जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, April 3, 2010

आठवणीतले ब्रेड कटलेट....

टिळक ब्रिज उतरून खाली आल्यावर डाव्या हाताला वळलो की कोपऱ्यात चंदू हलवाई. त्यावरून पुढे सरकलो की एक फ्लोरीस्ट आणि बरोबर तिथेच आहे हॉटेल स्वागत. गेली तीस वर्षे, मीच पाहत आलेय... बहुतेक त्याही आधीपासून हे हॉटेल आहेच. उडप्याचे असले तरी एकदम मस्त आणि जरा वेगळ्याच स्टाइलचे चाटही मिळते. शिवाय थाळी व काही पंजाबी खानाही मिळतो. घर-कॉलेज दादरलाच. नोकरी लागल्यावरही दादर सुटणे शक्यच नव्हते. जीवनात स्थित्यंतरे होत गेली तसतसे राहण्याच्या जागाही बदलत गेल्या असल्या तरी दादर हे अविभाज्य घटकातच अंतर्भूत राहिले.

स्वागत मध्ये आमचा अड्डा नेहमीच जमायचा. कॉलेजमध्ये गेल्यामुळे रडतखडत बाबांनी पॉकेटमनी रू. पन्नास देण्याचे कबूल केलेले पण त्यातही एक मेख होती. येण्याजाण्यासाठी बसचे वेगळे पैसे मिळणार नाहीत. तेव्हां बसचे मिनिमम तिकीट होते एक रुपया. त्यामुळे फार चैन परवडणारी नव्हतीच. स्वागत मध्ये एक खास चाटची डीश मिळे. नाव होते
ब्रेड कटलेट. एकच कटलेट पण आकाराने दणदणीत. सोबत कांदा, टोमॅटो, काकडी व रगडा. शिवाय बाजूला लाल-हिरवी चटणीही असे आणि याची किंमत होती एक रुपया पन्नास पैसे. एक खाल्ले की पोट भरून जाई. स्वागत आणि तिथे मिळणारे हे ब्रेड कटलेट म्हणजे कॉलेजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक होता. हल्लागुल्ला, साजरे झालेले वाढदिवस, काही एकदम सीरियस चर्चा सारे इथेच होत असे. लेकालाही अनेकदा खास नेऊन मी इथे खिलवलेय. गेल्या दहा वर्षात जेव्हां जेव्हां मायदेशी आले त्या प्रत्येक भेटीत मी आणि आई स्वागतमध्ये आलोच.

२००७ मध्ये मी आणि आई पुन्हा एकदा या ब्रेडकटलेटच्या ओढीने स्वागतमध्ये आलो तर अन्ना म्हणे की आता आम्ही ते बनवत नाही. बनवत नाही.....??? अरे, असे कसे.... आमच्या इतक्या आठवणींत सामावलेले हे ब्रेड कटलेट चक्क तुम्ही आता बनवत नाही..... मला खूप वाईट वाटले. तो म्हणे ताई दुसरे काही खाऊन पाहा नं... कितीतरी नवीन पदार्थ आणलेत.... पण मन उदास झाले. काहीच खावेसे वाटेना. फक्त कॉफी घेऊन निघालो. आता पुन्हा स्वागत मध्ये येण्याचे प्रयोजनच उरले नाही. आधीच हा सारा परिसरच बदलून गेलाय, ओव्हरब्रिज आलाय. फार्मर ब्रदर्सही राहिले नाही. अनेक छोटी मोठी दुकाने बदलली. नाही म्हणायला वालीया अँड कं, दाऊद शूज, चंदू हलवाई, अगरवाल क्लासेस, ज्योती हॉटेल, गांगल ऑप्टिशियन, आणि काही किड्स कॉर्नर्स अशी काही दुकाने आजही टिकून आहेत.

काल सहजच गप्पामध्ये कॉलेज- कट्टा- मणीजची इडली व अनलिमिटेड चटणी आणि सांबार, एवन चा समोसा, स्वागत व ब्रेड कटलेटची आठवण निघाली. त्या मुक्त मजेच्या, आनंदी, स्वच्छंदी दिवसांची, मित्रमैत्रिणींबरोबर केलेली धमाल, भटकंती..... सारे सारे जसेच्या तसे तरळून गेले. आता सगळे कुठे कुठे पांगलेत. आपापल्या संसारात - रहाटगाडग्यात अडकलेत. स्वागतही बदलून गेलेय. वाटले निदान तेच ब्रेड कटलेट आपण घरी करावे व त्या सोनेरी दिवसात रममाण व्हावे. तुम्ही आधी कधी स्वागतला गेला असाल आणि खाल्ले असल्यास पुन्हा एकवार तुमच्याही आठवणी ताज्या होतील. ( आता मिळतच नाही नं ते...... ) आणि खाल्ले नसल्यास घरी करून पाहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. घरी एखादा पदार्थ करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे चवीत थोडा बदल करता येतो. खास करून तिखटपणा वाढवता अथवा कमी करता येतो. मीही थोडासा बदल केलाय. स्वागतच्या ब्रेड कटलेटमध्ये चटण्यां व्यतिरिक्त काहीच नसे. मी चटण्या व मटाराचे जरासे सणसणीत स्टफिंगही घातलेय. :)



कटलेटच्या आवरणासाठी साहित्य:

दोन मोठे बटाटे उकडून घ्या.
चार ब्रेडचे स्लाइस चुरा करून
एक चमचा जिरे, चार मिरे, चवीनुसार मीठ व एक चमचा तेल

रगड्यासाठी साहित्य:

दोन वाट्या भिजलेले पांढरे वाटाणे उकडून घ्यावेत.
नेहमीची फोडणी व दोन चमचे तेल व चवीनुसार मीठ

स्टफिंगसाठी साहित्य :

दोन वाट्या ओले मटार दाणे ( आजकाल वर्षाचे बारा महिने फ्रोजन मटार मिळतोच )
मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
एक छोटा कांदा बारीक चिरून
दोन लसूण पाकळ्या, एक चमचा जिरे व दोन हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्यात
चवीनुसार मीठ व अर्धा चमचा साखर
एक चमचा लिंबाचा रस व दोन चमचे तेल

चटण्या:

हिरवी चटणी:
दोन मुठी कोथिंबीर बारीक चिरून
चार हिरव्या मिरच्या
सहा सात पुदिना पाने
दोन लसूण पाकळ्या
चार चमचे लिंबाचा रस
चवीनुसार मीठ घालून लागेल इतके पाणी घालून चटणी करावी.
( पाणी जरा कमीच घालावे. चटणी वाहायला नकोय )

लाल चटणी:
चार सुक्या मिरच्या
चार लसूण पाकळ्य़ा
चवीनुसार मीठ घालून कमीतकमी पाणी घालून चटणी करावी.
( ओल्या लाल मिरच्या मिळाल्यास ही चटणी अजूनच सुंदर व सणसणीत होते )

चिंचगुळाची चटणी:
दहा-बारा खजूर ( बिया काढून कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घ्या )
एक टेबल स्पून चिंचेचा घट्ट कोळ
तीन टेबल स्पून किसलेला/भुगा केलेला गूळ
अर्धा चमचा धणेजिरे पूड
अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ घालून लागेल तितके पाणी घालून चटणी करावी.
( अती घटटही नको व पाणीदारही नसावी )

एक मध्यम कांदा, एक काकडी व एक टोमॅटो: बारीक चिरून घ्यावे.
कटलेटस शॅलो फ्राय करण्यासाठी दहा ते बारा चमचे तेल.

वरील साहित्याची सहा ते सात मोठी कटलेट्स होतात.

मार्गदर्शन:

बटाटे व भिजलेले पांढरे वाटाणे उकडून घ्यावेत.

रगडा : कढई/ नॉनस्टिक पॅनमध्ये दोन चमचा तेल घालून ते तापल्यावर मोहरी, हिंग, हळद व एक चमचा धणेजिरे पूड घालून फोडणी करावी. त्यावर हे उकडलेले पांढरे वाटाणे घालून दोन-तीन मिनिटे मोठ्या आचेवर परतावे. नंतर गॅस मध्यम करून दोन भांडी पाणी व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून दहा मिनिटे ठेवावे. एक उकळी आली की आच बंद करावी. रगडा तयार.

आवरण : उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून किसून घ्यावेत अथवा हाताने कुस्करून घ्यावेत. लगदा झाला पाहिजे. किसल्यामुळे गुठळ्या राहात नाहीत व सोपे पडते. मिक्सरच्या चटणी जार मध्ये ब्रेडस्लाईसचे तुकडे, चमचा भर जिरे व चारपाच मिरे टाकून भुगा करून घ्यावा. एकावेळी दोन स्लाइसचे तुकडे टाकावेत. एक थेंबही पाणी घालू नये. कोरडा भुगा करायचा आहे. किसलेल्या बटाट्यात हा ब्रेडचा भुगा व चवीनुसार मीठ घालून मळावे. नीट एकजीव झाले की एक चमचाभर तेल लावून झाकून ठेवावे.

स्टफिंग : एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून मध्यम आचेवर गरम करावे. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून परतावे. एकीकडे लसूण, जिरे व हिरव्या मिरच्या वाटून घेऊन या परतलेल्या कांद्यावर टाकून दोन मिनिटे परतावे. त्यावर ओला मटार, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून सारे मिश्रण हालवून पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणावी. मटार पटकन शिजतो. जरा कमी शिजलाय असे वाटल्यास अजून तीन-पाच मिनिटे झाकण ठेवावे. आता त्यात साखर व कोथिंबीर घालून परतावे. दोन मिनिटांनी आचेवरून उतरवून त्यावर लिंबू पिळावे.

सगळे साहित्य तयार झाल्यावर साधारण मोठ्या लिंबाएवढे चार गोळे घ्यावेत. हाताला किंचितसे तेलाचे बोट लावून हातावरच थापून घ्यावे. हाताच्या तळव्याएवढा प्रत्येकाचा आकार करावा. पहिल्या चकतीला हिरवी चटणी लावावी. त्यावर दुसरी चकती ठेवून त्यावर एक टेबल स्पून स्टफिंगसाठी केलेली भाजी घालावी. त्यावर तिसरी चकती ठेवून लाल मिरचीची चटणी लावावी. त्यावर चौथी चकती लावून हलक्या हाताने या चारही चकत्या बंद कराव्यात. अशा प्रकारे चार कटलेट तयार करून घ्यावीत. नॉनस्टिक तव्यावर दोन चमचे तेल सोडून मध्यम आचेवर तवा तापवून घ्यावा. शक्यतो सगळीकडे सारखी आच लागेल असे पाहावे. तवा तापला की हलकेच तयार कटलेट ठेवून बाजूने चार चमचे तेल सोडावे. आच न वाढवता कटलेटस सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यावीत. वाढताना गरम गरम कटलेट वाटीभर रगडा, तीनही चटण्या व कांदा, टोमॅटो व काकडीबरोबर खायला द्यावे. आवडत असल्यास शेवही द्यावी.

टीपा:
रगडा जसजसा थंड होतो तसा घट्ट होत जातो. त्यामुळे वाढण्याआधी अर्धे भांडे पाणी घालून पुन्हा एक उकळी आणावी किंवा कडकडीत गरम अर्धे भांडे पाणी घालून सारखे करून घ्यावे. शिजवताना वाटाण्यांचा अगदी गाळ करू नये. कटलेटस शॅलो फ्राय करताना आच मोठी ठेवून भरभर करू नयेत. ब्रेडक्रम्समध्ये घोळून घेवून घेतले तरी चालेल. पण त्याची खास गरज नाही.

दिसायला ही कृती खूप वेळ खाणारी व बापरे! इतक्या गोष्टी कराव्या लागतील....... असे वाटायला लावणारी भासली तरी थोडेसे नियोजन केल्यास सहजी जमू शकेल. आदल्या दिवशी तीनही चटण्या व रगडा करून ठेवता येईल. अगदी स्टफिंगची भाजीही करून ठेवता येईल. दहा वर्षे आणि पुढे वयाच्या मुलांच्या पार्टीसाठी एकदम पर्फेक्ट पदार्थ. हमखास आवडणारा व पोटभरीचा. सोबत वेफर्स व केक किंवा एखादा गोडाचा पदार्थ असे कॉम्बिनेशन
करता येईल.

27 comments:

  1. sahiiiyeee...aajach sagali tayari karun thevate..udyacha menu suchavala g tu..

    ReplyDelete
  2. वा... इतक्या रात्रीच्या लेटकट मारून.. कटलेट खायला घालून भूक वाढवलीत .. :D आम्ही कोंलेज कंटीन मध्येच खायचो ब्रेड कटलेट... आता जाउन चक्कर मारावी म्हणतो एक... :)

    ReplyDelete
  3. अगं कसले भन्नाट दिसताहेत ते कटलेट्स.... तायो मला हवे गं....

    आजच करते थांब!!!

    ReplyDelete
  4. नक्कीच छान वाटतेय रेसिपी, वाचून व फोटो पाहून. मला जास्तकरुन हॊटेलमधले खाण्यापेक्षा घरी बनवायला व खिलवायला जास्त आवडते.भरपेट खाता येते. नो टेन्शन.तुमची हि रेसिपी नक्की करुन बघणार.
    शैलजा

    ReplyDelete
  5. फोटोत खूपच छान दिसत आहेत कटलेटस. मलाहि घरी बनवून खायला आणि दुस-यांना खिलवायला आवडते. रेसिपी नक्कीच ट्राय करते. हो आणि बनवताना कितीहि त्रास झाला तरिही खाल्यावर तो नाहिसा होतो.

    ReplyDelete
  6. छान वाटलं जुन्या आठवणी वाचताना... !! आणि वर कमेंटलेल्या एकाही शिलेदाराने केला नाही म्हणून माझा सगळ्यांच्या वतीने मोठ्ठा नि........... षे............. ध............. !!! :-)

    ReplyDelete
  7. शेवटी एकदाचं दादर अवतरलं बाई तुझ्या ब्लॉगवर...माझं दादरप्रेम तुला माहित आहेच..स्वागत मलाही माहिते कारण टिळक ब्रीज उतरलं की गप्पा मारत खादाडी करायला तेच ते...अगं पण हे काय त्याने कटलेट बंद काय केला चक्क...

    आणि हेरंब बरोबर मी पण नि...........षे................ध....कारण रेसिपी आहे की काय...एवढ्या पायर्‍या पाणी न गाळता करायच्या म्हणजे तुच हवीस...आम्ही आपले खाण्यापुरता बरे.....रोहणा...मी पण येते तुझ्याबरोबर कटलेट खायला.....

    ReplyDelete
  8. दोन पॅरा वाचून मनात ठरवतेय की या भारतवारीत स्वागतमध्ये चक्कर मारून ब्रेड कटलेट खाऊ तर तिसऱ्या पॅरामध्ये सगळी हवाच गेली. किती छोट्या छोट्या आठवणी आपण मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेल्या असतात नां?

    ReplyDelete
  9. माऊ, आवडले का सगळ्यांना...

    ReplyDelete
  10. रोहन, लेटकट आणि कटलेट....... एकदम सहीच जुळलेय... यादी मोठी लंबेलाट झाली असेल ना तुझी आता....खस ते खरवस...:)

    ReplyDelete
  11. तन्वी, अगं ये तू इकडे... नाहीतर नाशिकलाच भेटूयात... मस्त मज्जा करू.

    ReplyDelete
  12. Shailaja, स्वागत आहे. अगदी खरे आहे तुमचे म्हणणे...बनवताना थोडा त्रास झाला तरी खाल्ल्यावर तो नक्कीच नाहीसा होतो. तुमच्या दोन्ही टिपण्या ठेवल्यात... आवर्जून तुम्ही टाकल्यात त्यातली एक मला डिलटवली नाही... प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद. कटलेट करून पाहा आणि आवडले का ते कळवा बरं का...:)

    ReplyDelete
  13. हेरंब... हा हा... अजून आमची न्यूजर्सी ची वारी झालेली नाही. तेव्हां तुझा निषेध सहज घालवता येईल.

    ReplyDelete
  14. हा हा.... अपर्णा, तू पण ना.... अगं दिसायला जरा मोठी दिसतेय रेसिपी पण तू ट्राय कर गं... जमेल बघ नक्की. आणि मायदेशी गेल्यावर माझी आठवण काढा.... नाहीतर पोटात दुखेल.... :P

    ReplyDelete
  15. megh, हो ना.... किती प्रकारच्या आठवणींचा संचय करते हे मन. पुन्हा इथे माळ्यावर काय उगाच भरताड भरून ठेवलीये चला फेकून द्या पटापट... असेही म्हणता येत नाही... बरे-बाईट, कडू-गोड, हळवे-कोरडे सारे सारे आपापले कोने घट्ट पकडून बसलेले... खरे नं?

    ReplyDelete
  16. सुट्टी वर होतो म्हणून कट लेट वर लेट आलो. . .मी आता एक भली मोठ्ठी मेनु लिस्ट तयार करुन तुम्हाला मेल करून देतो म्हणजे जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा या सगळ्यावर आडवा हात हाणु. . :)

    ReplyDelete
  17. रात्रीचे दहा वाजत आहेत, जेवण अजुन व्हायचेय आणि ह्या अश्या पोस्ट्स... जोरदार निषेध...

    ReplyDelete
  18. मनमौजी, जरूर...मोस्ट वेलकम.

    ReplyDelete
  19. आनंद, मग आज हैद्राबादेत कशावर ताव मारलास... :)

    ReplyDelete
  20. काय गं ताई, इथे कशावर ताव मारणार ? भात भाजी हादडली... काय करणार? खुप भुक लागली होती :)

    ReplyDelete
  21. ओह्ह्ह.... :( आनंद,आता घरी जाशील तेव्हां जरा... आईच्या हातचे... :)

    ReplyDelete
  22. थोडी किचकट वाटते आहे पण खाताना केलेल्या श्रमांचे चिज होईल हे नक्की. करून बघायला हवी एकदा फुरसतमध्ये.
    सोनाली

    ReplyDelete
  23. अगो बाय माझी! भरल्या पोटात भुकेचा खड्डा पाडला या कटलेटानं. :p

    ReplyDelete
  24. सोनाली, आहे थोडी वेळखाऊ कृती पण थोडीशी तयारी आधी केलीस तर सहज जमून जाईल.... बाकी आपल्याकडे मनात आले की लगेच बाहेर जाऊन खाता येते गं... ती चैन इथे नाही नं( नेमके हवे ते हवे तेव्हांची चैन... )

    ReplyDelete
  25. shinu, पटकन उचल की कटलेट आणि खाऊन टाक.... :)

    ReplyDelete
  26. अगं तशी सोय असती तर मी स्वयंपाक करायचा सोडून तुझा ब्लॉगच दिवसातून तीन वेळा चावला सॉरी वाचला (????की पाहिला)असता नां :) (आयला हे भारीय अशी सोय हवी होती नाई पोरं भूक म्हणाली की म्हणायचा वाच जरा खादाडी ब्लॉग)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !