जाता जाता एक नजर इथेही........

Monday, June 8, 2009

कुठे कुठे आणि कसे जपायचे?

परवाच्या पेपरमध्ये वाचले, " महिलांनो ट्रायल रूम मध्ये जपा.... " ही प्रथमच नव्याने आलेली बातमी नाही. पण ही वाचून अतिशय अस्वस्थपणा ला. मुली-बायकांनी कुठे कुठे आणि कसे स्वतःला जपायचे? का आता घरातच कोंडून घ्यायचे? कोणावर कशाचा भरवसा धरायचा? ही विकृती कुठल्या थराला जाऊन पोचणार आहे? कधीतरी हे थांबेल का? सगळ्याची उत्तरे ' नकारार्थीच ' मिळत आहेत. ही होकारात बदलण्यासाठी समाज म्हणजेच आपण सामुदायिकरीत्या काय प्रयत्न करू शकतो? पद्धतशीर प्रक्रिया सार्वत्रिक सहकार्याने ह्या घटना काही प्रमाणात तरी नक्की कमी होऊ शकतीलच ना?

आजकाल मॉल संस्कृती आपल्याकडे चांगलीच रुळली आहे. मोठी मोठी चकचकीत दुकाने. सुंदर कपडे त्यांना ट्राय करण्यासाठी चोहोबाजूने आरसे लावलेल्या छान ट्रायल रूम्स. टीन एजर्स, सगळ्या वयातल्या मुली, बायका मॉल्समध्ये मजेत बागडत असतात. वातावरणात एक प्रफुल्लित जल्लोष असतो. कपडे घ्यायचे नसले तरीही बऱ्याच जणी ते घालून आपण कसे दिसू ह्याचा आनंद घेताना मी अनेकदा पाहिलेय. सीरियस बायर्सही घरी जाऊन ट्राय करून नाही झाले तर परत आणण्यापेक्षा दुकानातच ट्राय करून पुढची कटकट टाळणे पसंत करतात. ह्या सगळ्यात आपण कपडे ट्राय करीत असताना छुपे कॅमेरे लावून आपले शूटिंग केले जात असेल ही शंका स्पर्शूनही जात नाही. पण हे घडतेय. सर्रास घडतेय. कदाचित ह्यात मालकाचा हात नसेलही परंतु हाताखालचे लोक काय करतात ह्यावर लक्ष ठेवणे ही त्याची जबाबदारी आहेच. छोट्या छोट्या रिटेल शॉप्समध्येही हे कॅमेरे आढळून आलेत. म्हणजे तिथे मालकाचाही सहभाग असला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी एक मेल आला होता त्यात, " रस्त्यावरून चालतानाही सेलफोनवर स्त्रियांचे फोटो काढणे आजकाल अतिशय बोकाळले असल्याचे फोटोसहित दाखवले होते. " हे फोटो काढून नको त्या साईट्स वर टाकले जात आहेत. म्हणजे आता स्त्रियांनी ऑफिसात, बाजारात, थोडक्यात रस्त्यावर चालायचेच नाही का? पुन्हा सेलवर कोणीही तुमचा फोटो काढतोय हे सहजपणे कळू शकत नाही. दुसरे समजा कळलेच तरीही बाई एकटीच असेल आणि काढणारा ग्रुप मध्ये असेल तर ती बिचारी काय करू शकतो आपण? उगाच तमाशा होईल ह्या भीतीने गप्पच बसते.

गच्चीतून दुसऱ्याच्या घरांमध्ये रात्रीचे वाकून बघणे. घरातून दुर्बिणीने दररोज लोकांच्या घरात डोकावणारे लोक आहेतच. प्रत्येकाला एसीची चैन परवडतेच असे नाही. म्हणजे उकडून घामाच्या धारा, बटाट्यासारखे शिजत असतानाही खिडक्या बंद करणे भाग आहे. मोकळी हवा भले ती प्रदूषित का असेना पण तीही नशिबात नाही.

हल्ली हे प्रमाण कमी झाल्यासारखे वाटतेय कारण घरोघरी कॉम्प्युटर्स आलेत. परंतु काही वर्षांपूर्वी सायबर कॅफे मध्येही असे व्हिडिओ शूटिंगचे प्रकार रिपोर्ट झालेत. आता तिथे जाऊन मुला-मुलींनी असे काही करावेच का? हाही एक मूलभूत प्रश्न आहेच परंतु त्याचे चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल करणे हा चक्क गुन्हा आहे. ह्या अशा दगडाखाली हात सापडलेल्या मुलींना बळजोरीने धंद्याला लावण्याचेही प्रकार घडलेत. काही ठिकाणी ह्यात कायद्याचे रक्षकही सामील असल्याचे वाचलेय. म्हणजे आता भरवसा तरी कोणावर ठेवायचा? हे तर कुंपणानेच शेत खाल्ल्यासारखे झाले.

गेली बरीच वर्षे हॉटेल्समध्येही, अगदी पंचतारांकित हॉटेल्समध्येही असे छुपे कॅमेराज लावून गेस्टसचे शूटिंग चालते असे अनेकदा उघडकीस आल्याचे मधूनमधून वाचायला मिळते. उघडकीस येणाऱ्या केसेस अर्धा टक्काही असणार नाहीत. म्हणजे उघडकीस आलेल्या अनेक. ह्या अशा टेप्स आजवर किती दूरपर्यंत दिसल्या असतील बिचारे किती नवरा -बायको, कपल्स ब्लॅकमेल ला बळी पडले असतील, अव्याहत पडत असतील. काही जणांना तर जीवालाही मुकावे लागले असेल. काय दोष आहे त्यांचा? ' कलियुग ' ह्या हिंदी सिनेमामध्ये फारच प्रभावीरीत्या हे मांडलेय.

समाजातील ह्या विकृतीसाठी किती स्त्रिया, मुली समाजातून, स्वतःच्या घरच्यांच्या नजरेतून उठणार आहेत? तेही त्यांचा दोष नसताना.

6 comments:

 1. फार भयंकर आहे हे सगळ..

  ReplyDelete
 2. नक्कीच. धन्यवाद प्रसाद.

  ReplyDelete
 3. या अशा गोष्टी घडत राहतात,याला कारण आपणच नं गं! कित्येकदा भीतीपोटी,गप्पच बसतो ना आपण...मग अशा वृत्ती अजून वाढतात.

  ReplyDelete
 4. बरोबर आहे तुमचा मुद्दा. पण भडक, उत्तान्न, लो नेक, लो वेस्ट कपडे घालुन जाणुन-बुजुन लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल कुणीच काही बोलणार नाही ये का?
  चित्रपटांमध्ये सलमान खान आणि सध्या दोस्तानामधील काही दृश्यांपुरता जॉन-अब्राहम सोडला तर कुणीही मेल कलाकार 'न्युड' म्हणता येईल असे कपडे घालताना दिसत नाही. फिमेल मध्ये मात्र चढाओढच लागलेली दिसते. हा मुद्दाही लेखनात समाविष्ट केला असतात तर बरे वाटले असते. :-)

  ReplyDelete
 5. अनिकेत, सखी अनेक धन्यवाद.

  अनिकेत तुमचे म्हणणे बरोअबर आहे. स्त्रियांनी,मुलींनी कपडे घालताना व आम्ही एकदम free,mod आहोत या नावाखाली उत्तान कपडे व नको इतके अंगचटीस जाणे मुळीच करू नये. परंतु चोरून हे असे चित्रीकरण करणे योग्य आहे का? आईच्या वयाच्या बायकांचे सेलफोन वर फोटो काढणे... तुम्हाला कुठल्याही angle ने justifibale वाटते का? नाही ना? मुद्दा तो आहे.
  नट्यांचे म्हणाल तर काही न बोललेलेच बरे. ज्यांना मनाचीही राहिलेली नाही.....

  ReplyDelete
 6. कुठल्याही वयाच्या स्त्रीचे चोरुन फोटो चोरुन काढणे नक्कीच justifiable नाही

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !