प बसवतच नाही.अग आजोबा एकदम खासच होते आणि आजी पुरेपूर पुरून उरल्या होत्या त्यांना...हाहा.तुझ्या सासूसास~यांना.... म्हणजे तुमची जोरदार करमणूक होत असणार.

    ReplyDelete
  9. साधक,आता पुढल्या वारीला जाईनच म्हणते आजी-आजोबांकडे. मला तर भूंगा लावलाच आहे पण आता... :P. मग लग्नाचे ’हार’ कधी का झाले सुध्दा?:)

    ReplyDelete
  10. मला पण जाम उत्सुकता लागुन राहिली आहे,काय सांगितले असेल आजोबांनी :)

    प्रवासात भेटलेल्यांचे पत्ते, फोन नं. घेतले जातात पण नंतर कधिच भेटुन होत नाही, माझे तरी होते असे.
    सोनाली

    ReplyDelete
  11. मागील महिन्यात मी भारतात परत येत होतो तेव्हा १० तास कैरो विमानतळावर होतो तेव्हा पण मला २ आजी भेटल्या होत्या. आम्ही मस्त धमाल केली होती. अन् सगळ्यात महत्वाच म्हणजे मी एक तर घास फूस वाला त्यामुळे तिथे जेवायची अडचण . . . तेव्हा ह्या आजींनी त्यांचे पराठे अन् दही दिले. . आत्मा आगदी तृप्त झाला होता. :)

    BDW त्या आजोबांनी काय सांगितल असेल??? झाल आता डोक्यात तोच किडा राहणार. . .. काय कराव बर आता??

    ReplyDelete
  12. रंय गं कधी कधी अगदी पटकन आपण एखाद्या व्यक्तिशी मोकळे होऊन जातो. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण आपण नंतर किती विचार करत रहातो नां? जसं की, त्या लग्नाळूचं लग्न झालं असेल कां? इ.इ.

    ऍमस्टरडॅम लिहीताना ~emasTaraD~ema असं लिहावं लागेल तुला. बरहा मध्ये ? वर क्लिक कर व देवनागरी सिलेक्ट केलंस की कळेल तिथे.

    ReplyDelete
  13. छानच, प्रवासात झालेल्या काही ओळखी गुगल, ऑर्कुट रुपाने जिवंत आहेत....
    आजोबांचे उत्तर काय असेल बरे, उगाच तुम्ही हा प्रश्न सांगितला... आता लवकर उत्तर शोधा आणि सांगा :D

    ReplyDelete
  14. सोनाली, हो ना.आपण अगदी आवर्जून पत्ते-फोन नं. घेतो पण पुढे विसरून जातो. फारच क्वचित एखादी ओळख टिकते. अर्थात दोन्ही बाजूने प्रयत्न झाले तरच.अग दोन वर्षे हा भूंगा छळतोय मला... :)

    ReplyDelete
  15. मनमौजी, पराठे व दही... सहीच आणि तेही अनपेक्षितपणे. चंगळच झाली की तुझी.चला आता माझ्याबरोबर तुमच्याही डोक्यात किडा... :)

    ReplyDelete
  16. मेघ,हो ना. बरेचदा लोक सहजपणे मन मोकळं करतात.कदाचित कुठलेही घेणंदेणं नसतं-स्वार्थ नसतो म्हणूनही असेल. पण मग हे असे प्रश्न रेंगाळत राहतात.
    तू सुचवलेल्या पध्दतीनेच मी आधी केले होते गं... पण तो एडक्यातला ए च येतो. :( डॅ बरोबर येतो. अ लाच काय होतेय कोण जाणे.

    ReplyDelete
  17. आनंद,तू म्हणतोस त्याप्रमाणे ऑरकुट,फेसबुकमुळे ओळखी टिकू शकतात. आता या मायदेशाच्या वारीत गाठतेच आजोबांना.... :)

    ReplyDelete
  18. प्रवासातली मैत्री ही एकतर अतिशय क्षणभंगूर ठरते किंवा अतिशय जिव्हाळ्याची होते.
    प्रवासात भेटणारी माणसे ही अनोळखी, पुन्हा भेटण्याची शक्यता नसणारी असतात. त्यामुळे अश्या माणसांजवळ अनेक जण मन मोकळे करतात.
    ज्या गोष्टी आपण आपल्या ओळखीच्यांना सांगू शकत नाही त्या गोष्टी बोलल्या जातात. ऐकणाराही ऐकतो अन सोडून देतो. किंवा बरेचदा तो ही स्वत:चे मन मोकळे करतो.
    प्रवासात अगदी जिवलग मित्राप्रमाणे गप्पा मारणारे दोघेजण उतरल्यावर मात्र अगदी अनोळखी वागत निघून जातात हे आणखी एक विशेष.
    पण जर मैत्री जमली तर मात्र ती आयुष्यभर टिकते. अगदी जिवलग.

    आपला,
    (प्रवासी) अनिकेत वैद्य.

    ReplyDelete
  19. प्रवासी अनिकेता, यस्स्स...बरेचदा असेच घडते.’सगळा वेळ अगदी जीवलग मित्रासारखे गप्पा मारणारे मात्र अनोळख्यासारखे निघून जातात...”हेच बरेचदा घडते. कारणच संपते ना.आणि घरची/कामाची ओढ लागलेली असते.पण कधीकधी कुठल्याश्या निवांत समयी काही अशाच अनोळख्यांची याद जरूर येते. मला वाटते त्या काही काळाच्या सहवासाचा आनंद या आठवणीतच असतो.

    ReplyDelete
  20. मस्तच लिहीलेस ग..मज्जा आली वाचताना...खुपच छान....पण आता हे सांगुन आजोबांनी खरेच कानात काय सांगितले असेल ह्याची उत्सुकता आम्हाला ही लागली..तुला भविष्यात कळले तर तो गौप्यस्फ़ोट नक्की करशील...बाकी पोस्ट मस्तच !!!!!

    ReplyDelete
  21. माऊ, मला कळले की तुला नक्कीच सांगेन.:D

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !