जाता जाता एक नजर इथेही........

Friday, August 7, 2009

आम्ही तमाशाई अन बोचणारी शल्ये

ठाण्याच्या समर्थ भांडार समोरच...... बी केबिन वरून गोखले रोडवर येऊन मिळतो त्या भागात आता मोठा टॉवर झाला. पॉश दुकाने झाली. पण अगदी २००२ पर्यंत तिथे जुन्याच बिल्डिंग्ज होत्या. कल्चर-बरेच जुने पंजाबी सूटसचे दुकान व बी केबिनचा मधला हा पट्टा म्हणावा तर अगदी मोक्याच्या ठिकाणी पण थोडासा जुनाट. पायऱ्या चढून दुकानांमध्ये जावे लागते. इथे नेहमीच अनेक प्रकारचे फेरीवाले असत व अजूनही आहेत. नेमके साल आठवत नाही ( ९६-९७ असावे ) परंतु एका दुकानाचे काम चालू होते त्यामुळे बांधकामाचे सामान इतस्ततः विखुरलेले, त्यातच मजुरांचे संसार, पोरेबाळे नांदत होती. रस्ता हा सर्वांसाठी असल्याने ज्याला जमेल तसे हक्काने जो तो वापरत होता. कल्चरच्या भिंतीला पर्स, झोळ्या, झब्बे, बंड्या तस्तम टांगलेल्या याचे दोन-तीन विक्रेते असतात. बाकी भाजी-फळे, पिना-रबर-कानातले, कपबश्या, चिनी मातीचे सामान असणारेही आहेत. लेदर पर्स, पाकिटे व पासपोर्ट पाकीट याचेही दोघे तिघे आहेत. कसलीतरी सुटी होती म्हणून मी सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमारास कल्चरपाशी पोचले. पूर्वी त्याशेजारी पॉप्युलर लायब्ररी होती. शिवाय भाजीपोळी, मेथी, डिंक लाडू ( दुकानाचे नाव मी विसरलेय आता-काहीतरी पोळीभाजी केंद्र .... ) टिपीकल पडवळ डाळिंब्या, फणसाची भाजी वगैरे प्रकार हमखास मिळतात तिथे. तर मी लायब्ररीत पुस्तक बदलले आणि गावदेवी मार्केट मध्ये जाऊन भाजी घ्यावी म्हणून निघाले होते.

चार पावले चालले तोच लहान मुलाचा किंचाळून रडण्याचा आवाज ऐकू आला. समोरच बरीच गर्दीही दिसली. काय झालेय, इतक्या जोरात कोण व का रडतेय पाहावे म्हणून डोकावले. अन अवाक झाले. ह्या बांधकाम करणाऱ्यातल्याच एकाचे पोर- जेमतेम दीड-दोन वर्षांचे असावे, गुटगुटीत, सावळेसे. त्याचा बाप पोकळ बांबूच्या फोकाने सटासट त्याला मारत होता. पायावर, हातावर, पाठीवर... फटका बसेल तिथे वळ उमटत होते अन पोर कळवळून किंचाळत होते. इतके लहान मूल देऊन देऊन असा काय त्रास देऊ शकते? शिवाय लहान असो मोठे असो हे असे रानटी मारणे. बापाकडे पाहिले तर आजूबाजूला जमलेली गर्दी पाहून तो अजूनच चेव चढल्यासारखा मारत होता. बरेच जण," ये काय पागल झालास का? कशाला मारतो आहेस, सोड त्याला..... " असे ओरडत होते पण कोणीही पुढे गेले नाही.

या पोराची आई कुठे आहे म्हणून मी शोधू लागले. ती पायरीवरच बांबूची टोपली विणत बसली होती. तिला म्हटले, " अग दिसत नाही का तुला? घे ना पोराला उचलून नाहीतर नवऱ्याच्या हातातली काठी तरी काढून घे." तर म्हणाली, " ताई अवो तो प्यालाय दारू, आता म्या मध्ये गेल्ये तर मलाच बडवेल. थांबल की थोड्यावेळाने, ते पोर काय मरतंय थोडंच. तुम्ही जावा. " हे ऐकून काही जण म्हणू लागले , " अरे हे यांचे दररोजचेच असणार. बेवडा मारून यायचा अन बायकोला नाहीतर पोरांना बडवायचे. मरो. आपल्याला फुकटचा त्रास. " तोवर त्याचे पोराला थांबून थांबून मारणे सुरूच होते. एवढे लोक जमलेत पण एका कोणाची छाती नाही आपल्याला आडवायची असे वाटल्याने किंवा काय विचार असतील कोण जाणे पण ते पोर कळवळले ना की बाप आसुरी आनंदाने हसत होता.

मस्तकात अगदी तिडीक गेली होती शिवाय ते वळ अन तळतळ पाहून असे वाटत होते त्याच फोकाने बापाला मनसोक्त बडवून काढावे. पण इतके जण पाहत असूनही पुढे जात नाहीयेत अन पोराचा बाप चांगला तगडा होता. न जाणो मलाही चार रट्टे ओढायचा हाही विचार नक्कीच डोकावला त्यामुळे पुढे जायची हिंमत होईना. तेवढ्यात तिरासारखा कुठूनतरी एक सहावी-सातवीतला शाळकरी मुलगा बापाजवळ पोचला अन लाकडी फूटपट्टीने बापाला व इतर आमच्या सारख्या ( फुकटचा तमाशा पाहत उभे असलेल्यांना ) काही कळायच्या आत सटासट आठ-दहा रट्टे त्याची असेल नसेल तेवढी ताकद काढून हातावर ओढले. अचानक झालेल्या हल्ल्याने बाप एकदम गांगरला खरा पण लागलीच सावरला. त्याने स्वतःच्या पोराला सोडले अन या पोराला धरले पण तोवर काही बघेही सरसावले होते. त्यांनी त्या मुलाला बाजूला करून बापाच्या दोन-चार कानाखाली वाजवल्या. लागलीच लहानग्याची माय आली धावत, " अवो सोडा त्यांना, कशापायी हाणताय ...... घ्येतच व्हते ना पोराला काढून. तुम्हा लोकास्नी लय हौसच दुसऱ्याच्या भानगडीत पडायची. जावा जावा.... घरला जावा. " असे ओरडत नवऱ्यालाच लोकांनपासून दूर करू लागली. लहानगे तसेच हुंदकत रस्त्यावर पालथे पडले होते.

गर्दी पांगली. मीही निघाले. इतक्या लहान मुलाला जे जमले ते आम्हा तमाशाई ५०/६० माणसांना जमू नये. खरेच सांगते लाज वाटली. तो आपल्याला मारील की काय ही भीती त्या लहानग्याच्या वेदनेपेक्षा मोठी ठरली. माझे पोर आहे त्याला मारीन / काहीही करेन तुम्ही कोण अडवणार असे तो म्हणेल असेही वाटून गेले होते. ते जे काय असेल ते असो, मी पुढे होऊन त्याचा हात धरून का थांबवले नाही...... हा इतका लहान मुलगा जे करून गेला ते अनेकांना करणे शक्य होतेच. अनेकदा या नसत्या काल्पनिक भित्या योग्य ती कृती गरजेच्या वेळी करायला अटकाव करतात . यावर मात करायला हवी. नाहीतर नुसते लांबून चुकचुकणारे गर्दीतले बघे बनून बनून अशी शल्ये वाढतच राहतील.


4 comments:

  1. मध्यमवर्गीय माणसाचे मन पटकन पुढे जायला धजावत नाही. ही अशी बोच बरेचदा लागून राहते. आमच्या कामवालीचा नवरा तिला दररोज मारत असे. फार त्रास होई तिचा चेहरा पाहून पण तीला धीर देण्यापलीकडे मी काही करू शकले नाही.
    पोस्ट आवडली.

    ReplyDelete
  2. kharay tumche mhanane...

    pan aapan swathahala samanya samanya ka mhanvun ghyayche? yamulech aapla dhir nako tenva khachto...tyapeksha jithe garaj asel tithe tase vagave...
    aapanach manat bhiti nirman karto...aani ghabarat basto.

    alikade mi swatahalach ghabrto... tyamule ase kahi prasang ale tar shalya tochu naye mhanoon jast vichar na karta mala je yogya vatel tech karto.

    aapan thodajari pudhakar ghetla tari barech lok aaplya magun yetat
    actually madat sarvannach karaychi aste pan initiative konala ghyaychi naste or ghyala jamat naste. tenva aapan thodi jari survat karun dili tari aaplyala pathinba miltoch...maja anubhav ha asa ahe

    tumhi prasang khup manapasun lihilay

    ReplyDelete
  3. हर्षल, काल्पनिक भित्यांचे बागुलबुवे अनेक चांगल्या गोष्टी करण्यापासून रोखतात आपल्याला. हे झुगारून जो देऊ शकेल त्याला अशी बोच लागणार नाही.
    आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !