जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, June 27, 2009

समज...

आता आठ दिवसात दिवाळी येणार...... मग खूप मजा. जुई स्वत:शीच बडबडत होती. शाळेला सुटी लागलीच होती. पहिलीत होती जुई. आई-बाबा व धाकटा भाऊ. चौकोनी कुटुंब. मध्यमवर्गीय. आमदनीपेक्षा खर्च जास्त होता नये. पगाराचा पाचवा भाग शिल्लक ठेवायचा म्हणजे अडीअडचणीला उपयोगी येतो अशा शिकवणीतले. सणवार, असेल त्यात आनंदाने साजरे करायचे.

जिकडून तिकडून फराळाचे वास येत होते. खमंग बेसन भाजल्याचा तर त्याला छेदणारा भाजणीच्या चकल्यांचा वास. लहान मुले एकमेकाला आणलेले फटाके नवीन कपडे दाखवत आनंदाने खेळत होती. जुईही आता बाबा कधी आपल्याला कपडे फटाके आणायला घेऊन जातात याची वाट पाहत होती. दोन दिवस गेले, पण बाबांनी काही जाऊया म्हटले नाही. तिने बाबांच्या मागे थोडी भुणभूण केली.... जाऊ हं लवकर असे म्हणून बाबांनी तिला खेळायला पाठविले. दिवसभराच्या खेळण्याने दमून जुई व भाऊ गाढ झोपले होते. केव्हातरी रात्री दचकून जुई जागी झाली. पाहिले तर आई दिसली नाही. एवढ्या रात्री आई कुठे गेली......

तेवढ्यात आई-बाबांच्या बोलण्याचा आवाज कानावर आला. आई म्हणत होती, " अहो, कशी हो दिवाळी साजरी होणार आता? आपले जाऊ दे. पण पोरं किती लहान आहेत. शिवाय आजूबाजूची सगळी मुले टिकल्या, फुलबाज्या वाजवूही लागलीत. जुई आणि विनीतला एखादा तरी कपडा आणायला हवा ना? घरात जे काही आहे त्यातून मी थोडे थोडे फराळाचे पदार्थ करेनच हो. पण......... " हे ऐकून बाबांनी कपाळ चोळले, " अग, तूच सांग आता लागोपाठ दोन्ही महिने माझे पगाराचे पाकीट मारले गेलेय. लक्ष ठेवून असणार गं कोणीतरी. तरी तू फार काटकसरी आणि निभावून नेणारी आहेस म्हणून कोणापुढे हात नाही पसरावे लागले. नाहीतर हे असे सणासुदीचे कोणाकडेतरी जाऊन उसने पैसे......... "

जुईला हे ऐकून एवढेच कळले की बाबांकडे पैसे नाहीयेत. तेव्हा आता आपण हट्ट करता नये. दिवाळीची पहिली पहाट आली. आईने कणकेचे दिवे केले होते. सगळ्यांना तेल उटणे लावून अभ्यंग स्नान घातले मग ह्या दिव्यांनी ओवाळले. जुईला त्या कणकेच्या दिव्यांचे खूप आकर्षण होते. खूप वाती असत त्यात. ओवाळून झाले की आई ते दिवे खिडकीत ठेवी. मग त्या उजेडात बादलीत गरम पाण्यात डुंबायला तिला खूप आवडे. नंतर बहुतेक एकाच वेळी ते विझत. त्यांचा विझताना येणारा वास ती भरभरून घेत राही.

आईने विनीतला नवीन शर्ट-पँट घातली. आणि जुईला हाक मारून सुंदर लेमन कलरचा फ्रील असलेला फ्रॉक घातला. केसांचे दोन बो घालून मोठ्या पिवळ्या ठिपक्यांच्या रिबीनी बांधल्या. खूप गोड दिसत होती जुई. जुईला फ्रॉक खूप आवडला. " आई, अग हा फ्रॉक कधी गं आणलास तू मला? " जुईच्या बालमनात प्रश्नच प्रश्न उभे राहिले. बाबांकडे तर पैसे नाहीयेत मग...... तेवढ्यात आईने जुईला फ्रॉकची गंमत सांगितली. मग विचारले, " जुई, अग तुझे आवडते काम करणार ना आज तू? हे ताट घे अन समोरच्या दळवी काकूंकडे घेऊन जा गं सोने. " कोणाला काही नेऊन द्यायला आईने सांगितले की जुई खूश.

आताही तिने ताट घेतले आणि ती निघाली काकूंकडे. काकूंचे दार वाजवले..... " कोण आहे? अगं जुई तू. ये ये आत ये. फराळाचे ताट आणलेय का? ठेव ते. किती गोड दिसतेय गं पोर. नवीन फ्रीलचा फ्रॉक आणला का यावेळी दिवाळीला? आईला सांग हो दृष्ट काढायला. " " काकू, अहो हा फ्रॉक नवीन नाहीये. काय झाले ना, आमच्या बाबांचे ना गेले दोन महीने पगाराचे पाकीट मारले. मग पैसे कसे असणार? विनीत छोटा आहे ना.... तो रडेल म्हणून आईने ना त्याला नवीन शर्ट-पँट आणली. आणि माझा वाढदिवसाचा फ्रॉक होता ना त्यालाच हा लेमन कलर देऊन आणला. पण किती छान दिसतोय ना? मला खूप आवडला. " हे ऐकले आणि काकूंचे डोळे पाणावले.

जुईला बोटाशी धरले आणि जुईच्या आईकडे आल्या. " जुईच्या आई पोरीची दृष्ट काढा हो आज. एवढूसा जीव पण केवढी समज आहे तिला. अहो मोठ्यांना पण कळत नाही अशा प्रसंगात कसे वागावे. आणि ही चिमुरडी, अगदी सहजपणे सांगतेय की फ्रॉकला कलर करून आणलाय आणि तो मला खूप आवडलाय. जुई, पोरी सुखी राहा. " जुईला आपण असे काय केलेय की आई आणि काकू आपल्याला गुड गर्ल म्हणत रडता आहेत हे कळलेच नाही. फक्त त्या दुःखाने रडत नाहीयेत हे पाहून ती बाबांनी आणलेल्या टिकल्या एक एक करून फोडण्यात रमून गेली.

5 comments:

 1. छान आहे ही कथा. मुलांच्या अशा समंजसपणाचा अनुभव प्रत्यक्षांतही येतो. बहुतेक मुले जात्याच समंजस असतात. अर्थात्‌ सुसंस्कराचेही महत्व आहेच. जुईला आई-वडिलांनी सुसंस्कार दिले हे नक्की.

  ReplyDelete
 2. अरुणदादा, ही सत्य घटनाच आहे......:). आभार.

  ReplyDelete
 3. परिस्थीती मुळेच सगळा समजुतदार पणा येतो. परिस्थितीच वागायला शिकवते या जगात . छान आहे गोष्ट . कथा लेखन हा पण एक विषय आहे,जॊ मला कधिच जमला नाही..
  :)

  ReplyDelete
 4. धन्यवाद महेंद्र.

  ReplyDelete
 5. काही विचारू नका.. सध्या जाम गडबडीत आहे ... आज निघतोय मेक्सिकोला जायला ... आता ह्या महिन्यातले बाकीचे ब्लॉग पोस्ट वाचून होतीलच लवकर ... :D

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !