जाता जाता एक नजर इथेही........

Friday, September 25, 2009

मनात रेंगाळणारे शब्द अन त्यांचा भावार्थ.......

अनेक साहित्यिकांचा माझ्यावर खोलवर पगडा आहे. जितके अधिक अधिक वाचावे तितके पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला होते. हाताच्या बोटावर मोजण्याइतके असते तर नावे लिहिलीही असती. तरीही काहींकडे मन अधिक ओढ घेतेच . आरती प्रभूंशी दोन शब्द तरी बोलायला मिळाले असते तर.... पण इतके भाग्य कुठले. असे अकाली जायचे होतेच तर तुमच्याऐवजी मी जायला तयार होते-आहे. ग्रेस, सुरेश भट, सुधीर मोघे, यशवंत देव, शांताबाई शेळके...... कुसुमाग्रजांबरोबर भेट झाली. आजही तो आनंद अंतरात भरून आहे. गद्य लिखाणामध्ये ना. स. इनामदारांच्या झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊची पारायणे केलीत. रणजित देसाईंचे स्वामी तर तोंडपाठ. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय तर गोनींचे - श्रिकृष्णायन, कर्णायन आणि मोगरा फुलला. जयवंत दळवींचे सारेच लिखाण, श्री. ज. जोशींचे - आनंदीगोपाळ, सुभाष भेंडेंची - अंधारवाटा तर ह. मो. मराठेंची - निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी. आवडीच्या पुस्तकांची यादी काढणे शक्यच नाही इतकी ती मोठी आहे.

या साऱ्यात वपुंचे लिखाण सतत मला झपाटत राहते. मानवी मनाचा, त्यात उठणाऱ्या तरंगाचा, सुख, दुःख, लोभ, हव्यास, झपाटलेपण, आर्तता, निकटता, वैषयीक कल्लोळ, वासनांशी दिलेला झगडा, बेबंदपणा, मुक्तता, रितेपण, एकाकीपण, अगतिकता, अन बरेच काही नेमके आणि अतिशय भिडणाऱ्या, हलवून टाकणाऱ्या, पटणाऱ्या सहज शब्दात अलगद वपुंच्या लिखाणातून उलगडत असे. वाचलेलेच पुन्हा वाचले तर प्रत्येकवेळी त्यातील भावना अजूनच स्पर्शून जाते. आपल्या मनाच्या त्या वेळेच्या अवस्थेनुसार काही नवीन अर्थही अचानक समोर येतात. वपुंचे लिखाण अनेकांना आवडते, बहुतांशी साहित्यप्रेमी मंडळींनी वाचलेही आहेच. त्यांच्या अनेक कथासंग्रहातील मला भावलेले बरेच काही आहे त्यातले थोडे नमूद करतेय. दररोजचे प्रसंग व अतिशय साधे शब्द पण आशय प्रचंड. या सगळ्या देवाकडून देणगी मिळवून आलेल्यांना सलाम.

अंत ’ आणि ’ एकांत ’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. शब्द जोडण्याचा आटापिटा तेवढ्याचसाठी.

" प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं, अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एकाच क्षणाशी असतं. दुसऱ्याच पुढच्या क्षणी तो अनुभव एका क्षणानं जुना झालेला असतो. भूतकाळात गेलेला असतो. नंतरचा आनंद पुनरुक्तीचा असतो. ’क्षणभंगूर ’ हे विशेषण आयुष्याला न लावता अनुभवालाच लावलं पाहीजे. "

" प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते, प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवाट शोधायला लावते, स्वत:च्या मालकीची. प्रेम, प्रेमविवाह दोन्ही मान्य. पण संसार हा व्यवहार आहे. "

" माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत. जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते. आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही. एकमेकांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणाला तरी समजावं असं त्याला वाटतं. असं का?-ह्याला उत्तर नाही."

" प्रत्येकाने काही ना काही वेड घेतलेलं असतं. केवळ शरीराने जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात. मन नावाची ठिणगी आहे ती सातत्याने प्राणवायूच्या शोधात असते. पण तरीही आपण घेतलेल्या वेडाला कुणीतरी ते वेड नसून शहाणपण आहे असं म्हणावं ही इच्छा असते. अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेने चालू असतो. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, ह्याचं उत्तर पण नियतीजवळच असतं."

" माणूस कायमचा दुरावतो. तेव्हा त्या दु:खात आणखी एक दु:ख मिसळलेलं असतं. ज्या दु:खाचं सांत्वन होऊ शकत नाही असं ते दु:ख असतं. वियोगाचं दु:ख काळ शांत करतो. हे दुसरं दु:ख कायम ताजं राहतं. ते म्हणजे, जिवंतपणी आपण त्या माणसाशी कधीकधी ज्या अमानुषतेने वागलो, त्या आठवणींचं दु:ख. ते नेहमी ताजं राहतं. काळाचं औषध तिथं प्रभाव दाखवू शकत नाही."

खरा संसार हा एकाच दिवसाचा आणि एकाच रात्रीचा असावा. बाकी पुनरावृत्ती असते. माणूस खरं तर सहज सुखी होऊ शकेल. सुखी होणं हे एवढं दुर्मिळ नाही. अहंकार सोडावा, आणि जगातल्या चांगुलपणावर नितांत श्रध्दा ठेवावी. सुख दाराशी हात जोडून उभं राहील. पण तसं होत नाही. माणसं खळखळून मोकळी होत नाहीत. गप्प राहतात. सहन करतात. ही माणसं, ह्या व्यक्ती काय गमावतात, काय मिळवतात हे फक्त त्यांनाच माहीत. मोहावर जेव्हा ही मंडळी मात करतात तेव्हा त्यांच्या त्या यशाला सत्काराचे हार नाहीत आणि पराभवाच्या दु:खाला सांत्वनाचा स्पर्श नाही."

" नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण ’ नाही ’ का म्हणत नाही? न पटणाऱ्या, न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते, तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो."

" दिवस कधी थांबत नाही म्हणूनच हवा असलेला दिवस हा असा उगवतो. काळ हा माणसाचा शत्रू नव्हे. तो सर्वात जवळचा मित्र आहे. मुख्य म्हणजे तो गतिमान असल्याने नित्य टवटवीत, ताजा असतो. एखाद्याच दिवसाची तो तुम्हाला वाट पाहायला लावतो तो तुमचा अंत पाहायचा म्हणून नवे, तर त्या दिवसाला तुम्ही कडकडून, तीव्रतेने भिडावं म्हणून! जेवढी प्रतीक्षा मोठी, तेवढाच पूर्तीचा क्षण ज्वलंत, ताजा, उत्कट. "

" सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे. भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हातगाडीवाला, दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो. कष्ट हे सौंदर्य, बुध्दी हे सौंदर्याचंच रुप, नम्रता म्हणजे देखणेपणा. कोणतंही काम भक्तीने करणं हेच सौंदर्य. आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवणं ही कुरुपता. "

" स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच पालक शब्द समजला. "

" गैरसमज हा कॆन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो. "

" समोरच्या चालत्या-बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य दु:खी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो. "

" नकार
देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच करणे , ही त्याहून मोठी कला आहे. "

( सगळे लिहीणे शक्यच नाही. असेच पुन्हा केव्हांतरी ...... )

8 comments:

  1. आजची पोस्ट एकदम हटके आहे ... झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ. रणजित देसाईंचे स्वामी आणि शिवाजी सावंतांचे मृत्युंजय वाचले आहे. अर्थात माझे जास्त वाचन एतिहासिक आहे.

    पण व.पु. ... अशी लेखनशैली नाही वाचली मी अजून कोणाची. मस्तच ... !

    ReplyDelete
  2. 'देशाची फाळणी, प्रथम माझ्या शरीराची फाळणी झाल्याशिवाय होणार नाही' अशी वचन देणाऱ्या माणसाला 'राष्ट्रपिता' ही किताबत मिळाली.
    त्याने विश्वासघात केल्यावर लाखो संसार हे असेच उद्वस्त झाले. पित्याच पद न पेलणारा माणूस श्वापदच. --- व. पु. काळे.

    ReplyDelete
  3. किती यथार्थ आहेत हे बोल.रोहन,धन्स.

    ReplyDelete
  4. खूप छान अन् वेगळी पोस्ट आहे!!

    ReplyDelete
  5. भानस ताई,
    खुप छान आहे पोस्ट......व पु चे लिखाण म्हणजे एकदम हटके....आणि त्याचे वाचन हा एक भन्नाट अनुभव आहे....आणि तसा जगायला मिळाले तर क्या बात आहे!!!!
    सेलेक्टेड लाइंस एकदम best आहेत.....व पु चे वैशिष्ट्य म्हणजे शब्दापलिकडे अर्थ!! आणि ते समजणे हे एक सुन्दर अनुभूती आहे.......

    अमृता (रोहनची मैत्रिण)

    ReplyDelete
  6. खुप वेगळं आणि उत्कृष्ट पोस्ट आहे. पुस्तकांच्या सान्निध्यात खुप छान वेळ जातो. वपु काळेंचं पार्टनर मी हजारदा वाचलं असेल. मला अगदी मनापासुन आवडणारं पुस्तक आहे ते, आणि दुसरं दुनियादुरी..
    नंतर जसं वय वाढंत गेलं, तसं वपुंची घासुन गुळगुळित झालेली वाक्य आवडेनाशी झालीत. हल्ली तर वपू वाचणं सोडुनच दिलंय मी..

    लहानपणी मला एकदा टायफॉइड झाला होता . दिड महिना घरीच होतो मी . तेंव्हा मी होतो सातवित. वडिलांच्या कॉलेजच्या लायब्ररीमधली बरिच पुस्तकं वाचुन काढली. वडिल स्वतः आणुन द्यायचे त्यामुळे बहुतेक सगळी ऐतिहासिकच होती.

    एक लायब्ररी होती.. तिथुनही पुस्तकं आणायचो. तिथेच एकदा जिम कॉर्बेटचं पुस्तक वाचलं होतं.. ते पण लक्षात आहे. एक पोस्ट लिहायची आहे जिम कॉर्बेटवर..

    तुझी पोस्ट वाचली आणि हे सगळं आठवलं.. म्हणुन म्हणतात, माणसाचं मन कसं?? तर ड्रंकन मंकी स्टंग बाय स्कॉर्पियो.. कधी कुठे जाईल तेच कळत नाही. मस्त आहे पोस्ट.. दुसरा भाग पण लवकर लिही.

    ReplyDelete
  7. महेंद्र, रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्याच म्हणतो आहेस ना? जबरदस्तच आहे ते.
    एक होता कार्व्हर ही असेच एक effective पुस्तक.म्हणून म्हटले नारे यादी करणेच शक्य नाही इतकी पुस्तके आणि इतके साहित्यीक आहेत.

    मला हल्ली वाटते जेवढे पावसाळे वाढतात तसे आपण फार सत्यात जगायला लागतो. अन मग ही असे”गुळगुळीत’भाव जास्तच वाढतात. असो.
    आभार.

    ReplyDelete
  8. अमृता स्वागत व अनेक आभार.हो गं, एक वेगळीच अनुभूती आहे ती.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !