जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, August 22, 2010

उंधीयो

थंडीची चाहूल लागली की दिल्ली मटार आणि उंधीयो हे दोन्ही हटकून बाजारात दिसू लागतात. मटारच्या लांब भरलेल्या हलक्या हिरवा रंग असलेल्या तजेलदार शेंगा जातायेता लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर सुरती पापडी, तिचे सोललेले दाणे, जांभळी-काळपट छोटी छोटी वांगी आणि कोनफळे. खंडेलवाल, प्रशांत व टिपटॉपकडे उंधीयोचे बोर्ड खुणावू लागतात. अनेक ठिकाणी घरगुती उंधीयोही मिळतो. गुजरातची खासियत असलेला उंधीयो महाराष्टात कधीचाच रुळलाय. अगदी रांग लावूनही उंधीयो घेणारे लोक घाटकोपरच्या टिपटॉपकडे पाहिलेत.

तशी ही बरीच खटपटीची भाजी आहे. त्यामुळे बहुतांशी बाहेरून आणण्याकडेच कल असतो. परंतु बाहेरच्या उंधीयोत प्रचंड तेल बदबदलेले असते आणि अनेकवेळा चक्क दुकानाच्या समोरील फुटपाथवर बसून तिथे काम करणारी पोरे तयारी करताना दिसतात. त्यावर उडणारी धूळ, येताजाता लोकांचे चाललेले ख्यॉखूं... आणि इतरही काही... पाहिले की अगदी कसेसेच होते. तरीही ती खायची वासना चक्क डोळेझाक करायला लावते आणि आपण खातोच. मात्र मिळतच नाही म्हटल्यावर हीच खादाडीची इच्छा अजूनच कटकटायला लागते. शेवटी आळशीपणाची हार आणि जिभेचा विजय होतो. तर असा हा उंधीयो पुन्हा एकदा गेले दोन तीन दिवस छ्ळत होता, सरतेशेवटी आज केला. आता माझा छळवाद संपलाय म्हणून पोस्टतेय. कदाचित तुम्हालाही आवडेल. वर म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतेय की जरा वेळखाऊ व किंचित मेहनत करायची तयारी ठेवून उंधीयो करावा लागेल. मात्र एकदा केलात की तब्येतीत हाणता येईल.

मैत्रिणींनो एकदा ही मेहनत करून नवर्‍याला खिलवलेत नं की पुढच्या वेळी ( आणि ती वेळ लगेच येईल ) जेव्हां, ’ पुन्हा कर गं ’ ची फर्माइश येईल तेव्हां, " ए नाही रे. आत्ताच तर केला होता. खूप मेहनत होते. तुला काय तू मस्त मज्जेने खाशील. " असे म्हणून आढेवेढे घेतलेत की लगेच नवरा किमान दिखाव्यापुरते तरी म्हणेलच, " हात्तिच्या! त्यात काय मोठे. चल मी मदत करतो तुला. " बस. मग पुढे काय करायचे ते मी सांगायला नकोच....




वाढणी : चार माणसांना दोन वेळा पुरेल.

उंधीयो हा खरे म्हणजे नुसताच खाल्ला जातो. वाडग्यात उंधीयो घेऊन त्यावर चमचाभर लिंबाचा रस, कोथिंबीर, दोन चमचे शेव व सणसणीत हिरवी चटणी घालून गरमागरम उंधीयो डोळे, जीभ व मन यासगळ्यांनी खायचा. पहिला वाडगा संपेतो कोणाशी बोलायचे नाही की टिवी पाहायचा नाही.

( साहित्याची लांबलचक यादी पाहून पळ काढू नका. खयालों में जा ...... )


साहित्य:

छोटी जांभळी-काळी वांगी दहा ते बारा
दोन मध्यम रताळी साल काढून तीन तुकडे करून
दोन मोठे बटाटे साल काढून तीन तुकडे करून
सुरती पापडीच्या शेंगा चारशे ग्रॅम/ फ्रोजन घेतल्यास एक पाकीट
सुरती पापडीचे सोललेले दाणे पाव किलो/ फ्रोजन घेतल्यास एक पाकीट
कोनफळ अर्धा किलो : दोन इंचांचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत
कच्ची केळी दोन घेऊन त्याचे प्रत्येकी दोन तुकडे करून

एक मोठी कोथिंबिरीची जुडी पाने व काड्या वेगवेगळ्या करून घ्यावी व दोन्ही चिरून ठेवावे.

अर्धी वाटी तेल, दोन चमचे तूप

पाच - सहा चमचे लाल तिखट, दीड चमचा हळद, चार - पाच चमचे धणेजिरे पूड, एक चमचा गरम मसाला.
( आवड व झेपेल तितके प्रमाण वाढवावे, )

दोन चमचे चिंचेचा घट्ट कोळ.

एक चमचा साखर व चवीनुसार मीठ.


मसाल्यासाठी :

एक मोठा लसणाचा गड्डा सोलून तुकडे करून : पाच-सहा चमचे तरी हवेतच
चार चमचे आल्याचे चिरलेले तुकडे
बारा-पंधरा हिरव्या मिरच्या चिरून
पाऊण वाटी तीळ
चार चमचे सुके खोबरे ( शक्यतो तयार खीस मिळतो तो घ्यावा )
अर्धी वाटी चिरलेल्या कोथिंबिरीच्या काड्या


मुठीये करण्यासाठी :

अर्धी मेथीची जुडी: पाने खुडून धुऊन चिरून घ्यावीत
( जर ताजी मेथी मिळाली नाही तर फ्रोजन मेथी घ्या. तीही हाताशी नसेल तर कसुरी मेथी तीन चमचे घ्या )
तीन चमचे डाळीचे पीठ
दोन चमचे तांदुळाचे पीठ
दोन चमचे रवा
चार चमचे गव्हाचे पीठ
एक लसूण पाकळी ठेचून, एक हिरवी मिरची बारीक चिरून
पाव चमचा ओवा, एक चमचा हळद, हिंग व दोन चमचे लाल तिखट
चवीनुसार मीठ व एक चमचा तेल

तळण्याकरिता तेल.

हिरवी चटणी :
(ऐच्छिक )

पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक पेरभर आले बारीक चिरून, एका लिंबाचा रस, मूठभर चिरलेली कोथिंबीर व स्वादानुसार मीठ.

कृती :

वांगी धुऊन डेखं काढून मधोमध चीर करून घ्या. रताळी-बटाटे व केळाचे तुकडे धुऊन घ्या. ताजी सुरती पापडी मिळाल्यास दोरे काढून संपूर्णच ठेवा. दाण्यासाठी आणलेल्या सुरती पापडीतले दाणे काढून झाले की तीही घ्या. कोनफळ स्वच्छ धुऊन ( फार माती असते याला लागलेली ) साल काढून तुकडे करून घ्या.

आता मसाल्यासाठी दिलेले सगळे साहित्य घेऊन मिक्सरला घालून वाटून घ्यावे. अगदी गंधासारखे नको परंतु एकजीव व्हायला हवे. साधारण एक मोठा वाडगा भरून मसाला तयार होईल.

एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये अर्धी वाटी तेल घालून तापत ठेवावे. चांगले तापले की वाटलेला मसाला घालून परतावे. आंच मध्यम ठेवावी. मसाला गुलाबीसर होईतो परतायचा. मात्र आंच मध्यम ठेवूनच.

तोवर परातीत मुठीये करण्यासाठी दिलेले सगळे साहित्य घेऊन पाणी न घालता मळावे. मेथी धुऊन घेतलेली असल्याने / फ्रोजन घेतल्यासही ती ओलीच असते, थोडेसे पाणी अंगचेच असते. एकदा का सगळे मिश्रण एकजीव होऊ लागले की लागेल तितकेच पाणी घालून पुरीची कणीक जितपत घट्ट भिजवतो तितपत घट्ट गोळा तयार करावा. जरासा तेलाचा हात लावून या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करावे किंवा लांबट मुटके करावे. कढईत तेल चांगले तापवून आच मध्यम करून सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

मुठीये करत असताना मसाला परतत राहावा. तेल सुटू लागलेले दिसले की रताळी व बटाटे घालून हालवून अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवून एक सणसणीत वाफ काढावी. ( दहा मिनिटे ) नंतर कोनफळ, सुरती पापडी व तिचे दाणे घालावे, त्यावर चिरलेली कोथिंबीर पसरून मिश्रण हालवून पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून वाफ काढावी. ( सात आठ मिनिटे )

आता बटाटे व रताळे बरेचसे शिजले असतील. वासही सुटू लागलेला असेल. मिश्रणाचा कच्चा रंग बदलून थोडीशी तकाकी दिसेल. त्यावर वांगी व केळी घालून उरलेली सारी कोथिंबीर व अर्धी वाटी पाणी घालून हलक्या हाताने ढवळून वाफ काढावी. ( सात-आठ मिनिटे ) आच आपण मुळातच मध्यम ठेवली आहे ती तशीच हवी.

झाकण काढून लाल तिखट, हळद, धणेजिरे पूड, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण हलकेच ढवळून दोन मिनिटे झाकण ठेवावे. अर्धी वाटी पाण्यात चिंचेचा कोळ मिसळून ते पाणी व साखर जवळपास शिजलेल्या उंधीयोत घालून ढवळावे. उंधीयोला तेल सुटू लागलेले दिसत असेलच. तयार करून ठेवलेले मुठीये घालून जर पाणी अगदीच कमी वाटले ( उंधीयोला रस्सा असत नाही परंतु ते कोरडेही नसते. जिथल्या तिथे प्रकारात ते मोडते. ) तर वरून पाण्याचा एक हबका मारावा व झाकण ठेवून सात-आठ मिनिटे ठेवून आचेवरून उतरवावे. झाकण काढून त्यात तूप मिसळून लगेच झाकण ठेवावे. ( तुपाचा स्वाद मुरू द्यावा )

वाढताना शक्यतो एखादे वांगे, केळे, बटाटा, रताळे, कोनफळ, पापडी-दाणे व दोन तीन मुठीये येतील असे सगळे वाढावे. लिंबू, कोथिंबीर, शेव व हिरवी चटणी घालून गरम गरम, नुसते अथवा पुरी किंवा फुलक्यांबरोबर खावे.

टिपा:

सुरती पापडी व तिचे दाणे उंधीयोसाठी हवेतच.

फ्लॉवर, फरसबी, कोबी, टोमॅटो, सिमला मिरची, वगैरे सारख्या भाज्या यात घालू नयेत. कंद चालतील.

तिखट, धणेजिरे पूड व मसाला घालताना हात थोडा सैलच सोडावा.

मुठीये करताना थोडे जास्तच करावेत. घरातले सगळेजण निदान दोन दोन तरी पळवतातच. आणि आपणही एखादा हळूच मटकावतोच.

इतकी मेहनत करून बनविलेला उंधीयो किमान दोन तीनदा तरी खाता यावा म्हणून... पण जर फक्त एकाच वेळेपुरता हवा असेल तर वरील साहित्य वापरून केलेला उंधीयो साधारण आठ ते दहा माणसांना पुरावा.

उंधीयोतील भाज्या शक्यतो मोडू/ गाळ होऊ देऊ नयेत. अखंड राहायला हव्यात. त्यासाठी अडस होईल असे पातेले अजिबात घेऊ नये.

अजून वाचतायं.... का फोटू पाहून पळ काढलात??? आता मी मात्र कलटी मारतेयं.... कुठे? पानं घेतलीत नं ...... .

31 comments:

  1. तये... अगं काय हे ... जरा ३ दिवस थांबता येत नाही तुला??? आ...................

    हे उंधियो म्हणजे कोनफळ आमच्या गावाकडे एक खास भाजी. हिवाळ्यात आम्ही ते घरीच बनवतो गावाला. मडक्यात सर्व एकत्र करून जमिनीखाली मडके गाडून, भोवतून चूल पेटवून शिजवायचे..

    आयला खपलो.. ठार झालो मी... किती मिटक्या मारू अन किती जिभल्या चाटू ...

    अरारारा...!!! तुझा खरच मोठाच्या मोठा निषेध... आता मी तिकडे जाऊन हल्लाबोल करणार ... :P

    ReplyDelete
  2. रोहना, तू इथे असतास नं तर तुला पोष्टला असता रे. पण तू बसलायस कुठच्या कुठे टोकाला जाऊन.... सध्या तू डोळ्यांनीच खाऊन टाक. :D

    ए त्या मडक्यातल्या खरपूस भाज्या कसल्या चविष्ट लागतात. आईगं नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले रे.

    ReplyDelete
  3. वांग्याची ऍलर्जी आहे ग मला.... :(

    ReplyDelete
  4. हात तुझी... मग वांगे घालायचे नाही. उंधीयोची चव काही कमी होणार नाही वांगी नसली तर. :)

    ReplyDelete
  5. आईगं श्रावणी सोमवार वगैरे विसरतात लोक अमेरिकेत ... छे छे घोर कलीयुग!!

    कसल्या पोस्ट या... ह्या आम्हाला पटत नाहीत हे प्रकार....

    मेले कौतूकही करवत नाही आणि निषेधही नाही... या अवस्थेचाच निषेध आज!!

    तू भारतात कधी जातेस ते नक्की कळव म्हणजे मी आणि रोहन तुझ्या स्वागतालाच उभे रहातो आणि सगळे पदार्थ तू करुन खाऊ घातल्यावरच तूला घरी सोडतो बघ आता!! :) बाकिही कोणी येणार का रे.. कळवा पटापट!!

    ReplyDelete
  6. भाग्यश्री ताई पहिल्यांदाच कॉमेंट लिहित आहे. पण मी तुझे सर्व ब्लॉग वाचले आहेत. उंधियो नाव खूप ऐकल आहे पण कधी खाल्ला नाहिये. यात जे कोनफळ लिहिले आहे ते काय? पुण्यात हे नाव मी कधी ऐकलं नाहिये. दुसरं काही नाव आहे का याला?

    ReplyDelete
  7. उंधियो..सहि एकदम...मला पण ज्याम आवडतो हं..मी मात्र अजुनही मडक्यात बनवते...मी उंधियो करता स्पेशल मडके बनवले आहे...तु माझ्या घरी आलीस न श्री की उंधियो उडवु...नक्की..

    ReplyDelete
  8. कित्ती दिवसांनी उंधियोचा फोटो पाहिला....
    कधी खायला मिळेल कोणास ठाऊक... :(
    निषेध!

    ReplyDelete
  9. आहाहाहा...माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये त्याने आवर्जून खायला संगितलेला पदार्थ..पण त्यात काही जिन्नसवर दिलेले नव्हते..पण चव उत्कृष्ट लागते..
    एकदा घरी करायला ट्राइ केला पाहिजे:)

    ReplyDelete
  10. बाये, ह्या ऐन धुमशान पावसात ह्या असल्या आठवणी का करून देतीयस ?
    वाचल्यावर सवयीने त्या प्रशांत कॉर्नर च्या दारात जाऊन उभा राहिलो ......
    तर त्याने हाकलूनच लावले कि ग ,, म्हणे या ३ महिन्यांनी ....
    शेजारी गेलो नुसताच `कृष्ण', त्यात कायपण `राम' नाही, !
    आता तूच सांग .... हे असले सगळे वाचल्यावर कोणाला इतके १०० दिवस वाट बघवेल ...
    मग प्रशांत पेक्षा तुझ्या येण्याची वाट बघत विमानतळावर मुक्काम ठोकावा...
    तर त्या आयात होणाऱ्या सापाझुरळांच्या भीतीने ते पण शक्य नाही :"(
    म्हणजे तो पर्यत नशिबी फक्त भात-पिठले ....?

    ReplyDelete
  11. ये तन्वे, आमच्याकडे श्रावणी सोमवार उजाडायचा होता की... मला तुझ्या उपासाची किती काळजी ते नाही दिसत तुला... :P

    तू येणार आहेस मी जाईन तेव्हां... बघ हं मग कारणे चालणार नाहीत. रोहन तर फक्त ढांगभर अंतरावर आहे. मज्जा करू. :)

    ReplyDelete
  12. लिना, ब्लॉगवर स्वागत आहे. अगं कोनफळ हे कंदात मोडते. साधारण सुरणासारखे वरून दिसते परंतु जरा जास्त काळपट असते ( वरून दृष्यस्वरूप: मातीने माखलेले असते ) मात्र वरची साल काढली आत जांभळट रंग असतो. आळकुडासारखेच थोडे चिकट असते. नुसत्या कोनफळाची ओला नारळ व मिरची+जिरे+अमसुले घालून केलेली भाजीही मस्त लागते. मुंबईत कोनफळ बहुतेक सर्वत्र मिळते. माझ्या माहिती नुसार तरी याला हे एकच नाव असावे. ( इतर कोणाला माहीत असल्यास कृपया लिहा. धन्यू. )

    आवर्जून टाकलेल्या टिपणीकरता धन्यवाद. पुन्हा लवकरच दर्शन देशील. :)

    ReplyDelete
  13. विभी, तू घरी बनव असे म्हणायची हिंमत नाही करत... त्यापेक्षा नेक्स्ट टाईम आपण एका वेळी मायदेशी जाण्याचा बेत जमवू. मग रोहन, शमी, तन्वी, तू, महेंद्र, आणि जे जे येतील ते सगळे मिळून धमाल उडवू. :)

    ReplyDelete
  14. उमा, यस्स्स... मी आले की मडक्यातले उंधीयो आणि खिचडीचा फक्कड बेत... आणि मी तुझे मडके पळवणार. :P

    ReplyDelete
  15. सुहास, इथे भाज्यांचा फार दुष्काळ ( आपल्याकडच्या टिपिकल भाज्या म्हणतेय मी ) त्यामुळे जे असेल त्यातच प्रयत्न करायचा... त्यांनी काय काय अजून घातले होते?
    आभार.

    ReplyDelete
  16. राजीव, अरे तू ही ठाण्याचाच? सहीच!
    अरे अजून बाजारातला उंधीयो मिळायला वेळ आहे नं... नोव्हेंबर... १०० दिवस. :(

    साप-झुरळे आयात होणार आहेत.... हे बाकी एकदम भारीच. ती बया वाचतेय बरं का... आता निदान खोटे तरी आणेलच आणि तुझ्यामाझ्यावर टाकून आपली कशी पळताभुई होतेय ते पाहून खदाखदा हसेल.

    सब्र का फल बडा... सो थोडी कळ काढ. :)
    धन्यवाद.[ उगाच फार कोरडा कोरडा वाटतो हा शब्द कधी कधी... लिहायलाच हवे का???( प्रश्न स्वत:लाच विचारतेय... पण उत्तर... ) ]

    हेरंबा, तुझे कंस जिकडे तिकडे... :)

    ReplyDelete
  17. तुझी कृती भारी असते की सुरुवातीची चटपटीत बडबड उर्फ प्रस्तावना यात माझा नेहमी गोंधळ उडतो.. (अर्थात फोटू नेहमीच सगळ्यात भारी असतात त्यामुळे मी ते या स्पर्धेत धरत नाहीये.)

    उंधीयो मला तर आवडतेच पण माझ्या बाबांना प्रचंड आवडते. अगदी जीव की प्राण.. त्यांना तुझी ही पोस्त वाचायला सांगतो. :)

    ReplyDelete
  18. अरे वा!! अति सुंदर. हे काहीतरी टेलीपथी म्हणतात तसे झालेय. गेल्या सोमवारपासून उंधीओ डोक्यात आहे. कारण असे की ज्या हरवलेल्या मैत्रीणीशी गेल्या आठवड्यात बोलले, तिने तिच्या आईच्या हातचा उंधीओ खाउ घातला होता कॊलेजमध्ये असताना, अल्टीमेट. आणि तिला या अडीच दशके डोक्यात/जीभेवर रेंगाळलेल्या चवीबद्दल सांगायचे राहून गेले. लिहिते तिला.

    मीही २-३ वेळा इकडे सुरति पापडीच्या शेंगा मिळाल्या तेव्हा केला होता उंधीओ ... फारावर्षांपूर्वी... आता हिम्मत होणार नाही. :)

    पण सगळे वर म्हणतायत तसे... फोटोतला उंधीओ सुंदर आहे.

    ReplyDelete
  19. भाग्येश्री, तुझ्या घरच्यांची मजा आहे गं!!!

    ReplyDelete
  20. धन्यवाद हेरंब. बाबांनी फोटो पाहिला का?

    ReplyDelete
  21. सीमा, पुढच्यावेळी करू गं आपण तुम्ही आलात की. :)

    ReplyDelete
  22. आहे खरी मज्जा. :) धन्यवाद श्रीराज.

    ReplyDelete
  23. आज तुझ्या खाऊ गल्लीत जरा फेरफटका मारून आलो . पाय ओढत ओढत बाहेर पडेतो घशाला एकदम कोरडच पडली.
    बोलता येईना झाले . कसा बसा डॉक्टर कडे गेलो. त्याने मोठ्ठा ` आSSSSS ' करायला लावला, न एक प्रकाशझोत आत टाकून म्हणतो कसा -" काय, आज कुठे गेला होता ? ", लिहून सांगितले `खाऊ गल्लीत ' .
    तो हसला मिस्कीलपणे व विचारता झाला ` खाऊ गल्लीत किती वेळ होतास ?
    यापुढे जाशील तर नुसता कोरडा हिंडू नकोस, काहीतरी तोंडात टाकून ये ! सगळ्या लाळग्रंथीवर ताण पडलाय, त्या कोरड्या ठाक झाल्यात. "
    मी काय लिहिणार कागदावर पुढे ..... , बोलती तर आधीच बंद , आता लेखणी पण .......!

    तात्पर्य : ............................................. ( तुला कळलेच असेल ते आतापर्यंत )

    ReplyDelete
  24. मी उंधीयो कधी चाखलीच नाही :(
    पण फोटू पाहून निषेध करावाच लागला... :0))

    ReplyDelete
  25. सकाळी सकाळी माझ्या खाऊगल्लीचे इतके कौतुक ऐकून ओंजळीभर हसू चेहर्‍यावर पसरले रे. राजीव, तेरा ये कमेंट मेरे पे उधार रहा. :) धन्यू.

    ReplyDelete
  26. अरे... उंधीयो कधी खाल्लेच नाहीस तू? ह्म्म्म... हैदराबादेत नाही का मिळत? आनंद, पुण्यात मिळते रे.(मुंबईत मिळतेच सगळीकडे )

    ReplyDelete
  27. पण मग तुझी उधारी कायम वाढतच राहणार ........ कारण मला लिखाण(ब्लोग वगैरे ) येतच नाही.... हि हि हि ....

    ReplyDelete
  28. I am here for the first time, will read your blog .
    You are from Goa? i.e Sardesai from
    Goa . I would love to see some Goan dishes cooked at home if you are..
    Check out my blog too for goan food and put in your comments on it...

    ReplyDelete
  29. महक, ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मी कोकणातली आहे पण गोव्याची नाही. मात्र गोव्याला दोन वर्षे राहीलेली आहे. :) आपल्या ब्लॉगला जरूर भेट देईनच. गोवा म्हणजे आमचा अगदी जिव्हाळ्याचा आहे.

    अभिप्रायाबद्दल धन्यवाद. लोभ असावा.

    ReplyDelete
  30. Bhagyashri tai,Hee post vachlya pasun kadhi ekdache undhiyo banavte (aani khate) ase jhale hote.Shevti banavle magchya athavdyat,ani chakka tumhi sangitlya pramenech pratikriya milali majhya navryakadun!
    Itkya changlya recipe saathi khoop dhanyavad!

    Pushpa

    ReplyDelete
  31. पुष्पा, पाकृ जमली व सगळ्यांना आवडली हे वाचून आनंद झाला. थोडी खटपटीची आहे खरी पण श्रमाचे फळही तितकेच चविष्ट. :)

    खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !