लग्नाच्या आधी स्वयंपाक करता येत असला तरी तो निव्वळ चौकोनी प्रकारातला. वरण-भात, भाजी व पोळी. म्हणजे कसे की वरण भात कुकरला आपसूक होतोय. एक वाटी तांदूळ घेतले की तीन वाट्या पाणी..... की आटोपला भाताचा कारभार . डाळीला पाणी घालताना... आईने सांगितलेले पक्के घोकलेले.... " अगं किती सोप्पयं.... डाळ धुतलीस नं की साधारण डाळीच्यावर अर्धे-पाऊण पेर पाणी तरंगेल इतपत ठेवायचे. आठवणीने हिंग, हळद व दोन थेंब तेल टाकायचे की झाले. पुढचे काम कुकर आपोआप करतोय. " अर्धे-पाऊण पेर म्हणजे नक्की किती... , हा घोळ आठवी ते बारावी चालूच होता. पण डाळीचे बरे असते, समजा अगदी गाळ झाला तर म्हणायचे काय झक्क मिळून आलीये नं आज... आणि जरा बोटचेपी - टचटचीत राहिली की.... पाहिलेस कशी अख्खी डाळ दिसतेय... आहे की नाही माझी युक्ती, जराही गाळ होऊ दिला नाही. शिवाय त्यावर साजूक तूप अन लिंबू पिळले की सगळे आनंदाने खातातच. काही नेमक्या भाज्या अन मस्त टम्म फुगलेले फुलके.... मनसोक्त तूप लावून गरमागरम ताटात पडले की उजवी डावी बाजू कोणी पाहत नाही.....पटापट स्वाहा करतात आणि पळतात.
पण..... जेव्हां इतर काहीही चटक मटक, अगदी साधा सांजा, उपमा, साबुदाण्याची खिचडी करायची वेळ आली तेव्हां घाबरगुंडी उडाली. एकतर लग्नाआधी चुकूनही या वरकरणी साध्या दिसणाऱ्या पदार्थांच्या मी वाटेला गेले नाही.... हे काय, अगदी सहज जमेल, त्यात काय शिकायचेय आणि करून पाहायचेय. त्यापेक्षा कधी पुरण पोळी कर तर कधी सांजाच्या पोळ्या कर तर कधी चकल्या.... जमले नाही तरी लुडबुड तरी करायचीच. लग्न झाले आणि दुसऱ्याच शुक्रवारी रात्री सासूबाईंनी साबुदाणा भिजवलेला पाहिला मात्र, माझ्या पोटात मोठ्ठा गोळा आला. अरे देवा! न जाणो उद्या मलाच करायला सांगायच्या. म्हणजे तसे, " सूनबाई, जरा अमुक कर गं.... " सारखी काही परीक्षा नसली तरी मला कुठे खिचडी येईलच ची खात्री होती. रात्रभर धाकधूक होत असतानाच कधीतरी झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी कळले की सासरे-मोठा दीर व नवरा, असा तिघांचा उपास असतो. मोठा दीर खास त्याच्याघरून दर शनीवारी खिचडी खायला येत असे.
सासरे नेहमीप्रमाणे फिरायला गेले. सासूबाईंचे सकाळचे कॉलेज, त्या गेल्या सातालाच. साबुदाणा भिजवला आहे गं... असे वाक्य हवेत सोडून त्या गायब. तसे त्यांनी प्रत्यक्ष मला खिचडी कर असे मुळीच सांगितलेले नव्हते. आणि असेही मी येण्याआधी जे कोण करत होते तेच आजही करेलच की.... मी कशाला उगाच स्वतःवर ओढवून घ्यावे, असा विचार करून थोडे दुर्लक्ष केले पण जीवाला चैन पडेना. मग बटाटा किसून ठेवला, आले-मिरच्या चिरून ठेवल्या, ओले खोबरेही खवले, दाण्याचे कूट वाटीत काढून ठेवले, अगदी कढईही गॅसवर ठेवली. सगळी जय्यत तयारी केली पण फोडणीला टाकायचा धीर काही झाला नाही. वाटले बिघडली तर सगळे चिडतील त्यापेक्षा नकोच.
सासरे फिरून आले आणि त्यांनी खिचडी केली. मी काढून ठेवलेले प्रमाण बरोबरच होते ते पाहून मला थोडे बरे वाटले. पुढे हळूहळू मी रुळले, सगळे पदार्थ करू लागले पण ही आठवण मनात पक्की बसली. सासू-सासऱ्यांना नक्कीच नवल वाटत असेल की ही इतके सगळी तयारी करते पण खिचडी फोडणीला टाकत नाही, ते काम मात्र ठेवते सासऱ्यांसाठी...... मी माझी भीती कधी त्यांना सांगितली नाही पण खरेच मला धीरच होत नसे.
बऱ्याच मैत्रिणींकडून अनेकदा साबुदाणा खिचडीच्या अनेक तऱ्हा ऐकल्या. कोणाची अती फडफडीत होई तर कोणाचा गचका... कोणाची कडकडीत तर कोणाची खरपूड.... एक ना दोन अनेक तक्रारी. नेमके चुकतेय कुठे याचा थोडा शोध घेतला ... तर काय.... सारे पाणी साबुदाणा भिजवण्यातच मुरतेय की.. .... खिचडी चांगली होण्याची पाऊण लढाई साबुदाणा भिजण्यातच आहे बाकी मग फोडणी आणि इतर कलाकुसर काय एकदम सोपी. शिवाय त्यात वेगवेगळे प्रकार करून पाहण्याची सोयच नसल्यामुळे अजूनच सोपा कारभार. साबुदाणा एकाच दुकानातून आणला तरीही अनेकदा तो वेगवेगळा निघू शकतो. त्यामुळे असे नाही एक वाटी साबुदाणा तर एक वाटी पाणी... साधे -सोपे गणित... पण नाही... तोही महा खट, काहीतरी घोळ होतोच.... मग कधी ओला गच्च तर कधी कोरडा ठाक.... बऱ्याच जणांना आपापला अनुभव असेलच की.... काय?
गेल्या वीस एक वर्षात मला आठवत नाही साबुदाण्याची खिचडी बिघडलेली..... त्या आधी मी बनवलेलीच नसल्याने म्हणजे तेवढा धीरच न झाल्याने.... अर्रर्रर्र... हे काय गं बनवलेय? किंवा हा गचका मी नाही खाणार तूच खा..... अशासारख्या टोमण्यातून बालबाल बचावलेयं.... खाली कृती देतेय, तुम्हीही करून पाहा. अजाबात चुकणार नाही. फक्त साबुदाणा मात्र बरोबर भिजवा म्हणजे जिंकलात म्हणून समजा.....
साहित्य:
तीन वाट्या भिजलेला साबुदाणा ( दीड- पावणेदोन वाट्या कच्चा साबुदाणा घेतल्यास साधारण तीन वाट्या भिजलेला भरेल )
तीन चमचे घट्ट साजूक तूप ( पातळ असल्यास चार ते पाच चमचे )
दोन मध्यम बटाटे साले काढून किसून घ्यावेत
एक मोठा चमचा जिरे
चार हिरव्या मिरच्या तुकडे करून ( तिखट आवडत नसल्यास नुसते पोट फोडून घ्यावे )
एक ते दीड चमचा आल्याचे बारीक तुकडे
चार ते पाच चमचे शेंगदाण्याचे कूट
दोन चमचे साखर व स्वादानुसार मीठ
दोन चमचे ओले खोबरे
दोन चमचे कोथिंबीर ( ऐच्छिक : काही जण उपासाला कोथिंबीर खात नाहीत- काही खातात )
वाढणी : तीन माणसांना पुरेल
मार्गदर्शन:
उद्या सकाळी खिचडी करायची असल्यास आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भांड्यात घेऊन भरपूर पाणी घेऊन धुवावा. पाणी काढून टाकावे. नंतर साधारण साबुदाण्यावर पाऊण सेंटिमीटर ( अंदाजे पाव पेर तरंगेल ) इतपत पाणी ठेवून झाकून रात्रभर ठेवून द्यावा. सकाळी सगळे दाणे छान टपोरे फुललेले दिसतील.
कढई-नॉन स्टिक पॅन मध्ये तूप घालावे व मध्यम आचेवर ठेवावे. तूप वितळले की जिरे टाकावेत. मिनिटभराने हिरव्या मिरच्या व आले टाकून परतावे. जिरे व आले-मिरचीचा वास सुटला की बटाट्याचा निथळून घेतलेला कीस त्यावर टाकून परतावे व मध्यम आचेवरच झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. नंतर एकदा ढवळून कीस शिजला आहे का त्याचा अंदाज घ्यावा, थोडा कच्चट वाटला तर अजून तीन-चार मिनिटे झाकण ठेवूनच शिजू द्यावा. बटाटा आता नक्कीच शिजला असेल, त्यात साबुदाणा, स्वादानुसार मीठ व दोन चमचे साखर घालून नीट परतावे व झाकण ठेवून मध्यम धीम्या आचेवर पाच मिनिटे वाफ येऊ द्यावी. झाकण काढून त्यात दाण्याचे कूट घालून परतावे. दोन मिनिटांनी आचेवरून उतरवावे. ओले खोबरे, कोथिंबीर व लिंबू पिळून गरम गरम खायला द्यावी. लिंबू आवडत नसेल किंवा दही जास्त आवडत असेल तर सायीचे घट्ट दही घ्यावे.
टीपा:
साबुदाणा भिजवताना पाणी जास्ती होता नये व कमीही पडता नये. साबुदाणा कितीही खट असला तरीही एकदा भरपूर पाण्यात स्वच्छ धुऊन नेमके पाणी घालून झाकून सात ते आठ तास ठेवला की मस्त भिजतो व छान मोकळा होतो. झाकण न ठेवल्यास वरचा साबुदाणा कडकडीतच राहून जातो. उकडलेला बटाटा किंवा बटाट्याचे कापही घालता येतात पण उकडलेल्या बटाट्यामुळे खिचडी कोरडी होऊन घास लागतो कारण बटाटा सारे तूप शोषून घेतो. बटाट्याच्या कापांमुळे खिचडी मिळून येत नाही. कीस घालून करून पाहाच एकदा. साबुदाण्याची खिचडी ही सुरवातीला गोड व शेवटी तिखट अशी लागायला हवी.
फोटोंच्या आधीचं मी वाचलं आणि नंतरचं अनुजाला वाचायला दिलं :P
ReplyDeleteफोटोंनी तोंडाला पाणी सुटेश हे वेगळं सांगत नाही आता :-)
US हुन असले भन्नाट फ़ोटु नका टाकत जाउ बाई...सकाळी सकाळी जिव भुकेने कासाविस...[:p]अशा अनेक घटना लग्नानंतर घडतात नां...आठवल्या तरी हसु येते...:)
ReplyDeleteहेरंब,हा हा....मापात पाप नको...तुझ्या फायद्याचे .... खादाडीचे अनुजाला दिलेस काय... :)
ReplyDeleteमाऊ, अगं ये नं तू... अगदी गरमगरम खायला देते तुला लगेच.... :) तर काय.... आता हसू येतेयं पण तेव्हां घाबरगुंडी...
ReplyDeleteअगं साधि :) साबुदाण्याची खिचडी पण कसली मस्त पोस्ट लिहीलीयेस तू.... आणि अगं ही माऊ आणि हेरंब कुठल्या फोटोबद्दल बोलताहेत ...मला तर नाय बा दिसला कूठला फोटू बिटू.....
ReplyDeleteमला साबुदाण्याच्या खिचडीबरोबर ताक लागतं, अमितला दही...मग आम्ही तू कशी बेचव खातोयेस/खातेस असे वाद घालत खिचडी खातो!! :)
माझ्या सासरी ते खिचडीला ’उसळ’म्हणतात...सुरूवातीला मला वाटायचं ;उसळ’ कुठे चालते उपवासाला आणि आईंना वाटायचे ’खिचडी’ कुठे चालते उपवासाला :)) ......बाकि कोथिंबिर आम्हीही खातो ..मला ना खरं तर हे चालतं ते चालतं हा प्रकार उमजतच नाही...
असो केव्हढाली मोठ्ठी कमेंट टाकते ना मी हल्ली...
त्यापेक्षा
नि---षे----ध हे बरेय.. :)
ताई, आमच्याकडे सुद्धा ह्याला साबुदान्याची उसळ म्हणतात. आईच्या उपवासाला मुद्दाम ती जास्त करायची आणि आम्ही विना-उपवासाचे हादडायचो. बरेच दिवस झाले नाही खाल्ली अश्यात... आणि फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटेश म्हणुन मोठा निषेध...!
ReplyDeleteतन्वी, अगं कमेंट आलीये गं... :) आणि फोटू दिसला नाही म्हणजे काय?? मी दोन फोटो टाकलेत नं पोस्टबरोबर... एक तयारीचा आणि दुसरा खिचडीचा... तुला दिसत नाहीयेत का? आता ही काय नवीनच भानगड आहे गं? कळवं गं जरा... पुन्हा पाहून फोटो दिसतात का ते?प्लीज.... :)
ReplyDeleteसाबुदाण्याची उसळ...हा हा...खरेच गं कानाला काही वेगळेच ऐकल्यासारखे वाटते...आणि अहो आणि अगं ची जुगलबंदी तर घरोघरी सारखीच चालू... मस्त वाटले कमेंट वाचून... उगाच त्रोटक नको गं...
आनंद, तर तर...आईचा उपास आणि तुमची चंगळ. आता घरी गेलास की येईलच कुठला नं कुठला उपास... मग हादडा मस्तपैकी, तोवर फोटूवरच समाधान मानून घे...:)
ReplyDeleteधत तेरी की...अगं राणी फोटू दिसला नाही म्हणजे मी डोळे बंद केले गं ....सकाळी अत्याचार कोण बा सहन करेल... आधि किचनमधे गेले ४-५ मस्त लुसलुशीत ईडल्या चापल्या, चहाचा कप हातात घेतला आणि मग खिचडीच्या फोटोचा आस्वाद घेतला....
ReplyDeleteयेव्हढी पुर्वतयारी करूनही खिचडीच्या फोटोसमोर शरणागती पत्करलेली असुन आम्हास एक बोकाणा हवा आहे.... :) भन्नाट दिसतोय फोटू....
mastach. tondala pani sutla. batatyacha kis ghalun kadhihi keli nahiye, next time nakki try karen. thanks.
ReplyDeleteहेहे...तन्वी, अगं अजून एप्रिल सुरू आहे नं... एक तारखेला नाही पण तू चकवलेस बघ मला...:D
ReplyDeleteसायो, अगं किती दिवसांनी आलीस...मस्त वाटले तुझी कमेंट पाहून.धन्स गं. कीस घालून आवडेल तुला.
ReplyDeleteखिचडीची रेसिपी वाचून तोंडाला पाणी सुटले. उद्या तातडीने करून खाणार. आईने केलेली खिचडी मला फारशी कधीच आवडली नाही; मात्र आजीच्या हातची खिचडी याम्मी...भन्नाट करते. सायीचं गोड दही (किंवा कधी कधी ताकात दुध मिसळून) शेंगदाण्याचे तिखट दही मिसळून आणि कोथींबीर पेरून खिचडी तीनंच द्यावी आणि मी खावी. (या साठी मी आईचा ओरडाही खूप खाल्ला आहे, माझी खात नाहीस आवडीनंत आणि आजीची मात्र खातोस..हा हा हा) आज तुमची रेसीपी वाचून आजीची खूप्प आठवण झाली
ReplyDeleteprajkta,कधी कधी डाव्या बाजूला काहीच नसले आणि भाजीही सपक असली की आमची आई नेहमी दह्यात दाण्याचे कूट+तिखट( जरा जास्तच )+जिरे पूड व कोथिंबीर+मीठ+साखर घालून चटणी बनवायची... तुझी कमेंट वाचून त्याची आठवण आली बघ. हा हा...घरोघरी ही धमाल असतेच... माझ्या आजीच्या हातचे तांदुळाचे लाडू देवालाही बनवता येणार नाहीत असे मी नेहमी आईला सांगे आणि मग दोन धपाटे खाई... तेही आनंदाने... आईला पण पुढे पुढे मी चिडवले नाही तर चैन पडत नसे... :) मॉर्निग मॉर्निग तुझी कमेंट आली... मस्तच. धन्स रे.
ReplyDeletehi pl send me u r email id.p pl pl.
ReplyDeletethank u.....mazi 1 wahi sanskarachi kashi watli...be frank?
ReplyDeleteprajkta, मला तुझी लिखाणाची स्टाईल नेहमीच भावते. तुझी फॉलोवर असल्याने नवीन पोस्ट आली की लगेच कळते... ही पोस्ट वाचली पण जरा घाईत होते... शिवाय या व्यक्तीची मला काहीच माहिती नसल्याने पुन्हा एकवार जरा शांतपणे वाचून कमेंटायचे... आज दुपारी वाचते. रवीवारची सकाळ आहे नं... आज उपम्याने वर्णी लावलीये... :)
ReplyDeleteसाबुदाण्याची खिचडी म्हणजे लगेच तिकोना किल्याचा ट्रेक आठवतो... :) तिथल्या टाक्यामधल्या गारगार पाण्यात साबूदाणा भिजवून शमिकाने तयार केलेल्या खिचडीची चव ७ वर्षे झाली तरी अजून जिभेवरुन गेलेली नाही... :)
ReplyDeleteकश्या आहात तुम्ही?? याहू वर भेटा... मी नॉर्वेला आलो आहे १ आठवडयासाठी... :)
रोहन, अरे किती आठवण काढली तुझी.:) नॉर्वेला आला आहेस का? बरं बरं येते तिथे.... बोलूयात. सहीच रे, ट्रेकला खिचडी...वॉव!
ReplyDeleteनि.....षे....ध.....श्री ताई विश लिस्ट मध्ये खिचडी टाकली आहे.....लिस्ट लवकरच मेल करीन!!! पुण्यात पण कुमठेकर रस्त्यावरील स्वीट होमची, डेक्कन च्या बिपीन स्नॅक्सची, कॉसमॉस बॅंकेच्या मुख्य शाखेजवळ एक दुकान आहे राधिका की शमिका असच काहीतरी....या सगळ्या ठिकाणी खिचडी भन्नाट मिळते!!!
ReplyDeleteसबुदाण्याची खिचडी ऑल टाईम फेव्हरेट सगळ्यांची. लहानपणी भरपुर खिचडी खायला मिळेल म्हणुन उपास करायचे त्याची आठवण झाली.
ReplyDeleteयोगेश, मला नं दत्त स्नॅक्सची खिचडी आवडते आणि खरवसपण. तू लिस्ट मेल कर मी पदार्थांचे फोटू मेल करते... ही ही...
ReplyDeleteसोनाली, खिचडी खाऊन होईतो आमचा पण उपास खाऊन झाली की लगेच खादाडीला सुरवात.:D
ReplyDeleteसाखि आपला वीकपॉइण्ट...तशी घरी मीच बनवतो...
ReplyDeleteखुमासदार झालीय पोस्ट..पाणी सुटेश, भूक लागेश, लवकर वाढेश प्लीस :) :)
शहाण्या माणसानं आता तुमचा आणि रोहनचा ब्लॉग वाचू नये अशी स्थिती आलीय. अरे किती व्हर्च्युअल वजनं वाढवाल लोकांची? :P पोस्ट वाचायची सोडून फ़ोटूकडं टुकूटुकू बघतच राहिले. च्यामारी मी पण नां रात्री जेवणं झाल्यावर ब्लॉग वाचायला घेते आणि तुमचा ब्लॉग वाचला की झोप लागत नाही. आज स्वप्नातपण खिचडी येणार, :p.
ReplyDeleteखिचडील उसळ म्हणतात (उपवासाची) हे मला माझ्या शेजीबाईकडून पहिल्यांदा समजलं. त्यादिवशी म्हणजे ज्या दिवशी खिचडीला उसळ म्हणतात हे समजलं त्यादिवशी डोक्यावर चक्र गरगरलं. :)
shinu, हा हा... आवडली मला तुझी कमेंट. धन्सं.अगं अगदी सेम... मलाही खिचडीला उसळ म्हणतात हे आणि मुगाची उसळ उपासाला खातात हे जेव्हां कळले नं तेव्हां गरगरलेच.:D
ReplyDeleteखर तर तुमचे आभार मानायचे आहेत.माझी आजी खिचडी सुंदर करायची पण ती गेल्या पासून कधीच तशी खिचडी नाही खाल्ली.पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे साबुदाने भिजवल्यावर आज तशीच खिचडी झालीई.खरच मना पासून आभार.
ReplyDelete