जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, September 30, 2009

पापणीला तुझा रंग येतो......


हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हांच या बोलांनी-संगीताने व अप्रतिम सुरांनी जबरदस्त मोहिनी घातली. बरेचदा आपल्या मन:स्थितीनुसार ह्या आवडीनिवडी बदलतात. या बोलांमधली आर्तता, विरह, प्रिय व्यक्तीची चाहूल जरी नुसती लागली तरी कंपणारे हृदय. धृवपदच इतके बोलके आहे, जिथे मनीचे गूज व्यक्त करताना शब्द पुरे पडत नाहीत तिथे एक स्पर्श ते सगळे भाव शब्दांच्या पुढे जाऊन देऊन जातो. समोर नसतेस तेव्हां मला किती त्रास होतो.....हे सांगताना कवी यशवंतांनी किती सुंदर बोल रेखले आहे......., ' पापणीला तुझा रंग येतो. वा!! ' हे धृवपद स्वत: गुणगुणून पाहा, अडकूनच पडायला होते ना? अतिशय अर्थपूर्ण आणि गेय असे हे गीत कवी यशवंत देव यांचे असून संगीतही त्यांचेच आहे. हे काळजाचा ठाव घेणारे गाणे गायलेय येसूदास यांनी. जितकी ताकद शब्दात तितकीच संगीतात वआपल्या मंतरलेल्या आवाजाने ही शब्दांची भाषा समरसून रसिक मनापर्यंत पोचवली येसूदासनी.


॥ पापणीला तुझा रंग येतो ॥


शब्दमाळा पुरेशा न होती, स्पर्श सारेच सांगून जातो
लोचनाआड जातेस जेव्हा, पापणीला तुझा रंग येतो.....।धृ।

आर्त कोमेजलेल्या मनाची, पाकळी पाकळी खिन्न झाली
सांत्वनाच्या तुझ्या फुंकरीने, प्राण घेऊन आली नव्हाळी
एक हुंकार देतो दिलासा, एक झंकार गात्रात गातो
लोचनाआड जातेस जेव्हा, पापणीला तुझा रंग येतो.....।१।

माळवैराण निश्वासताना, रानपक्षी असा गात होता
काळरात्रीस ही सोबतीला, रातराणी तुझा गंध होता
काल निश्वासलेला तराणा, आज विश्वास देऊन जातो
लोचनाआड जातेस जेव्हा, पापणीला तुझा रंग येतो....।२।

मोरपंखी खुणेसारखी तू, चित्त मोहून घेतो फुलोर
अभ्र दाटून आले तरीही, तू ढगामागची चंद्रकोर
चांदण्याचा झुला हालताना, जीव भोळा शहारून जातो
लोचनाआड जातेस जेव्हा, पापणीला तुझा रंग येतो....।३।


माझ्याकडे हे गीत होते परंतु कसे कोण जाणे कुठेसे हरवून गेले. जालावर खूप शोधूनही मिळाले नाही. जर कोणाकडे असेल तर मला पाठवाल का?

चुरापाव यांनी श्री.अरुण दातेंनी गायलेले गाणे दिले आहे. येथे ऐका.
चुरापाव अनेक आभार.

3 comments:

  1. मस्त आहे गाणं, तुमची पोस्ट वाचून झाल्या झाल्या मी ऐकलं, हे तेच गाणं आहे का पहा http://www.in.com/music/track-shabda-mala-puresha-na-hoti-382221.html

    ReplyDelete
  2. मालतिनन्दनOctober 1, 2009 at 4:24 AM

    अप्रतिम गीत. हे मी कधी ऐकल्याचे आठवत नाही. पण इतक्या चांगल्या गीताला मुकल्याची खंत मात्र मनाला लागलीच. कवितेचे शब्द मात्र मनाचा कोरून राहिले. खास करून दुसरे कडवे. तुझ्या खजिन्यात ही अशी रत्‍ने आणखीही असतीलच. तर ती येउ देत.

    ReplyDelete
  3. चुरापाव खूप खूप धन्यवाद. गाणे हेच आहे परंतु हे श्री.अरुण दाते यांच्या आवाजातील आहे.त्यांनी चांगले म्हटले आहे पण मूळ येसूदास यांचे केवळ अप्रतिम.
    पुन्हा एकदा धन्यवाद.

    अरुणदादा, चुरापावने लिंक दिली आहे ती टाकली आहे . ऐकून पाहा. यशवंत देवांची कमाल आहे हे गाणे.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !