जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, June 4, 2009

हँडसम व् हजरजबाबी...:)

कॉप्सचा विषय निघालाच आहे तर काही Ultimate किस्से सांगायलाच हवेत. कॉप्स तर हजरजबाबी आणि हो एकदम हँडसम बरे का. आम्हाला थांबवले होते ना तोही अस्साच होता. मी आपली टक लावून पाहत होते त्याच्याकडे तर शेवटी नवरा म्हणाला अग आता पुरे झाले नाहीतर त्याला complex येईल. LOL. नवऱ्याला म्हटले, " उगाच माझी तंद्री मोडू नकोस . पुरुषांनी बायकांकडे पाहिलेले चालते आणि मी मात्र. ... ( मला माहितीये मनात म्हणताय, काय फेकतेय. सासू-सासरे बरोबर असताना हे संभाषण झाले असेल का? पण खरेच झालेय. तसे माझे सासरचे लोक ना स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत हं का. :) आपापली मते मांडण्याचा हक्क प्रत्येकाला असलाच पाहिजे वगैरे वगैरे. आता हे सासूबाई वाचणार आहेतच. :D बहुतेक आता कॉप मला पकडून सांगेल, तुझी गाडी भरकटलीये तिला जरा मार्गावर आण. उगाच सासू-सुनेत घुसू नकोस. )

तर हे असे हँडसम :) चतुर कॉप्स...

एकदा एक ओळखीचा आमच्या गावापासून पाऊण तास अंतरावरच्या गावी जात होता. बरेच लोक काय करतात की फ्लोबरोबर राहायचे. म्हणजे मग जर कॉपने पकडलेच तर सगळ्यात पुढे असेल त्याला पकडेल तोवर बाकीचे साळसूदपणे सटकणार. अगदी तसेच हा पण करत होता. खूप वेगात होता पण फ्लोमध्ये. नेमके कॉपने धरले. सायरन, दिवे... चोहोबाजूने हल्ला करून ह्याला थांबवले. आजूबाजूने तरीही इतर गाड्या पळवत होतेच. आता एकाच वेळी कॉप चार जणांना थांबवू शकत नसल्याचा फायदा ते पुरेपूर उठवत होते. हा जाणून होता, आज नक्की फोडणी आहे. फक्त कितीची हाच प्रश्न होता.

कॉप आला. हाय, कसा आहेस नेहमीचे सोपस्कार झाले. कागदपत्रे घेऊन गाडीत जाऊन बसला. तोवर ह्याचे रक्त उसळायला लागले. तात्त्विक वाद हो. सगळेच जात आहेत आणि साला मलाच का धरले टाईप. आता व्हिसा साठी इतके प्रचंड अर्ज आले होते, नेमका मलाच का मिळाला हा प्रश्न तेव्हा पडला का? नाही. चालायचेच, मनुष्य स्वभाव.

कॉप आला हातात पांढरा कागद नाचवत. दोनशेची चाट बसली होती. हा धुमसत होताच. पैसे तर भरावे लागणारच आहेत तर निदान ह्याला थोडा राग तरी देऊयात म्हणून ह्याने कॉपला विचारले, " मी तुला एक प्रश्न विचारू का? " कॉप म्हणाला, " हो, विचार की. " " अरे आत्ताही तू पाहतो आहेस ना, हे लोक तर बघ माझ्यापेक्षाही जास्त स्पीडने जात आहेत. मग तू मलाच का पकडलेस? " त्यावर अगदी मिश्किल हसत कॉपने उत्तर दिले, " असे पाहा, तू मासे पकडायला तळ्यावर जातोस ना त्या तळ्यात खूप मासे असतात. पण ते सगळे तर काही पकडता येत नाहीत. जो गळाला लागतो तोच आपण पकडतो ना. अगदी तसेच आहे बघ. माझ्या गळाला आज तू लागलास. :) मग धरले तुला. " आता बोला... आहे की नाही हजरजबाबी.

एकदा जावेची मैत्रीण आणि तिच्याकडे आलेले पाहुणे कुठेतरी फिरायला गेले होते. मैत्रीण जवळ जवळ पंचवीस वर्षे इथे आहे . तिला एकदम हुक्की आली पाहुण्यांना दाखवायची की मी किती फास्ट ड्राइव्ह करू शकते. झाले. नवरा शांतपणे चालवत होता, त्याला उठवले आणि स्वतः बसली. गाडी थेट नव्वदच्या काट्यावर. थोडा वेळ मस्त गेला. पाहुण्यांनी स्तुती केली ती ऐकून छान खुशीत होती. थोड्यावेळाने आरशात मागे कॉपची गाडी दिसली. ठोका चुकला. पण कॉपने ना दिवे लावले ना सायरन वाजवला. तो दिसूनही पठ्ठीने स्पीड काही कमी केला नव्हता. आता तर तिला वाटले बहुतेक सुटी झालेली दिसतेय कॉपची. त्यामुळे अजूनच बिनधास्त झाली.

पंधरा मिनिटे नव्वदनेच चालवतेय तरीही कॉपने काही केले नाही. तिला दिसत होते तो तिच्या गाडीच्या मागेच आहे. आणि अचानक त्याने दिवे लावले, सायरन चालू केला. तिने गाडी घेतली साइडला. कॉप आला उतरून, तिला हाय केले. गाडीत पाहिले. फॅमिली आहे, बुजुर्ग लोक आहेत हे पाहिले. तिला विचारले, " काय सगळे ठीक आहे ना? कोणाला बरं नाहीये का? बराच वेळ मी पाहतो आहे तू नव्वदने गाडी पळवते आहेस. " तो असे म्हणताच ही पटकन म्हणाली, " अरे, मला ना कधीची जोराची बाथरुमला लागली आहे. पण एकही एक्झीट अजून आले नाही. म्हणून मी रेस्टरुम गाठण्यासाठी गाडी पळवत होते. " " ओह! असे झाले का? I understand ... चल मी तुला जवळचे एक्झीट दाखवतो. मला फॉलो कर. " असे म्हणून तो गेला त्याच्या गाडीत.

इकडे हिने पुन्हा फुशारकी मारून म्हटले पाहा कसे सहज उल्लू बनविले मी त्याला. सगळे हसले. तेवढ्यात हा आला आणि खुणेनेच ये माझ्यामागे म्हणत पुढे गेला. ही ही निघाली मागोमाग. तो जाऊन रेस्ट एरियात थांबला.तिला म्हणाला, " जा जा. पटकन जा. " ही जाऊन आली. इतरही गाडीतली मंडळी फ्रेश होऊन आली. सगळे बसले तसा हा आला परत तिच्याजवळ आणि दोनशेपन्नास डॉलर्स चे तिकीट हातात ठेवले. ही फक्त बेशुद्ध पडायची राहिली. तिला म्हणाला, " मी तुझ्यामागे वीस मिनिटे तरी होतोच. तेवढ्या वेळात तीन एक्झीटस गेली पण तू एकदाही साधा सिग्नलही दिला नाहीस. शिवाय तू आरशात मला पाहतही होतीस. तरीही मी तुला रेस्टरूमला घेऊन गेलो. तू relax झाल्यावर तुला तिकीट देतोय. गाडीत बरीच माणसे आहेत तुमच्या तेव्हा आता जरा हळू चालव गाडी. Have a nice day! "
नवऱ्याचा एकदम जवळचा अमेरिकन मित्र एकदा घरी आला होता. त्याला त्याच्या कॉप मित्राने एक प्रसंग सांगितला होता तो ऐकून हसूही आले आणि वाईटही वाटले. घडले होते असे,
कॅम्रीमधून दोन देशी( भारतीयांचे प्रचलित नाव ) चालले होते. ते शांतपणे चालवत होते. तरीही कॉपने त्यांना थांबवले. ह्यांनी गाडी बाजूला घेतली, मागोमाग दहा फुटावर कॉपने गाडी थांबवली. तो नंबर प्लेट डेटाबेसमध्ये रन करीत असताना त्याच्या लक्षात आले की गाडीत फार गडबड सुरू आहे. दोन्ही मुले काहीतरी इकडे तिकडे फेकत आहेत. मध्येच खाली वाकून काहीतरी करत आहेत. ह्याला काही समजेना हा काय प्रकार आहे. त्याला वाटू लागले ह्यांच्याकडे नक्कीच ' वीड ' आहे किंवा अजून जास्तच घपला दिसतोय.

कॉप चक्क हातात गन घेऊनच आला. दोघांना हात समोर ठेवून शांत बसा असे सांगून सगळी गाडी सर्च केली. कुठेच काही मिळाले नाही. ही मुले तर अक्षरशः थरथर कापत होती. शेवटी त्याने ह्या दोघांना सांगितले की गाडीतून उतरा. पोरे इतकी घाबरली की रडायलाच लागली. कॉपला तर काहीच समजेना. त्याने त्यांना शांत करत विचारले, " मी पाहत होतो गाडीतून, तुम्ही इतकी फेकाफेक काय करत होतात? " ह्यावर त्या मुलांनी सांगितले, "आमच्याकडे असे पोलिसाने पकडले ना की असतील नसतील तेवढे पैसे काढून घेतात. म्हणून आम्ही आमच्याकडे असलेले पैसे निरनिराळ्या ठिकाणी लपवीत होतो. "

हे ऐकल्यावर कॉपचा ' ' वासला. त्याने त्यांना गाडीत बसायला सांगून सांभाळून जा रे असे म्हणून निघून गेला.ह्या आमच्या मित्राला भेटल्यावर हे सांगून म्हणाला, " अरे ती मुले चक्क लहान मुलांसारखी रडत होती रे. म्हणजे ह्यांच्याकडचे पोलीस असे सगळ्यांना लुबाडतात की काय? " आता हाच प्रश्न आमचा हा मित्र आम्हाला विचारत होता. आता काय सांगायचे ह्याला, धड हो ही म्हणू शकत नाही आणि नाही ही म्हणू शकत नाही. टाळी एका हाताने वाजते का? नाही. म्हणजे दोघेही दोषीच झाले ना.

7 comments:

 1. मस्त... किस्से वाचुन मजा आली... छान झाली आहे post... विषेशत: तो मैत्रिणिचा किस्सा वाचुन खुपच हसु आलं...

  ReplyDelete
 2. :) मजेदार झालंय पोस्ट.. !!

  ReplyDelete
 3. भाग्यश्री,
  मामालोकांचे भन्नाट अनुभव. मलाही या मामालोकांनी बरेंच पिडले आहे. या लेखापासून कांही स्फूर्ति मिळाली तर बघतो.फार छान झाला आहे हा लेख. अजून येऊं देत.

  ReplyDelete
 4. भाग्यश्री,
  मामालोकांचे भन्नाट अनुभव वाचून मजा आला.फार छान झाला आहे लेख.ही स्फूर्ति घेऊन माझेही अनुभव लिहिण्याचा मोह होतोय.तू मात्र खूप छान लिहिले आहेस. शुभेच्छा!

  ReplyDelete
 5. mast lihales.. maja ali vachoon khup.. mala pan nehami handsome cops disatat ;)

  Chakali

  ReplyDelete
 6. mastt kissa ahe maitrinichaa !!

  chakali, ithle cops handsome ch astat rav! by default.. ti kay condition ahe ka ithli??

  ReplyDelete
 7. रोहीणी, महेंद्र धन्यवाद. रोहिणी तुमचे रशियन भाषेचे मुके-बहिरेपण मस्त ग.

  अरूणदादा, बरे वाटले तुझी टिपणी पाहून. तुझ्या पोस्टची वाट पाहतेय.आभार.

  चकली, अनेक आभार. अग भाग्यश्रीने म्हटलेच आहे, पण खरेच इथले कॊप्स by default handsome असतात.

  भाग्यश्री, हो ग. नक्कीच, ही अटच असणार.:D
  धन्स ग.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !