जाता जाता एक नजर इथेही........

Monday, February 1, 2010

मनाचे तारू.........

एखादी वस्तू, पदार्थ, स्वर-आवाज, रंग, रूप थोडक्यात सांगायचे तर ( जे मला कधीच जमत नाही. थोडक्यात सांगणे हो....) चिवचीव आवाज ऐकला चिमणी. बटाटेवड्याचा विचार मनात यायचा अवकाश......., काय होते हे सांगायला हवे का? सिनेमाला जायचे म्हटले की ' ए वनचे समोसे ' पाऊस म्हटला की उगीच शोभेची का होईना पण छत्री अन मनात हुळहुळणाऱ्या-तरल तर कधी फजिती झालेल्या आठवणी - चिंब भिजून खाल्लेला भुट्टा - जागोजागी जमलेल्या थारोळ्यांत बदकन उड्या मारत आपला व मैत्रिणीचा झालेला मस्त अवतार आणि आईची खाल्लेली बोलणी.

" पाऊस आला की कसला संचार होतो गं तुझ्यात? अग त्या डबक्यात बेडकाची, उंदराची अंडी असतात. उद्या कसला रोग झाला म्हणजे आई आहेच निस्तरायला." आईपण ना.... , " काहीही बोलतेस गं. अग इतक्या मुलामुलींनी डबकी डुचमळून काढलीत ना की आता चुकून माकून एखादे अंडे शिल्लक असलेच तर त्यातून बेडूक+उंदीर यांचा अफलातून कॉम्बो बाहेर निघेल बघ नक्की. वीणाला ( माझी बालमैत्रीण ) सांगायलाच हवे गं, डबक्यावर लक्ष ठेवायला. " हे असे भयंकर तारे मी तोडले की आई लागलीच मला शाबासकी देई. जाऊ दे इतक्या वर्षांनीही आठवणीने पाठ लाल होईल. किती हे विषयांतर...... तरी मी आधीच म्हटलेय की थोडक्यात सांगणे म्हणजे..... हाहा.......

अरे हो, शाळेत नेहमी एक प्रश्न असे, ' खालील पाचातून तीन प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.' सहावीत असताना आमच्या धुरी सरांनी इतिहासाच्या चाचणी परीक्षेत मला २५ पैकी २४ १/२ मार्क दिले. वर सगळ्या वर्गाच्या समोर मला उभे करून सांगितले, " मुलांनो, हिचा अर्धा मार्क का कापला माहीत आहे का? " एकजात सगळे नाही म्हणताच कुचकट आवाजात, " अरे ज्याला शीर्षकाचा अर्थच समजत नाही त्याला बोडकं इतिहास कसा समजणार. नाही म्हणजे मान्य आहे की इतिहास हा काही भूगोल किंवा गणितासारखा नसतो. थोडे रंगवून सांगावेच लागते. पण म्हणून किती पाल्हाळ लावायचे याला काही सुमार. एक पेपर तपासायला पंधरा मिनिटे फुकट घालवली गधडीने माझी. थोडक्यात म्हणजे सविस्तर नव्हे. पुढच्या वेळी पाच मार्क कापेन आधीच सांगून ठेवतोय. चल पळ जागेवर. " म्हणजे हायेस्ट येऊनही माझ्या डोळ्यांत अश्रू अन चेहऱ्यावर नापास झाल्याचे दुःख पसरवून धुरीसरांनी त्यांच्या फुकट गेलेल्या पंधरा मिनिटांचा पुरेपूर वचपा काढला.

आतापर्यंत मला काय म्हणायचेय ते तुम्हाला कळले असेलच. शाळा म्हटली की अभ्यास-शिक्षा-सहली-कवायत, एकेकाळी रेडिओ - आकाशवाणी मुंबई ब वरील भूपाळी पासून सुरू होऊन मग विविधभारतीवरील भुले बिसरे गीत पासून मधुमालती पर्यंत. टेकाडे भाऊजी, सुधा नरवणे, दत्ता कुलकर्णी, एस कुमारकी अदालत, अमीन सयानी, सुशील दोशींपर्यंत, फौजी भाईयों के लिये विशेष जयमाला - प्रस्तुत करणारे शम्मीकपूर, लता मंगेशकर, देव आनंद अशी अनेक माणसे..... खरे तर त्यांचे आवाज, बोलण्याची ढब, लकबी. कर्सन घावरीची उडणारी जुल्फे अन गावसकर-विश्वनाथचे रनिंग बिटवीन द विकेट्स, सुशील दोशींच्या तोंडून ऐकताना कितीक जणांचे प्राण कंठाशी येत.

याचप्रकारे, झुरळ-पाल-असे ईईई.... जमातीतले कीटक दिसले की डोळ्यासमोर तक्षणी तीनचार गोष्टी येतील. झाडू- चप्पल-पेपर आणि जरा जास्तीच सवड असली म्हणजे त्या फर्रर्रर्रकन उडणाऱ्या व नेमका नेम धरून आपल्याच अंगावर टपकन पडणाऱ्या, आपण त्याच्यावर वार करायच्या आधीच मिशा फेंदारून आधीचेच फेंगडे पाय अजूनच फेंगाडवून आपल्यावरच चाल करून येणाऱ्या झुरळाने किंवा भिंतीचा नीटवीट हक्काचा आसरा सोडून आपल्या खांद्यावर, डोक्यावर विराजमान होण्याचा पवित्रा घेण्यास पालीला थोडासा वेळ आहे हे लक्षात येताच चपळाईने बेगॉन स्प्रेने त्यावर हल्ला बोल करायचा. अर्थात इतकी उसंत मिळत नाहीच. एकतर झुरळाचे विमान अंगावर लँड झालेय हे लक्षात येताच शरीर आपोआपच भांगडा करू लागते. त्या गडबडीत आपण झुरळाला का झुरळ आपल्याला घाबरतेय हे नक्की कोणालाच न कळल्याने ते दुसऱ्या सोयिस्कर जागी प्रस्थान करण्याऐवजी भलतीकडेच स्थानापन्न होते. मग पुढे काय घडते हेही मीच सांगू का? काय आठवले ना, असे झाले होते तेव्हां तुम्ही काय केले होते ते...... ही ही....

मला मात्र झुरळ म्हटले की, ना झाडू आठवतो ना चप्पल. पेपरने झुरळ मारले तर तो वाचायचा कसा हा प्रश्न कायमचा पडलेला असल्याने तो पर्याय बाद. राहिले बेगॉन. पण तितकी उसंत-आणि शत्रुपक्षावर फवाऱ्याचा मारा मला करायला मिळावा, ये हमे कदापि मंजूर नही च्या धरतीवर घरात कधीही झुरळ आले की ते डायरेक्ट माझ्या अंगावरच झुमकन उतरते. " प्रत्येक वेळी मीच कशी गं दिसते याला? तरी बरं मी काही गोरी नाही की जाडीही नाही. कुत्र्यामांजरासारखा यालाही माझा वास येतो की काय? " या माझ्या त्राग्यावर आई नुसती गालातल्या गालात हसत असे. केवळ झुरळ कापावे लागते या भीतीने मी सायन्सला गेले नाही, किती नुकसान....... अहो माझे नाही काही, तुमचे......
डागदर झाले असते की नाही मी पण......

आवरा आता नाहीतर पुन्हा विषयांतर होईल. काय पोस्ट चाललीये का म्युन्सिपाल्टीने जागोजागी खणून अर्धवट माती ढकलून बुजवलेले खड्डे म्हणायचे. एक चुकवला तर दुसऱ्या खड्ड्यात चालणारा पडलाच पाहिजे तसं चाललंय की. निस्ता एक शब्द ' म्युन्सिपालटी ' की व्हशील पुन्हा चालू. आता या शब्दातच किती जबरी दम आहे, तुम्हीच पाहा. याला डावलून पुढे जाता येईल का? नाही म्हणजे तुम्हीच सांगा ना..... विषयांतर व्हणारच का नाय? उगाच त्या धुरी मास्तरासारखं ' थोडक्यात ' चे खूळ नगा घेऊ, कसं?

’ बेगॉन म्हणजे झुरळ ’ हेच समीकरण माझ्या टाळक्यात फीट बसलेले. चाळीत झुरळे-पाली-उंदीर यांचा भारी सुळसुळाट. त्यांचा हक्कच असल्यासारखे राजरोस येतजात. पुन्हा त्यांच्या वहिवाटीत अडथळा झाला की पिसाळल्यासारखे अंगावर चाल करून येत. परंतु मला या चारातले एकही हत्यार कधीही आठवले नाही आणि ते वापरण्याइतकी सवडही मिळाली नाही. झुरळाची ’ उडान ’ दमभरी की माझे माझ्या पांढऱ्या चादरीकडे धाव घेणे याचा दरवेळी वेगवेगळा निकाल लागे. फारच क्वचित मला तहाचा झेंडा फडकवायची संधी मिळे. चादर हातात मिळताच भर्रर्रकन ती उलगडून डोक्यावरून गुंडाळून मी स्टूलवर, खुर्चीवर, कॉटवर बसकण मारत असे. जोवर फटाक, फुसफुस... असे आवाज आणि आई-बाबांपैकी कोणीतरी त्याचे कलेवर मला दाखवत नाही तोवर मी काही चादरीतून बाहेर येत असे.


एक दिवस शेजारच्या काकू घाबऱ्याघुबऱ्या आईला सांगू लागल्या, " अहो भाग्यश्रीच्या आई, ऐकलेत ना? लता बेगॉन प्यायली थोड्यावेळापूर्वी. किती गलका झाला, तुम्ही कोठे होतात? नेलीये आता सिव्हिलमध्ये. पालीसारखी तडफडतेय नुसती. काय बाई पोरी या. नसते आचरटपणाचे उद्योग. " हे ऐकले आणि माझ्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. लता माझी मैत्रीण. काल रात्री तर चांगली होती. आणि बेगॉन ही काय प्यायची गोष्ट आहे का? झुरळ कसे तडफडून मरते एवढुसा फवारा मारला तरी... आणि ही म्हणे संपूर्ण डबा प्यायली. किती जळजळले असेल.... दिवसभर डोक्यात फक्त बेगॉन आणि ते पिऊन तडफडणारी लता.

दोन दिवसांनी ती घरी आली. थोडी गर्दी ओसरल्यावर तिला विचारले, " कशाला गं प्यायली होतीस? " त्यावर, " तुला नाही कळायचे. करावे लागते असे कधीकधी. त्याशिवाय घरच्यांना कळतच नाही. ' मला याचा अर्थ कळलाच नाही. फक्त ती मरावे या उद्देशाने प्यायली नव्हती तर घरच्यांना फक्त घाबरवावे म्हणून प्यायली होती हे समजले.
पण कारण उमगले नाही.

पुढे पुढे चाळीत एखादे फॅड निघते ना तसेच झालेले. उंदराच्या औषधाने उंदीरही मरत नसत त्यामुळे ते बाद. जाळून घेणे म्हणजे फारच हाल. घरात सहजी हाताशी उपलब्ध असलेले व हमखास लागू पडणारे बेगॉन हा बेस्ट ऑप्शन. बेगॉन ढोसणे हा जणू खेळच झालेला. अगदी दुसरीतल्या मुलानेही पिऊन झाले अन आजोबांनीही पिऊन झाले. दर पंधरा दिवसाला एक तमाशा ठरलेला. त्या घरातल्यांची पळापळ आणि प्यायलेल्याचा ओठांतून फेस गळणारा चेहरा माझ्या स्वप्नांत येऊन येऊन मला रडकुंडी आणत असे. अशात तो भयानक दिवस उजाडला. घरातल्या भांडणामुळे एकीने बेगॉन प्यायले. यावेळी मात्र अंदाज चुकला आणि........ त्यादिवसानंतर अनेक वर्षे आमच्याकडे बेगॉनचा डब्बा आला नाही. दरवेळी घ्यायला गेलं की आईच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा येई आणि हात तिथेच थबके.......

गेला महिना दिडमहिना लहान लहान मुलांच्या आत्महत्यांनी फार विषण्ण केलेय. ज्यांना अजून जगणे म्हणजे काय हेच समजलेले नाही त्यांनी मरणाचा मार्ग धरावा....... पूर्वी काय मुले नापास होत नव्हती का? मग, आजच काय बदललेय? जीवघेणी स्पर्धा...., पालकांच्या प्रचंड अपेक्षा....., न्युक्लिअर फॅमिलीज, घरात येणारा पैसा की मुलांनी शोधलेली सोयिस्कर पळवाट? जी त्यांच्या नकळत त्यांनाच महागात पडतेय. का सगळ्याचा एकत्रित परिणाम आणि अजिबात न होणारा किंवा फारच कमी होणारा संवाद? आजी-आजोबा दूर, आई-बाबा डेडलाईन्स, मीटिंग्ज- ऑफिसच्या ताणात अडकलेले. आम्ही दोघे आमचे एक यात हरवत चाललेले भाऊ-बहीण हे नाते.

लहानपणापासून, " कोणासाठी इतके मरतोय आम्ही? तुझ्यासाठीच ना? मग तुला साधे इतके मार्क्सही मिळवता येत नाहीत? तो अमुक बघ, तुझाच मित्र ना. त्याला कसे मिळतात मग तुलाच का नाही...... " संवाद झालाच तर असा नाहीतर भारंभार खेळणी, गेम्स ची खैरात. पाचवी-सहावीतल्या मुलांना मरून जाणे म्हणजे काय याचा अर्थ खरेच कळतो का? का यातले बरेचसे केवळ आजच्या प्रसंगातून - पालकांच्या रागातून सुटण्याची पळवाट म्हणून, का कुठल्याश्या शुल्लक मागणीला पालकांनी नकार दिला म्हणून, प्रेमभंग झाला म्हणून हे खऱ्याच्या जवळ जाणारे तात्कालीक मरणाचे नाट्य घडवायला जातात आणि एकवेळ अशी येते की सुटकेचा-परतीचा मार्गच बंद होतो. अचानक कोमेजलेले असहाय अश्राप कोवळे जीव. असो. टीवीवरच्या जाहिरातीतले झुरळ दिसताच मनाचे तारू पाहतापाहता कुठून कुठे भरकटलेय. या खोलवर रुजू लागलेल्या समस्येला समूळ नष्ट करणारे किंबहुना ही समस्याच निर्माण होणार नाही असे औषध आपल्यापाशीच असावे मात्र ते आपल्याला दिसत नसावे, काहीसे असेच झाले आहे का?

12 comments:

  1. अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेनासा झाला की मृत्यू हा पर्याय न वाटता सुटका वाटू लागते. मात्र मलाही असं वाटतं की या वरचेवर होणा-या आत्महत्यांच्या घटना म्हणजे आई-वडीलांना घाबरवण्यासाठी किंवा हवे ते मिळवण्यासाठी निर्माण केलेला देखावा असतो, जो भयानकपणे सत्यात उतरतो.

    ReplyDelete
  2. कांचन,प्रतिक्रियेबद्दल आभार.
    मी अगदी जवळून याप्रकारच्या घटना ( पालकांना घाबरवण्याचे प्रकार ) पाहिल्यात. काळ जरी बदलला असला तरी मनोवृत्ती तशीच किंबहुना जास्तच आग्रही,आक्रस्ताळी,हेकट आणि संतापी. सारासार विचार या वयाला शक्य नाही. समजावून सांगायला व समजून घ्यायला कोणाला सवड नाही.त्यातून सुटका मिळवण्याचा हा मार्ग. म्हणजे एकदा का हा प्रकार केला की पालकांची बोलती बंद. प्रत्यक्षात घडते वेगळेच.

    ReplyDelete
  3. नेहेमीप्रमाणेच, मस्तच झालंय पोस्ट.

    घाबरवण्यासाठी असं करायचं म्हणजे फारच झालं ग. आईकडे इमर्जन्सीला यायच्या अश्या केसेस ... टिपिकली सासरच्या जाचाला कंटाळून पेटवून घेणाऱ्या किंवा बेगॉन पिणाऱ्या तरूण सुना ... कधी कधी त्यांचे हाल बघून यातून ही वाचण्यापेक्षा अजून हाल न होता लवकर मेलेली बरी असं म्हणायची परिस्थिती असायची!

    ReplyDelete
  4. माझ्या आसपास कधी अश्या घटना न घडल्यामुळे कदाचित मला कधी असे नाही वाटले की केवळ घाबरविण्यासाठी कुणी आपल्या जिवाशी खेळतो.
    आत्महत्या करणार्‍या लोकांबद्दल मला अशीच सहानुभुती वाटायची की काय कारण असेल की ते शेवटचा पर्याय स्विकारतात, जगणे इतके कसे अवघड होवु शकते की मृत्यू सोपा वाटतो...अजुनही आश्चर्य आहेच...

    ReplyDelete
  5. एकतर झुरळाचे विमान अंगावर लँड झालेय हे लक्षात येताच शरीर आपोआपच भांगडा करू लागते... भारी... :D

    एकदा आमच्याकडे जुन्या घरात भरी किस्सा झालेला... चांगली ७०-८० झुरळे घुसली घरात कुठुनशी. मग मी आणि दादा हल्लाबोल केला त्यांच्यावर. हाहा.. अर्थात दादा पुढे. त्याला चुकवून एखादे आलेच तर मी हल्ला करत असे. आम्ही नाही कधी वापरले बेगोन. आपली चप्पल डायरेक्ट... :)

    ReplyDelete
  6. गौरी, हो गं.त्या जळलेल्या सुना-मुलींचे हाल-यातना भयंकरच. ब~या झाल्या तरी कुठले ताट समोर वाढून ठेवलेय हे पाहून पुन्हा जीव देतील अशातली अवस्था. दुर्दैव.घाबरवण्यासाठी असे काहीतरी करायला जाताना मनात आपण खरेच मरू असे चुकूनही आलेले नसते ना....

    ReplyDelete
  7. आनंद, असेही लोक पाहिलेत ज्यांनी लक जोरावर म्हणूनही जीव वाचताच कामा नये इतका बंदोबस्त करून जीव दिलाय. परंतु ते झाले टोकाचे वागणे. लहान लहान मुले इतका विचार कसा करतील.खरेच जगणे इतके नकोसे होते की मरणाला जवळ करतात. अनाकलनीयच आहे.

    ReplyDelete
  8. रोहन, हाहा... मी मुलखाची घाबरट.आजतागायत एकही झुरळ मी मारलेले नाही. बरे झाले इथे निदान आमच्याकडे तरी झुरळेच नाहीयेत.:D

    ReplyDelete
  9. Shree, lekh vachalya var khup athavan alli ga majhya khup khaas maitrinichi, eka kshanachya raagane kivha asech ghabaravanya sathihi asel kadachit...karane kahihi aso pan tyachi kimmat khupach mothi chukavavi lagali ....Aso,thodakyat kay majyahi 'Manache Taaru' khup khup bharakatun aale.

    ReplyDelete
  10. anjoo, स्वागत व अनेक आभार.
    खूपच वाईट घडले.इतका राग/हतबल होणे/घाबरवणे किती प्रचंड उलथापालथ घडवून जाते. जाणारा तर निघून जातो, मागे राहणारे घटनेतून बाहेर येतच नाहीत. आई-बापाची स्थिती तर त्याहून वाईट.:(

    ReplyDelete
  11. अंतर्मुख करणारा लेख ....
    मला जे वाटत होत ते तुम्ही शब्दात मांडल्याबद्दल आभार

    ReplyDelete
  12. अंतर्मुख करणारा लेख ....
    मला जे वाटत होत ते तुम्ही शब्दात मांडल्याबद्दल आभार

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !