आता जवळपास सगळ्यांच्याच परीक्षा संपल्यात. थोड्याच दिवसात एक एक करून निकालही लागतील. गेल्या वर्षीच्या निकालाचे भयावह परिणाम अजूनही आपले बळी घेत आहेतच. तशातच हे येणारे निकाल किती व कुठवर आघात करतील याची आत्तापासूनच भीती वाटू लागली आहे. तसे पाहू गेल्या निकालानंतर आत्महत्या/ आत्महत्येचा प्रयत्न, असे प्रकार गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून ऐकीवात आहेतच. परंतु गेल्या तीनचार वर्षातील विशेषत: गेल्या वर्षातली आकडेवारी व वयोगट पाहता अनेक प्रश्न मनात येत राहतात......... चौथी-पाचवी-सहावी म्हणजे जेमतेम ९ ते १२ वर्षाची ही लहान लहान मुले इतका टोकाचा निर्णय घेतात कसा....... आणि तो अमलांतही आणतात? एवढे धाडस - हिंमत येते कुठून? आपण जीव द्यायचाच या निर्णयावर ठाम राहण्याची क्षमता.... दुसरा कुठलाही मार्ग आपली सोडववूक करू शकत नाही ....... ही करून घेतलेली समजूत..... आपल्याला समजून घेणारे कोणीच नाही..... अगदी आईवडीलही नाहीत....... फार अनाकलनीय आहे ही मनाची अवस्था.
सर्वसाधारणपणे एखादा विद्यार्थी नापास होतो तेव्हां पहिली प्रतिक्रिया असते ती, " हां...... अभ्यास करायला नको ....... नुसते उनाडायला हवे...... आईबाप मरमर कष्ट करत आहेत. लागेल तितका पैसा देत आहेत, जे मागेल ते लगेच हजर करत आहेत. यांना फक्त अभ्यास करायचाय........ पण नाही, साधे तेवढेही जमत नाही. " ही झाली सौम्य प्रतिक्रिया. ( सौम्य एवढ्यासाठीच की कुठलेही आई-वडील मूल नापास झाले म्हणून त्याचे कौतुक नक्कीच करू शकत नाहीत. त्यांचा झालेला अपेक्षाभंग, मुलाचे वाया गेलेले वर्ष- त्यामुळे त्याच्या भविष्यावर होणारा खोलवर परिणाम, त्यांचा फुकट गेलेला पैसा व समाजात होणारी चर्चा-हेटाळणी, कुत्सित बोचरे शब्द- नजरा याचा एकत्रित परिणाम काहीसा तरी बाहेर पडणारच व तो मुलाला ऐकवला जाणारच आहे. असे बोलणे चूक का बरोबर हा मुद्दा वेगळा परंतु चिडचिड होणारच. ) काही वेळा थोडीशी तर काही प्रसंगी रागाचा अतिरेक होऊन केलेली विचित्र मारहाण, आत्यंतिक जहरी बोलणे, सततचा अपमान, येता जाता केलेला उद्धार व चारचौघांसमोर काढलेले वाभाडे.......... अश्या अनेक प्रकारच्या टोकाच्या प्रतिक्रिया आणि त्यांचा होणारा जबर आघात व जीवघेणारा परिणाम.... हे सारे आपण बरेचदा पाहतो व नुसतेच हळहळतो. अरेरे! नापास काय झाली म्हणून लगेच जीवच देऊन का टाकायचा? या आजकालच्या मुलांना काही बोलायचीही सोय राहिली नाहीये...... आता आईबापाने जन्मभर कसे सोसायचे हे दु:ख........
परंतु अनेकवेळा अतिशय साध्या साध्या गोष्टी, पुढे केलेला मदतीचा हात, चार आश्वासक शब्द, धीराचे -आत्मविश्वास वाढवणारे बोल जादू करून जातात. बरे हे फक्त पालकच करू शकतात असे नसून अगदी कोणीही करू शकते. पालक व शिक्षक हे आधाराचे दोन मोठ्ठे खांब आहेत. नंतर येतात घरातील इतर जवळची माणसे, मित्र मैत्रिणी, शेजारी, अगदी रिक्षावाल्यापासून ते मोलकरणीपर्यंत....... अगदी कोणीही....... वाईट घडून गेल्यावर कोरडी सहानुभूती दाखवण्याऐवजी किमान दुसऱ्याच्या दु:खावर अजून घाव तरी न घालण्याचे तारतम्य दाखवता येईलच की.
मुळातच शब्दांत प्रचंड ताकद आहे........ त्यातून ते मनापासून, जवळिकीने व आवर्जून बोलले गेले की त्यामागचे कळकळीचे-प्रेमाचे भाव त्या दुखऱ्या - कोलमडलेल्या मनापर्यंत पोचून आपले काम चोख बजावतात. खरे तर आता या विषयावर इतके लिहून-बोलून झालेय की आता नवीन ते काय....... पण इतका उहापोह होऊनही हे आत्महत्यांचे सत्र थांबलेय का? नाहीच. उलट वाढतेच आहे. असे असले तरी कदाचित हे यापेक्षाही प्रचंड असू शकले असते..... प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदतीने निराशेने जीव देण्याच्या सीमारेषेवर झुलणारे अनेक जीव वाचले आहेत. पालक - शिक्षक - डॉक्टर्स - मानसोपचारतज्ञ....... वागणुकीवरून - संभाषणातून मुलांच्या मनाचा अभ्यास करून, चर्चा करून त्यांना मदत करणारी तज्ञ मंडळी व इतरही बरेच जण अतिशय मेहनत घेऊन अनेक खचलेल्या मुलांमध्ये पुन्हा आत्मविश्वास जागवत आहेत. न हिणवता - टोमणे न मारता त्यांच्या चुका दाखवून त्यावर मात करण्यासाठी मदत करत आहेत.
आज तीस वर्षे लोटली तरी हा प्रसंग जसाच्या तसा आठवतोय मला.........
माझा नववीचा रिझल्ट आला, चौथा नंबर व मराठी, हिंदी ( दोन्ही हायर लेवल ) समाजशास्त्रात हायेस्ट गुण मिळालेले. बीजगणितात पैकीच्या पैकी व भूमितीत ७५ पैकी ७१ गूण मिळाले होते. मराठी व हिंदीचा पेपर तर बोर्डावर लावला होता. एकंदरीत सगळे आलबेल होते. दहावीचे वर्ष सुरू झाले. शाळा - क्लास व उरलेल्या...... ( ?? ) वेळात गृहपाठ नुसती हाणामारी होत असे. कृष्णधवल टीव्हीवरील रविवारचा सिनेमा तर सोडाच साधे छायागित का रेडिओवरची बिनाका गीतमालाही ऐकायला मिळेना. दहावीत गेली आहेस आता.... अभ्यास सोडून काहीही करू नकोस..... अगदी पोपटाच्या डोळ्यासारखे फक्त परीक्षेकडे लक्ष ठेव. जिकडून तिकडून हेच कानावर पडत होते. त्यामुळेही उगाच टीव्ही पाहायला जाऊन अजून बोलणी ऐकायला लागू नयेत म्हणूनही असेल पण मी जातच नव्हते.
पहिली चाचणी परीक्षा जुलैच्या शेवटी होणार होती. फार काही ताण अजून जाणवत नव्हता. परीक्षा झाली. सगळे पेपर मस्त गेले फक्त का कोण जाणे आजकाल भूमिती हा शब्द जरी कानावर आला तरी फार भितीच वाटू लागे. बीजगणितात २० पैकी २० मार्क्स मिळणार याची खात्री होतीच. भूमितीचा पेपर हाती आला आणि एकदम घशाला कोरड पडली. पाच प्रश्न होते. एकही प्रमेय धड सोडवता येईना. प्रश्नाचा अर्थच लागत नव्हता....... रडू येऊ लागले. पण सगळे हसतील या भितीने तोंड दाबून जे जे लिहिता येईल ते ते मी लिहिले. एकदाचा पेपर संपला. घरी गेल्या गेल्या आईने विचारले, " काय गं, कसा गेला पेपर? नीट सोडवलेस ना सगळे? चल, पटापट मला सगळे प्रश्न सोडवून दाखव. म्हणजे कालच्यासारखेच कळेल पैकीच्या पैकी गुण मिळतील का ते.... " हे ऐकताच मला कापरेच भरले. कसेबसे आईला लाडीगोडी लावत म्हटले, " आई, नको नं गं...... आत्ताच तर परीक्षा संपलीये. जरा आज तरी मजा करू दे. तू काळजी करू नकोस, पेपर मस्तच गेलाय मला. " कसे कोण जाणे पण आई बरं म्हणाली आणि मी स्वत:ची तात्पुरती सुटका करून घेतली.
पुढच्या आठवड्यात एक एक करून सगळे पेपर मिळू लागले. इतर काही विषयांत पैकीच्या पैकी, एखादा गुण कमी इतके चांगले मार्क्स मिळूनही मला अजिबात आनंद होत नव्हता. पेपर लिहितानाच आपल्याला पुरेपूर माहीत असते...... आपण किती बरोबर लिहिलेय व किती थापा मारल्यात...... मला तर मी सगळेच चुकीचेच लिहिलेय असेच वाटत होते...... छातीत नुसती धडधड होऊ लागली......... तशात आमच्या मुख्याध्यापिका- सौ. काटदरेबाई, भूमिती त्याच शिकवत..... पेपरांचा भारा सांभाळत वर्गात शिरल्या. अल्फाबेटीकली वर्गक्रमांक दिलेले असल्याने माझा नंबर मुलींमध्ये लगेचच होता. ( माझे माहेरचे आडनाव जोशी ) काटदरेबाई एकेकाची अगदी मनापासून भादरत होत्या........... सगळ्या वर्गासमोर निघत असलेले इतरांचे वाभाडे ऐकूनच एक मोठ्ठा हुंदका घशात अडकला. आजवर कधीही चौथ्या नंबरपेक्षा खाली नंबर न घसरलेली मी भूमितीत काय दिवे लागलेत या कल्पनेनेच अर्धमेली झालेली होते. तोच.......
" भाग्यश्री...... अगं तू तर कमालच केलीस गं...... " हे ऐकले आणि मी एकदम बावचळलेच.......... मला खूप कमी मार्क्स असतील हे पक्के जाणून होते तरीही उगाच कुठेतरी क्षणभर वाटले की अरे उगाच घाबरत होतो की काय आपण......... सगळी उत्तरे तर बरोबर आलेली दिसत आहेत. नाहीतर काटदरे बाई इतके हसून असे कसे म्हणतील नं...... पण म्हणतात ना........ असे हे वाटणे कधीच खरे होत नसते...... पुढच्याच क्षणाला त्या अतिशय कुत्सितपणे म्हणाल्या, " वा! चक्क नापास....... धन्य आहेस. अगं नुसते बीजगणितात सगळे गुण मिळवून पास नाही बरं होता येत...... गधडी कुठली. काय शिंगे फुटलीत वाटतं........ २० पैकी फक्त सहा गुण मिळालेत तुला. घ्या आता हा पेपर आणि फ्रेम करून लावा..... आता ये की पुढे पटकन आणि घे हा पेपर........नुसते रडून काय फायदा........ लक्ष नको द्यायला - अभ्यास केलाच नसशील मग काय नापासच होणार नं..... " अजूनही त्या काय काय बोलल्या..... मला काहीच ऐकू येत नव्हते. सगळा वर्ग गरागरा फिरत होता. डोळ्यासमोर आई-बाबांचा चेहरा येत होता........... हे मार्क्स पाहून त्यांना काय वाटेल आणि ते मला किती रागावतील..... कधी तास संपला..... शाळा सुटली..... मला काहीच समजत नव्हते. अशी एकाएकी मला भूमिती का समजेनाशी झाली आहे........ काही संगतीच लागत नव्हती....... घरी जावेसेच वाटेना........
कशीबशी पाय ओढत घरी आले........ आईला पाहताच इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका फुटला..... मी ओक्साबोक्शी रडत होते. आईने जवळ घेतले...... काय झालेय ते अंजारून गोंजारून काढून घेतल्यावर म्हणाली, " हात वेडे, इतके कशाला रडायचे. उद्यापासून तू मला समजावून सांग तुला काय समजत नाहीये ते....... मग आपण पाहू बरं का...... " मी नुसतीच मान हालवली पण मनाने अगदी हाय खाल्ली होती. आपण चक्क नापास झालोय हा धक्का जबरदस्त होता.......... त्यावेळी मी रेगे क्लासला जात होते. तिथे भूमिती शिकवायला श्री. रामभाऊ आठल्ये म्हणजेच माझे आवडते आठल्येसर होते. नववीपर्यंत एकदम पुढे पुढे करणारी ही मुलगी दहावीच्या पहिल्या दोन महिन्यातच आक्रसून गेल्यासारखी करतेय..... आपल्याकडे पाहायचेही टाळतेय..... एकाही प्रश्नाला उत्तर देत नाही किंबहुना मी तिला प्रश्न विचारीन या भितीनेच ती वरही पाहत नाही हे सरांच्या लक्षात आलेले होतेच.
संध्याकाळी सहाला क्लास सुरू होई आणि पावणेनऊला संपे. एक दिवस क्लास संपल्या संपल्या सरांनी मला हाक मारली आणि थांब गं जरा..... थोडे बोलायचेय तुझ्याशी..... असे सांगताच मी काहीतरी सबब सांगून सटकायला लागले तशी जरा दमात घेऊनच त्यांनी मला थांबवले. आठल्येसर माधववाडीतच ( दादरचा रेल्वेचा ब्रिज उतरून पूर्वेला आलो की लगेचच ही भली मोठी व खूप जुनी व प्रसिद्ध वसाहत आहे. ) राहतं होते आणि मी तिथूनच पुढे चित्रा सिनेमाजवळ. सर म्हणाले, " मी आहे ना सोबत.... तुला घरी नेऊन घालेन. काळजी नको. " पाच मिनिटात सगळी पोरे पळाली. दोन तीन शिक्षक व कारकून व चुकार दोन -चार पोरे इतकेच आम्ही उरलो. सरांनी मला वर्गात नेले........ मघाशी असलेला सगळा गोंधळ निमाला होता.... " हां...... भागाबाई..... आता बोला शांतपणे..... नक्की काय चाललेय तुझे? आजकाल खूप घाबरून घाबरून असतेस..... कोणी काही बोलले आहे का? त्रास देतेय का..... मी आहे नं.... सांगून टाक. अगं प्रत्येकाला काहीतरी त्रास होतच असतो आयुष्यभर..... मग वय लहान असो की मोठे....... पण सगळ्या प्रश्नांवर उत्तरे असतात बरं का..... चल पटकन सांग बरं.... "
आठल्येसरांचे इतके जिव्हाळ्याचे बोल ऐकताच पुन्हा गंगायमुना पूर आल्यासारख्या वाहू लागल्या. थोडे शांत झाल्यावर अडखळत सरांना भूमितीची कशी भीती वाटतेय आणि मी नापास झालेय हे सांगितले. सारे ऐकल्यावर सर म्हणाले, " ह्म्म्म्म....... असे झालेय का...... बरं. आता मला सांग, आपण नापास झालोय आणि सगळे आपल्याला हसत आहेत, आईबाबांना किती राग आला असेल...... याचे जास्त दु:ख वाटतेय की आपल्याला भूमिती समजत नाहीये - जी गेल्या वर्षीपर्यंत अगदी उत्तम समजत होती त्याचे दु:ख होतेय? म्हणजे दु:ख दोन्हीचेही होणारच गं पण हताश न होता दु:खाचे कारणच नष्ट करायला हवे नं..... सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा तुझा जो आत्मविश्वास अगदी गेलाय ना तो ताबडतोब तू परत मिळवायला हवांस........ कसा? सांगतो नं.... ऐक...... आजपासून रोज मनाशी दिवसातून शंभर वेळा घोकायचे, मी हुशार आहे. मला भूमिती समजावून दिली की नक्की समजेल आणि पुढच्या परीक्षेत मी पास तर होईनच शिवाय खूप चांगले गुण मिळवेन. काय.... कळतेय का मी सांगतोय ते? माझ्यावर विश्वास आहे नं तुझा? उद्यापासून मी सांगेन तसा अभ्यास करायचा आणि वेडगळ वाटले तरी मी सांगितलेले वाक्य घोकायचेच...... चल आता घरी जाऊ. " असे म्हणून सरांनी मला घरी नेऊन घातले.
हॅं...... हे असे म्हणून काय मला भूमिती समजणार आहे का? सर पण नं..... उगाच मला काहीही सांगतात....... असे सारखे मनात येत होते खरे, पण सरांवर माझा प्रचंड विश्वास होता....... ते माझ्याकडून अभ्यास करवून घेतील आणि मला तो समजेलच. सरांच्या कालच्या शब्दांनी मला थोडासा धीर मिळाला होता. आठवड्यातले तीन दिवस तासभर भूमितीचा अभ्यास सर नेमाने घेऊ लागले. सहामाही परीक्षा जवळ आली तशी अजून एक तास उजळणी चालू झाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी खरोखरच रोज दिवसातून शंभर काय त्याही पेक्षा जास्ती वेळा ते संपूर्ण वाक्य म्हणत असे. कदाचित हे हास्यास्पद वाटेल वाचताना........ पण ते अतिशय परिणामकारक ठरले. माझा ढासळलेला आत्मविश्वास, अभ्यास व प्रोत्साहनाच्या मदतीने वाढत होता. सहामाहीचा पेपर दिला आणि मी तडक सरांच्या घरी धाव घेतली. सरांनी संपूर्ण पेपर सोडवून घेतला व तुला ६७ मार्क्स मिळतील....... तू पाहशीलच...... अशी पैजही लावली.
दिवाळीच्या सुटीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी सगळे पेपर मिळाले. इतर विषयांची मला बिलकुल चिंता नव्हतीच. भूमितीचा पेपर कधी मिळतोय असे झालेले........ सगळा जीव एकवटून मी काटदरेबाईंची वाट पाहत होते. एकदाच्या अगदी शेवटच्या तासाला बाई आल्या...... पेपरांचा ढीग टेबलावर ठेवता ठेवता त्यांनी म्हटले, " पहिले दिवे लावणाऱ्यांचे मार्क्स सांगते.... बाकीच्यांचे मागाहून...... " नापास झालेल्या एक एक मुलामुलींची नावे घेत घेत त्यांनी, " भाग्यश्री...... उभी राहा गं........" हे ऐकले मात्र मी तटकन उठून उभी राहिले........ आणि मला चक्करच आली. सरांनी तर पैजेवर सांगितले होते की मला ६७ गुण मिळतीलच. मग..... म्हणजे मला येत असून मी पेपर सोडवलाच नाही की काय...... माझी अवस्था पाहून बाई भरभर जवळ आल्या आणि पाठीवरून हात फिरवून म्हणाल्या, " अगं किती घाबरट गं तू...... तुला काय वाटले... याही वेळेस नापास झालीस का? तुझे नाव म्हणून नाही घेतले मी..... उलट सगळ्यांना कळावे की तू झटून अभ्यास करून ६९ गुण मिळवले आहेस....... हा घे पेपर. आणि असाच अभ्यास करायचाय बरं का आता..... "
दहावेळा डोळे फाडून फाडून मी त्या गुणांकडे पाहून खात्री करून घेत होते. शाळा सुटताच तडक सरांचे घर गाठले..... त्यांना पेपर दाखवला..... त्यांची शाबासकी मिळवली तेव्हां कुठे बरे वाटले. पुढे संपूर्ण वर्ष संपेतो मला संजीवनी देणारे ते वाक्य घोकत होते...... दहावीला भूमिती व बीजगणितात मला १५० पैकी १४७ मार्क्स मिळाले. भूमितीत ७४ मार्क्स मिळवून शाळेतून मी पहिली आले आणि हे केवळ सरांमुळेच घडले. अन्यथा कदाचित मी संपूर्णपणे निराश झाले असते..... अभ्यास मला समजतच नाही.... मी मूर्ख - बिनडोकच आहे, असे म्हणत म्हणत इतरही विषयात नापास झाले असते..... शेवटी वर्ष गमावून बसले असते. पाहिले तर घटना तशी शुल्लक आहे...... चाचणी परीक्षेत नापास होणे म्हणजे काही अगदी पहाड कोसळलेला नाही परंतु ही सुरवात होती. योग्य ते मार्गदर्शन व मानसिक आधार नेमक्या वेळी मिळताच यशाचा रस्ता अचूक सापडला. एक नक्की की मी काही जीव दिला नसता..... परंतु निराशा- त्यातून पुन्हा पुन्हा नापास होणे - अपमान - बोचरे शब्द हे गरगरून टाकणारे चक्र सुरू झाले असते आणि कदाचित मी डिप्रेशन मध्ये गेले असते.......
ही घटना माझ्या सगळ्या जीवनावर परिणाम करून गेली. अजूनही कधीकधी अडखळल्यासारखे- जीवनाच्या लढाईत हारल्यासारखे वाटू लागले की मी आठल्ये सरांचा हा संजीवन देणारा मंत्र घोकते....... आपोआप मार्ग सापडतो........ निराश झालेले मन हसू लागते. देव करो आणि अशा हताश- निराश झालेल्या दुबळ्या जीवांमध्ये आत्मविश्वास जागवणारे माझ्या आठल्येसरांसारखे कोणी....... कुठल्या नं कुठल्या रूपात तत्काळ त्यांना भेटोत. सर आज तुमची व तुमच्यासारखे सगळे विसरून केवळ मुलांसाठी तळमळीने मदत करणाऱ्यांची फार फार गरज आहे. आपण सगळेच असे कोणा निराश मनाला उभारी देऊ शकतो....... नकळत एखाद्याचा जीवही वाचवू शकतो ........ कुठल्याही अपयशावर मात करता येते व यशही मिळवता येतेच हा विश्वास व बळ एकदा का जागृत झाले की मग " नापास " होणारच नाही व होवू की काय अशी भीतीही वाटणार नाही.......
खरंय, शब्दबंबाळ करण्यापेक्षा शब्दमधाळ करणं खुप आवश्यक असतं अश्या नाजुक प्रसंगी...
ReplyDeleteआजच्या स्पर्धेच्या युगात अश्या खूप सार्या आठल्ये सरांची गरज आहे. नापास झाल्या नंतर त्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची खूप आवश्यकता असते. अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी येथे असलेल्या शाळेत फक्त नापास मुलांनाच प्रवेश दिला जातो!!
ReplyDeleteखरयं गं ताई अश्या वेळेस कोणितरी जवळ घेण्याची,’आत्ता नाही जमले तर काय पुढच्यावेळेस झटून अभ्यास करा’ असे आश्वासक सांगणारे नक्कीच हवे!! आणि ते काम पालकांचेच आहे....
ReplyDeleteछान झालयं गं पोस्ट....एकदम मनातलं!!!
आत्मविश्वास, हीच यशाची गुरूकिल्ली आहे. पण कधी कधी आपण तो कॉन्फिडॅन्स नाही दाखवू शकत तेव्हा अशी माणसा असतात जी आपल्याला प्रेरणा देतात..अप्रतिम पोस्ट
ReplyDeleteआनंद, खरेच आहे...
ReplyDeleteमनमौजी, अण्णा हजारेंच्या शाळेसारख्या अजून शाळा निघायला हव्यात... सर्वसामान्यपणे नापास झाले की त्याचे कारण कोणी समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही... केवळ अभ्यास केला नाही म्हणूनच नापास झाला... हेच गृहीत धरले जाते.... :(
ReplyDeleteतन्वी, आई-बाबा आणि शिक्षक... सगळ्यात जास्त मदत व आधार देऊ शकतात. पण दुर्दैवाने काही ठिकाणी तिथेच अतिरेक दिसतो... अन मग विपरीत घटना घडतात....
ReplyDeleteअशा माणसांची आज फार फार गरज आहे.धन्यवाद सुहास.
ReplyDeleteखरच अपयश मिळालेल्या मुलांना घरापासुन समाजापर्यंत खुपच त्रासदायक वागणुक मिळते.याउलट अश्या वेळी त्यांना आधाराची त्यांचा गेलेला आत्मविश्वास वाढवणारयांची गरज असते.तुम्हाला जसे आठल्ये सर मिळाले तसे सगळ्यांनाच मिळो...बाकी तुमची पोस्ट वाचतांना शाळेतील दिवसांची आठवण झाली.तपासलेले पेपर वर्गात वाटले जात असतांना आपला क्रमांक येइपर्यंत खुपच उत्सुकता लागलेली असायची...
ReplyDeleteवा ताई. खूप सुंदर अनुभव सांगितलास. नुसता हा अनुभव वाचला तरी मुलांच्या मनातून 'नापास होण्याचं भूत' कुठच्या कुठे पळून जाईल. आणि अर्थातच महत्वाचं म्हणजे आठल्येसरांसारखे मुलांना समजून घेणारे शिक्षक मिळणं हेही नशीब !!!
ReplyDeleteखरंय अगं समजुन घेणारी लोकं योग्यवेळी मिळाली तर मुलांना निकालाची भिती वाटणार नाही निदान अगदी आत्महत्येपर्यंतची मजल मारणं तरी नक्कीच कमी होईल असं वाटतंय़...
ReplyDeleteतळटीप...Good to see ya backk...
चांगला लेख आहे भाग्यश्री. अपयशाची कारणं जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि तो जागवण्यासाठी एक तरी आश्वासक हात हवा असतो त्या वयात. अन्यथा संपणे हा एकुलता एक पर्याय दिसतो डोळ्यांपुढे मुलांच्या. बाकी कोणत्याही शक्यतांचा विचार करणं त्यांच्या गावीही रहात नाही, आणि मग वृत्तपत्रांचे रकाने भरभरून बातम्या दिसतात नको त्या. अशा वेळी कुणाच्याच हातात काही उरत नाही.
ReplyDeleteसही, Positive Thinking चा खरच उपयोग होतो मी स्वत: त्याचा खुपदा अनुभव घेतला आहे.
ReplyDeleteसोनाली केळकर
छान लिहिलंय ...
ReplyDeleteपास-नापास असलं काही नसतंच,
त्यातून शिकणं महत्वाचं
भोवतालच्या जगाशी स्वत:शी स्पर्धा अटळ असते,
त्यात टिकणं महत्वाचं
davbindu, नेमके जेव्हां आजूबाजूच्यांनी जास्तीत जास्त सांभाळून घ्यायची गरज असते तेव्हांच ते घडत नाही.... :( शाळेच्या प्रचंड आठवणी आहेत... एकदम मजेचे-आनंदाचे दिवस होते ते सारे... :)
ReplyDeleteहेरंब, खरे तर चाचणी परीक्षेत नापास होणे ही काही अगदी भयंकर गोष्ट नव्हती... पण जीवाला इतके लावून घेतले होते... मूळात सतत पहिला दुसरा नंबर येण्याची सवय लागून गेलेली नं... :) आमचे सर एकदम ग्रेट आहेत... आणि कुठेतरी लागेबांधे खोलवर होते माझे त्यांच्याशी की माझे लग्न ठरले तेव्हां मला कळले की ते नचिकेतचे नातेवाईक आहेत. :)
ReplyDeleteहो ना गं... प्रत्येक मुलाचे टेंपरामेंट वेगवेगळे... कोणी माझ्यासारखे एका छोट्याश्या परीक्षेत नापास होणेही अती लावून घेईल तर कोणी इतर काही.... त्या त्या वेळी योग्य ती मदत लगेच मिळायला हवी...क्रान्ती धन्स गं.
ReplyDeleteयस्स्स... सोनाली, अगं सकारात्मक विचार खूप मदत करतातच.
ReplyDeleteप्रसाद... अगदी अगदी.... सारख्या प्रत्येक गोष्टीला फुटपट्टीने मोजू नये.... बरेचदा हे कळले तरी वळत नाही... शेवटी या जगात टिकायचे असते ना... :(
ReplyDeleteअपर्णा, नेमके तिथेच तर घोळ होतोय नं.... नको तिथे समजूतदारपणा आणि हवे तिथे सक्तीचा बडगा... शिवाय या वयात अनुकरण- पळवाट-सुटकेचे सोपे रस्ते.... मग ते चुकीच्याच गोष्टींचेच जास्ती होते... :(
ReplyDeleteधन्स गं... मलाही खूप छान वाटतेयं...:)
Absolutely rite...कोणी तरी खरचं मुलांना प्रेमाने ,आपुलकीने समजवणारे हवे..ब~याचदा आईवडीलांनी समजवलेले किंवा टोकलेले मुलांना समजत नाही..कळत्नकळत मन दुखवली जातात..त्त्यांत त्यांचे नाजुक वय..मनात चालु असलेली घालमेल कोणाला सांगावी हा मोठ्ठा प्रश्न.....अभ्यासाचा प्रचंड बोजा..श्री, मी तुला कालच cbsc pattern ची कल्पना दिली..कंटाळुन जातात मुले..धड हे ना धड ते..रोज नवे सरकार...तसे रोज नवे अभ्यासक्रम......एकेका विषयाचे ३-३ पुस्तके...[:(]सगळा गोळा कारभार..त्यात शिक्षकांवर managementचे pressure..आणि त्यांचे frusrtation मुलांवर..मग तर झालेच...काय करावे समजत नाही..मी पण सध्या ह्याच विवंचनेत असते...लेकाला जास्तित जास्त वेळ देउन समजुन घेण्याच्या प्रयत्नात आहे...lets hope for....बाकी पोस्ट बेस्ट्च..as usual..
ReplyDeleteअगदी गं उमा. रोजचे नवे रामायण... मुलांनी तरी किती म्हणून जुळवून घ्यायचे. पालकांवरचे आणि मुलांवरचे ताण रोजचे वाढत चाललेत. कुठेतरी मग टोकाचे वागणे झाले की दोष नक्की कोणाचा हे शोधत बसायचे... :(
Deleteधन्यू गं !
Smita
ReplyDeleteVery Nice, Khup Khup Sunder Lihile Aheyas.
आभार्स !
Deleteमलाही आठल्ये शिक्षकांसारखे एखादे शिक्षक लाभले असते तर..........
ReplyDeleteहम्म्म...
Deleteधन्यवाद!