जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, June 18, 2009

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्याचा

लायब्ररीमध्ये आजकाल फारच गर्दी होऊ लागलेली. वर्षभर उनाडणारी पोरेही पुस्तकात डोके घालून बसली होती. बारावीची परीक्षा अगदी दोन महिन्यावर आलेली. जोतो जीव आय मीन वर्ष वाचवायच्या खटपटीला लागलेला. प्रथमपासून अभ्यास करणारी, स्कॉलर पोरेपोरी थोडीशी शांत होती. बाकीची त्यांच्या मागेमागे. नोटस माग तर कुठे अडलेले समजावून घे. नीता.... शांत, सरळ मुलगी. मध्यमवर्गीय. आपण बरे आपला अभ्यास बरा ह्या प्रकारात मोडणारी. शाळेपासूनची मैत्रीण इथेही बरोबरच असल्याने नीताला नवीन ओळखी झाल्या असल्या तरी गुंतण्याची गरज वाटलीच नाही. सगळे आलबेल चालले होते. अन एक दिवस....

नीताने क्लासच्या दारात पाऊल ठेवले तोच कपाळावर... ठपाक..... " आई गं..... कोणी..... कोणी मारला बॉल? डोळे फुटलेत का? जरा समोर पाहा...... हा क्लास आहे खेळाचे मैदान नाहीये. स्स्स्स्स..... आता हे टेंगूळ ...... " नीताच्या कपाळावर टेबल टेनिसचा बॉल फाडकन बसला होता. दररोजच क्लास सुरू होण्याआधी निनाद व त्याचे मित्र सरांच्या टेबलालाच टेबल टेनिसचे टेबल बनवून खेळत असत. निनाद एका साइडने परमनंट मेंबर... तो हरतच नसे. दुसऱ्या बाजूचे प्लेअर्स बदलत राहत. वर्गातली खूप पोरे-पोरी ह्याचे फॅन्स. तसा हँडसम होताच. प्रचंड गोरा, धारदार नाक, चांगली सहा फुटापर्यंत उंची. किंचित बेफिकिरी...... केसांची झुलपे उडवताना ती जाणवत असे. वागणे-बोलणे मात्र एकदम सिंपल. पटकन कोणालाही स्वतःकडे खेचून घेणारी, आरपार जाणारी नजर. त्याच्याकडे फारसे कधीही न बघता नीताने केलेले हे त्याचे निरीक्षण होते.

तो दररोज एकदातरी दिसावा असे नेहमी तिला वाटे. पण ही भावना तिने इतर कोणाशी तर सोडाच स्वतःच्या मनाशीही शेअर केली नव्हती. वरकरणी मात्र ती त्याला बदमाश म्हणत असे. नेमका आज बॉल बसल्याने तिचा पारा तडकला होता. निनादने पाहिले, टेंगूळ तर आले होतेच. त्यालाही थोडे वाईट वाटले, तो सॉरी म्हणणार होता परंतु नीताने राग देताच तोही नकळत भडकला. " अहो मॅडम, काय.... तोंड चालूच ठेवणार का? मी बॅकहँड मारेतो तू दरवाज्याच्या आसपासही नव्हतीस . त्यात हा माझा मित्र तो उचलणार नाही हे माहीत होते का? नेमके तुलाच त्या बॉलसमोर कपाळ आणायची काय गरज होती? आणि काय गं, कधी पडली नाहीस का? एवढूसे टेंगूळ काय आलेय तर किती ओरडा आरडा करत्येस? अगदी रडूबाईच आहेस तू तर...."

तेवढ्यात बेल वाजली. क्लास जवळ जवळ भरलेला. इतक्या मुलामुलींसमोर सॉरी तर नाहीच म्हणाला उलट मलाच झापतोय ... नीताच्या डोळ्यात पाणी आले. इकडे एवढ्या पोरापोरींसमोर सरळ सरळ इन्सल्ट करतेय म्हणून निनाद वैतागलेला. नीताच्या डोळ्यातले पाणी पाहून मात्र कुठेतरी खोलवर दुखले त्याच्या. तो काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात सर आले, तशी ती दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसली. पूर्ण तासभर निनाद मधूनमधून नीताकडे पाहत डोळ्यांनीच सॉरी म्हणत राहिला पण नीताने कळत असूनही संपूर्ण दुर्लक्ष केले. क्लास संपला. पुढे पंधरा मिनिटांची रिसेस होती. नीता मैत्रिणींबरोबर लेडीज रूममध्ये जी पळाली ती बेल वाजेपर्यंत बाहेर आलीच नाही. त्या दिवशी निनादला संधी मिळालीच नाही. नंतर रविवारला जोडून कुठलासा बँक हॉलिडे आला मग कॉलेजची इलेक्शन्स होती. त्या धामधुमीत संपूर्ण आठ दिवस निघून गेले.

दहा-बारा दिवसांनंतर निनाद दुसऱ्या मजल्यावरून कॉलेजच्या गोल जिन्यावरून खाली उतरत होता तर त्याला तळात नीता दिसली. पांढरा शुभ्र लेसवाला मेगास्लीव्हजचा टॉप, खाली प्लीटेड शेवाळी रंगाचा स्कर्ट... नीताचे लांब केस हा चर्चेचा विषय होताच कॉलेजमध्ये. तिने दोन वेण्या घालून त्या पुढे घेतल्या होत्या. दिसायला सुंदर असूनही नीताला त्याची जाणीव आहे असेही दिसत नसे त्यामुळे ती अजूनच देखणी, निरागस दिसत असे. निनाद भरभर उतरून आला तोवर नीता पहिल्या मजल्यावर पोचली होती. अचानक निनादला समोर पाहून ती थबकली.

" नीता...... एक मिनिट गं..... " तशी भुवया उंचावत तिने खुणेनेच काय?
" अजून राग गेला नाही का तुझा? अग मी काय मुद्दाम मारला का तुला बॉल? तरीही मी सॉरी म्हणत होतो पण तू बसलीस तोंड फुगवून... मग मी कशी तुझी समजूत काढणार? " " निनाद , उगाच आव आणू नकोस. तुला काही वाईट वगैरे वाटलेले नाहीये. आताही मित्रांशी पैज मारून आला असशील काहीतरी..... चल, मी जाते. तूही जरा अभ्यास कर. नाहीतर होशील नापास. "

असे म्हणून नीता भरभर पायऱ्या चढू लागली.... मनातल्या मनात स्वतःलाच कोसत होती. बापरे! कशाला मी त्याला असे बोलले? आता हा अजूनच भडकेल. पण मला दिसतेय ना माझे मन त्याच्याकडे ओढतेय ते. एवढ्या जवळून आज प्रथमच पाहिले त्याला, भुवईवर खोक पडल्याची निशाणी दिसत होती. कपाळाला.... त्या.....खोकेला कुरवाळणारी झुलपं, धारदार नाकाच्या शेंड्यावरचा तीळ, थोडेसे जाड-भरलेले ओठ, संपूर्ण चेहऱ्यावर आलेला किंचित घाम ...... शर्टाची दोन बटन्स उघडी ..... त्यातून दिसणारी छाती अन तुरळक केसांची रेघ.......... अवघ्या दोन मिनिटांत मला व्यापून गेला हा. बाई गं, कळले असेल का त्याला माझे असे नजरेने............ नीता लाजेने अर्धमेली झाली. शब्द इतके कोरडे, फटकारणारे अन डोळ्यातून सांडणारे............... मज हवास तू......... काय खुळेपणा करतेय मी.....

निनाद दुखावला गेला......

क्रमशः

6 comments:

 1. सुरुवात छान जमली आहे.. :-)

  ReplyDelete
 2. बापरे! कशाला मी त्याला असे बोलले? टिपिकल मुली. मनात एक आणि बोलायचं एक !! सही आहे ! इंटरेस्टिंग.

  ReplyDelete
 3. प्रसाद, साधक....तुमच्या प्रोत्साहाने उत्साह वाढला. अनेक धन्यवाद.

  ReplyDelete
 4. 16व्या वर्षातले प्रेम हे असेच असते ..हो कि नाही???मस्त सुरुवात आहे.आता पुढे काय होते हे बघण्या करता ब्लोग वर यावेच लगणार.. हे हे...

  ReplyDelete
 5. उमा, हो गं... सगळे काही Looksवर.कळत तर काही नाही पण आव...:D.
  प्रयत्न करतेय गं लिहीण्याचा..... सांग जमला का फसला(सुधारणाही) ते. आभार.

  ReplyDelete
 6. काल काही कारणांमुळे संगणकासोबत दोन हात झाले नाहीत, त्यामुळे तुमची पोस्ट वाचली नाही. आज कालची आणि आजची अशा दोन्ही पोस्ट वाचल्या. सुरवात झाली आणि वाचतच राहिलो. खूप सुंदर लिहीले आहे. ही नीता नावाची बिनचेहऱ्याची मुलगी डोळ्यांसमोर उभी राहिली. कॉलेजमधल्या काही आठवणीही ताज्या झाल्या....उद्याच्या "एपिसोड'मध्ये तुम्ही काय लिहिणार याची उत्सुकता घेऊनच आज संगणकाला अलविदा केला आहे...उद्याची वाट पाहत आहे...

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !