जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, June 20, 2009

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......

नीताचे लग्न झाले. नवरा, त्याच्या घरचे सगळे चांगले होते. निनाद मनात आयुष्यभर जिवंत राहणारच होता. त्याला बरोबर घेऊनच नीताने संसार-नवऱ्यावर लक्ष केंद्रित केले. पाहता पाहता तीन वर्षे लग्नाला झाली. नीताला दिवस राहिले. माहेरचे-सासरचे, नवरा सगळे कोडकौतुक करत होते. नीताही मातृत्वाच्या चाहुलीने हरकली. सातव्याचे डोहाळजेवण घाटत होते अन एक दिवस संध्याकाळी नवरा थोडा उदास चेहऱ्याने घरी आला. " नीता, अग थोडा घोळ झालाय गं. मला कळतेय तुला खूप वाईट वाटणार आहे पण हे टाळता येणार नाही. " " अहो आधी काय झालेय ते सांगा ना? मेला माझा जीव टांगणीवर..... " " अग, मला प्रमोशन मिळालेय. " नीताला कळेचना की प्रमोशन मिळालेय ही तर आनंदाची गोष्ट आहे मग ह्याला का नको झालेय ते? " अहो, मग यात वाईट कशाला वाटेल? उलट पाहा बाळ येण्याआधीच तुम्हाला प्रमोशन मिळाले. म्हणजे दोन दोन प्रमोशन्स होणार तर. "

तिच्या ह्या आनंदाने नवराही खुशीने हसला, पण " अग, हो ते आहेच गं. पण माझी बदली होणार आहे. ती ही पंधरा दिवसात. म्हणजे तुला आई-बाबांकडे नेहमीच जाता येणार नाही शिवाय आपल्याला घरही सोडावे लागेल. त्यात तुझे दिवस भरत आलेत. कसे होणार गं सगळे मॅनेज ? " " अहो एवढेच ना? होईल सगळे नीट. बरं बदली कुठे होणार आहे ते नाही सांगितलेत, फार कुठेतरी आडरानात तर नाही ना? " " ती तर गंमतच आहे बघ, तुमच्याच गावी होतेय. मी तुझ्या बाबांना फोन केला होता, ते म्हणाले अजिबात काळजी करू नका. जागेचा प्रश्न सोडवतो लागलीच. खूप ओळखी आहेत तिथे. " नवरा बोलत होता..... नीताचे लक्ष कधीचेच उडाले होते. पुन्हा आपण ....... अरे देवा! निनाद..... निनाद तिथे भेटला तर.......

पुढचे सगळे भरभर झाले. नीताच्या डॉक्टरने लागलीच आपल्या मित्राला एक पेशंट पाठवतोय तुझ्याकडे, नीट काळजी घे रे असे सांगून मोठ्ठा प्रश्न सोडवला. जागाही मिळाली. बस्तान बसले. हे होईतो आठवा महिना संपत आला होता. नीता चांगलीच जडावलेली. घरातही हळूहळू कामे करत होती. पहिले बाळंतपण माहेरीच पण नीताने ठाम नकार दिला. आईलाच ये म्हटले, त्यानिमित्ताने तुझ्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल गं. शेवटी हो नाही करता करता आईचेच येणे ठरले. आता सगळे बाळाची वाट पाहू लागले.

एक दिवस नवऱ्याने ऑफिसमधून फोन करून सांगितले, संध्याकाळी एका कलीगला घेऊन येतोय. अचानक काही प्रसंग उदभवला तर कोणीतरी हाताशी हवे शिवाय हा मित्र एकदम हसमुख, मस्त आहे. नीता बरं म्हणाली. तिच्याने फार काही करवत नव्हते तरी तिने साबुदाणा खिचडी व शिरा असा बेत केला. बेल वाजली, नीताने दार उघडले अन समोर निनाद उभा. दोघेही फक्त बेशुद्ध पडायची राहिली. तेवढ्यात नवऱ्याचा आवाज आला, " अग हाच माझा मित्र आहे. मी जरा टपाल घेऊन येत होतो ह्याला म्हटले हो पुढे. ये रे, आता ओळख करून देतो. निनाद ही माझी बायको नीता. अन बाळराजे आहेतच रस्त्यात...... काय? (जोरात हसून ) नीता हा माझा इथला एकमेव मित्र, निनाद. जिंदादील आहे एकदम. किती हँडसम आहे हे तू पाहतेच आहेस, पण अजून आम्ही most eligible bachelor बरं का. आता तूच विचार त्याला कशी पोरगी हवीय ते. "

नीता कसनुसे हसली, डोळ्यांनीच क्षमा मागत राहिली. निनाद व नीता दोघांनीही कलाकारांना लाजवेल असा अभिनय करून वेळ साजरी केली खरी पण किमान एकदा तरी भेटायलाच हवे असे मन म्हणतच राहिले. दोन दिवसांनी दुपारी फोन वाजला. आता या वेळेला कोण म्हणत नीताने फोन घेतला, तर निनाद होता. दोघेही खूप वेळ बोलले. परंतु नऊ वर्षांची कसर कशी निघावी. म्हणावे तर त्या दोघांमध्ये प्रत्यक्ष काहीच घडले नव्हते. तरीही जीव पूर्णपणे गुंतला होता. नीता निनादला विनवत राहिली लवकर लग्न कर म्हणून. निनादने हसण्यावारी घालवून तिच्या प्रकृतीबद्दल विचारत विषय बदलून टाकला. हळूहळू फोन सिलसीला चालू झाला.

निनाद - नीता आपल्या आपल्या मर्यादा जाणून होते. त्यामुळे आता डायरेक्ट अपेक्षा संपल्या होत्या. संवादात नकळत जास्त मोकळेपणा येत गेला. दिवस जवळ येत होते तेव्हा आता आईनेही यावे म्हणजे बरे असे म्हणून नवऱ्याने सासूबाईंना बोलावले. ती येण्याआधीच नीताला अचानक त्रास होऊ लागला. नवरा एकटा थोडं घाबरला त्याने निनादला फोन केला आणि गाडी घेऊन ये असे सांगितले. निनाद पळतच आला. नीताला सांभाळून दोघेही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रात्रीतच नीताला गोंडस मुलगी झाली. दोघीही मायलेकी खुशाल होत्या. रात्रभर निनादही तिथेच बसून होता.

आठ दिवसांनी बाळाला घेऊन नीता घरी आली. आई-बाबाही बरोबर होतेच. खुशीत तीन महीने कसे गेले कळलेच नाही. निनाद दोनदा चक्कर मारून गेला. आता बाळाचे बारसे झाले की आम्ही जातो असा धोशा आईने लावला. आई जाणार याचे वाईट वाटले तरी केव्हातरी आईला जावेच लागणार होते. मग थाटात बारसे झाले. निनाद अगदी घरच्यासारखा वावरला. एकीकडे नीताला त्याचे असे जवळपास राहणे आवडत होते पण कुठेतरी अपराधी भावही डोकावत होते. जे त्या न कळत्या वयातही निनादने सांभाळले ते आता उधळले जाऊ नये...

आईबाबा गेले. पुन्हा नीता- निनादचे फोन सुरू झाले. संवादात आक्षेपार्ह काहीही नसले तरीही मनाच्या तळाशी प्रेम तसेच तिष्ठत होते. एक दिवस नवरा घरी आला...... बूट काढतानाच म्हणाला, " अग नीता, दुपारी ना बराच वेळ मी तुला फोन लावत होतो गं. चांगला २०% बोनस मिळणार आहे मला. ही आनंदाची बातमी कधी तुला सांगेन असे झालेले .... पण फोन सारखा एंगेज लागत होता. कोणाशी बोलत होतीस एवढा वेळ? " नीताचा ठोकाच चुकला, पण वरकरणी.... " नाही हो मी कोणाशी बोलणार? कदाचित सकाळी फोन पुसत होते ना तेव्हा चुकून नीट ठेवला नसेल गेला. " तो विषय तिथेच संपला.

नवरा दमल्याने पटकन झोपून गेला. बाळाला मांडीवर घेऊन झोपवताना नीता फार अस्वस्थ झाली. नवऱ्यावर तिचे प्रेम होते. त्याने तिला नेहमीच आनंदी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता हेही तिला ठळकपणे दिसत असे. निनाद अजूनही लग्नाबद्दल काही बोलत नव्हता ह्याचाही तिला त्रास होऊ लागला होता. विचार करता करता कधीतरी तिला झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मनाशी ठरविले की आज निनादचा फोन आला की कालचा संवाद सांगायचा. नेमका आज निनादचा फोन जरासा उशिराच आला.

" का रे? कामात होतास का खूप? मी कधी पासून वाट पाहत होते. " " अग हो, होतो जरा कामात. पण तू का एवढी वाट पाहत होतीस ते सांग. " मग नीताने काल संध्याकाळी झालेला तिचा व नवऱ्याचा संवाद निनादला ऐकवला. " निनाद, तुझे-माझे नाते आता मित्र-मैत्रिणीचे आहे तरी मी नवऱ्याशी खोटे बोलले. का? मला ह्याचा फार त्रास होतोय रे. आपल्या नात्याचाही अपमान आहे हा आणि उद्या असेच सारखे काहीतरी घडत राहिले तर नवऱ्याचा गैरसमज होईल अन मोठ्ठा अनर्थ ओढवेल. मी फार गोंधळून गेलेय. तू काहीच बोलत नाहीयेस...... मग मला कसे कळेल तुला काय वाटतेय ते? बोल ना? " " अग हो हो.... तू एकदम अपमान, अनर्थ असे मोठे मोठे शब्द बोलू लागलीस ना मी घाबरलोच गं. तुला आठवते ना मी तेव्हाही तुला घाबरायचोच. म्हणून तर बाईसाहेबांना म्हणावे लागले ना....... " असे म्हणून निनाद मोठ्याने हसला.

नीताला वाटले हा काय वेडाबिडा झालाय की काय? मी इतके गंभीर बोलतेय आणि...... " हे बघ, उगाच डोके शिणवू नकोस. बाळाकडे लक्ष दे. मी पाहतो काय ते. वेडाबाई, परत स्वतःला कधी दोष देऊ नकोस हं का. चल मी फोन ठेवतो आता. तू जप गं स्वतःला. " नीताला खूप हलके हलके वाटले. पंधरा दिवस गेले. निनादने फोन केला नाही मात्र एकदा संध्याकाळी सहज चक्कर मारून गेला. एके संध्याकाळी नवरा म्हणाला, " अग आजकाल हा निनाद ना सारखा साहेबाच्या केबिनमध्ये घुसलेला असतो. काय खलबतं चाललीत कोण जाणे. "

रविवार सकाळचे नऊ वाजले होते. नीताने सुंदर कांदेपोहे केले अन कोथिंबीर, खोबरे घालून लिंबू पिळत होती तोच दाराची बेल वाजली. एवढ्या सकाळी कोण आले असा विचार करत नवऱ्याने दार उघडले, " अग नीता, पाहिलेस का कोण आहे ते? आता दुसरी प्लेट भर गं. खूप दिवसांनी दर्शन झालेय साहेबांचे. " कोण आहे एवढे म्हणून नीता डोकावली तर निनाद. ती हसली, " खरेच की. काय कुठे गुंतला आहात आजकाल? " " सांगतो सांगतो. पण आधी पोहे. अग ह्याने तुझ्या पोह्यांची इतकी तारीफ केलेली की आज सकाळीच ठरवले तुमच्याकडे दत्त म्हणून थडकायचेच. चल आण लवकर. "

नीताने दोघांच्याही प्लेटस आणल्या. जरा जिभेची चव भागल्यावर नवरा म्हणाला, " आता बोल, इतक्या सकाळी सकाळी? काय बातमी आहे? गुड न्यूज आहे का? " " यस्स्स..... गुड न्यूजच आहे. ( अय्या, लग्न ठरले का ह्याचे? नीताचे मन खूश झाले ) पण पहिल्यांदा, नीता पोहे अप्रतिम. मला अजून हवेत बरं का." " अरे मुलगी कुठली? कशी दिसते? कधी आणतोस दाखवायला? " नवरा आता घायकुतीला आलेला " अरे अरे थांब जरा. तुला मुलीशिवाय काही दिसत नाही का? तर मी एवढ्या सकाळी का आलोय......... ?(निनादने एक मोठा पॊझ घेतला......... नीता व मित्राकडे पाहीले तशी उत्सुकता अनावर होऊन नीताने डोळे मोठ्ठे केले..... ते पाहून हसत हसत ) अरे गेले काही दिवस ऐकून होतो, चंद्रपूरला टेरेटरी मॅनेजरची पोस्ट ओपन झालीयं. पण कोणीच जायला तयार नाहीये. मोठे प्रमोशन आहे ना रे हे. मी सडाफटिंग माणूस. विचार केला आपणच घ्यावे ना प्रमोशन. मग काय साहेबांच्या केबिनमध्ये धरणे धरून बसलो होतो. काम फत्ते. आज दुपारीच निघायचेय म्हणजे उद्या सकाळी रिपोर्ट करता येईल. "

नीता-नवरा दोघेही अवाक झाले. नवरा म्हणाला, " निनाद, अभिनंदन! पण इतक्या तडकाफडकी....... आता जेवल्याशिवाय जायचे नाही. नीता पटकन काहीतरी छान कर गं. " नीता हो म्हणत आत गेली. भिंतीशी टेकून डोळे मिटून उभी राहिली. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. माझा निनाद कधीही वेड्यासारखे वागणार नाही. तिने भरभर उकडलेल्या बटाट्याची भाजी, पोळ्या व शेवयांची खीर केली. तोवर निनाद व नवरा बाळाला खेळवत गप्पा मारत, हसत होते. बाराच्या ठोक्याला नीताने जेवण वाढले. मनापासून निनाद जेवला. डोळ्यांनीच नीताला मी तृप्त झालोय हे सांगत राहिला.

निरोपाची वेळ झाली. नवऱ्याचा हात हातात घेऊन निनाद म्हणाला, " मी गेलो की पत्ता-फोन कळवीनच. दररोज इथे नसलो तरीही मी तुमचाच आहे. ( नीताकडे पाहत म्हणाला... ) कधीही हाक मारा मी धावत येईन. जपा स्वतःला-बाळाला, येतो आता. "

15 comments:

 1. अभिप्राय देण्यासाठी शेवटच्या भागाची वाट बघत होते. मस्त जमुन आली आहे कथा... अलवार आणि संयमित भावना छान express झाल्या आहेत.

  ReplyDelete
 2. katha edam zakas zali...khup aawdli.

  ReplyDelete
 3. वा!!! सकाळच्या कांदा-पोह्या सोबत छान कथा वाचायला मिळाली..अप्रतीम...

  ReplyDelete
 4. नीता सुरतेला जाताना साधनाचा पत्ता घेऊन तिच्यामार्फत निनादशी संपर्क साधू शकली असती.

  निनाद दोनदा सुरतेला गेला. उत्तम, पण गेल्यावर त्यानी नीताला शोधायचा कसा प्रयत्न केला? त्या वेळेला सुरतला अशी किती कॉलेजेस होती की हा शोध अशक्य ठरावा?

  आणि नीताच्या नवर्‍याच्या नावाचा उल्लेखही नाही.

  माहेरी बाळंतपण करायला नीतानी 'ठाम' नकार दिला, तो का म्हणून?

  माफ करा पण येनकेनप्रकारेण त्रिकोण वगैरे तयार करून 'कथा' तयार होत नसते.

  - वेताळ

  ReplyDelete
 5. रोहिणी, प्राजक्त व प्रसाद धन्यवाद.उत्तेजन दिलेत, खूप आनंद झाला. असाच लोभ असू द्या.:)

  वेताळ स्वागत व आभार.

  नीता सुरतेला गेली तेव्हा साधना गावाला गेलेली होती. अनेक वेळा मित्रमैत्रिणी जवळचे असले तरी त्यांची घरे माहीत असतातच असे नाही.

  नीताच्या नवर्याचे नाव....राम, दिपक,प्रकाश...काहीही असले तरी त्याने काय फरक पडणार आहे?

  माहेरी बाळंतपण करायला नीताने नकार दिला केवळ नवर्याला नवीन( नीताचे जुने गाव असले तरी नवर्याला नवीनच होते) गावात एकटे ठेवण्यापेक्षा आई-बाबाच जर आले तर त्यांनाही जुने दिवस-त्यांचे स्नेहसंबंधी भेटतील.

  ह्या कथेत त्रिकोण तयार करायचा प्रयत्न नव्हताच मुळी.....तरीही तुम्हाला असे वाटले...:(
  सुचनांचे स्वागत आहेच, पुन्हा नविन काही लिहीताना जास्त स्पष्ट लिहीण्याचा प्रयत्न राहील. अनेक धन्यवाद.

  ReplyDelete
 6. भाग्यश्री, मी तुझ्या लेखनाची चाहती आहे. पण या वेळी मी वेताळशी सहमत आहे. या कथेत फार नाटकीपणा आहे. आणि घटनांची रचना विचारपूर्वक नाही. अगं नीताच्या आईबाबांना त्यांचे स्नेहसंबंधी भेटत राहणारच, ती माहेरी जावो अथवा न जावो. उलट नीता माहेरी गेली असती तर ओळखीच्या जागेत हे स्नेही भेटू शकणार.

  आणि निनाद दूर एकटा राहू शकत असेल तर जवळ गावातच एकटा न रहायला 'नवरा' काय कुक्कुलं बाळ आहे? त्याला स्वतःच्या नवर्‍यासारखा समजलीस की काय :)

  - वेताळ नंबर दोन

  ReplyDelete
 7. कथा छान आहे. पण माझ्या बायकोने असं काही केलं तर...टेरिबल भीती पण वाटते.

  ReplyDelete
 8. वेताळ नं२... हाहा...हा, अग बाई माझा नवरा एकटा जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो. :)
  मुळात नवरा राहायला नाही म्हणालाय थोडाच, नीताच्या मनात आहे त्याला एकटे ठेवू नये.आई-बाबांचे स्नेहसंबंध भेटण्याबद्दल म्हणशील ना तर हे मी अगदी वैयक्तीक अनुभवावरून लिहीलेय. माझ्या बाबांची बरेच ठिकाणी बदली झालीये, अग त्यावेळी अगदी क्लोज असलेले लोक नंतर दोन-चार पत्रांच्या पलीकडे राहीलेच नाहीत.:( आम्ही तर लहानच होतो.
  एका गोष्टीचा आनंद झाला, तुला माझे लिखाण आवडते हे या निमित्ताने मला कळले. पुढच्या वेळी कथा तुम्हालाही भावेल असा प्रयत्न नक्की करेन. आभार.

  साधक, अहो ही कथा आहे...म्हणूनच सिंपल आहे. लाईफ इतके सिंपल नसावे बहुतेक...
  आभार.

  ReplyDelete
 9. भाग्यश्री, कथा खूपच नेटकी, मनापासून लिहीलेली आणि संयत झालीये. तू म्हटल्याप्रमाणे शेवटचा हा भाग वाचल्यावर आधीच्या भागावर मी दिलेली टीकेची प्रतिक्रिया आता मलाच काढून घ्यावीशी वाटत्येय. तुझ्या कथेतली पात्रे जशी वागलीत तशी सभ्य सुसंस्कॄत लोक वागतात.
  अजून लिहीत रहा!

  ReplyDelete
 10. तुम्ही मनापासून लिहिलेल्या साध्या गोष्टीबद्‌दल तुम्हाला त्रास द्यायचा विचार नाही, आणि अजून एक वेताळ(बाई) टीका करायला सरसावलेल्या दिसताहेत. पण एक माझी शंका इथे मांडतो. कारण तुम्ही टीकेचा मोकळ्या मनानी स्वीकार करताहात, आणि ही बाब स्तुत्य आहे.

  संघर्षाचे किंवा नाट्याचे प्रसंग तुम्ही टाळता. यामुळे तुमच्या कथा ढेपाळणार. कदाचित कथा हा साहित्यप्रकार तुम्हाला लेखिका म्हणून न झेपणारा असू शकतो. निनादला चंद्रपूरला ढकलून दिलंत. त्याच्या पुनर्भेटीच्या वेळी नवर्‍याला टपाल पाहायला पाठवलं. पण ते जाऊ द्या. एक लपवाछपवीचा प्रयत्न खटकला. ही नीता तशी मोकळ्या मनाची दिसते आहे. (तुम्ही पण तशा लिखाणावरून दिलखुलास वाटता.) ती आणि निनाद दोघेही त्यांची आधी ओळख होती, हे लपवतील का? मला नाही वाटत. आणि जर असा प्रयत्न केला आणि पुढे साधना (किंवा जुन्या गावातल्या अनेक जुन्या मित्रांपैकी कुणीही) अचानक नीता-नवरा-निनाद या त्रिकुटाला भेटली नीता आणि निनादनी मैत्री लपवायचा केलेला प्रयत्न उघडा पडणार. तेव्हा एखाद्या कृतीचा पूर्ण परिणाम लक्षात न घेता येनकेनप्रकारेण कथा पुढे ढकलत नेली असा सगळा प्रकार वाटतो.

  - वेताळ

  ReplyDelete
 11. It is easy to write a story based on love or failed love. If you want to write a story seriously, try writing one without any tangle of love. You can choose an all-male or all-female cast and start from there. Your intention is sincere but there is no corresponding serious effort to match the desire to write a story.

  ReplyDelete
 12. वेताळ, नीता-निनाद मध्ये प्रेम व्यक्त करणे...हा संवाद अवघ्या काही मिनीटांचा आहे.अंकूर रुजला पण वाढला नाही. दोघांनी मनातल्या मनात तो जपला. एकमेकांना गृहीत धरून. नीता मुलगी असल्याने व निनादचा शोध घ्यायचा मार्ग तिला न सापडल्याने शिवाय घरातले वाढते दडपण..... (प्रॆक्टीकली विचार करता निनाद कशावरून आपली वाट पाहत असेल, असेही तिला वाटू शकते.हेच विचार निनादच्या मनातही येऊ शकतात)
  लग्न झाल्यावर नवरा हेच आपले सर्वस्व हेच विचार मनात ठेवून ती समरस होते.

  अचानक निनाद समोर आल्यावर... भांबावून ती ओळख दाखवत नाही. नंतर तो मार्ग बंद होतो. शिवाय एक मन म्हणते जिथे काही घडलेच नाही तिथे आधीची ओळख आहे हे सांगून नवयाच्या मनात संशयाला जागा कशाला द्या. उद्या जर तो म्हणाला...इतका हॆंडसम निनाद, तू ही देखणी तरी तुम्ही प्रेमात कसे नाही पडलात? हा रस्ताच बंद ठेवलेला बरा.

  मित्रमैत्रिणी समजा भेटलीच तरीही ते काय सांगणार होती? प्रत्यक्ष नीता व निनाद दोन प्रसंग वगळता कधी बोललेच नाहीत.
  निनादला कुठल्याही प्रकारे नीताला त्रास होऊ नये म्हणून... चंद्रपूरला बदली होणे बिलकूल अशक्यातले नाही.:)

  कथेचे मूळ सूत्र त्याच्या शिर्षकात दडलेले आहे.प्रेमात पडलेले दोन जीव एकमेकांचे झाले नाहीत तरीही एकमेकाला जपत राहीले. विशेषत: निनाद......:)
  असो. पुन्हा एकदा धन्यवाद.

  गुमनाम, अहो हा प्रेमाचा त्रिकोण नाहीये हो....
  आपण विषय सुचविलेत, आभार.:)

  ReplyDelete
 13. भानस,कथेची काल पासुन वाट पहात होती,शेवटी झोपताण्या पुर्वी एक् नजर टाकली.तेम्व्हाच अभिप्राय द्यायचा होता पण नीता च्या पात्रातुन बाहेर येऊ शकले नाही .मी रोहिणीशी सहमत आहे. खुपच छान मांडणी केली आहेस्.स्त्री कितीही शिकली सवरली तरी मनाच्या एका कोनाड्यात खुप काही तीने जपले असते.पण शेवटी तिचा संयमच तीला संसार सुखी करण्यास कारणीभुत करतो.माझ्या मते नीता आणि निनाद दोघे ही matured दाखवले आहेत..आणि ही कथा म्हणजे Ekata kapoor ची serial नाही हे वाचकानी लक्षात घ्यावे.Keep it up shree...

  ReplyDelete
 14. भानस...कथा उत्तम जमलीये....ग्रेट गोईंग...keep it up....

  ReplyDelete
 15. माऊ, धन्यवाद गं. तुला कथा आवडली... मला छान वाटलं.

  सुप्रिया, स्वागत व आभार. असाच लोभ असू दे.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !